जळजळीत 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 21 डिसेंबर 2020

कुतूहल 

सगळेजण जमले होते. एरवी बडबड करू पाहणारा आणि स्वस्थ न बसणारा चंदू मात्र जागच्या जागीच चुळबूळ करत बसला होता. तोंडातून हाय हुय म्हणत सुस्कारे टाकत होता. मधूनच जीभ बाहेर काढून श्वास सोडल्यासारखं करत होता. 

‘काय रे चंदू, काय झालंय?’ नानांनी विचारलं. 

पण चंदू गप्पच. नानांनाही कळेना काय प्रकार आहे ते. 

‘त्याच्या दाताखाली मिरची आलीय नाना. ती चांगलीच झोंबतेय.’ बंड्यानं माहिती पुरवली. 

‘त्याला खाण्याशिवाय काय सुचतंय! बकाबका काहीतरी खाल्लं असेल. त्यात मिरची आहे की नाही हेही पाहिलं नसणार. बरी अद्दल घडली!’

‘मिंटी, अग तो चांगलाच कासावीस झालाय. तू आणखी त्याला भडकवू नकोस.’

‘पण नाना, मिरची अशी का झोंबावी. परवाच तर आईनं मिरचीची भजी केली होती. आम्ही सर्वांनी खाल्ली. कोणालाही तिखटाचा असा त्रास नाही झाला.’

‘पण चिंगे ती भोपळी मिरची. तिची भाजीही खातो आपण.’

‘बरोबर बोललास गोट्या. चिंगे, अगं मिरचीमिरचीमध्येही फरक असतो. सगळ्याच मिरच्या काही तिखट नसतात. आईला विचार, जेवणात घालण्यासाठी सहसा थोडीफार लांबलचक मिरचीचाच वापर करते ती. पण जर लहानखुरी लवंगी मिरची असेल तर मात्र जपूनच वापर करेल ती. भज्यांसाठी किंवा भाजीसाठी वापरतो ती भोपळी किंवा सिमला मिरची अगदीच मिळमिळीत. उलट काही मिरच्या अशा ज्वलज्जहाल असतात की, जीभेला त्यांचा नुसता स्पर्श व्हायची खोटी, ब्रह्मांड आठवतं!’

‘असंच जर आहे तर मग मिरचीचा तिखटपणा समजायचा कसा? तो मोजायचा कसा?’ 

‘अॅ हॅ हॅ! काय पण प्रश्न! तू गप्प होतास तेच ठीक होतं चंद्या. तिखटपणा कसा मोजणार? काही तरीच!’

‘नाही मिंटे, चंदूचा प्रश्न रास्तच आहे. मिरचीचा तिखटपणाही मोजण्याची एक मोजपट्टी वैज्ञानिकांनी तयार केलीय. मिरचीला तिखटपणा बहाल करतं ते त्यातलं कॅप्सायसिन नावाचं रसायन. त्याचं प्रमाण किती आहे, यावर त्या मिरचीचा तिखटपणा अवलंबून असतो. त्याचाच आधार घेत स्कोव्हिल या शास्त्रज्ञानं १९१२मध्ये तिखटपणा मोजण्याची एक पद्धत शोधून काढत,  त्याची तीव्रता सांगणार्‍या एका मोजपट्टीची निर्मिती केली. तीच आता स्कोव्हिल स्केल या नावानं ओळखलं जाते.’

‘म्हणजे नाना, प्रत्येक वेळी मिरची घ्यायची आणि या यंत्रात घालून ती किती तिखट आहे हे मोजायचं. मगच तिचा वापर करायचा. भलतंच झेंगट आहे हे.’

‘तसं नाही करावं लागत. निरनिराळ्या जातीच्या मिरच्यांचा तिखटपणा या मोजपट्टीवर मोजला गेलाय. त्यासाठी स्कोव्हिलनं मानवी स्वयंसेवकांचाच वापर केला. कॅप्सायसिनच्या द्रावणात पाणी घालत त्यानं कॅप्सायसिनचं प्रमाण कमी कमी केलं आणि त्याची चव कशी लागते हे ते चाखणार्‍याकडून वदवून घेतलं. त्यानुसार तिखटाची चव कळते न कळते, अशी असताना एक मिलिलीटर द्रावणात कॅप्सायसिनचा जेमतेम एखादाच रेणू असल्याचं त्यानं अजमावलं. त्या परिस्थितीत तिखटाची मात्रा एक असल्याचं त्यानं सांगितलं. भोपळी मिरचीचा तिखटपणा तेवढा असतो. त्यानंतर मात्र या स्केलमध्ये भूमितीश्रेणीनं दहाच्या पटीत वाढ होत जाते.’

‘पण नाना हे काही बरोबर नाही वाटत. कोणाला तिखट अजिबात सहन होत नाही. तर काहीजण झणझणीत तांबडा रस्साही घटाघटा पिऊन टाकतात.’

‘खरंय तुझं म्हणणं बंड्या. म्हणूनच मग म्हणून मग क्रोमॅटोग्राफी या, रसायनांचे घटक वेगवेगळे करणार्‍या, तंत्राचा अवलंब करून एका नव्या पद्धतीची रुजवात केली गेली. मात्र त्यासाठी स्कोव्हिलच्या मोजपट्टीचाच वापर करण्यात आला. आता तर रिचर्ड कॉम्प्टन या ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापकानं अत्याधुनिक अशा नॅनोटेक्नॉलॉजीची मदत घेत हे मोजमाप अचूकपणे करण्याची नवी पद्धत विकसित केली आहे.’

‘भले शाब्बास! मग आता सर्वात जळजळीत मिरची कोणती ते समजलं असेल.’

‘हो तर! अशी मिरची सापडली आपल्याच आसाममध्ये. तोवर तो मान होता मेक्सिकोमधल्या हाबानेराकडे. तिची तीव्रता स्कोव्हिल स्केलमध्ये ८,५५,००० एवढी होती. पण ही आसामी मिरची तिच्याही पन्नास टक्के अधिक म्हणजे दहा लाखाहूनही जास्ती आहे. तिचं नावही तसंच जबरं आहे. भूत झोलोकिया.’

‘याच भूतानं चंद्याला झपाटलेलं दिसतंय.’ 

हसत हसत सगळ्यांनी बैठक आवरती घेतली.

संबंधित बातम्या