आगडोंब 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 28 डिसेंबर 2020

कुतूहल

‘काय चंदू, आज बरं वाटतंय का?’ सगळेजण जमल्याबरोबर नानांनी विचारलं.

‘हो नाना. काल काय झालं विचारू नका. चुकून माझ्या दाताखाली खिचडीतला मिरचीचा तुकडा आला. तो मी नकळत चावला आणि तोंडात जळतं लाकूड ठेवल्यासारखा आगडोंब उसळला. नाकातोंडातून आग ओकत असल्यासारखं वाटायला लागलं.’

‘अरे मग पाणी प्यायचंस. ती आग विझली असती.’

‘पाणी? काय चेष्टा करतेस काय मिंटे? आईनं ताबडतोब पाणीच दिलं मला. पण एक घोट घेतला तर विझायच्या ऐवजी ती आग पसरतच गेली. नाकाडोळ्यात जायला लागली. अधिकच झोंबायला लागली.’

‘थापा नको मारूस.’

‘थापा नाही चिंगे. तो म्हणतोय ते खरंच आहे. मिरचीचा झणका पाण्यानं थंड होण्याऐवजी उलट वाढतोच.’

‘पण नाना मिरची खाल्ल्यावर असा तोंडात वणवा पेटल्यासारखं का वाटतं?’

‘आपण ज्या ज्या चवी घेतो त्या चवीला कारणीभूत असणार्‍या पदार्थाला दाद देणार्‍या काही गाठी, काही पीटिका आपल्या जिभेवर असतात. त्या दोघांची गाठ पडली की तिथं एक विद्युतरासायनिक लोळ उठतो--’

‘----आणि त्यापायी आग पेटल्यासारखं वाटतं, समजलं चंद्या!’

‘नाही गोट्या. त्यामुळं नाही. तसं असतं तर काहीही खाल्लं, अगदी गोडाचा पदार्थ खाल्ला तरी आग आग व्हायला हवं. तसं होत नाही. कारण हा जो विद्युतरासायनिक लोळ उठतो तो जीभेवरच्या त्या गाठीशी जोडलेल्या मज्जारज्जूंकडून मेंदूकडे पोचवला जातो. मेंदू त्याचं परीक्षण करून त्याचा अर्थ लावतो. आणि आपल्याला मग ती चव कळते. ’

‘तरी पण असा आग्यामोहोळ का उठावा?’

‘कारण कॅप्सायसिनबरोबर गाठ पडल्यावर जो संदेश मेंदूला मिळतो तो अवतीभवती आग पसरलेली असली की मिळणार्‍या संदेशासारखाच असतो. त्यामुळं मेंदूकडून तोच अर्थ लावला जातो. खरोखरीच तिथं आग पेटलीय का मिरची खाल्लीय हे मेंदूला कळत नाही. तो फक्त त्या संदेशाचा जो अर्थ त्याच्या स्मृतीकोशात साठवलेला असतो तोच आपल्याला सांगतो.’

‘म्हणजे थोडक्यात मेंदूचा गोंधळ उडतो. तिखट काय आणि जाळ काय त्याला सारखंच वाटतं. त्यांच्यातला फरक त्याच्या लक्षात येत नाही.’

‘सगळ्यांचाच मेंदू काही तुझ्यासारखा नसतो चंद्या, असा गोंधळ उडायला!’

‘चंदूचं म्हणणं रास्तच आहे मिंटे. त्याच्याच कशाला तुझ्याही मेंदूचा असाच गोंधळ उडेल. मिरची खाऊन बघ म्हणजे समजेल.’

‘पण मग नाना पाणी प्यायल्यावर ती आग विझण्याऐवजी पसरते ते का?’

‘बंड्या, अरे मेंदूचा गोंधळ उडाला असला तरी पाण्याबरोबर होणार्‍या रासायनिक क्रिया वेगवेगळ्याच होतात. मला सांग  

मिरचीतला तिखटपणा कशात असतो. ’

‘तुम्हीच सांगितलयत नाना, कॅप्सायसिनमध्ये. ’

‘करेक्ट! तर हे कॅप्सायसिन पाण्यात विरघळत नाही. उलट ते पाण्याशी फटकून वागतं. त्याच्यापासून दूर जातं. त्यामुळं एका जागी असलेले कॅप्सायसिनचे कण तिथून दुसरीकडे जाऊ पाहतात. आपल्याच भाईबंदांना घट्ट पकडू पाहतात. त्यामुळं उलट त्यांची गर्दीच होऊ लागते. सगळीकडे हातपाय पसरायला लागते.’

‘एकेकटा असता तर एवढी आग नसती वाटली. पण असे एकत्र आल्यामुळं उलट त्यांचा तिखटपणा कमी होण्याऐवजी वाढतच असणार. ’

‘बरोबर ओळखलंस गोट्या. म्हणून तर तोंड तिखटानं भाजल्यावर पाणी पिऊन त्याचा ठणका कमी होत नाही.’

‘पण मग नाना, अशा मोकाट सुटलेल्या कॅप्सायसिनला आवरायचं कसं?’

‘त्याचाही उपाय आहे चिंगे. असे पाण्याशी फटकून वागणारे पदार्थ बहुतेक तेलातुपाशी गट्टी करतात. त्यांच्यात मिसळून जातात. त्यामुळं पाण्याऐवजी चमचाभर तूप खाल्लं तर ही भडकलेली आग शांत होऊ शकते. ’

‘पण घरात तूप नसेल तर!’

‘अरे तूप म्हणजे काय तर स्निग्ध पदार्थ. असा कोणताही पदार्थ, उदाहरणार्थ लोणी, चीज, चालेल. आणि समजा तेही नाही मिळालं तर कोरड्या भाताचा उंडा खाल्ला तरी चालेल.’

‘कोरडा भात? पण त्यात कुठं असतो स्निग्ध पदार्थ?’

‘बरोबर आहे गोट्या. पण त्या कोरड्या भाताला कॅप्सायसिनचे कण चिकटतात आणि मग जिभेवरून काढले जातात. जिभेवरच्या त्या गाठींशी त्यांची गाठभेट होणं टळतं. मेंदूला संदेश मिळत नाही. साहजिकच आगीची भावना होत नाही.’

वेळ संपल्यावर सगळेच उठले

संबंधित बातम्या