आरपार 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 4 मार्च 2019

कुतूहल
 

‘म्हणजे काही केल्या असा बोगदा खणताच येणार नाही? मग त्यातून प्रवास करायचा प्रश्‍नच उरत नाही,’ निराश सुरात चिंगी म्हणाली.  आपला प्रश्‍न असा निकालात निघाल्याचं तिला वाईट वाटत होतं, की तो कल्पनारम्य प्रवास करता येणार नाही याचं दुःख झालं होतं हे सांगणं कठीण होतं. 

नानांनाही तिला असं निराश करणं जड जात होतं. वस्तुस्थितीच त्यांनी सांगितली असली तरी चिंगीच्या कल्पनाशक्तीचं त्यांना कौतुकच वाटत होतं. त्यामुळं ती नाउमेद होणार नाही हे पाहणं जरुरीचं होतं. 

‘अगदीच नाही असं नाही...’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे उपाय आहे तर!’ आता सगळ्यांनाच हुरूप आला. 

‘इंग्लंडच्या शेफील्ड विद्यापीठातल्या दोन वैज्ञानिकांनी २००५ मध्ये एक मार्ग सुचवला होता. म्हटलं तर तो वेडगळपणाचाच होता. पण तसा तो एकदम सोपाही वाटत होता,’ नाना सांगू लागले. 

‘सोपा होता ना! मग सांगूनच टाका,’ चिंगी उत्साहात म्हणाली. 

‘म्हणजे असं आहे, की किरणोत्सारी पदार्थांच्या अंगी खूप उष्णता असते,’ नाना म्हणाले. 

‘किरणोत्सारी म्हणजे जे सतत घातक किरण बाहेर फेकत असतात ते?’ गोट्यानं विचारलं. 

‘म्हणजे रेडियम? त्याचा शोध मादाम क्‍यूरींनी लावला होता. पण त्यातून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळंच त्यांना कॅन्सर झाला आणि त्यांचा बळी गेला. वाचलंय मी. आमच्या शाळेच्या लायब्ररीत आहे त्यांचं चरित्र,’ चंदू म्हणाला. 
‘हो तसंच. पण फक्त रेडियमच नाही. इतरही अनेक आहेत. तर या दोघा विक्षिप्त विद्वानांनी गणित करून दाखवलं, की एक फूट व्यासाचा ६० अणुभाराचा कोबाल्टचा एक गोल घ्यायचा. त्यातून खूपच ऊर्जा असलेले किरण बाहेर पडतात. त्या गोलावर टंग्स्टनचं कवच घालायचं,’ नाना म्हणाले. 

‘कशासाठी?’ न राहवून गोट्यानं विचारलं. 

‘अरे टंन्ग्स्टन हा मोठा टणक धातू आहे. सहजासहजी त्याच्यावर ओरखडे पडत नाहीत. शिवाय त्या कोबाल्टच्या उष्णतेपायी त्याला भोकही पडण्याची शक्‍यता नाही. तर असा गोल घ्यायचा आणि तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठेवून द्यायचा. त्यातली उष्णता मग पृथ्वीला वितळवायला लागेल आणि तो गोल हळूहळू आपोआप खोलखोल जात राहील. पृथ्वीला भोक पडायला लागेल. तुम्हाला हवा असलेला बोगदा आपोआप खणला जाईल. ऑटोमॅटिक,’ नाना म्हणाले. 

‘पण नाना तुम्हीच तर आता म्हणालात ना की पृथ्वीच्या आत खूप उष्णता असते,’ मिंटीनं विचारलं. 

‘हो ना. जसजसं आपण जास्तीत जास्त खोलवर जाऊ लागतो तसतसं तिथलं तापमान वाढतच जातं,’ नानांनी माहिती दिली. 

‘पण मग तो वितळलेला दगडांचा रस असतो त्याचं काय?’ चिंगीनं विचारलं. 

‘तो पृथ्वीचा गाभा. तिथं तो शिलारस असतो,’ नाना म्हणाले. 

‘..आणि तो खूप उष्ण असतो. तर मग तो किरणोत्सारी कोबाल्ट कशाला?’ चंदूनं विचारलं. 

‘माझ्या सांगण्याकडं लक्ष आहे तर तुमचं! छान, छान. पण त्या गाभ्यापर्यंत पोचायच्या आधीच ते टणक खडक लागतील त्यातून पुढं कसं जाणार? ते फोडण्यासाठी आपल्याकडं कोणतंही त्या ताकदीचं ड्रिल मशिन नाही. म्हणून ते वितळवायला आणि बोगदा पुढं सरकवायला साधारण १००० अंश सेल्सियस इतकं तापमान गाठायला हवं. त्यासाठी कोबाल्टमधली उष्णता वापरायची आणि पुढं गेल्यावर गाभ्यात जे साडेतीन हजार अंश सेल्सियसचं तापमान लागेल त्याला पुरून उरण्यासाठी टंग्स्टनचं कवच. कारण टंग्स्टन साडेतीन हजार अंशालाही वितळत नाही. त्यामुळंच ती कोबाल्ट-टंग्स्टनची कुपी व्यवस्थित टिकेल आणि पुढं पुढं जात राहील. पार दुसऱ्या टोकापर्यंत. आरपार...’ नाना उत्तरले. 

‘पण ते किती वेळात गाठता येईल?’ मुलांचे प्रश्‍न संपत नव्हते. 

‘त्याचंही गणित त्या वैज्ञानिकांनी केलंय. त्यांच्या मते पहिल्या वर्षात वीस किलोमीटर खोलवर जाता येईल. त्यानंतर हळूहळू पुढच्या तीस वर्षांमध्ये आणखी शंभर किलोमीटरपर्यंत पोचता येईल. जसजशी ती कुपी पुढची मजल मारेल तसतसा त्याच्या पाठचा वितळलेला खडक परत गोठून पूर्वीसारखा होईल. पण तसं होताना त्या प्रक्रियेतून काही आवाज बाहेर पडतील. ते ऐकू येण्याची व्यवस्था करता येईल आणि त्यातून त्या कुपीचा प्रवास कसा होतोय हे तर समजेलच. पण पृथ्वीच्या ज्या अंतरंगातून हा प्रवास होतोय त्याचीही माहिती तो आवाज देत राहील,’ नानांनी माहिती दिली. 

‘म्हणजे आमचे बाबा नेहमी म्हणतात ना तसे आमके आम...’ मिंटी म्हणाली. 

‘... और गुठलियोंके भी दाम!’ इतर सगळ्यांनी तिची म्हण पूर्ण केली.

संबंधित बातम्या