नक्की लग्न करायचेय का? 

गौरी कानिटकर
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

लग्नविषयक...
पालकांच्या दृष्टीने मुला-मुलींचे लग्न हा अलीकडे चिंतेचा विषय होऊ लागला आहे. ‘मुलांना खरेच लग्न करायचे आहे की नाही?’ हा कळीचा मुद्दा बनू लागला आहे. पालक एका मुद्द्यावर ठाम आहेत, तर मुले एका मुद्द्यावर! यातून मध्यम मार्ग काय? या सदरातून ‘लग्नविषयक...’ अशा अनेक विषयांवर चर्चा...

‘काय सुमे, लग्न कधी करत्येस लेकीचं? किती वर्षांची झाली आता संजना?’ 
‘अगं मला गेल्या वर्षीच करायचं होतं तिचं लग्न. पण ती तयारच नाहीये लग्नाला. म्हणते आत्ता नको..’ प्रतिभा सांगत होती. 

‘काही कळत नाही या मुलांचं. आमचा अमितपण नाही तयार लग्नाला. अजून मी ‘प्रीपेअर’ नाही म्हणे लग्नाला. सेटल व्हायला अजून वेळ आहे. म्हणून म्हणे नको इतक्‍यात..’ अनु म्हणाली.. ‘पण मला अजून एक प्रश्‍न पडतो की शारीरिकदृष्ट्यासुद्धा या मुलांना वेळेवर लग्न करावं असं वाटत कसं नाही?’ 

प्रतिभा म्हणाली, ‘मला तर कधी कधी वाटतं, की तिला बहुतेक लग्नच करायचं नाहीये. कारण, वाट्टेल ती कारणं सांगून स्थळ नाकारते. काही जणांमध्ये म्हणे ‘नवरा मटेरिअल’ नाही, तर एखाद्याचे नावच आवडत नाही. कुणाचे घर चांगल्या लोकेशनला नाही, तर कुणाच्या घरातले फर्निचर निवडण्याची दृष्टीच रसिक नाही...’ 

‘अगं माझी ही लेक झाली ना आता अठ्ठावीस वर्षांची आणि तिच्यानंतर दुसरी आहे ना. खरे तर तिचेही वय झालेय आता लग्नाचे; पण मोठीचे झाल्याशिवाय धाकटीचे कसे करणार? आणि शिवाय मला एकटीलाच पाहायचे ना सगळे. मी तर सिंगल पेरेंट आहे. मला तर खूप टेंशन येते. मनात विचार आला की झोप उडते माझी...’ 

‘हो ना, मला तर आता काहीच सुचत नाहीये. वय वाढल्यावर लग्न होणार नाही असे म्हणाले तर म्हणते, की नाही झालं लग्न 
तर नाही. त्यात काय एवढं? पण मला चैन पडेल का? आता स्वतःचं स्वतः जमवलेले नाही म्हणजे मलाच पाहावे लागणार ना!’ 

सुमा, प्रतिभा, अनु, छाया... अशा सगळ्याजणी जमल्या होत्या भिशीला. सगळ्यांची मुले लग्नाच्या वयातील होती. गेले तास - दीड तास खळाळून हसत गप्पा मारणाऱ्या सगळ्याजणी आपल्या मुलांच्या लग्नाचा विषय निघाल्याबरोबर 
सगळ्या गंभीर झाल्या होत्या. 

काय?? तुझ्या घरचे तुझ्या लग्नाच्या मागे आहेत? इतक्‍यात?  २६ व्या वर्षी? कमाल आहे... आणि तू ऐकत्येस त्यांचे? ए ऐका सगळ्यांनी... प्रणिता काय सांगत्येय? म्हणे आता तिच्यासाठी लग्नाचे पाहणारेत...’ 
‘ए प्राची, अगं केवढी ओरडत्येस? असे काय जगावेगळे सांगितलेय गं तिच्या घरच्यांनी? आपल्या सगळ्यांच्या घरी थोड्या फार फरकाने हेच चाललेय की...’ 
‘अरे समीर, हे तू बोलतोयस? तुला काय जातंय? अजून २ - ३ वर्षे नोकरी करून जरा सेटल होऊ दे ना तिला... तुम्ही मुलगे म्हणजे ना!’ 
‘समीर, प्राची म्हणत्येय ते बरोबर आहे. जोवर प्रणिताला मनापासून वाटत नाहीये, तोपर्यंत लग्नाची घाई कशाला करतात घरातले?’ 
‘पण प्रणिताला विचार ना तिला काय हवेय? खरेच तिला नकोय का इतक्‍यात लग्न?’ 
‘प्रणिता कडाडून विरोध कर गं. अरे एकविसाव्या शतकात राहतोय आपण. आपल्या मताला काही किंमत आहे की नाही? अरे काय कमाल आहे, जरा शिक्षण पूर्ण होऊन जॉब सुरू झाला की लागलेच लग्नासाठी मागे. मला तर वाटते, की लग्न 
म्हणजे काय आयुष्याची इतिकर्तव्यता आहे का?’ 
‘आपल्या घरातल्या लोकांना तर लग्नाशिवाय काही सुचतच नाही. मला तर हल्ली घरीच जायला नको वाटते. माझ्या आईने तर कुठेतरी नाव पण register केलेय... आणि सारखी त्या कॉम्प्युटरसमोर बसलेली असते. कसली कसली स्थळे शोधत असते. परवा तर एक टकलू मुलगा शोधला होता, इतके कमी केस होते त्याला... आणि परत मला म्हणते, काय वाईट आहे? शेवटी परवा मी तिला म्हणालेदेखील की तुला मी नकोच आहे घरात. मग काय करणार? शेवटी बोलावेच लागले मला असे. घरात तर फक्त लग्नाचाच विषय. कंटाळा आलाय मला...’ 
प्रणिता, प्राची, समीर आणि त्यांची मित्रमंडळी सगळ्यांची नेहमीचीच चर्चा.

खरेच या मुलांना नक्की लग्न करायचेय का? 
समस्त पालकांना पडलेला हा प्रश्‍न आहे. मुला - मुलींना नेमके काय म्हणायचेय, हे पालकांना समजत नाही आणि त्यांना समजेल 
असे सांगण्यात या मुलांना रस नाही. 
आपल्या मुलांची लग्ने हा सध्या आपल्या समाजात ऐरणीवरचा विषय आहे. एक तर मुले - मुली लवकर लग्नाला तयार होत 
नाहीत... आणि कधी कधी पालकांच्या दबावाला बळी पडून लग्नासाठी स्थळ शोधायला तयार होतातसुद्धा; पण मग त्यांच्या अपेक्षा आणि पालकांच्या अपेक्षा या अजिबातच जुळत नाहीत. खरोखरच लग्न यांना करायचेय की नाही असा विचार पालकांच्या मनात येणे अगदी साहजिकच आहे. 

मुळातच लग्न हा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, हे या नवीन पिढीलाही मान्य आहे, त्यांना लग्न करायचेदेखील आहे... 

पण लग्न म्हणजेच आयुष्य यावर त्यांचा विश्‍वास नाही. लग्न = पूर्ण आयुष्य, या समीकरणावर त्यांचा विश्‍वास नाही.. आणि असे करायला ते कडाडून विरोधही करत आहेत. लग्नामुळे माझे आयुष्य बदलणार आहे, याचाच कुठेतरी धसका या मुलांनी घेतल्याचे मला अनेकदा जाणवते. लग्न व्हायलाच पाहिजे, या नोटवर पालक ठाम आहेत, तर ‘हवे तसे मिळाले तरच लग्न, नाहीतर नाही झाले लग्न तरी चालेल’, अशा नोटवर मुले - मुली आहेत. 

अनेकदा पालक त्यांचे लग्न ज्या वयात झाले आहे त्या वयाची आणि मुलांच्या आत्ताच्या वयाची तुलना करतात. मग त्यांना त्याचे टेंशन येते. त्यांना असे वाटत राहते, की अजून लग्नाला पत्ता नाही, मग पुढच्या गोष्टी कशा होणार? सगळे काही 
वेळेवर झालेले बरे असते... 

या सगळ्या विचारांमध्ये तथ्य आहे यात शंकाच नाही. पण आपल्या मुलांशी बोलताना, त्यांना पटवून सांगताना मुला/मुलींची लग्नाच्या संदर्भातली मानसिकता समजून घेणे खूप गरजेचे आहे. का बरे मुले - मुली लग्न लांबणीवर टाकत असतील? इतकी शिकलेली मुले - मुली आहेत, पण मग वेळेवर लग्न करावे असे त्यांना का वाटत नसेल? 

लग्नाबद्दल, आपल्या जोडीदाराबद्दल ते काय विचार करत असतील? आपल्या जोडीदाराबद्दल त्यांच्या अपेक्षा काय आहेत? त्या अपेक्षा कशा पक्‍क्‍या करायच्या? 
लग्न म्हणजे काय असते? त्यांना नेमके काय हवेय? 

पालकांची मानसिकता कशी आहे? पालक काय विचार करतात? कोणता संदेश पालक आपल्या मुलांना देतात? 
आणि एकदा लग्न झाल्यावर एकमेकांशी जुळवून कसे घ्यायचे? त्यासाठी काही कौशल्यांची गरज आहे का? 

लग्नविषयक या आणि अशाच वेगवेगळ्या प्रश्‍नांची उत्तरे आपण या सदरामधून शोधणार आहोत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या