लग्नाची मानसिक तयारी

गौरी कानिटकर
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

लग्नविषयक...
पूर्वी मुलींना तर लग्नासाठी अगदी लहानपणापासूनच तयार केले जायचे. अगदी पद्धतशीरपणे. या कार्यक्रमात शाळाही अग्रेसर असायच्या.

आमच्या एका कार्यशाळेत लग्नाची मानसिक तयारी या विषयाबाबत आम्ही बोलत होतो. जवळपास तीनशेपेक्षा जास्त मुले - मुली कार्यशाळेला उपस्थित होती. सहजपणाने जेव्हा मी त्यांना विचारले, की ज्याअर्थी तुम्ही आजच्या कार्यक्रमाला आला आहात त्या अर्थी तुम्ही सगळे लग्नासाठी तयार आहात. लग्नाची  मानसिक तयारी काय काय केली आहे? 

सगळेच थोडे विचारात पडले. मानसिक तयारी? असे काही असते? 
कुणी म्हणाले, सर्वांत प्रथम अपेक्षा सेट करायला हव्यात. 
कुणी म्हणाले, मेडिकल चेक अप करायला पाहिजे. तर एक मुलगी म्हणाली, मी आता जरा जरा स्वयंपाक शिकणार आहे. 
तर एक मुलगा म्हणाला, पैशाचे नियोजन करणे फारच आवश्‍यक आहे. 

मला तर नेहमी वाटते, की काय विचारले आहे आणि आपण उत्तरे काय देतो आहोत याचा अनेकदा गोंधळ होत असतो. लग्नाच्या बाबतीत तर तो फारच जास्त आहे असे मला वाटते. लग्नाची मानसिक तयारी.. काय असू शकते असे विचारल्याबरोबर अनेक गोष्टी.. अगदी मेडिकल चेकअपपासून ते स्वयंपाकापर्यंत अनेक गोष्टी मनात येतात. तसे पाहता यात दोष असा कुणाचाच नाही. पण लग्न करायचे हे ठरल्यानंतर - अगदी त्या क्षणापासून घरातल्या सगळ्यांना अनेक गोष्टी सुचायला लागतात. 

‘किती उशिरापर्यंत झोपून राहतेस गं? लग्नानंतर चालेल का असं?’ कोणत्याही लग्नेच्छू मुलीची आई. 
‘समीर, अरे रोज रात्री किती उशिरापर्यंत घराबाहेर असतोस. रात्रीचे जेवण झाले की रोज रात्री मित्रांना भेटायला बाहेर... लग्नानंतर हे चालणार नाही असे...’ कोणत्याही लग्नेच्छू मुलाची आई. ‘अगं घरात शॉर्टस घालू नकोस. ही सवय बदलायला हवी. लग्नानंतर नाही चालणार... ‘ती’ची आई. ‘अरे, आता पैसे द्यायला लागा घरात. लग्न करायचंय ना, जबाबदारीची जाणीव व्हायला हवी,’ ‘त्या’चे बाबा. 

ही अगदी काही प्रातिनिधिक उदाहरणे. 
मला कायमच या गोष्टीची गंमत वाटते. वरची सगळी उदाहरणे पाहिलीत तरी लग्न करायचे असले किंवा नसले तरीही वागण्याच्या तऱ्हा लग्नानंतर बदलल्या पाहिजेत, किंबहुना लग्न करायचे असेल तर या या गोष्टी बदलायला हव्यात. असे का बरे असावे? 

  • घरात पैसे द्यायला हवे, हे पैसे मिळवायला लागल्यानंतर लगेच का घडू नये? 
  • उशिरापर्यंत झोपून राहणे हे लग्नाच्या आधी तरी का चालावे? लवकर उठण्याचे फायदे तर सगळ्यांनाच माहीत असतात. 
  • रात्री रोज उशिरापर्यंत बाहेर असणे... ही सवय लग्नानंतर अचानक कशी बदलेल? 
  • घरात कोणते कपडे घालावेत? घरातल्या सगळ्यांना लाज वाटणार नाही, असे कपडे असावेत, या सगळ्याचा लग्नाशी काय संबंध? 

खरे तर या सगळ्या गोष्टी वयाच्या त्या त्या टप्प्यावर सहजपणाने व्हायला हव्यात. आत्ताच्या पालक पिढीने त्या सहजी आत्मसात केल्याही होत्या. पण अचानकपणे या गोष्टी सांगितल्या तर त्यात बदल करणे किती अवघड जाईल. 
मला काही काही पूर्वीच्या गोष्टी खरोखरीच मनापासून आवडतात.. आणि पटतातही. 
माझ्या लहानपणी घरातली खूप कामे आम्ही करायचो. मी आणि माझे दोन्ही भाऊ, आई आणि बाबा... असे घरातले 

सगळेजण काम करत असू. आई माझ्यासाठी रोज शेवटच्या दोन पोळ्या करायला ठेवत असे. त्यावेळी मला ते फारसे आवडत नसे. पण नाही म्हणायची प्राज्ञा नव्हती. (आणि नंतर त्याचे फायदे लक्षात आल्यावर तर आईने जबरदस्ती केली हे बरेच वाटले होते) हळू हळू रोज दोन पोळ्या करून चांगली सवय होत गेली. आम्हाला कुणालाच घराबाहेर उशिरापर्यंत राहण्याची परवानगी नव्हती. माझ्या मैत्रिणी आणि आसपासची घरे यांच्याकडचे वातावरणही थोड्या फार फरकाने असेच असायचे. 
त्यामुळे झाले काय, लग्नासाठी अशी वेगळी तयारी करण्याची गरजच भासली नाही. आज मुला - मुलींचे लग्नाचे वय पूर्वीच्या मानाने बरेच पुढे गेले आहे. बाहेरच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा घरातली परिस्थितीही बदलली आहे म्हणून म्हणा, लग्नासाठी वेगळी तयारी करणे गरजेचे भासू लागले आहे. घरातल्या थोड्या थोड्या जबाबदाऱ्या लहानपणापासून अंगावर पडल्या तर आपोआपच तयारी होत जाईल. पण घरातले कुठलेच काम मुलांना/मुलींना सांगितले जातेच असे नाही. 

आई वडिलांना मुलांचे अभ्यास, त्यांचे वेगवेगळे क्‍लासेस.. प्रत्येक बाबतीत आपले मूल पहिले येण्याचा अट्टहास या सगळ्याची  मातब्बरी जास्त वाटते. या सगळ्यामध्ये आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवण्याचे/शिकण्याचे राहूनच जाते. मग आता लग्न करायचे असे ठरताक्षणी वेगवेगळ्या गोष्टी आठवायला लागतात. मग वरती आपण पाहिले त्याप्रकारच्या सूचना पालक मंडळी करू लागतात. 

पूर्वी मुलींना तर लग्नासाठी अगदी लहानपणापासूनच तयार केले जायचे. अगदी पद्धतशीरपणे. या कार्यक्रमात शाळाही अग्रेसर असायच्या. माझ्या शाळेत तर (हुजूरपागा) गृहजीवन शास्त्राचा तासच असायचा. शिवाय वार्षिक परीक्षेला एक पदार्थ शाळेत  करून दाखवायचा असे. त्यासाठी शाळेनेदेखील जय्यत तयारी केलेली असायची. आमच्या शाळेत ३० ते ३५ स्टोव्ह होते. त्यावर आमची ही प्रात्यक्षिकांची परीक्षा व्हायची. शिवाय शिवणकाम, विणकाम या गोष्टी असायच्याच. हळू हळू या गोष्टी अंगवळणी पडायच्या. त्याच बरोबर सायकल चालवणे, पोहणे हे सुटीमध्ये असायचेच. मुलांना पण वेगळ्या पद्धतीने शिक्षण मिळत असे. आमच्या शेजारी राहणारे काका तर सायकलचे अनेक भाग सुटे करून मग जोडण्याचे काम आम्हाला अगदी सहजपणाने शिकवत असत. काही वर्षांपूर्वी मुलांचे - मुलींचे  तुलनेने घरात राहण्याचे प्रमाणही जास्त होते. निरीक्षणातून शिकण्याची सवय तिथेच लागली असावी. 

लग्नाचे वेगळे असे शिक्षण खरे तर नाहीच. आपले रोजचे जगणे डोळसपणाने असणे हीच ती तयारी. 

अगदी साधेसुधे मुद्दे पाहूया ः 
सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ठरवणे. सध्याच्या मुलींच्या / मुलांच्या अपेक्षा या कागदावरच्या असतात. 
म्हणजे रसिका आली होती, तिला विचारले काय अपेक्षा तुझ्या? - तर अमुक एक package असावे त्या मुलाचे, अमुक एक शिक्षण असावे, गाडी वगैरे तर हवीच, घरही मोठे असावे, त्याच्यावर जबाबदारी नसावी - अर्थात आर्थिक.. इत्यादी इत्यादी. मी या सगळ्या अपेक्षांना कागदावरच्या अपेक्षा म्हणते. लग्न हे त्या पलीकडे काहीतरी देणारे आहे. लग्नाकडून आपल्याला वेगळ्या गोष्टी मिळायला हव्यात. सध्या चाललेल्या आयुष्यात काहीतरी नवीन इंटरेस्टिंग भर पडली पाहिजे. ज्या वेळी कोणतीही मुलगी किंवा कोणताही मुलगा स्वतःच्या अपेक्षा ठरवायचा विचार करतो त्यावेळी खरे तर मी स्वतः कशी आहे किंवा कसा आहे, हा विचार प्रथम करायला हवा. अगदी एका शब्दात सांगायचे तर स्वतःच्या स्वभावाचा अभ्यासच हवा. मी किती लवचिक (flexible) आहे, मला माझ्यात बदल करता येऊ शकतो का? 

माझ्या मनाला न पटणारी गोष्ट / घटना / प्रसंग घडत असेल, तर मी त्याला सामोरी जाताना कशी / कसा वागेन? माझी सपोर्ट सिस्टिम किती मजबूत आहे? मी किती धीट आहे? मला कोणकोणत्या गोष्टींची भीती वाटते? इत्यादी इत्यादी. असे अनेक मुद्दे आहेत. 

अनेकदा मुले ः मुली माझ्यासारखाच माझा जोडीदार असावा असा आग्रह धरतात. ‘माझ्यासारखा’च जोडीदार कसा मिळेल? जगात इतकी असंख्य माणसे राहतात, एक तरी माणूस जसाच्या तसा दुसऱ्यासारखा आहे का? दिसण्यात, स्वभावात अशा  शेड्‌स वेगळ्या असणार नाहीत का? त्या व्यक्तीचे संस्कार वेगळे, तो ज्या परिस्थितीत वाढला असेल ती परिस्थिती वेगळी, हे सगळेच वेगळे असू शकते. 
आणि अगदी निराळ्या दृष्टीने विचार केला तरी ‘माझ्याच’सारख्या असणाऱ्या माणसाबरोबर राहण्यात काय मजा? थोडक्‍यात सांगायचे, तर माझ्याच झेरॉक्‍स कॉपीबरोबर मला राहायला आवडेल का, हाही विचार करावा. दुसरे म्हणजे समोरच्या माणसाला हळू हळू उलगडत नेत, त्याप्रमाणे अंदाज घेत स्वतःला adjust करत जाण्यातली मजा काही औरच असते! त्याच्याबरोबर असताना स्वतःच्याही कम्फर्टचा शोध घेत जाणे हा प्रवास आनंददायी असू शकतो. त्यामुळे अपेक्षा ठरवताना या साऱ्याचा विचार हवा. शिवाय अपेक्षा वास्तववादी हव्यात. स्वतःला नीटपणे आरशात न्याहाळता यायला हवे. माझे बाह्यरूप आणि आतले रूप.. माझ्यातले स्ट्राँग मुद्दे, माझी वैगुण्ये मला माहीत हवीत. मी असेन समजा सावळी तरीही आत्मविश्‍वासाचा glow माझ्या चेहऱ्यावर येण्यासाठी मी काय करू शकेन याचा विचार करायला हवा. कारण काही गोष्टी आपण बदलू शकणार नाही. पण काही गोष्टी मात्र आपल्याला नक्की बदलता येतात, त्या बदलण्याची हिंमत आपल्यात हवी. 

मीरा जेमतेम पाच फूट उंचीची. कदाचित एखादा इंच कमीच; पण ड्रेस सेन्स इतका योग्य, (apt) की तिची उंची आहे त्यापेक्षा जास्त भासावी. नीरज दिसायला चारचौघांसारखा, पण बोलणे इतके प्रभावी आणि लाघवी की त्याच्याशी बोलता बोलता त्याच्या रुपाकडे लक्षच जाऊ नये. अशी कितीतरी उदाहरणे आपण आपल्या आसपासदेखील पाहात असतो. 

अपेक्षा ठरवत असताना आपल्या कानावर आलेले काही अनुभव किंवा काही मित्रमैत्रिणींचे अनुभव हेही अनेकदा खूप मोठी भूमिका बजावत असतात. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की हा अनुभव त्यांचा आहे, तो अनुभव माझा नाही. मी आणि तो / ती वेगळे आहोत, त्यामुळे जसाच्या तसा अनुभव माझ्या वाट्याला येणे ही गोष्ट खूप दुरापास्त आहे. त्यामुळे इतरांना आलेल्या अनुभवावर मी माझे मत कधीही बनवू नये. त्या व्यक्तीचा अनुभव ही त्याची खासगी मालमत्ता असते. ती माझी होऊ शकत नाही. 

तुम्हाला काय वाटते? नक्की कळवा. आपण याच सदरामधून त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया...

फोटो फीचर

संबंधित बातम्या