अपेक्षांचा महासागर..(पालकांचाही)!

गौरी कानिटकर
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

लग्नविषयक...
लग्न म्हटले की उत्साह, आनंद तर असतोच; पण त्याचवेळी विशेषतः मुला-मुलींचे पालक काहीसे धास्तावलेलेही असतात. विवाहेच्छु मुले-मुली, त्यांचे पालक यांच्या या मनःस्थितीचा विचार करून काही गोष्टींवर त्यांच्याबरोबर संवाद साधणारे पाक्षिक सदर. 

ही प्रोसेसच नको वाटते. कुठेतरी नाव नोंदवायचे आणि मग कोणत्याही मॉलमध्ये जसे ड्रेस बघायचे, ना तसे कॉम्प्युटरवर मुलं शोधायची... मग त्यांचे ते अगदी अनप्रोफेशनल फोटो पाहायचे, चेहऱ्यावरच्या रेषांवरून त्याला जोखायचे आणि मग त्यातल्या त्यात बरा वाटला (म्हणजे आईला बरा वाटला तर...) तर त्याला इंटरेस्ट पाठवायचा. त्यातून मुलांचे फोटो तर काय दिव्य असतात, बहुतेक मुले गॉगलमधले फोटो का देत असतील? मी नाही बघणार...’ सायली वैतागली होती. 
‘अगं पण मग काय करायचं? आपण तुझ्यासाठी स्थळं पाहायचीच नाहीत?’ सायलीची आई पौर्णिमाताई. ‘स्वतःला दाखवून काय घ्यायचं? येईल त्याची वेळ झाल्यावर माझ्यासमोर..’ - सायली.  ‘तर तर मोठी लागून गेल्येय.. म्हणे येईल समोर!’ - इति पौर्णिमाताई.  माझ्या समोरच दोघींची वादावादी चालली होती. 
***
हर्षल आणि त्याचे बाबा आले होते. हर्षल एका मुलीला - स्वप्नालीला  भेटला होता. एकदा - दोनदा नाही, तर चांगला चार वेळा भेटला होता. हर्षलच्या बाबांना आणि आईलादेखील स्वप्नाली खूप आवडली होती. शिक्षण, उंची, दोघांच्या वयातले अंतर, शिवाय आर्थिक परिस्थिती अगदी जुळेल अशी होती. दिसायलापण स्वप्नाली छान होती. शिवाय त्यांच्या मते थोडीशी नम्रपण होती. पण चार वेळा भेटूनदेखील हर्षल होकाराच्या निर्णयापर्यंत पोचत नव्हता. 
त्याच्या आईबाबांना आता टेंशन आले होते. ‘किती वेळा भेटणार ना? झाले आता चार वेळा भेटून.. आणि १५-२० मिनिटे नाही, तर चांगले दीड - दीड तास भेटले आहेत प्रत्येक वेळी. शेवटी काय आहे ना वीस भेटी घेतल्या तरी त्या कमीच वाटतील. आम्हालापण स्वप्नालीच्या आईवडिलांना काही तरी सांगायला पाहिजे. आता नकार द्यायचा तर ते म्हणतील मग भेटला कशाला चार चार वेळा? कसा तिढा सुटायचा? आणि उगीच काय नकार द्यायचाय? म्हणे क्‍लिक होत नाहीये. मग भेटलास तरी कशाला इतक्‍या वेळा?’ हर्षलच्या बाबांचा पारा हळू हळू चांगलाच चढू लागला होता. 
‘पण बाबा, मला ती माझ्यासाठी योग्य नाही वाटत. असे का वाटते ते मात्र मी नाही सांगू शकत. तुम्ही म्हणताय ते पटते मला. पण केवळ तिढा सोडवायचा म्हणून तिला होकार द्यायचा? ती चांगली आहे.. अगदी सर्वार्थाने; पण मला होकार द्यावा असे नाही वाटत. माझ्यासाठी ती योग्य नाही असे वाटतेय.’ 
***
असे अनेक प्रसंग माझ्यासमोर सातत्याने, अगदी जवळ जवळ रोज घडत असतात. लग्न ही गोष्ट मुले - मुली जेव्हा लांबणीवर टाकत असतात, त्यावेळी पालक अस्वस्थ होतात. पालक हात धुऊन मागे लागले, की मुले - मुली अस्वस्थ होतात. का टाकत असतील मुले लग्न लांबणीवर? कोणतीही डिग्री घेताना मुले - मुली केवढा तरी अभ्यास करतात, मग लग्नासारखी आपल्या आयुष्यातली इतकी महत्त्वाची गोष्ट - त्याबद्दल मुले - मुली का विचार करत नसतील? लग्न हा विषय ऑप्शनला टाकल्यासारखे का करत असतील? 

याचा विचार करताना मला काही मुद्दे लक्षात येतात.

पालकांचे नियंत्रण 
आपल्या मुला - मुलीचे लग्न अरेंज्ड मॅरेज असेल, तर पालकांचे नियंत्रण खूप जास्त दिसते. ‘मला माझा पार्टनर कसा हवा’ याचा विचार मुला-मुलींनी करण्यापेक्षा त्यांचे आईवडीलच जास्त करतात. म्हणजेच ‘मला जावई कसा हवा’ किंवा ‘मला माझी सून कशी हवी’ असा विचार जास्त होताना दिसतो. 
..आणि त्याबद्दल घरात जरा जास्तच चर्चा होताना दिसते. ‘सोनाली, तुला आधीच सांगते, नवरा चांगला रुबाबदार हवा हं.. माझ्या मैत्रिणींच्या सगळ्या जावयांपेक्षा माझा जावई चांगला उठून दिसला पाहिजे माझ्या ग्रुपमध्ये! आणि उंच, भरपूर पैसे मिळवणाराही हवा. तुला किती सुखात वाढवलंय आम्ही... अगदी तळहातावरच्या फोडासारख जपलंय..’ 

‘अभी, तू तिला भेटायला जाशील तेव्हा स्मार्टली सगळं विचारून घे. स्वयंपाक येत नसला समजा तरी शिकायची तयारी असायला हवी.. आणि नोकरी पण हवी बरं का... कारण घरात बसून तरी काय करणार? आणि हल्लीच्या मुलींबद्दल पण काय काय ऐकायला येतं..  दिसायला सुंदर नाजुकशी हवी. हल्ली मुली किती जाड असतात.. अरे आणि आपल्या घरात तरी मुलगी कुठाय? तिनेही राहावं की मुलीसारखं आपलं घर समजून.. आणि आपल्याकडे काही कमी आहे का? आहे सगळं परमेश्‍वर कृपेने... तुम्हाला काही म्हणजे काऽऽऽऽही करायला नको.’ 

‘हॅलो, कोण बोलतंय? हां हां तुम्ही होय? हो हो मेल मिळालीय तुमची.. अहो पण त्यात तुम्ही लिहिलंय की मुलाला एक बहीण आहे म्हणून आणि ती पुण्यातच असते. पण मग तिचं जाणं - येणं किती असतं तुमच्या घरात?... हो बरोबर आहे, तिचंही घर आहे हे मान्य आहे मला, पण कसं आहे ना हल्ली लग्न झालेल्या मुलींचंपण प्रस्थ असतं हो घरात.. आणि आमच्या बबडीला काही म्हंजे काही करायची सवय नाहीये. मी मुद्दामच कामाची सवय लावली नाहीये तिला. बबडी म्हणजे तेच हो प्राचीच. लाडाने आम्ही बबडी म्हणतो तिला. तशी ती फार फ्लेक्‍झिबल आहे बरं का! ज्या घरात जाईल ना ते भाग्यवान..’ 

लक्ष्मी-नारायणाचा जोडा 
लक्ष्मी-नारायणाचा जोडा ही आपल्याकडची एकदम पॉप्युलर संकल्पना. गंमत म्हणजे ही संकल्पना सगळी बाह्य गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे उंची, वय, वर्ण, शिक्षण, पगार.. या गोष्टी कशा साजेशा आणि अनुरूपच असायला हव्यात. 

उंचीच्या बाबतीत पण सगळी मंडळी भारी संवेदनशील असतात. जोडा एकमेकांना शोभून दिसला पाहिजे, असे वारंवार बोलले जाते.  तसे पाहिले तर आयुष्यात एकदाच फक्त स्वतःच्या लग्नातल्या रिसेप्शनला आपण नवरा - बायको शेजारी शेजारी उभे राहतो. त्यानंतर शेजारी शेजारी उभे राहिलेले नवरा बायको मी तरी पाहिलेले नाहीत. त्यातल्या त्यात आपल्या मुला- मुलींच्या लग्नात आईवडील शेजारी शेजारी उभे राहतात, पण त्या वेळेपर्यंत पुलाखालून इतके पाणी वाहून गेलेले असते, की त्यावेळी हा उंचीचा मुद्दा रद्दबातल झालेला असतो. 

अरेंज्ड मॅरेज 
तसेही लग्न अरेंज्डच करायचे आहे ना? मग कशासाठी तडजोड करायची? अगदी जसा हव्वा तस्साच जावई किंवा हव्वी तशी सून  मिळाला - मिळाली पाहिजे. पहिल्याच स्थळाला कुठे हो म्हणायचे? आत्ता तर सुरवात केलीय. जरा एक - दोन वर्षे जातातच असे वाटले होते. पण त्यामुळे अगदी पहिल्याच स्थळाला कुठे होकार द्यायचा? आणि तडजोड तरी का करायची? प्रत्येकच गोष्ट मनासारखी मिळायला हवी. 

घरात सुसंवादाचा अभाव 
अनेकदा तर कोणत्याही विवाहसंस्थेत नाव नोंदवताना पालक आपल्या मुला - मुलींना विश्‍वासात घेतच नाहीत. त्यांना न सांगताच नाव नोंदवले जाते. बरे कधी कधी नाव नोंदवताना सांगत असतीलही, पण त्यानंतर मात्र अनेकदा त्यांना बऱ्या वाटलेल्या स्थळांना पालकच इंटरेस्ट पाठवतात किंवा एखाद्याकडून आलेल्या इंटरेस्टला आपल्या पाल्यांना न विचारता तो इंटरेस्ट नाकारतात. 

घरात जर मुलगा किंवा मुलगी लग्नाची असेल, तर त्यांच्याशी घरात फक्त आणि फक्त त्यांच्या लग्नाबद्दलच बोलले जाते. जणू काही जगातले सगळे विषय संपलेत. 

कुंडली जमवून पाहण्याचे प्राबल्य 
पत्रिका पाहण्याचे प्रमाण विलक्षण वाढले आहे. पत्रिकेचेच जवळ जवळ किमान दहा तरी मुद्दे असतात. गण, गोत्र, नक्षत्र, रास, ग्रह (त्यात शुभ ग्रह - पाप ग्रह). या मुद्द्यांमध्ये अनेकदा मुला - मुलींचे आणि त्यांच्या आईवडिलांचे एकमत असतेच असे नाही. म्हणजे कुणाला तरी पत्रिका पाहायची असते, तर कुणाला तरी पत्रिका पाहायची नसते. 

१९७२ च्या सुमारास रत्नाकर मतकरींचे ‘प्रेमकहाणी’ नावाचे नाटक आले होते. त्यातदेखील पत्रिकेचा विषय हाताळला आहे. केवळ पत्रिका जमत नाही, त्यावेळी लग्नाला विरोध झालेला नाटकात दाखवला आहे. आज २०१८ मध्ये म्हणजे तब्बल ४५ वर्षांनंतरही पत्रिकेचा विळखा काही सुटलेला नाही. उलट तो जास्तच जास्त आवळत चालला आहे, असे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते. हे नक्कीच सुसंस्कृत समाजाचे लक्षण असल्याचे चिन्ह नाही. 

पैशाला आलेले अवास्तव महत्त्व 
लग्न या संपूर्ण प्रक्रियेत पैशाला अवास्तव महत्त्व आलेले आहे. जगायला पैसा हवा, पैशाशिवाय काही होत नाही हे खरेच. पण पूर्वीच्या गरजा, सुविधा आणि चैन या शब्दांच्या अर्थासह संकल्पनाच बदलल्या आहेत असे दिसते. त्यामुळे मुलाच्या किंवा मुलीच्या स्वभावापेक्षा त्याच्या किंवा तिच्या पॅकेजला महत्त्व आले आहे. कमी पैसे मिळवणाऱ्या मुलाचे/मुलीचे लग्न होताना अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. स्वतः मुलगी कितीही पैसे मिळवत असली (कमी किंवा जास्त) तरी तिला खूप जास्त पैसे मिळवणारा मुलगा हवा असतो. 

लग्न ः एक सोहळा 
लग्न हा विचार मनात येताच ते कसे व्हायला पाहिजे हेच जास्त मनात येते. लग्न, त्याचा सोहळा, त्याची तयारी, कपडे, मानपान, कोणत्या कार्यालयात लग्न करायचे इत्यादी गोष्टींचा तपशीलवार विचार मनात अगदी पक्का असलेला दिसतो. कपडे कसे असायला हवेत, संध्याकाळी रिसेप्शनला गाऊन घालायचा की शरारा घालायचा? याचे प्लॅनिंग अगदी सुरवातीपासूनच असते; ज्यावेळी लग्न ठरलेलेदेखील नसते. इतकेच काय पण लग्नाचे पाहायलासुद्धा सुरवात झालेली नसते. 

असे अनेक मुद्दे आहेत. यातल्या प्रत्येक मुद्द्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत पुढच्या लेखात.

संबंधित बातम्या