लग्न, खर्च, पत्रिका वगैरे... 

गौरी कानिटकर
शुक्रवार, 9 मार्च 2018

लग्नविषयक
लग्न म्हटले की उत्साह, आनंद तर असतोच; पण त्याचवेळी विशेषतः मुला-मुलींचे पालक काहीसे धास्तावलेलेही असतात. विवाहेच्छु मुले-मुली, त्यांचे पालक यांच्या या मनःस्थितीचा विचार करून काही गोष्टींवर त्यांच्याबरोबर संवाद साधणारे पाक्षिक सदर. 

मागच्या लेखात विशद केल्याप्रमाणे आपल्याला एका एका मुद्द्याकडे जास्त लक्ष द्यायचे आहे. 

सगळ्यात पहिल्या मुद्द्याबद्दल आपण बोललो, ते म्हणजे आपल्या मुला/मुलींच्या लग्नावर असलेले पालकांचे नियंत्रण! 

अनेकदा एखादा मुलगा आणि मुलगी बाहेर एकमेकांना भेटायला जाताना पालकांच्या सतराशे साठ सूचना असतात. 

‘तू हा ड्रेस घालून जाणारेस त्याला भेटायला? अगं जरा बरे कपडे घाल ना!’ - इथपासून ते अगदी, 
‘सगळ्या विषयांवर बोल त्याच्याशी. बारीक बारीक गोष्टींमधूनदेखील कळतो माणूस.. आणि जरा तल्लख बुद्धीने वावर त्याच्यासमोर. 
नाहीतर करशील वेंधळेपणा!’ इथपर्यंत छोट्या छोट्या सूचना पालक देत असतात. 

अनेक वेळेला स्थळांची माहिती मुला/मुलींपर्यंत पोचतेच असे नाही. पुढल्या पुढे पालकच काही निर्णय घेत असतात. त्यांना 

ते स्थळ आवडले नाही तर आपल्या पाल्यांना ते सांगतातच असे नाही. 

स्थळे निवडतानासुद्धा आपल्या मुलांना काय हवंय या पेक्षा त्यांना जावई / सून कशी हवी याचा प्रभाव जास्त असलेला दिसतो. तसेच अनेकदा खरी माहिती लपविण्याचा प्रयत्नही केला जातो. 

‘अरे, आधी तुझा साखरपुडा होऊन लग्न मोडले आहे हे लगेच सांगायची काही आवश्‍यकता नाही. बघू पुढे...’ अशी भूमिका घेतली जाते. 

जे नाते विश्‍वासाच्या पायावर उभे राहायला पाहिजे, जे नाते आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचे आहे, त्याचा पायाच असा फसवण्याचा असेल तर सहजीवनाची इमारत पक्‍क्‍या पद्धतीने उभी कशी राहणार? आणि अशी पायाभरणी घरातूनच, जबाबदार पालकांकडून होत असेल तर त्याला काय म्हणावे? 

स्थळे निवडण्याची जबाबदारी मुला-मुलींची आहे हे पालकांनी ठामपणे आपल्या मुला-मुलींना सांगायला हवे. स्थळे पालक निवडतात आणि मुले-मुली निवांत असतात. कोणताही निर्णय घेणे, याचाच अर्थ त्या निर्णयाची जबाबदारी घेणे असा असतो. 

स्थळे मुलामुलींनी निवडावीत आणि पालकांनी त्यांना मदत करावी असे खरे तर व्हायला पाहिजे. पण अनेकदा याच्या उलट घडताना दिसते. पालक त्यांच्या दृष्टिकोनातून स्थळे निवडतात आणि ती स्थळे मुलामुलींना आवडतातच असे नाही किंवा केवळ नकार द्यायचा म्हणून मुलेमुली नकार देत राहतात.. आणि मग लग्न लांबणीवर पडते. लग्न जमायला वेळ लागायला लागला की पालकांचा पेशन्स संपतो. मग घरात वादावादीला सुरवात होते. 

लक्ष्मी-नारायणाचा जोडा, असे म्हणत असताना मानसिक अनुरूपतेचा विचार करताना फारसे कुणी दिसत नाही. जी मुले-मुली असा विचार करतात तोही विचार खूप वरवरचा करताना दिसतात. एकाच वेळी स्त्री-पुरुष समानतेचा विचार करत असताना उंची, वय, शिक्षण, पगार या सगळ्या बाबतीत नवरा वरचढच असला पाहिजे ही पारंपरिक संकल्पना मात्र अजून तशीच आहे. जोडा एकमेकांना शोभून दिसला पाहिजे, असे म्हणताना दिसण्यावरती खूप जास्त भर दिला जातो असे वाटते. 

अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत देखील पालक मंडळी विशेष संवेदनशील असतात. एकतर आज परिस्थिती अशी आहे, की त्यांना आपल्या पाल्यांनी त्याचे त्याचे लग्न जमवावे असे वाटते.. आणि नसेल जमलेले तर त्या पालकांना ती त्यांची जबाबदारी वाटते. इथपर्यंतदेखील मी समजू शकते. पण त्या जबाबदारीचे ओझे जेव्हा पालकांना वाटायला लागते त्यावेळी त्याचे टेंशन येते. मग पालक त्यांचे स्वतःचे लग्न कोणत्या वयात झाले याचा विचार करू लागतात. या दोन वयांचा मेळ अजिबातच बसत नाही.. आणि मग, ‘आमच्या वेळी...’ ‘एव्हाना...’ असे वाक्‍प्रचार ऐकू येऊ लागतात. तिथेच विसंवादाला सुरवात होते. 

शिवाय काही गृहीतके अनेक पालकांनी आपल्या मनात धरलेली असतात. उदा. एकदा नाव नोंदवले की वर्ष - दोन वर्षे बघता बघता जातीलच नं! पण ज्या संस्थेकडे स्थळे भरपूर आहेत अशा संस्थेत नाव नोंदवले, की नावनोंदणी होताक्षणी अनेकदा भरपूर इंटरेस्ट यायला सुरवात होते. मग पालकमंडळी गडबडून जातात. कारण एक/दोन वर्षे लागतील या गृहितकावरती नावनोंदणी केलेली असते. तशीच कबुली मुलाला किंवा मुलीला दिलेली असते. मग आता आलेल्या इंटरेस्टचे काय करायचे? त्या लोकांना मग अधांतरी ठेवणे सुरू होते. 

या सगळ्याची माहिती आधीच घेतलेली चांगले असते. तसेच प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखीच व्हायला पाहिजे हा अट्टहासही सोडायला लागतो. 

मुले-मुली आणि पालक यांच्यात असलेल्या सुसंवादाचा अभाव ही गोष्टदेखील चिंताजनक आहे. घरातली मुलेमुली जेव्हा लग्नाची असतात, त्यावेळी जवळ जवळ रोज लग्नाचा विषय निघतो. कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष. 

सुनीता मला म्हणाली, ‘आता माझ्या मामेबहिणीचेपण नाव नोंदवलेय. त्यामुळे आईला जाम टेंशन आलेय.. की तिचे ठरायच्या आधी आता माझे लग्न ठरले पाहिजे..’ 

अशा प्रकारच्या तुलनेने आपण फक्त ताणाला जन्म देत असतो. 

पत्रिका बघणे 
लग्नाच्या प्रक्रिये-प्रोसेसमध्ये कुंडली - पत्रिका बघण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आम्हाला पत्रिका न पाहता लग्न करायचे आहे, असे सांगणारी मंडळी हाताच्या बोटावर मोजली जातील इतकी कमी आहेत. पत्रिकेच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात अर्धवट ज्ञान दिसते. एकवेळ अज्ञान असेल तर चालते, कारण अशा वेळी आपण समोरच्या तज्ज्ञ माणसावर डोळे झाकून विश्‍वास ठेवतो. पण ज्यावेळी अर्धवट ज्ञान असते, त्यावेळी आपण त्या तज्ज्ञ माणसापर्यंत पोचतोच असे नाही. 

विद्याताई माझ्या समोरच बसल्या होत्या. दोन स्थळे मी त्यांच्या मुलासाठी सुचवली होती. एका क्षणातच त्यांनी ती नाकारली. 

त्याचे कारण विचारले असता त्या म्हणाल्या, की त्या दोन्ही पत्रिकेत मंगळ आहे. 

विद्याताई स्वतः उच्च विद्याविभूषित होत्या. तरीही त्यांना पत्रिका बघायचीच होती. पत्रिकेच्या बाबतीत जे तज्ज्ञ आहेत त्यांचे म्हणणे असेच आहे, की पत्रिका नेहमी समग्र पद्धतीने पाहिली जावी. म्हणजे कुठलाही मंगळ किंवा, एखादे नक्षत्र किंवा कुठलातरी एखादा गण असे सुटे सुटे पत्रिकेतले भाग पाहू नयेत. एक संपूर्ण पत्रिका पाहावी. शिवाय एक नाड, सगोत्र या बाबतीतदेखील पारंपरिक कल्पनांचा आधार घेतला जाऊ नये. 

ज्या वेळी स्वतःवरचा विश्‍वास कमी पडतो त्यावेळी अशा बाह्य गोष्टींवरचे आपले अवलंबित्व वाढू लागते. मग अशावेळी आकाशस्थ ग्रहांवर विसंबण्याची क्रिया चालू होते. पण त्यापेक्षा मनाची ताकद वाढवणे आपल्या हातात असते. आयुष्य तसेही फार सरळसोट जात नसते किंवा तंतोतंत आपल्या मनाप्रमाणे आयुष्यात गोष्टी घडतात असेही नाही. आयुष्य हे असुरक्षिततेने भरलेले असते. किंबहुना त्यालाच आयुष्य म्हणतात. त्यामुळे कोणतेही प्रसंग घडू देत, त्याला भिडण्याचे सामर्थ्य असेल तर पत्रिकेवर विसंबण्याचे प्रकार कमी होतील. पत्रिकेप्रमाणेच बाबा - बुवा यांचेही प्रस्थ वाढल्याचे दिसून येते. 

लग्नाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये पैशाला विलक्षण महत्त्व आलेले आहे. बाकी कोणत्याच गोष्टींपेक्षा पैसा हा भारी झाला आहे. मुलाचे स्वतःचे घर हवे आणि तेदेखील वयाच्या २७-२८ व्या वर्षी! हे कसे काय शक्‍य आहे? याचे तारतम्य का नसावे? 

तसेही त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ऑलरेडी खूप खर्च झालेला असतो. 

तनुश्री स्वतः वर्षाला साडेचार-पाच लाख कमावणारी... तिला ‘तो’ वर्षाला नऊ ते दहा लाख कमावणारा हवाय. 

आदिती दर महिना अवघे दहा हजार मिळवते, पण तिला नवरा मात्र बारा लाखाचे पॅकेज असलेला हवाय. कारण तिचे बालपणापासून ते आत्ताचे दिवस अतिशय ऐषोरामात गेले आहेत. 

पालकही असा विचार करण्यात अजिबात मागे नाहीत. कोणत्याही प्रकारची झळ बसताच कामा नये अशीच पालकांची धारणा आहे. 

प्रज्ञा अतिशय हुशार मुलगी. अभिजय नावाच्या मुलाला ती भेटली. अभिजय परदेशात नोकरी करणारा. दोघेजण एकमेकांना पसंतही पडले. आता ती लग्न करून त्याच्याबरोबर परदेशात जाणार आणि तिकडे जाऊन उच्च शिक्षण घेणार असे ठरले. त्यावेळी अभिजयच्या वडिलांनी रोखठोक सांगितले, की उच्च शिक्षणाचा खर्च प्रज्ञाच्या वडिलांनी करावा. 

इथे कुठेतरी लग्न हा एक सौदा होत चाललाय असे वाटते. दोन कुटुंबे लग्नाच्या निमित्ताने एकत्र येत असताना अशा पद्धतीचा सौदा होत असेल तर कुठलेही नाते तयार होण्यापूर्वीच त्याला सुरुंग नाही का लागणार? 

एका बाजूला अशा पद्धतीचे अनुभव येत असताना दुसऱ्या बाजूला मात्र लग्ने धूमधडाक्‍यात होताना दिसतात. एक एक आठवडा लग्नाचा सोहळा चाललेला दिसतो. लक्षावधी रुपयांचा चुराडा होत असताना आपण पाहतो. अर्थातच हा हौसेचा मामला आहे. पण त्यातही तारतम्य बाळगणे आवश्‍यक आहे असे वाटते. हजारो - लाखो रुपयांचे कपडे, दागिने यांची रेलचेल असलेली दिसते. असे कपडे जे आयुष्यात परत घातले जातील की नाही याबद्दल शंकाच आहे. दागिन्यांचीही तीच कथा. नंतर शेवटी ते दागिने आपण बॅंकेच्या लॉकरमध्येच ठेवतो. पण अशा प्रकारच्या सोहळ्यावर आपले समाजातले स्थान अवलंबून आहे असे वाटणारी अनेक मंडळी आहेत, याची कल्पना आहे. इथे महागाईचा मागमूसही दिसत नाही. पण या सगळ्याचा विचार व्हायला पाहिजे असे वाटते मला. तुम्हाला काय वाटते?

संबंधित बातम्या