... आणि चिंता पालकांची! 

गौरी कानिटकर    
मंगळवार, 20 मार्च 2018

लग्नविषयक
लग्न म्हटले की उत्साह, आनंद तर असतोच; पण त्याचवेळी विशेषतः मुला-मुलींचे पालक काहीसे धास्तावलेलेही असतात. विवाहेच्छु मुले-मुली, त्यांचे पालक यांच्या या मनःस्थितीचा विचार करून काही गोष्टींवर त्यांच्याबरोबर संवाद साधणारे पाक्षिक सदर.

लग्न मुलामुलींची आणि चिंता पालकांची’ याच नावाने आम्ही करत असलेल्या कार्यक्रमाला पालकांचा खूपच प्रतिसाद मिळतो. त्या दिवशीदेखील असेच झाले. या कार्यक्रमाला सभागृह अगदी तुडुंब भरले होते. साहजिकच आहे हे; कारण आपल्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता वाहणारे असंख्य पालक आहेत... नव्हे, त्या चिंतांचे ओझे झाल्याने अनेक पालक आजारी पडल्याचेदेखील आढळले आहे. 

मेधाताई म्हणाल्या, ‘आता लग्न करायचं ना माझ्या मुलीचं.. त्यामुळं महिनाभर सुटीच घेतली आहे ऑफिसमधून. आता फक्त एकच उद्दिष्ट; काहीही करून या ३-४ महिन्यांत जमलंच पाहिजे. मोहीमच करायचीय..’ 

सुजाताताई म्हणाल्या, ‘काय करावं कळत नाही. मला दुखणं यायची वेळ आल्येय. ब्लड प्रेशर पाठीमागं लागलंय टेंशनमुळं. झोप उडाल्येय माझी. माझा मुलगा तयारच नाही लग्नाला, कारण काय तर म्हणे मी अजून सेटल नाहीये. तेहतीस वर्षांचा झाला तो आता.  त्यामुळं चैन नाही पडत आता मला.’ 

असे अनेक अनुभव मला दर दिवशी येत असतात. 

पालकांच्या या सगळ्या अपेक्षांच्या.. चिंतांच्या मागे एक निखळ, नितळ असं मन आहे. आम्ही शून्यातून सुरवात केली, आम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष केला, पण आता मुलांवर नको ती वेळ यायला.. ही या सगळ्या विचारांच्या मागे एक प्रांजळ भावना असते. हे अगदीच समजू शकते. 

आसपासच्या लोकांचे, नातेवाइकांचे दडपण हेदेखील पालकांवर खूप जास्त प्रमाणात असते. 

मुलाचे - मुलीचे शिक्षण संपले आणि त्यांना नोकरी लागली, की लगेच ओळखीची माणसे, नातेवाईक विचारायला लागतात. ‘लग्नाचा बार कधी उडवून देताय?’ 

पण जरा आपण या मुला-मुलींचे त्यांच्या लहानपणापासूनचे आयुष्य आठवूया. तुम्ही त्यांना एकदा म्हणून बघा, की - हे हे तीनच कपडे तू या आठवड्यात वापरू शकतेस. 

किंवा 

ती छत्री जरा दुरुस्त करून वापर. 

किंवा 

पुढचा महिनाभर तू हॉटेलमधले खाऊ नकोस. 

काय प्रतिक्रिया मिळते बघा. आई रोज डबा हातात देते. गादीवर टाकलेले कपड्याचे बोळे व्यवस्थित धुऊन इस्त्री करून त्याची थप्पी कपाटात लागलेली दिसते. घरातल्या कामाची कोणतीही जबाबदारी नसते. स्वतःच्या मनाप्रमाणे वागता येते. 

हा ‘कम्फर्ट झोन’ मुलांच्या जन्मापासून आलेला आहे. लहानपणापासून त्यांना टंचाई शब्द माहीत नाही. कोणत्याच गोष्टीची कमतरता त्यांना नाही. नकार ऐकायची सवय नाही. (अर्थातच मी हे सगळे मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग याबद्दल बोलते आहे याची मला कल्पना आहे.) 

कदाचित कुणाला असे वाटू शकते, की याचा लग्नाशी काय संबंध? पण याचा संबंध लग्नाशी नक्कीच आहे. कारण लग्न करत असताना माझा ‘कम्फर्ट झोन’ कमीत कमी कसा ब्रेक होईल हा विचार प्रत्येक मुलगा - मुलगी करत असतात. त्यांना त्यांचा ‘कम्फर्ट झोन’ खूप महत्त्वाचा वाटतो. 
सानिका म्हणाली, ‘जसे माझ्या घरात वातावरण आहे तसेच वातावरण असलेले घर मला मिळेल का?’ 

त्यामुळे या पार्श्‍वभूमीवर जेव्हा पालक बोलतात, की लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट, ती करावीच लागते. सगळे हवे तसे मिळणार नाही, इत्यादी इत्यादी. या सगळ्याची नोंद मुलांच्या दृष्टिकोनातून कुठेच होत नाही. ‘आमच्या वेळी...’ असे म्हणता क्षणी मुला-मुलींचे कान आतून बंद होतात, हे समजून घ्यायला हवे. आत्ता लग्नाला उभी राहिलेली पिढी ही जागतिक उदारीकरणानंतर जन्माला आलेली पिढी आहे. खूप मोठी सामाजिक स्थित्यंतरे या पिढीने अनुभवलेली आहेत. 

सध्या अनेक घरांमध्ये गप्पा होताना दिसत नाहीत. फार जुजबी, अत्यावश्‍यक गोष्टींवर घरात बोलले जाते. त्यातून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आपण आपली मुले-मुली मोठी झाल्यावरच त्यांचे लग्न करतो. ‘मोठी होणे’ म्हणजे सक्षम होणे. मग मुले सक्षम आहेत, तर मग आपण चिंता का करतोय? पालक जे पैसे मिळवत होते आणि आज मुले-मुली जे पैसे मिळवत आहेत त्यात खूप अंतर आहे. त्यामुळे ‘आम्ही नाही का सहाशे रुपयावर नोकरी केली?’ या म्हणण्याला तसा काहीच अर्थ नाही. मुले इतके जास्त पैसे मिळवत आहेत, याचा अभिमान जरूर असावा पण त्याचे दडपण पालक घेत आहेत. 

पालकांनी ठाम खंबीर भूमिका घ्यायला हवी. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी, की पती - पत्नी हे नाते ३० - ४० वर्षे टिकवायचे आहे असे सांगितले जाते, तेव्हा मुलामुलींना या गोष्टीचे सर्वांत जास्त टेंशन येते. कमिटमेंटची भीती खूप जास्त आहे. 

पालकांनी दिवसभर पाच - सात तास घालवून कुठेतरी तीन किंवा चार स्थळे शोधलेली असतात. त्यातही ती स्थळे मुले-मुली नापास करतात. त्यांना ते करायला तीस सेकंदही लागत नाहीत. मग एखादे स्थळ कुठेतरी सगळ्यांच्या पसंतीला उतरते. मग ती पत्रिका जुळवा जुळवी, मेल, फोन करून प्रत्यक्ष मुलगा आणि मुलगी बाहेर भेटतात. तोपर्यंत पालकांची उत्सुकता कमालीची ताणलेली असते... आणि घरी आल्यावर मुलगा-मुलगी म्हणतात, ‘हं म्हणजे ठीक आहे, पण लाइफ पार्टनर म्हणून विचार करावा असे काही वाटत नाही...’ 

या सगळ्याच्या मागे एक खूप मोठी असुरक्षितता आहे. ‘पुढे होईल ना सगळे नीट?’ हा विचार त्यामागे आहे. ‘कुठलेही नाते मी टिकवू शकतो’ हा विश्‍वास असल्याचेच दिसत नाही. 

शिवाय पालकही सहजपणे सांगत असतात, ‘काय दिवस होते आमचे! आम्ही मर मर करून काम केलेय.. किती खस्ता काढल्या आहेत. शून्यातून उभे केलेय सगळे. घरातले केले, बाहेरचे केले.. खूप कष्ट केले. पण लग्नामुळे आमच्या आयुष्यात मजा आली, आम्ही एंजॉय केले. हं कष्ट केले खूप पण मजाही केली. अनुभव शेअर करायला माझा पार्टनर होता. भांडलोही कधी कधी, पण त्यातही गंमत होती...’ हा संदेश पालकांकडून जाताना दिसत नाही. लग्नाचे फायदे सांगणे ही पालकांची जबाबदारी आहे. लग्नामुळे माझ्या आयुष्याला अर्थ आला, असे सांगताना पालक दिसत नाहीत. उलट आम्ही किती कष्ट केले आणि आम्हाला किती त्रास झाला, याचीच उजळणी करताना दिसतात. 

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आई - वडिलांची भांडणेसुद्धा मुलांच्या समोर घडलेली आहेत. तेही कारण लग्नाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होण्यासाठी दिसते. 

अजिंक्‍य म्हणालादेखील, ‘आई बाबा इतके भांडतात आणि लग्नानंतर हेच जर करायचे असेल तर कशाला करायचे लग्न? मला तर नकोच वाटते.’ 

लग्न या शब्दाबरोबरच काही गोष्टी आपोआप येतात. उदा. लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे स्वातंत्र्य संपणार, लग्न म्हणजे कॉम्प्रोमाईज इत्यादी. 

याबद्दलदेखील विस्तृतपणे पालकांनी बोलायला हवे. ‘आम्ही नाही का टिकवले नाते?’ असे जेव्हा पालक म्हणतात, तेव्हा साहजिकच मुले - मुली म्हणतात, ‘नाते सहजपणे का नाही टिकले? टिकवावे का लागले?’ 

या सगळ्याचाच गंभीरपणे विचार करायची वेळ आता येऊन ठेपली आहे, असे नाही का वाटत?

साधारणपणे आमच्या या कार्यक्रमात कोणते कोणते प्रश्‍न येतात त्याच्याकडं लक्ष देऊया. 

 • काय या मुलींच्या अपेक्षा? स्वतः पाच हजार रुपये मिळवतात; पण मुलानं मात्र लाखभर रुपये मिळवले पाहिजेत दर महिना. इतके पैसे का लागतात यांना? 
 • माझा मुलगा परदेशात राहतो, तर तो ज्या ठिकाणी राहतो तिथं जायला ती मुलगी तयार होईल का? 
 • परदेशातल्या आणि अगदी इथल्यादेखील मुलांची/मुलींची माहिती कशी काढायची? 
 • लग्नात ॲडजस्टमेंट करायची असते हे पालकांनी मुलांना/मुलींना सांगायला हवे. 
 • अनेक जणांना फोन केले, काँटॅक्‍ट केले, पण लोक उत्तरच देत नाहीत. 
 • लोक नावपण विचारत नाहीत.. त्या आधीच पॅकेज विचारतात. बाकी कुठल्या माहितीत त्यांना इंटरेस्टच नसतो. 
 • इतके दिवस पाहतोय पण मनासारखे मिळत नाही. 
 • मुला मुलींना बाहेर भेटायचे असते. काय करावे? प्रथम सगळ्यांनी मिळून घरी भेटावे की बाहेर? 
 • मुले - मुली निर्णय घ्यायला वेळ लावतात. 
 • चॅटिंग करत राहतात तीन - तीन महिने. 
 • मुलाच्या किंवा मुलीच्या वडिलांपेक्षा आईचा पगडा जास्त आहे. 
 • फोटो पाहून स्थळे नाकारली जातात. हे आणि असे अनेक प्रश्‍न.. अर्थातच चिंता... 

संबंधित बातम्या