सोशल मीडिया आणि लग्न

गौरी कानिटकर
गुरुवार, 22 मार्च 2018

लग्नविषयक   

‘सहा महिने आम्ही chat करत होतो. चांगलं जमलं होतं आमचं . खूप गप्पा मारत होतो जवळ जवळ रोज.. आणि अचानक सहा महिन्यांनंतर त्यानं ‘नाही’ म्हणून सांगितलं.. आणि नाही म्हणून सांगताना त्यानं नुसता एक साधा मेसेज करून ‘नाही’ म्हणून सांगितलं. प्रत्यक्ष भेटून नक्की काय झालं हे पण सांगता आलं नाही त्याला. मला खूप डिप्रेस्ड वाटतंय..’ सुविधाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. 

‘एका लग्नविषयक साइटवरून प्रथम त्यानंच इंटरेस्ट सेंट केला. नंतर मग फोन वर बोलणं होऊन भेटायचं ठरलं.. आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी हे घरीपण सांगितलं नव्हतं. तो म्हणाला की आधी आपलं आपण बोलूया. भेटूया. आधीच मोठ्यांना नको यात घ्यायला. मग मी पण नाही सांगितलं. मला वाटलं सगळं छान जमलं, की येईल नंतर सांगता. पण त्यामुळं आता मला  घरात मोकळेपणी वावरता येत नाहीये. मला समजत नाही काय करावं ते. का नाही म्हणाला असेल तो? माझ्यात काय कमी आहे? आणि ही काय पद्धत झाली का?? सहा सहा महिने बोलल्यानंतर असं कसं हा नाही म्हणू शकतो? आणि आता तर तो माझे फोनही घेत नाहीये. फेसबुकवरून पण त्यानं मला आता unfriend करून टाकलाय. Whats app वर तर रोज आम्ही तासनतास बोलत होतो. त्यानी मला फसवलं, याचं दुःख मला जास्त होतंय.’ 

***

‘काय ऑसम आहे नं? मी गिटार वाजवतो आणि तुलाही आवडतं. काय विलक्षण योगायोग आहे..’ केदार नेहाशी बोलत होता. दोघं एका कॉफी शॉपमध्ये गप्पा मारत होते. कुठल्याशा लग्नविषयक साईटवरून केदारनं नेहाचं प्रोफाइल पाहिलं होतं.. आणि आज त्या संबंधानं दोघं भेटले होते. 

नेहा म्हणाली, ‘गिटार आणि मी? कुणी सांगितलं तुला? मला नाही वाजवता येत गिटार.’ 
‘काहीही काय? अगं मी फेसबुक प्रोफाइल पाहिलं तुझं. त्यात तुझे तीन - चार फोटो आहेत, हातात गिटार घेतलेले.’ 

‘हां हां ते होय?..’ असे म्हणून नेहा मोठमोठ्यानं हसू लागली. ‘अरे come on, ती फक्त स्टाइल होती. तुला काय खरं वाटलं की काय?’ नेहाला हसू आवरेना. 

केदारचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता. त्याचा झालेला भ्रमनिरास स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

‘काय कमाल आहे... ती फक्त स्टाइल आहे? मग खरं काय आहे?’ त्यानं विचारलं. 

‘काही नाही रे. मी जस्ट हातात घेऊन पाहिलं गिटार.. मग माझ्या मैत्रिणीनं फोटो काढले आणि मग केले शेअर ‘एफबी’वर.. बस इतकंच.’ तिनं उत्तर दिलं. 

***

ही गल्लत अनेकदा होते. माहिती खरी दिली आहे का हे तपासून पाहण्यासाठी मुल - मुली सोशल मीडियाचा अतिरेकी वापर करताना दिसतात. अनेकदा तर आमच्या विवाहसंस्थेच्या साईटवर दिलेली माहिती आणि फेसबुकवरची माहिती क्रॉसचेक करताना दिसतात. तसं पाहिलं, तर अनेक जण फेसबुक खूप सहजपणे (कॅज्युअली) वापरताना दिसतात. वेळ नसेल तर सहजपणे जाता जाता like करून जातात किंवा नुसतंच Wow .. भारी.. अशा पद्धतीच्या कॉमेंट्‌स पास करताना दिसतात.. आणि तरीही त्यावर खूप जास्त प्रमाणात भर देताना दिसतात. 

आपल्यापैकी प्रत्येकजण सतत निरनिराळे मुखवटे घेऊन वावरत असतो. शिवाय आपण सगळेजण आपल्या ओळखीतल्या प्रत्येक माणसाशी वेगवेगळे वागत असतो. अनेकदा हे वेगवेगळे मुखवटे, वेगवेगळं वागणं ही व्यावसायिक गरज असू शकते. 

निकिता इमेज कन्सल्टंट आहे. तिनं तिचे खूप वेगवेगळ्या पेहरावातले फोटो Instagram वर टाकले होते. तसेच फेसबुकवरदेखील ते लोड केले होते. सूरज म्हणाला, ‘इतक्‍या मॉड पोशाखातले फोटो आहेत. कशी असेल ही मुलगी? आमच्या घरी नाही चालणार.’  कोणत्याही गोष्टीवरून आपण किती पटकन मतं बनवतो नं? 

सोशल मीडिया आपल्या मनात अक्षरशः दिवसभर जागृतावस्थेत असतं. सतत आपण आपल्या मुखवट्यांचा विचार करत असतो. व्यावसायिक गरज असेल तर तेवढी गरज भागली की मुखवटा बाजूला सारता यायला हवा. पण अनेकदा तोच आपला खरा चेहरा बनून जातो. समाजासमोर प्रेझेंट केलेला चेहरा तसाच्या तसा ठेवावा लागतो. 

वरच्या पहिल्या उदाहरणासारखंदेखील अनेकदा घडताना दिसतं. कोणताही मुलगा आणि मुलगी पहिल्यांदा भेटतात त्यावेळी अनेकदा आपापले फोन नंबर्स एकमेकांना दिले जातात आणि कॉफी शॉपमधून बाहेर पडल्यापासून ‘पोचलीस का?’ ‘जेवलीस का?’ ‘गुड मॉर्निंग, गुड नाईट’.. अशा मेसेजेसची सुरवात होते. मग विशेष करून मुलींना वाटायला लागते, की किती माझी काळजी करतोय हा मुलगा! मग त्यातूनच chatting ला सुरवात होते. भावनिकदृष्ट्या कमकुवत असणारे त्यात अडकत जातात. ते नातं पुढं गेलं तर ठीक असतं; पण वरच्या उदाहरणाप्रमाणंच  अनेकदा घडताना दिसतं. 

कोणत्याही सोशल मीडियाचा वापर Whats app चा वापर फक्त कुठं भेटूया, किती वाजता भेटूया अशा जुजबी कारणासाठी केला जावा असं मला वाटतं. आमच्या सगळ्या कार्यक्रमांमधून आम्ही हे सातत्यानं सांगत असतो. आजही मुली कितीही शिकलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या असल्या, तरीदेखील माझ्या नवऱ्यानं माझी काळजी घेतली पाहिजे ही अपेक्षा मनातून गेलेली नाही. दुर्दैवानं पोचलीस का? जेवलीस का?... हीच काळजी घेण्याची वाक्‍यं वाटायला लागतात आणि विशेषकरून मुली या गोष्टीमध्ये अडकत जातात. 

फेसबुकवर किंवा Whats app वर बोलणं, मेलवर बोलणं हे प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा तुलनेनं खूप सोपं असतं. आपण विचार करून, शब्दयोजना ठरवून मेसेज लिहू शकतो. समोर भेटताना जसं डोळ्याला डोळा भिडवून बोललं जातं, तसा प्रकार लिहिताना नसतो. समोर भेटून जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या अनेक गोष्टी लक्षात येतात, जसं की त्या व्यक्तीचा आत्मविश्‍वास - कॉन्फिडन्स, देहबोली, बोलण्याची ढब, समोरच्याचा आदर करण्याची पद्धत. तशा कोणत्याच गोष्टी लिखाणातून कळत नाहीत. त्यामुळं शक्‍य असेल तेव्हा मुला-मुलींनी प्रत्यक्ष भेटणं हे निश्‍चितच स्वागतार्ह आहे. 

तरीही परदेशी राहणारी मुलं - मुली किंवा दोन वेगवेगळ्या शहरांत राहणाऱ्या मुला - मुलींना वारंवार भेटणं शक्‍य होत नाही. अशावेळी chatting चा पर्याय नक्की चांगला असतो. पण सुरवातीचं जुजबी बोलणं झालं, की भेट नक्की घ्यावी. कारण अशा प्रकारच्या chatting मध्ये गुंतायला होतं. त्यातच रमायला होतं. तो मुखवटा असू शकतो, याचा विसर पडण्याचा संभव असतो. मग या खोट्या रमण्याचा एक विचित्र ताण मनावर येऊ शकतो. त्यातूनच मग नैराश्‍यासारख्या विविध मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. लग्न ठरवत असताना सोशल मीडियाचा वापर अजिबात करू नये, असं माझं म्हणणं नाही पण त्याचा वापर हा सजगतेनं करायला हवं हे नक्की. एखादी व्यक्ती जर अनेक महिने नुसती chat करत असेल आणि काहीच निर्णय घेत नसेल तर वेळीच सावध होणं, ही बाब आवश्‍यक ठरते. पालकांनीदेखील यामध्ये लक्ष घालणं आणि घरातल्या विवाहेच्छू मुला-मुलींना सावध करणं आवश्‍यक आहे. सोशल मीडिया आपल्या आयुष्यातून वजा करता येणं अवघड आहे, पण निदान त्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक पद्धतीनं करणं आपल्या हातात आहे आणि हे तर आपण नक्कीच करू शकतो.

संबंधित बातम्या