पालक प्रगल्भ होत आहेत... 

गौरी कानिटकर
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

लग्नविषयक
कालची चैन ही आजची गरज ठरत आहे. जीवनशैलीच्या कक्षा रूंदावल्या आहेत. स्वत:मध्ये बदल करून आजचे पालक नव्या पिढीसोबत जुळवून घेताना दिसत आहेत. पालकांमधील हे बदल विलक्षण आहेत. दोन पिढ्यांमधली बदलत जाणारी संवादाची भाषा नक्कीच आश्‍वासक आहे.

दहा ते पंधरा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या ओळखीतली एक मुलगी - मधुरा अमेरिकेला एम एस करायला निघाली होती. तिचे लग्नही ठरले होते. तिचा होणारा नवरा सागर अमेरिकेतच नोकरी करत होता. साहजिकच माझ्या मनात विचार आला, की तिथे पोचल्यावर ही आता प्रथम कुठे जाईल? 

माझा मुलगा तेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. मी सहज त्याला विचारले, की मधुरा आता पहिल्यांदा कुठे जाईल? तो म्हणाला, ‘सागरकडे!’ मला एकदम धक्काच बसला. 

मी म्हटलं, ‘अरे पण त्याचं लग्न कुठं झालंय? त्या आधीच ती त्याच्याकडं कशी राहायला जाईल? रिस्की नाही का ते?’ 

तो म्हणाला, ‘आई, ती एक परक्‍या प्रदेशात जातेय. तिथं कुणीच ओळखीचं नाही. त्यातल्या त्यात सागरच तिच्या ओळखीचा आहे. सागरकडं तिनं जाणं हे सेफ नाही का?’ 

म्हटलं, ‘अरे हो की! हे माझ्या कसं लक्षात नाही आलं? माझ्या डोक्‍यात वेगळाच मुद्दा होता.’ 

तो म्हणाला, ‘आई, मला कळतंय तुझ्या मनात काय आहे ते. पण Its ok. We are capable to take responsibility of ourselves.’ त्याचं कौतुकच वाटलं. 

आज मी जेव्हा या प्रसंगाचा विचार करते तेव्हा मला त्यात काहीच गैर वाटत नाही. सगळ्याचे सामाजिक संदर्भ दर थोड्या वर्षागणिक बदलत असतात. गेल्या पंधरा - वीस वर्षांत पालकही किती बदललेत. अगदी पंचवीस - तीस वर्षांपूर्वीपर्यंत एखाद्या मुलीनं / मुलानं  केवळ लव्ह मॅरेज ठरवलं, तर केवढा विरोध व्हायचा. माझ्या आसपास अशी अनेक उदाहरणं होती. पण आता मात्र जवळ जवळ प्रत्येक पालक म्हणतात, की तुझं तू पाहिलंस तर फारच छान! अगदी त्याच वेळी म्हणजे २५/३० वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये मुला-मुलींचा एकत्र ग्रुप असणं हेच अपूर्वाईचं होतं. आज अगदी सर्रास असे अनेक ग्रुप असतात. जवळपास प्रत्येक मुलाला अनेक मैत्रिणी आणि प्रत्येक मुलीला अनेक मित्र असतात. एकमेकांच्या घरी ते सगळे येत जात असतात. मुख्य म्हणजे त्यात पालकांना काही विशेष वेगळं वाटत नाही. 

पालकांची पिढीदेखील नित्यनेमानं नवीन काहीतरी शिकते आहे. झपाट्यानं सगळ्या गोष्टी बदलत आहेत. अगदी पाच - सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.. सुलेखा ही मंजिरीची सून - अमेरिकेतून एक महिन्यासाठी भारतात यायची होती. त्यासाठी मंजिरीनं पूर्ण एक महिन्याची रजा घेतली. सुलेखा आली तीच मुळी एअरपोर्टवरून थेट तिच्या आईच्या घरी गेली. दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, चारही दिवस गेले. मंजिरी तिची वाट पाहात होती. कदाचित अजून जेटलॅग गेला नसेल, अशी मनाची समजूत करून घेत होती. शेवटी आठ दिवसांनंतर तिनं वाट पाहून एकदा तिच्या घरी फोनही केला. तिच्या आईनं फोन उचलला. ती म्हणाली, की सुलेखा तिच्या मैत्रिणीकडं गेली आहे. मंजिरी म्हणाली, की मी तिची वाट पाहिली. सुलेखाची आई म्हणाली, की ती घरी आली की मी तिला निरोप देते. दुसऱ्या दिवशी सुलेखाचा फोन आला. ती म्हणाली, बरीच कामं आहेत. शिवाय मित्र आणि मैत्रिणींना पण भेटायचं आहे. मी दोन - तीन दिवसांनी जेवायला येते...’ मंजिरी मनातून समजून चुकली. तिनं तिची रजा रद्द करून घेतली आणि ती ऑफिसला जॉईन झाली. पण मनातून मात्र खट्टू झाली. 

ही गोष्ट फार जुनी नाही. अगदी पाच - सहा वर्षांपूर्वीचीच आहे. पण आता मात्र ‘मुलाची आई’ या गोष्टीला सरावली आहे. मुलगा तरी आपल्या घरी राहायला येतोय यातच ती आई सुख मानू लागली आहे. 

पालकांमधला हा बदल विलक्षण आहे. इतकंच नाही, तर तरुण मुलांची भाषादेखील अनेक पालक सहजी वापरू लागले आहेत. पालक आता कॉम्प्युटरला सरावले आहेत. एक काळ असा होता, की पालक साधी ई-मेल करू शकत नव्हते. पण आता मात्र वेगवेगळ्या वेबसाइट्‌स पाहणं, त्या ब्राउझ करणं हे त्यांना सहजी जमू लागलं आहे. 

अगदी दोनच दिवसांपूर्वी एका मुलाचे वडील आले होते. आमचे त्यांच्या मुलाच्या लग्नासंदर्भात बोलणे चालले होते. पटकन त्यांनी त्यांचा अँड्रॉइड काढला, त्यावर एक Aap डाऊनलोड केलेलं होतं. झटकन त्यांनी वेबसाइट उघडली आणि त्यावरची माहिती ते वाचून दाखवू लागले. पालक आता tech savvy झाले आहेत. youtube, instagram, facebook, whatsapp या सगळ्या गोष्टी आता त्यांना नित्य सरावाच्या झाल्या आहेत. पटकन स्वतःचा DP बदलणं या गोष्टी आता ते सराईतपणं करतात. सगळ्याच संकल्पना बदलल्या आहेत. 

पूर्वी सुटी लागली की आजोळी जाणं, नातेवाईकांकडं जाणं या गोष्टी नित्याच्या होत्या. एवढा खर्च करून जाते आहेस तर अजून चार दिवस का राहत नाहीस? अशी विचारधारा होती. पण आता नातेवाईकांकडं राहायला जाणं हे सवयीचं राहिलेलं नाही. हवापालटासाठी बाहेर थंड हवेच्या ठिकाणी जाणं, ही फक्त श्रीमंतांचीच असणारी मक्तेदारी कधीच मोडीत निघाली आहे. 

‘गेल्याच महिन्यात ‘लाँग वीक एंड’ आला होता. त्याला जोडून दोन दिवसांची रजा घेऊन, माझ्या दोन्ही मुली मस्त चार - पाच दिवस सिंगापूरला जाऊन आल्या,’ एक मैत्रीण अगदी कौतुकानं सांगत होती. 

अनेक घरांमध्ये घरटी एक तरी पाल्य परदेशात शिकायला आहे. त्यामुळं फोन, स्काइपवर बोलणं हेही अगदी नित्यसरावाचं! आज अनेक मुलं - मुली अगदी लहान वयातच घरापासून शिक्षण किंवा नोकरीनिमित्तानं लांब जातात. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकतात. मुलांनी घरापासून लांब जाणं हे पालकांना आता अजिबात नवीन राहिलेलं नाही. इतकंच नाही, तर एकाच शहरात नोकरीचं ठिकाण लांब असेल तर नोकरीच्या ठिकाणी स्वतंत्र जागा घेऊन मुलं - मुली राहत आहेत. 

सुनीताचं नोकरीचं ठिकाण हिंजवडीला होतं आणि तिचं घर - म्हणजे तिच्या आईवडिलांचं घर होतं पर्वतीला! तिला ट्रॅफिकमुळं जायला यायला दोन - दोन तास लागत असत. त्यामुळं हिंजवडीत एक छोटं घर भाड्यानं घेऊन ती तिथं राहू लागली. तिच्या लग्नाच्या आधीच तिने आईवडिलांचं घर सोडलं आहे. 

कालची चैन ही आजची गरज ठरू लागली आहे. मुलांच्या निमित्तानं का होईना, पण पालकांना आता परदेशवारी घडू लागली आहे. नजरा विस्फारल्या आहेत. कक्षा रुंदावल्या आहेत. पैसे खर्च करण्याच्या कल्पनापण बदलल्या आहेत. लाइफस्टाइलमध्ये बदल घडत आहेत.  

‘घटस्फोट’, ‘लिव्ह इन’ या शब्दांनी पालक आता दचकून जात नाहीत. 
एखाद्या सोसायटीमध्ये एखादं जोडपं ‘लिव्ह इन’मध्ये राहात असेल तर ‘संस्कृती बुडाली’ इतक्‍या टोकाचा धक्का आता कुणाला बसत नाही. असा विचार कुणी करत नाही. 

दर दोन वर्षांनी बदलणारी विवाहेच्छू मुला-मुलींची पिढी अगदी जवळून पाहण्याची - त्यांचं निरीक्षण करण्याची संधी माझ्या कामाच्या निमित्तानं मला मिळते आहे. पालकही अगदी दोन वर्षांनी नाही, तरी दर चार - पाच वर्षांनी बदलत आहेत. 

कुणाला वाटेल या सगळ्या बदलांचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? पण या प्रत्येक बदलाचा आणि वैवाहिक आयुष्याचा अगदी नजीकचा संबंध आहे. या नवीन पिढीतल्या मुलांची आणि मुलींची लाइफस्टाइल जर जुळली, तर त्या दोघांना एकमेकांशी जुळवून घेणं तुलनेनं सोपं होऊन जातं. इतकंच नाही, तर पालकांनादेखील या नव्या पिढीबरोबर राहताना जमायला लागण्याचं प्रमाण तुलनेनं वाढलं आहे. 

हा सगळा बदल निश्‍चितच स्वागतार्ह आहे. बदलणाऱ्या परिस्थितीबरोबर आता आपल्यालाही बदलायला हवं, याचं भान असणं, हेच प्रगल्भतेचं लक्षण आहे. होय.. पालकही बदलत आहेत, प्रगल्भ होत आहेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या