सिंगल पेरंटच्या मुलांची लग्ने!

गौरी कानिटकर
गुरुवार, 10 मे 2018

लग्नविषयक
आपल्याकडे आजही सिंगल पेरंटच्या मुलाचे लग्न करताना अनेक अडचणी येतात. बदलत्या काळानुसार लग्नाच्या संकल्पना बदलत असताना, 'सिंगल पेरंट' या शब्दाभोवती असणारे पूर्वग्रहदूषित मत बदलण्याची आता आवश्‍यकता आहे.

एकेरी पालकत्वाची प्रक्रिया भारतातही मोठया जोमाने सुरू झाली आहे. भारतात गेल्या काही वर्षापासून एकल किंवा एकेरी पालकत्वाचे वारे वाहू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी सुश्‍मिता सेन आणि संदीप सोपारकर या सेलेब्रेटींनी मुलांना दत्तक घेतले आणि एकेरी पालकत्व स्वीकारले आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 

अलीकडेच अभिनेता तुषार कपूरने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आणि अविवाहित पुरुषाचे एकल पालकत्व हा विषय ऐरणीवर आला. एकत्र कुटुंब किंवा आजवर परंपरागत पद्धतीने नजरेसमोर असलेल्या कुटुंबांची व्याख्या बदलत गेली, बदलत चालली आहे. कुटुंबाचा विस्तारलेला परीघ कमी झाला आहे. आत्या, काका, मामा, मावशी ही नाती हळूहळू कमी झाली. पुढे कदाचित आई किंवा वडिलांपैकी कुणी एकच असू शकेल. पण परिस्थितीला शरण जात होऊन एकट्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या व्यक्तींचे प्रश्न वेगळे आहेत आणि स्वेच्छेने एकेरी पालकत्वाचा पर्याय स्वीकारणाऱ्या व्यक्तींचे प्रश्न वेगळे आहेत. 

पण आज आपण बोलणार आहोत ते परिस्थितीमुळे एकट्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारलेल्या पालकांबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल आणि अर्थातच त्यांच्या लग्नाबद्दल. 

पूर्वीची कुटुंबव्यवस्था होती, किंवा लग्नासंबंधीचे जे विचार होते, ते काळानुरूप बदलत चालले आहेत. आज घटस्फोटाची संख्या सातत्याने वाढताना दिसते आहे. त्याची कारणे काय आहेत, का सातत्याने ही संख्या वाढते आहे? कोण बरोबर किंवा कोण चूक हा आजच्या लेखाचा विषय नाही. पण परिस्थितीनुसार काही कारणांमुळे, तर कधी एका पालकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एकल पालकत्व निभावून नेणारे पालक संख्येने कमी नाहीत. त्यातल्या त्यात घटस्फोट झाल्यामुळे एकट्यावर पालकत्वाची जबाबदारी आलेले पालक हे संख्येने जास्त आहेत. आणि त्यातही स्त्री-पालक हे तुलनेने जास्त असल्याचे दिसते. बाकी सगळ्या जबाबदाऱ्या अत्यंत खंबीरपणे पेलणारे पालक जेव्हा त्यांची मुले लग्नाला येतात त्यावेळी मात्र वेगळा विचार करताना दिसतात. 

...अहो, माझी मुलगी संगीता, लग्न होईल ना तिचे? ती पाच वर्षाची असताना घटस्फोट झालाय माझा. परवा माझी एक मैत्रीण म्हणाली मला, की अगं तुझा घटस्फोट झालाय, मुलीला जप हो... कारण संस्कार पण तसेच असतात नं... तिचा नको व्हायला घटस्फोट... खरंच का हो असं होईल ? माझी तर झोपच उडाली आहे तेव्हापासून... 

आई वडिलांचा घटस्फोट झालेला असेल तर त्यांच्या मुलांचे लग्न लवकर जमत नाही... आणि आमचा घटस्फोट झालाय. मी तिची सिंगल पेरेंट आहे, हे पण तुमच्या संस्थेच्या फॉर्ममध्ये नोंदणी करताना लिहावं लागेल का? 

अरे देवा, मग माझ्या मुलीला कोण पसंत करेल? ...पण घटस्फोट झालाय माझा म्हणजे काही गुन्हा नाही ना केलाय मी!! 

लोकांना काय माहिती, की माझ्या मुलीला वाढवताना काय कष्ट पडलेत मला.  

राग, हताशपणा, चिंता, अपराधीपणा, नैराश्‍य अशा सगळ्या नकारात्मक भावनांनी मीनाताईचा ताबा घेतला होता. वास्तविक पाहता मीनाताई एका मोठ्या बॅंकेत महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या. सगळ्या गोष्टी स्वतःच्या कष्टाने निभावून नेलेल्या. पण आपल्या समाजात आजही या गोष्टींकडे निकोप दृष्टीने पाहिले जात नाही. वास्तविक पाहता घटस्फोट ही काही आनुवंशिक गोष्ट नव्हे, की आईचा-वडिलांचा घटस्फोट झालाय म्हणून त्यांच्या मुलीचा/मुलाचा संसार नीट होणार नाही, असं थोडंच आहे? 

कोणत्याही मुलाच्या/मुलीच्या निकोप वाढीसाठी आई आणि वडील अशी दोघांचीही गरज असते हे मान्यच आहे. तरीही परिस्थितीमुळे मुलाला वाढवण्याची जबाबदारी एकट्या पालकांवर येऊन पडते. आपल्या पाल्याशी सुदृढ असं नातं प्रस्थापित करायचं ही खरंच त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असते. अचानकपणे त्यांना एकल पालकत्वाचे मोठे शिवधनुष्य पेलायचं असतं. त्यातल्या त्यात कुणा एका पालकाचा नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर, तुलनेने गोष्टी कमी अवघड असतात. कारण जे घडलेले असते त्याला कुणाचाच इलाज नसतो. पण घटस्फोटामुळे विभक्त झालेल्या अनेक जोडप्यांमध्ये टोकाचा विसंवाद असू शकतो, आणि त्यामुळे मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल कटुता दाटलेली असते. त्याच वेळी आर्थिक, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सगळ्यात महत्त्वाचे सामाजिक पातळीवर स्वतःला आणि पाल्याला सावरावे लागते. एकटे पालक असलेल्या कुटुंबातील जीवन हे दोघांसाठी ही तणावपूर्ण असू शकते, पण त्यातूनही स्वतःला आणि मुलांना अत्यंत खंबीरपणे सावरल्याच्या घटना समाजात कमी नाहीत. 

आमच्या एका वधू-वर गप्पांच्या कार्यक्रमात मला गायत्री भेटली होती. कमालीची स्मार्ट, सडसडीत, उंच गहूवर्णी गायत्री कुणावरही छाप पडेल अशीच होती. स्वतःची मते असलेली आणि ती योग्य शब्दात मांडण्याची समज असलेली अशी होती. 

ती मला म्हणाली, मी आणि माझी आई अशा दोघींचंच आमचं कुटुंब असलं तरी आमचं विस्तारित कुटुंब खूप मोठं आहे. या विस्तारित कुटुंबात मी वरचेवर जात असल्याने मला आणि आईला कधीच एकटे वाटत नाही. आई आणि माझ्यात एक स्ट्रॉंग असा बॉंड आहे. घरातल्या जबाबदाऱ्या आम्ही दोघी आमच्यात नेहमीच वाटून घेतो, त्यामुळे घराचं व्यवस्थापन मला छान जमतं. शिवाय माझ्या घरात आई एकटीच पालक असल्याने इतर घरात जशी पालकांची एकमेकांमधली भांडणे असतात तशी आमच्या घरात नाहीत. पण याचा अर्थ असं नाही, की मला एकत्र राहणारे कुटुंब नकोय. मला माणसे आवडतात.  

त्याच कार्यक्रमात तिची अमितसोबत भेट झाली होती. कुठलाही आडपडदा न ठेवता पहिल्याच भेटीत तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाल्याचे तिने त्याला सांगितले. 

अमित मला म्हणाला, ‘सिंगल पेरंटने वाढवलेल्या मुलींबद्दल माझ्या मनात वेगळे विचार होते. व्यक्तिमत्त्वात काहीतरी कमतरता असू शकेल असे वाटायचे. पण गायत्रीकडे पाहिल्यावर आणि तिला जाणून घेतल्यावर माझे हे मत बदलले. मनात एक विचार आला, तसे तर आमच्या घरातसुद्धा आई-वडील दोघेही आहेत. अशा घरातसुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद असतात. किती भांडणे असतात. मग अशा घरात वाढणाऱ्या मुलांची वाढ निकोप कशी होईल? मग त्यापेक्षा अत्यंत आत्मविश्वासपूर्ण अशा गायत्रीला मी जास्त मार्क देईन.’ 

अशाच पद्धतीचा अनुभव मला अनुरूपमध्ये काम करताना नुकताच आला. शेखर म्हणून एकजण भेटायला आले होते. चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. ते म्हणाले, ‘सुमारे पंधरा वर्षापूर्वी आमचा घटस्फोट झालाय. कारण म्हणाल तर तसे काही नव्हतं, पण आमचं नाही जमलं. मला दोन मुलगे आहेत. मोठं मुलगा माझ्याकडे असतो आणि धाकटा तिच्याकडे असतो. आता मोठ्या मुलाचं लग्न करायचंय. आणि लग्न सगळं सांगून सावरून करायचंय. कुठेही घटस्फोटाची दुखरी जाणीव चेहऱ्यावर नव्हती. 

ते पुढे म्हणाले, ‘माझे दोन्ही मुलगे-आम्ही तिघे भेटतो बरेचदा. वाचन, सिनेमा, राजकारण या विषयांवर भरपूर गप्पाही मारतो. बाहेर जेवायला जातो. खूप मजा करतो.’  

ऐकतानाही छान वाटत होते. हेल्दी रिलेशन जाणवत होते. असे असले तरी आजही समाजमन ‘एकल पालकत्व’ याबद्दल फारसे नितळ नाही. त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये काही प्रमाणात अडथळे येत आहेत. 

एकेरी पालकत्वाच्या जशा काही कमतरता आहेत तसेच त्याच्या काही चांगल्या बाजूही आहेत. ज्या पालकांनी मनापासून परिस्थिती स्वीकारलेली दिसते त्या घरातले वातावरण सौहार्दपूर्ण असलेले जाणवते. 

कोणत्याही छोट्याशा गोष्टीवरून थेट मते बनवण्याची पद्धत इथेही दिसते. एखादा मुलगा त्याच्या घटस्फोटित आईबरोबर राहत असेल तर तो लगेच ‘ममाज बॉय’ ठरतो. एखादी मुलगी घटस्फोटित आईबरोबर राहत असेल तर ती मुलगी जास्त स्वातंत्र्याची मागणी करणारी असेल, आगाऊ असेल अशी सरसकट विधाने अनेक जण करताना दिसतात. 

‘सिंगल पेरंट’ या शब्दाभोवती असणारे पूर्वग्रहाचे वलय भेदून त्या पलीकडे जाता यायला हवे. 

लग्नाच्या संदर्भात जास्त विशालपणे विचार करण्याची गरज कधी नव्हे ती आज जास्त जाणवताना दिसते आहे. समाज बदलतो आहे. निरनिराळे आयाम समाजात येत आहेत. अशा वेळी खूप जास्त प्रगल्भपणे विचार आणि वर्तन करण्याची आज गरज आहे.

संबंधित बातम्या