पहिली भेट 

गौरी कानिटकर
गुरुवार, 24 मे 2018

लग्नविषयक
कोणत्याही प्रकारची पहिली भेट ही नेहमीच महत्त्वाची असते. लग्नात तर ती विशेष महत्त्वाची असते. या पहिल्या भेटीत सगळेच अवघडून गेलेले असतात. काय बोलावे, कसे वागावे कळत नाही. त्यासाठी हे मार्गदर्शन..

अरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/कुटुंबीयांबरोबर घरी घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. हल्ली अनेक मुले मुली कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात राहताना दिसतात. त्यांचे आईवडील, कुटुंबीय दुसऱ्या गावात राहत असतात. अशा वेळी आणि एकूणच नवीन ट्रेंडनुसार मुले मुली स्वतंत्रपणे बाहेर भेटणे पसंत करतात. 

अनेकदा मुले मुली बाहेर कॉफी शॉपमध्ये भेटतात. २-३ तास गप्पा मारत असतात. पण आपण ‘लग्न’ या विषयासाठी एकमेकांना भेटतो आहोत हे बाजूलाच राहते आणि खूप अवांतर विषयांवर गप्पा होतात. वर्क प्रोफाइल, फ्युचर प्लॅन्स, व्हेज - नॉन व्हेज, स्मोकिंग,  ड्रिंक्‍स आणि अशाच विविध विषयांवर गप्पा होतात. एकमेकांचे छंद, आवडी निवडी या बद्दलही बोलले जाते.. आणि कित्येकदा त्याचे स्वरूप हे चेक लिस्टसारखे असते. 

पण वर्क प्रोफाइल काय किंवा फ्युचर प्लॅन्स हे विषय आपल्या वैवाहिक आयुष्याशी थेट संबंधित असण्याची शक्‍यता कमी आहे. कामाचे स्वरूप कधीही बदलू शकते आणि भविष्यातल्या गोष्टी तर खरेच आपल्या हातात नसतात. मला भविष्यात अमुक अमुक करायची इच्छा आहे, असे फार तर आपण म्हणू शकतो. पण आयुष्य इतके सरळमार्गी नसते. आपण ठरवतो एक आणि होते दुसरेच असे अनेकांच्या आयुष्यात घडताना आपण बघत असतो. 

एकमेकांच्या आवडी निवडी याबद्दल बोलायचे झाले, तर जशाच्या तशा आवडी असणे जरा अवघडच आहे. पण माझ्या कोणत्या आवडीच्या गोष्टी करताना माझा पार्टनर मला बरोबर असलेला आवडेल, हे मात्र ठरवावे लागते. तसे स्पष्टपणे बोलले गेले पाहिजे. 

अवांतर गप्पा मारल्यामुळे नेमकी व्यक्ती कशी आहे ते कळण्याच्या शक्‍यता कमी होतात आणि मग एका ठाम निर्णयापर्यंत पोचणे अशक्‍य होऊन बसते. 

आमच्या अशाच एका वधू वर गप्पांच्या कार्यक्रमात आम्ही काही रोल प्ले सादर केले होते. उपस्थित असलेल्या एका मुलाला आणि एका मुलीला आम्ही एकमेकांना ५-५ प्रश्‍न विचारायला सांगितले होते.. आणि ही तुमची पहिली भेट आहे असेही सांगितले होते. 

सुरवातच तू काय शिकला आहेस? काय शिकली आहेस? या प्रश्‍नाने झाली. पुढचे एक - दोन प्रश्‍न झाल्यावर त्या मुलाने तिला विचारले, की joint family मध्ये राहायला आवडेल का? ती म्हणाली, ‘हो, आवडेल की. कारण नंतर होणारी मुले सांभाळायला कुणीतरी हवेच की!’ 

फक्त तोच मुलगा नव्हे, तर उपस्थित असलेले सगळेच जण अवाक्‌ झाले. 
बोलताना कित्येकदा तारतम्य सांभाळले जाताना दिसत नाही. ही तुमची पहिलीच भेट आहे असे निक्षून सांगितलेले असतानादेखील अशा स्वरूपाचा संवाद होताना दिसतो. 

तयारी न करता भेटायला गेले तर अशी तारांबळ उडताना दिसते. 
भेटायला जाण्यापूर्वी एकमेकांची पूर्ण माहिती वाचून जाणे अपेक्षित आहे. 

माहिती वाचलेली असेल तर अर्थातच समोरच्याला बरे वाटते. इतकेच नाही, तर लग्नाबद्दल त्याला/तिला इंटरेस्ट आहे असे लक्षात येते... आणि तेच तेच बोलणेपण टाळता येते. त्यामुळे वेळही वाचतो. 

त्यातूनच गप्पा पुढे नेण्यासाठीचे काही धागे मिळू शकतात. कोणतेही मुलगा - मुलगी एकमेकांना जेव्हा प्रथम भेटतात त्यावेळी पहिल्या १०-१५ मिनिटांमध्येच समजते, की आपल्याला दुसऱ्या भेटीसाठी पुढे जायचे आहे किंवा नाही. अशावेळी सौम्य शब्दात आपण इथेच थांबूया का? असेही निःसंदिग्धपणे सांगायला काही हरकत नाही. फक्त हे सांगताना समोरच्या माणसाचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. एकमेकांचा वेळही वाचतो. पण अनेक उदाहरणांमध्ये आपण पुढे जाणार नाही हे मनातून माहीत असूनही उगीचच गप्पा होतात. साहजिकच जर समोरच्याला इंटरेस्ट असेल तर त्याची फसगत होण्याची शक्‍यता असते. विशेष करून मुली त्यात भावनिकदृष्ट्या अडकतात आणि नंतर नकार आला की नैराश्‍य येते. 

एकमेकांचा आदर राखून गप्पा व्हायला हव्यात हे साधे सूत्रसुद्धा अनेक उदाहरणांमध्ये पाळलेले दिसत नाही. कोणत्याही एखाद्या वाक्‍यावरून judgemental होणे हेदेखील अपेक्षित नाही. संवादात आणि वर्तनात किमान सौजन्य असण्याची आवश्‍यकता आहे. 

समीर म्हणाला, की तुमच्या लेखांमधून किंवा व्याख्यानांमधून हे नक्की सांगा की बाहेर कॉफीला जाल तेव्हा निदान स्वतःचे तरी पैसे मुलींनी द्यायला हवेत. 

‘म्हणजे?’ - मी. 

‘हल्ली काय एका मुलीला भेटले तर लगेच लग्न काही ठरत नाही. मीच आत्तापर्यंत ६-७ मुलींना भेटलोय. बाहेर भेटतो ते कुठल्यातरी महागड्या कॉफी शॉपमध्ये भेटतो. चांगली दीडशे-दोनशे रुपयांना एक कॉफी असते. आत्तापर्यंत फक्त एका मुलीने विचारले, की मी पैसे देऊ का? बाकीच्या सगळ्यांनी गृहीतच धरले की पैसे मुलानेच द्यायचे असतात. आत्तापर्यंत माझे हजार-पंधराशे रुपये गेले आहेत. प्रश्‍न पैशाचा नाही. या मुली गृहीत धरतात त्याचा त्रास होतो. इथे कुठे जाते त्यांची जेंडर इक्वॅलिटी?’ 

हे ऐकून ‘हे सुद्धा सांगायला हवे?’ असे मला वाटले. स्त्री-पुरुष समानतेच्या युगात आपण वावरत असताना या गोष्टी सांगायला लागू नयेत असे मला वाटते. 

घरातल्या कामांबद्दलपण बोलले गेले पाहिजे. आजच्या या युगात मुलांनाच काय पण मुलींनाही घरातल्या कामाची सवय नाही. कितीही माणसे घरातल्या कामासाठी असली तरी आपल्याला काम करावेच लागते, निदान करवून तरी घ्यावे लागते. याचीही जाण असणे आवश्‍यक वाटते. 
मुले मुली भेटतात त्यावेळी खूप वरवरच्या विषयांवर बोलले जाताना दिसते. 

खरे तर जीवनविषयक मूल्यांबद्दल बोलणे अतिशय आवश्‍यक आहे. माझी जीवन जगायची मूल्ये काय आहेत यावर विस्तृत चर्चा व्हायला हवी. माझ्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींना महत्त्वाचे स्थान आहे, हे सांगायला हवे. जिथे मूल्ये जुळतात, तिथे त्यांचे सहजीवन फुललेले पाहायला मिळते. 
विश्‍वास, 
 एकमेकांचा आदर, 
 नात्यातली पारदर्शकता, 
 समाजाप्रती असलेली बांधिलकी, 
 वेळ पाळणे अर्थात वक्तशीरपणा, 
 व्यवस्थितपणा, शिस्त, 
 एकनिष्ठपणाच्या माझ्या कल्पना.. 

अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल बोलले गेले पाहिजे. 

माझ्या आयुष्यात पैशाला महत्त्व किती आहे याचाही विचार व्हायला पाहिजे. पैशाबद्दलच्या कल्पना जुळल्या पाहिजेत. एकमेकांची ही जीवनमूल्ये match झाली तर सहजीवन सुरेल व्हायला मदत होते. 

Compatability ठरवण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लग्न या विषयाचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. 

पालकांबरोबरची पहिली भेट 
या अवांतर गप्पा फक्त मुला-मुलींच्याच होतात असे नाही, तर पहिली भेट जेव्हा पालकांबरोबर होते तेव्हादेखील नेमक्‍या विषयांवर चर्चा होताना दिसत नाही. अनेकदा पालक ओळखी काढण्याच्या मागे असतात. त्यातून त्या मुलाची किंवा मुलीची माहिती कळावी ही प्रामाणिक अपेक्षा असते. पण अशा ओळखी काढून नेमकी माहिती मिळण्याची शक्‍यता जवळ जवळ नाहीच. 

पूर्वीच्या काळी ओळखीतून लग्न जमायची. आपल्या सगळ्यांचेच एकमेकांच्या घरी जाणे येणे असायचे. त्यातून ती माणसे आपल्या परिचयाची व्हायची. पूर्वीची जीवनशैली निराळी होती. माझ्या लहानपणी आम्ही वाड्यात राहत होतो. सुटीच्या दिवशी आम्ही सगळी वाड्यातली मुले-मुली वेगवेगळे खेळ खेळायचो. तहान लागली तर कोणत्याही घरात जाऊन पाणी प्यायची मुभा होती. सगळ्यांच्या घराचे दरवाजे उघडेच असायचे. त्यावेळच्या जीवनशैलीचे हे अगदी एक छोटेसे उदाहरण. त्यातूनच माणसे कळायची. पण आता सगळेच बदलले आहे. पालकांबरोबरच्या भेटीमध्येसुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. 

घरात परिचितांचे किती येणे जाणे असते? घरातले धार्मिक कार्यक्रम कोणते? घरातले सगळे जण मिळून बाहेर जेवायला जाणे, घरात एकत्र जेवणे यापैकी एका आठवड्यात किती वेळा असते? घरातल्या सगळ्यांचे रुटीन काय असते? कशा प्रकारचे जेवण सगळ्यांना आवडते? घरात ड्रिंक्‍सच्या पार्टीची पद्धत आहे का? घरातल्या सगळ्यांना व्यायाम/exercises करायला आवडते का? असे अनेक मुद्दे आहेत. यातून जी माहिती समजेल ती कोणत्याही परिचिताला विचारून कळेलच असे नाही. स्वतः समोरच्या व्यक्तीशी गप्पा मारून त्यांना बोलते करून अनेक गोष्टी लक्षात येऊ शकतात. 

अनेकदा पालक येतात आणि म्हणतात, ‘त्या मुलाचे किंवा मुलीचे चारित्र्य कसे आहे त्याची तपासणी करता येईल का? आम्हाला ते कळायला हवे.’ पण सध्याच्या whats app आणि social media च्या जमान्यात अशी माहिती मिळणे खरेच अवघड आहे. त्यापेक्षा स्वतः खात्री केलेली केव्हाही चांगली. आम्ही कायमच पालकांना हे सांगतो, की दुसऱ्या व्यक्तींकडून ओळखी काढण्यापेक्षा स्वतः भेटा. 

लग्न ठरल्यानंतर ‘अनुरूप’मध्ये मुलगा, त्याचे कुटुंबीय आणि मुलगी, तिचे कुटुंबीय यांच्यासाठी guidence session उपलब्ध आहे. ज्याची बदलत्या काळानुसार गरज आहे. 

हल्ली तर मी अनेक पालकांना हे सुचविते, की लग्न ठरले की दोन्ही कुटुंबे मिळून २-४ दिवस कुठेतरी ट्रीपला जाऊन या. प्रवासात माणूस जास्त कळतो.. सरते शेवटी २४ तास एकत्र राहिल्याशिवाय थोडेच काही कळते?

फोटो फीचर

संबंधित बातम्या