संवाद म्हणजे नेमकं काय? 

गौरी कानिटकर
गुरुवार, 21 जून 2018

लग्नविषयक
 

‘सागर तुला काय वाटतंय? आपलं लग्न कुठल्या कार्यालयात व्हायला पाहिजे?’ 
‘हे सगळं घरातल्या मोठ्यांना ठरवू देत ना...’ 
‘माझ्या शब्दाबाहेर माझ्या घरातले नाहीत. मी म्हणीन त्या हॉलमध्ये होईल आपलं लग्न...’ नेहाचा पारा क्षणार्धात चढला होता. 
‘अगं नेहा, कशाला थोडक्‍यासाठी वाद? आई बाबा म्हणतायत तर तसं करूया नं!’ 
‘याचा अर्थ प्रत्येक गोष्ट घरातल्यांना विचारूनच करायची? म्हणजे तू नंतर पण तसाच वागणार का?’ 

‘म्हटलंय का तसं? बाकी गोष्टी तर आपण ठरवूया ना!! आणि तू पण म्हणजे...?’ 

‘अरे पण लग्न कुणाचं आहे? माझ्या मताला काही किंमतच नाही?’ 

‘प्रत्येक गोष्टीत वाद घालायचाच असं ठरवलं आहेस का तू? परवासुद्धा आई काहीतरी साधं सांगत होती. तेव्हाही तू ऐकून घेत नव्हतीस.’ 

‘अच्छा, म्हणजे ह्याची चर्चा झाली वाटतं घरात!?’ 

‘आता कुठून तरी कुठंतरी जाऊ नकोस.’ 

  

‘तुला सांगते सरिता, मला ना माझ्या सगळ्या गोष्टींबद्दल खूप कौतुक ऐकायची सवय आहे गं, पण या घरात नं कुणाला माझं कौतुकच नाही. मी साधी छोटीशी रांगोळी काढली ना तरी माझ्या बाबांना कित्ती कौतुक आहे माझं! सगळ्यांना सांगतात... आणि इथं? अगं माझ्या होणाऱ्या सासरी परवा मी बटाटे वडे केले होते, इतके चविष्ट झाले होते.. पण प्रवीणचे बाबा तर, ‘व्वा..’ इतकंच म्हणाले. साधं तोंडभरून कौतुकसुद्धा करता आलं नाही त्यांना.’ 

‘हो गं श्रेया, खरंच तुझे बाबा किती कौतुक करतात नं!’ 

‘आता तूच सांग, एवढी साधी अपेक्षापण मी नाही करायची?’ 

‘प्रत्येक मुलाला मी भेटले की तो विचारतोच - कुकिंग करायला आवडतं का? कुणीच मला का नाही विचारत की तू मॅनेजर आहेस तुझ्या कंपनीत... तर किती माणसं तुझ्या हाताखाली काम करतात? तू त्यांना कशी मॅनेज करतेस? त्याला हे समजून घ्यायला नको? तोही कुठल्यातरी कंपनीत महत्त्वाच्या पोस्टवर काम करत असतो ना?’ वैदेही मला सांगत होती. 

अशी कितीतरी उदाहरणे आहेत... 

गेली अनेक वर्षे समुपदेशक म्हणून काम करत असताना.. ‘समजूनच घेतलं जात नाही’ अशी तक्रार करताना अनेक जणांना मी पाहिलं आहे. मला समजलेली मी आणि दुसऱ्यांना समजलेली मी यात अनेकदा फरक असल्याचं जाणवत राहतं. तसं पाहिलं, तर हा फरक असतोच आणि तसा तो असणारच नं? समजूतदार हा शब्ददेखील फार गुळगुळीतपणे वापरला जातो, असं मला वाटतं. 

आमच्या एका ‘वधू-वर गप्पां’च्या कार्यक्रमात मी सहजपणे ‘तुमच्या अपेक्षा काय आहेत?’ असं विचारलं, तर सगळ्यांनी एकमुखानं ‘माझा पार्टनर समजूतदार असावा’ अशी अपेक्षा व्यक्त केली. 

पण लक्षात असं आलं, की समजूतदार या शब्दाचा अर्थ जो तो ज्याला त्याला हवा तसा, त्यांना अभिप्रेत असलेला घेत होते. स्मिता म्हणाली, ‘माझ्या प्रत्येक म्हणण्याला त्यानं ‘हो’ म्हटलं पाहिजे.’ तिच्या या उत्तरावर सगळेच हसले. 

‘बघ हं.. अशा वागणाऱ्या मुलाला तूच म्हणशील, की तुला तुझं काही मतच नाही... अगदी ठोंब्या आहेस...’ या माझ्या बोलण्यावरपण तिनं मान डोलावली. 

‘मला समजून घ्यायला हवं’ असेल, तर मला नेमकं काय वाटतंय, मला नेमकं काय म्हणायचंय, हे मलाही समजणं आणि नंतर योग्य शब्दांत सांगता येणं खूप आवश्‍यक आहे. समोरचा माणूस काय अर्थानं ते बोलतो आहे हेही मला समजलं पाहिजे. केवळ एका उदाहरणावरून आपण न्यायाधीशाच्या भूमिकेत जात नाही नं, हे ज्याचं त्यानं तपासलं पाहिजे. एखादी गोष्ट मला महत्त्वाची वाटते पण दुसऱ्या व्यक्तीला दुसरीच गोष्ट महत्त्वाची वाटू शकते. याचा अर्थ ती व्यक्ती समजूतदार नाही असं नाही.. आणि आपण कुणीच शंभर टक्के समजूतदार असत नाही. 

आपल्याला समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल, तर आधी स्वतःला समजून घ्यावं लागतं. कोणत्याही प्रसंगात माझ्या भावना नेमक्‍या काय आहेत, हेही ओळखणं आवश्‍यक ठरतं. 

नेहमी घडणारा एक प्रसंग--- मी कोणत्यातरी कारणानं रागावलेली असते. समोरचा माणूस विचारतो, ‘रागावली आहेस का?’ त्यावर मी पटकन म्हणते, ‘छे कुठं काय? रागवायला काय झालंय? आणि समजा रागावले तरी विचारतोय कोण माझ्या रागाला?’... आणि मग संभाषण वेगळ्याच पातळीवर जातं. 

संवादाची तीच तर गंमत आहे. संवाद साधता येणं म्हणजे दर वेळी गोड गोड बोलणं असं अजिबात नाही. पण ज्या अर्थानं आणि ज्या भावनेनं मी बोलते आहे, तोच अर्थ आणि तीच भावना समोरच्या व्यक्तीला समजणं आणि त्यानुसार त्यानं व्यक्त होणं... अशी समजायला अगदी सोपी आणि आचरणात आणायला कठीण अशी ही व्याख्या आहे. 

वरच्या उदाहरणातला सागर आणि नेहाचा संवाद बघूया. 

खरं तर लग्न ठरल्यावर ते दोघं एकत्र भेटले आहेत. दोघांनाही नेमक्‍या शब्दांत बोलता आलं असतं. 

पण दोघांनीही एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.. आणि एकत्र भेटण्याची, छान गप्पा मारण्याची, मिळालेला वेळ मजेत घालवण्याची संधी फुकट घालवली. कोणत्या हॉलमध्ये लग्न व्हावं हे खरंच माझ्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे का? आणि तसं असेल, तर मला ते योग्य शब्दांत मांडता का आलं नाही? सुतावरून स्वर्ग तर अगदी सहज गाठला जातो. सागर नंतरपण तसंच वागणार असं नेहानं अगदी लगेच गृहीत धरलं... आणि सागरनंदेखील तिला विचारायला हवं होतं की आपलं लग्न कुठं झालेलं तुला आवडेल? 

अनेकदा विषय अगदी क्षुल्लक असतो, पण मला महत्त्व दिलं जात नाही, या विचारानं समोरचा माणूस दुखावला जातो आणि मग संभाषण वेगळ्याच पातळीवर जातं. 

कोणतेही नातेसंबंध छान फुलवायचे असतील तर संवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संवादाची साखळी पूर्ण करावी लागते. नाहीतर कुठंतरी खूप रुखरुख लागून राहते. 

सुवर्णा आणि राजन दोघांची पसंती झाली होती. पण तरीही राजनला अजून एक - दोन वेळा भेटून मगच फायनल निर्णय घ्यावा असं वाटत होतं. पण त्यानं तसं तिला स्पष्ट काहीच सांगितलं नाही. येणाऱ्या रविवारी दोघं दिवसभर फिरायला गेले. सुवर्णा तर हवेत तरंगत होती. राजन तिला खूप आवडला होता. 

दुसऱ्याच दिवशी राजननं तिला एक मेसेज केला, It’s all over now. We can’t proceed. सुवर्णाला त्या मेसेजचा अर्थ कळायलाच वेळ लागला... आणि मग ती कोसळलीच. वारंवार आदल्या दिवसाचे प्रसंग, संवाद ती आठवून पाहू लागली. सुरुवातीला नैराश्‍य, नंतर राग, मग माझ्यात काय कमी आहे म्हणून त्यानं या पद्धतीची वागणूक मला द्यावी, असे विचार तिच्या मनात येऊ लागले. मग केवळ एका मेसेजवर असे संबंध संपवता येतात?... अशाही विचारांनी तिला घेरलं. तिनं त्याला फोन केला तर त्याचा फोन बंद! 

या उदाहरणामध्ये संवाद मधेच तोडून टाकला आहे. 

व्यवस्थित फोन करून, मला का पुढं जावंसं वाटत नाही, हे सांगितलं असतं आणि तुझ्यात काही कमी नाही पण मलाच निर्णय घेता येत नाही असं सांगितलं असतं तर सुवर्णा निराश झाली असतीच; पण तिला अपराधी वाटलं नसतं. त्याचा राग आला असता तरी तिला त्या प्रसंगातून सावरणं सोपं गेलं असतं. 

अशा पद्धतीनं संवादाची साखळी पूर्ण करावी लागते, नाहीतर गैरसमजच जास्त होतात. 
वरच्या प्रत्येक उदाहरणामध्ये लक्षात येईल, की मला हवंय काय आणि माझ्या पुढ्यात येतंय काय? यात नक्कीच फरक असतो. कित्येकदा मला स्वतःलादेखील त्या नेमक्‍या शब्दाचा अर्थ लक्षात येत नसतो. 

आपल्या सगळ्यांच्या बाबतीत थोड्याफार फरकानं या गोष्टी घडतच असतात. 
समर्थ रामदास म्हणतात, ज्या भाषेमुळे वाद मिटतो तो संवाद आणि तोच मनुष्यासाठी हितकारक असतो, बाकी सर्व वितंडवादच! 

संवादाला ‘कला’ म्हणतात. ‘कौशल्य’ म्हणतात... आणि कोणतीही कला किंवा कौशल्य शिकल्याशिवाय येत नाही. पण त्यातला चांगला भाग असा आहे, की शिकल्यावर पारंगत होता येतं. त्याची सुरुवात अगदी कोणत्याही वयात करता येते. 

मग कधी करताय शिकायला सुरुवात?

फोटो फीचर

संबंधित बातम्या