भावनांक महत्त्वाचा! 

गौरी कानिटकर
गुरुवार, 5 जुलै 2018

लग्नविषयक
 

मागच्या एका लेखात आपण ‘समजूतदारपणा’ याबाबत बोलत होतो. समजून घेणे, समजूतदारपणा या गोष्टीला नातेसंबंधात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘समजतंय तुला काय म्हणायचं ते...’ अशा नुसत्या शब्दांनीसुद्धा समोरच्या माणसाला बरे वाटते, आपल्या बरोबर कुणीतरी आहे असे जाणवते. खरेतर आपण कधी कधी त्या माणसासाठी फार काही करू शकत नसतो, पण त्याच्या भावनांशी तादात्म्य पावता येणे खूप महत्त्वाचे असते. जवळपास गेली साठ वर्षे Emotional intelligence या संकल्पनेबद्दल थोडेफार लिहिले-बोलले गेले असले, १९९० च्या दशकात प्रामुख्याने ही संकल्पना प्रकाशझोतात आली आणि पाहता पाहता नातेसंबंध समृद्ध करण्यासाठी EQ  - emotional quotient म्हणजेच भावनांक महत्त्वाचा असल्याचे जगाने स्वीकारले. 

स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखता येणे, इतकेच नव्हे तर त्या भावनांना नाव देता येणे आणि त्या आधारे आपली वागणूक ठरवता येणे याला Emotional Intelligence असे म्हणतात. मराठीत याला ‘भावनिक बुद्धिमत्ता’ म्हणूया. ही भावनिक बुद्धिमत्ता किती आहे याची मोजदाद म्हणजे ‘भावनांक’ होय. ही संकल्पना समजायला एकदम सोपी आहे. सर्वसाधारणपणे कोणकोणत्या भावना आहेत असे विचारले असता जेमतेम आठ ते दहा भावनांची नावे सांगता येतात. उदा. राग, लोभ, प्रेम, मत्सर, अपराधीपणा, अपमान, चिंता इत्यादी. पण असे म्हणतात, की प्रत्यक्षात ८२ ते ८५ भावना अस्तित्वात आहेत. फक्त ‘राग’ एवढी एकच भावना जरी घेतली तरी, ‘साधी चिडचिड’ इथपासून ते ‘तळपायाची आग मस्तकाला जाणे’ एवढी मोठी व्याप्ती या एका भावनेची आहे. कित्येकदा आपल्याला त्या भावनेला नेमके नाव देता येत नाही. कधी कधी कोणत्यातरी गोष्टीमुळे आपल्याला रुखरुख लागलेली असते आणि पुष्कळ वेळ विचार करूनदेखील त्याचे कारण कळत नाही. आपलीच नेमकी भावना न समजल्याने चुकीचा निर्णय घेण्याची शक्‍यता असते. आपला भावनांक उत्तम असेल तर हे टाळता येते. 

भावनांक म्हणजे नेमके काय? तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या भावनांबद्दलची जागरूकता होय. मला नेमके आत्ता काय वाटतेय, हे समजता येणे आणि त्या पुढचा टप्पा म्हणजे भावना हाताळता येणे. ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या कल्पनेतही न येणारी गोष्ट अचानकपणे मला सहन करावी लागली, तर माझे भावनिक संतुलन मला हाताळता येते का, हे पाहणे. माणसांची बुद्धिमत्ता मोजण्याविषयीचे प्रयत्न आणि त्याबाबतची जागरूकता गेली जवळपास शंभर वर्षे होत आहे. IQ- Intelligence quotient किंवा मराठीत ज्याला बुद्‌ध्यांक म्हणतात, तो मोजणे हे काही नवीन नाही. एका ठराविक वयानंतर मूलभूत बुद्‌ध्यांक वाढत नाही, असे मानले जाते. पण भावानांकाच्या बाबतीत मात्र असे नाही. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, कोणत्याही वयात, आपल्याला आपला भावनांक वाढवता येतो. कोणतेही नाते प्रस्थापित करायचे असेल, नव्हे ते दृढ करायचे असेल तर प्रत्येकाने त्याचा भावनांक वाढवणे याला पर्याय नाही. 

काही उदाहरणे बघूया. 

  नैना - दिसायला एकदम छान, शिकलेली, स्वतःचा स्टार्टअप बिझनेस. कुठेच काही कमी नाही. पण काही कारणाने ३-४ मुलांनी तिला नकार दिला. हा नकार तिला पचवता आला नाही. तिलाच नाही तर तिच्या आईलादेखील या गोष्टीचा खूपच त्रास झाला. तिच्या मनात असंख्य विचार आले - १. माझ्यामध्ये काही कमतरता आहे का? २. मी अजून बारीक असते तर मला होकार आले असते का? ३. आजकालच्या मुलांना काही कळतच नाही ४. कॉलेजात असताना मीच माझे ठरवून मोकळी झाले असते तर किती बरे झाले असते! 

असे एक ना शंभर विचार... आणि त्यातून येणारी हतबलता. अनेकदा अगदी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा पटकन हतबलता आलेली पाहायला मिळते. म्हणजे नेमके काय घडले? एखाद्या घटनेनंतर आपल्या मनात काय भावना आल्या, त्या का आल्या आणि त्यावर आपण नेमके काय करायला हवे याची सुसंगती लावता आली नाही. म्हणजेच आपला स्वतःचा इथे भावनांक वाढवण्याची गरज आहे. 

  मीना आणि आर्यन यांचे संध्याकाळी पाच वाजता एका कॉफी शॉपमध्ये भेटायचे ठरले होते. आर्यन अगदी वेळेवर पोचला. साडेपाच झाले, सहा वाजले, साडेसहा झाले... पण मीनाचा पत्ताच नव्हता. फोन लावला तर फोन ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर..’ आर्यनला खूप राग आला. मीनाने माझा अपमान केला असेच त्याला वाटत होते. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये राग येणे अगदी स्वाभाविक आहे. पण राग आल्यावर आर्यन आपल्या मनामध्ये काय बोलला असेल ते पाहू - १. किती उशीर? मेसेज पाठवायला काय झाले? २. जमणार नव्हते तर सांगायचे ना सरळ ३. किती वेळ मी इथे वाट पाहायची? ४. मला काय उद्योग नाहीत का दुसरे? की फक्त मलाच गरज आहे? नाही आली तर नाही आली, गेली उडत. जगात काय फक्त तीच एक मुलगी आहे की काय? 

सर्वसाधारणपणे हीच वाक्‍ये कुणाच्याही मनात येतील. पण त्यानंतर त्याच विचारांत आपण किती वेळ रेंगाळायचे आणि आपलाच मूड घालवून बसायचे हा आपला निर्णय असतो. इथे भावनांक वाढवण्याच्या दृष्टीने कामी येतो तो गुण म्हणजे Empathy. याला तदानुभूती म्हणता येईल. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर समोरच्याच्या जागेवर जाऊन विचार करणे. या वरच्या उदाहरणात आर्यनने तदानुभूतीने विचार केल्यास त्याच्या डोक्‍यात वेगळे विचार आले असते. ‘मीनाने मेसेज केला पण मला मिळालाच नाही का?’, ‘तिचा फोन हरवला का?’, ‘तिला तर काही नसेल ना झाले?’, ‘आयत्या वेळी इतके काहीतरी महत्त्वाचे आले असेल का की त्यामुळे ती येऊ शकली नाही आणि कळवूही शकली नाही?’ हे विचार डोक्‍यात आले असते तर आर्यनचा राग खूपच प्रमाणात कमी झाला असता.. आणि राग कमी झाला की त्या आधारे घेतले जाणारे निर्णयसुद्धा अधिक रॅशनल म्हणजेच विवेकनिष्ठ असण्याची शक्‍यता वाढते. एकुणात भावनांक वाढवण्याच्या दिशेने होणारा हा प्रवास आहे. 

  आता असे समजू की हा दुसऱ्या उदाहरणातला रागावलेला आर्यन घडल्या घटनेनंतर घरी गेला. त्याचे वडील घरी होते. आर्यनचा चेहरा पाहूनच त्यांनी ओळखले, की फारसे काही बरे घडले नसावे. त्यांनी विचारले, तर तो म्हणाला, ‘मीना आलीच नाही, मी आपला दीड तास तिथे ताटकळत बसून...’ ‘हो? तुझा तो दीड तसा अगदी त्रासाचा गेला असेल ना? समजतंय मला,’ बाबा म्हणाले, ‘..आणि त्यातून तिचे प्रोफाइल तुला आवडलेही होते. वाट बघूया तिचा काही फोन - मेसेज येतोय का ते. बस थोडा वेळ शांत. मस्त चहा करू का तुझ्यासाठी?’ वडिलांच्या या बोलण्याने आर्यनला एकदम छान वाटले. तो काहीसा रिलॅक्‍स झाला. वडिलांनी आपल्या मुलाच्या जागी जाऊन विचार केला. त्याला बरे वाटत नसणार याचा अंदाज घेतला आणि त्याला कशाने छान वाटेल याचा विचार करून कृती केली. म्हणजेच, त्यांचा भावनांक या विशिष्ट परिस्थितीत उत्तम आहे असे म्हणता येईल. 
आता याच जागी जर त्याच्या वडिलांनी, ‘अरे जाऊ दे... तोंड पडून बसायला काय झाले? असल्या छपन्न मुली शोधू आपण. या आजकालच्या मुली पार डोक्‍यावर बसल्यात अगदी.. आणि तू तरी तिथे एवढा वेळ कशाला थांबला होतास? तुला काही स्वाभिमान आहे की नाही? दहा मिनिटे थांबायचे आणि लगेच निघायचे तिकडून,’ असे म्हटले असते तर? आधीच नकारात्मक विचारांत असणाऱ्या आर्यनच्या भावना त्यांना कळल्याच नाहीत असे म्हणता आले असते. 

दुसऱ्यांच्या भावनांकडे तदानुभूतीने बघता येणे ही एक कला आहे. इतर कोणत्याही कलेसारखा याही बाबतीत जरा ‘रियाझ’ करावा लागतो. आपल्यात असतोच हा गुण थोड्याफार प्रमाणात तरी! गरज असते ती या गुणाला घासून - पुसून लख्ख करायची. तो अधिक अधिक व्यापक करायची. पती-पत्नीच्या नात्यांत तर भावनांक वाढवण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. तदानुभूतीने विचार करत भावना समजून घेणारा जोडीदार असेल तर आपोआप नात्याची वीण घट्ट होत जाते. इथे एक गोष्ट सांगणे गरजेचे आहे. भावनाच नसणे म्हणजे उत्तम भावनांक नव्हे. आनंद, राग, दुःख अशा वेगवेगळ्या भावना मनात येणे हे मानवी आहे. पण या भावना हाताळण्याची क्षमता म्हणजे भावनांक होय. 

अनेकदा जोडीदार निवडीच्या वेळी IQ ला म्हणजे बुद्‌ध्यांकाला अनेक मुले-मुली आणि पालकही अवास्तव महत्त्व देतात. बुद्‌ध्यांक आणि शिक्षण यांचा संबंध जोडायचीही चूक यावेळी घडताना दिसते. शिक्षण-बुद्‌ध्यांक याला दिल्या जाणाऱ्या प्राधान्याच्या गडबडीत पती-पत्नीच्या नात्यांत अत्यंत महत्त्वाचा असणारा EQ म्हणजे भावनांक कुठेतरी मागेच पडतो. सतरा पदव्या असलेली आणि आईनस्टाईनइतका बुद्‌ध्यांक असणारी व्यक्ती स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवू शकत नसेल, तुम्हाला भावनिकदृष्ट्या समजून घेत नसेल तर तुमचे नाते टिकेल का? बहरेल का? या प्रश्‍नाच्या उत्तरातच जोडीदार निवडताना बुद्‌ध्यांकापेक्षा भावानांकाला जास्त महत्त्व का द्यायचे या प्रश्‍नाचेही उत्तर आहे!

फोटो फीचर

संबंधित बातम्या