अनुरूपता.. शरीरांची... 

गौरी कानिटकर
गुरुवार, 19 जुलै 2018

मध्यंतरी मी एका तरुण कलाकारांच्या गटाशी गप्पा मारायला गेले होते. त्या गटात मुले-मुली दोघेही होते. विषय अर्थातच लग्न आणि जोडीदार निवड हा होता. वेगवेगळ्या विषयांवर बरीच चर्चा झाली आणि मग गटात असणाऱ्या मीराने प्रश्‍न केला, ‘मावशी, जोडीदार निवडताना आवश्‍यक असणाऱ्या बाकी अनुरूपतेबद्दल तू बोललीस. पण सेक्‍शुअल कम्पॅटिबिलिटीचे काय?’ मी लग्न या विषयात कामाला सुरुवात केली त्याला जवळपास दोन दशके झाली. लग्नाला उभ्या मुला-मुलींच्या लग्नाकडे, लग्नाच्या अपेक्षांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात जो प्रचंड बदल होत गेलाय तो थक्क करणारा आहे.

मध्यंतरी मी एका तरुण कलाकारांच्या गटाशी गप्पा मारायला गेले होते. त्या गटात मुले-मुली दोघेही होते. विषय अर्थातच लग्न आणि जोडीदार निवड हा होता. वेगवेगळ्या विषयांवर बरीच चर्चा झाली आणि मग गटात असणाऱ्या मीराने प्रश्‍न केला, ‘मावशी, जोडीदार निवडताना आवश्‍यक असणाऱ्या बाकी अनुरूपतेबद्दल तू बोललीस. पण सेक्‍शुअल कम्पॅटिबिलिटीचे काय?’ मी लग्न या विषयात कामाला सुरुवात केली त्याला जवळपास दोन दशके झाली. लग्नाला उभ्या मुला-मुलींच्या लग्नाकडे, लग्नाच्या अपेक्षांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात जो प्रचंड बदल होत गेलाय तो थक्क करणारा आहे. या बदलांमध्ये गेल्या काही वर्षांत नव्याने भर पडली आहे ती या नव्या अपेक्षेची-सेक्‍शुअल कम्पॅटिबिलिटी म्हणजेच लैंगिक किंवा शारीरिक अनुरुपतेचे करायचे काय? या निमित्ताने ‘सेक्‍शुअल कम्पॅटिबिलिटी’चा उल्लेख असणाऱ्या दोन गोष्टी मला आठवल्या. एक म्हणजे व्हाइट लिली आणि नाईट रायडर हे नाटक, ज्यात नायक आणि नायिका याबद्दल बोलतात आणि दुसरे म्हणजे काही वर्षांपूर्वी येऊन गेलेला ‘की अँड का’ हा सिनेमा; ज्यात नायिका करिना कपूरची आई हा विषय तिच्यापाशी काढते. ही दोन उदाहरणे म्हणजे हळूहळू हा विषय लग्नाच्या बाबतीतल्या चर्चाविश्‍वात आला आहे याची लक्षणे आहेत. 

लग्न म्हटल्यावर इतर सर्व गोष्टींबरोबर लैंगिकता हा विषयही महत्त्वाचा आहेच. किंबहुना लग्नसंस्थेच्या गाभ्याशी लैंगिकता आणि प्रजनन हेच मुद्दे आहेत. मुले-मुली आजकाल या विषयाकडे खुलेपणाने बघू लागलेत आणि बोलू लागलेत ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. प्रश्‍न विचारणे हे सजग असण्याचे लक्षण आहे.. आणि या प्रश्‍नांना योग्य उत्तरे मिळाली नाहीत तर नुकसानच अधिक आहे. लैंगिकता हा विषय जाहीरपणे न बोलण्याचा मानला जातो. पण असंख्य गैरसमज पसरवण्याची ताकद असणारी माध्यमे आज या मुलांच्या हातात आहेत. तेव्हा आमच्या पिढीने अधिक पुढाकार घेत याविषयी बोलण्याची आणि मुला-मुलींच्या शंकांचे निरसन करण्याची गरज आहे. म्हणूनच आज आपण लैंगिक अनुरूपतेविषयी बोलणार आहोत. मीराने जो प्रश्‍न विचारला तो असंख्य मुला-मुलींच्या मनात आहे, बोलून दाखवणारे तुलनेने कमी असले तरी! त्यातही अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत असणारी मुले-मुली काही प्रमाणात भीतीमध्येही आहेत. पालक वर्गातल्या अनेकांचे यावर म्हणणे असते, ‘त्यात काय एवढे? पाण्यात पडले की पोहायला येते. आम्ही नाही का संसार केला?’ पाण्यात पडल्यावर बुडायला लागल्यावर बुडण्याशिवाय दुसरी सोय तीस वर्षांपूर्वी उपलब्ध नव्हती. कसेही असले आणि काहीही झाले तरी रेटून न्यायचे हे पालकवर्गाच्या पिढीवर त्यांच्या आधीच्या पिढीकडून आणि एकूणच समाजाकडून बिंबवले गेले होते. आता तशी परिस्थिती उरलेली नाही. स्वतःच्या सुखाला टांगणीला लावून केवळ समाजात काय मान्य आहे याला महत्त्व देणे, या पिढीला मंजूर नाही. ‘पाण्यात पडण्याच्या आधी सुरक्षेचा तलाव लावावा, नीट पोहणे शिकून घ्यावे आणि मगच उडी मारावी.. इतके करूनही बुडायला लागलो तर सरळ तलावातून बाहेर यावे,’ असे मानणारी ही पिढी आहे. यात चूक काय बरोबर काय हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. पण आहे ही परिस्थिती अशी आहे, जी बदलणार नाही. उलट अजूनच पुढे जात मुले-मुली अधिक स्वतंत्र आणि स्वहित जपणारी होणार आहेत. म्हणूनच ही मानसिकता समजून घेऊन या प्रश्‍नाकडे बघायला हवे. 

सामान्यतः कम्पॅटिबिलिटी किंवा अनुरूपता असे म्हटल्यावर डोळ्यासमोर बौद्धिक, भावनिक, भौतिक/आर्थिक, रोजच्या सवयी/जीवनशैली, धार्मिक असे अनेक मुद्दे येतात. या सगळ्याच मुद्द्यांविषयी बोलताना, चर्चा करताना आम्ही सांगतो ते म्हणजे, ‘अनुरूपता रेडिमेड नसते.’ जगातल्या कोणत्याच दोन व्यक्ती एकमेकांना रेडिमेड अनुरूप आहेत असे होत नाही. आपला अतिशय जवळचा मित्र किंवा मैत्रीण आठवा. पहिली भेट आणि एकमेकांसाठी अतिशय जवळचे होण्यामध्ये काही कालावधी जातो. अगदी पहिल्या भेटीत आवडलेली किंवा आपली वाटलेली व्यक्तीसुद्धा लगेच जवळची होत नाही. त्यानंतरही एकमेकांना मित्र किंवा मैत्री म्हणून अनुरूप होण्यासाठीही बराच काळ जावा लागतो. असे का होते? कारण, अनुरूपता रेडिमेड नसते. ती हळूहळू घडत जाणारी गोष्ट आहे. आवडी-निवडी, स्वभाव, सवयी टोकाच्या असतानाही उत्तम मैत्री असणारी मंडळी आपण बघतो, अशी मैत्री अनुभवतोही याचे कारणच हे की आपण एकमेकांना अनुरूप होत जातो. लैंगिकतेच्या बाबतीतसुद्धा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे जो लक्षात ठेवला पाहिजे. 

मानव आणि इतर प्राणीविश्‍व यात एक महत्त्वाचा फरक आहे. केवळ प्रजननासाठी नव्हे, तर आनंदासाठीही लैंगिक संबंध असणे ही गोष्ट मोजके अपवाद सोडता प्राणीविश्‍वात अस्तित्वात नाही. आनंदासाठी लैंगिक संबंध असण्याच्या वृत्तीमागे मानवाच्या प्रगत जाणिवांचा हातभार आहे. मानवाचा मेंदू त्याप्रमाणे विकसित झाला आहे. म्हणून प्रत्यक्ष लैंगिक संबंधांची कृती ही यांत्रिकपणे होत नाही. मानवामध्ये सेक्‍स ही गोष्ट यांत्रिकतेच्या पलीकडे जाऊन भावभावनांशी जोडली जाते. एखाद्याचा लैंगिक अनुभव चांगला किंवा वाईट होण्यामागे शरीरापेक्षाही मनाचा भाग जास्त असतो असे अभ्यासक सांगतात. दोन व्यक्तींमधले चांगले नाते, भावनिक-बौद्धिक पातळीवर निर्माण झालेली अनुरूपता याचा सकारात्मक परिणाम बेडरूममध्ये दिसून येतो. म्हणूनच लैंगिक अनुरूपता अशी वेगळी काढून तपासता येऊ शकत नाही. किंबहुना इतर गोष्टी नसतील तर लैंगिक अनुरूपतादेखील असणार नाही. तात्पुरते वाटणारे शरीरसुख टिकाऊ नसेल. दोन व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर लैंगिक संबंध आनंददायी आहेत किंवा नाही हे ठरते. म्हणूनच ‘लग्नाच्या पहिल्या रात्री किंवा हनिमूनच्या वेळीच सर्वोत्तम लैंगिक अनुभव आपल्याला मिळेल आणि न मिळाल्यास आपण एकमेकांना लैंगिकदृष्ट्या अनुरूप नाही’ असे निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. लग्नानंतरची पहिली रात्र किंवा सुहाग रात आणि हनिमून यावेळीच मिळणारे परमोच्च सुख वगैरे गोष्टी सिनेमा, कथा-कादंबऱ्या यांनी निर्माण केलेली मिथके आहेत. त्याला बळी न पडण्यात शहाणपण आहे. लग्नानंतरचा कालावधी हा एकमेकांची नीट ओळख करून घेण्याचा, समजून घेण्याचा, एकमेकांना अनुरूप होत जाण्याचा कालावधी आहे. एकमेकांबरोबर असे भावनिकदृष्ट्या अनुरूप होत जाणारे बेडरूममध्येही एकमेकांना सहजपणे अनुरूप होत जातात. ही सगळी प्रक्रिया फक्त अरेंज्ड मॅरेजवाल्या मंडळींना लागू होते असे मुळीच नाही. लव्ह मॅरेज केलेल्या मंडळींनादेखील याच टप्प्यांमधून जावे लागते. अगदी लग्नाआधी लैंगिक संबंध असणाऱ्या जोडप्यांनासुद्धा लैंगिक अनुरूपतेपर्यंत पोचायला त्यांच्या नात्याच्या सुरुवातीचा काळ द्यावा लागतो. या विषयातल्या जगभरच्या तज्ज्ञ अभ्यासक मंडळींनी याविषयी संशोधन करून, अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. एकुणात सांगायचा मुद्दा हा, की लग्नाच्या नात्यात इतर सर्व मुद्द्यांप्रमाणेच लैंगिक अनुरूपतादेखील दोघांनी मिळून हळूहळू मिळवायची गोष्ट आहे. रेडिमेड मिळत नाही. त्याचमुळे अर्थातच लग्नापूर्वी ती तपासायची कोणतीच सोय उपलब्धही नाही, गरजेचीही नाही. या विषयातली गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे लैंगिक आरोग्य तपासणी! 
आज काही लग्न मोडताना दिसतात ती लग्नाआधी लैंगिक आरोग्य तपासणी करून न घेतल्यामुळे. लैंगिक अनुरूपता तपासण्यापेक्षा लैंगिक आरोग्य तपासणीकडे लक्ष देणे जास्त आवश्‍यक आहे. बदललेली जीवनशैली, कामाचे वाढलेले तास आणि तिथले ताणतणाव याचा परिणाम शरीर आणि मनावर होत असतो. अर्थातच अंतिमतः सेक्‍सवरदेखील होत असतो. त्याचबरोबर दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा यांचा लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो. लैंगिक आरोग्य जपणे आपल्याच हातात असते. लग्नाआधी या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्‍टरना भेटून त्यांचा सल्ला घेणे, समुपदेशन घेणे अत्यावश्‍यक आहे. इंटरनेटवर माहिती मिळते, ज्ञान नव्हे. त्यामुळे इंटरनेटवर वाचून सगळे समजले अशा भ्रमात न राहता तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे जाऊन लैंगिक आरोग्याची तपासणी करून घ्यायला हवी. हे समुपदेशन आणि तपासणी दोघांनीही करून घ्यायला हवी. याचे अनेक फायदे असतात. एकतर लैंगिक आरोग्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला होते. काही उपचारांची गरज असेल, तर तत्काळ त्याबाबत काहीतरी करता येते. दुसरे म्हणजे तज्ज्ञ व्यक्तीकडून मनातल्या शंकांचे निरसन होते. तिसरे, त्याहून महत्त्वाचे म्हणजे लैंगिक संबंधांच्या बाबतीत अनेक गैरसमज असतात. ते सगळे या समुपदेशनातून दूर होऊ शकतात. 

एकुणात सांगायचा मुद्दा इतकाच की शरीरांची अनुरूपता बघण्याच्या मागे धावण्यापेक्षा एकमेकांमधले नाते फुलवत भावनिक अनुरूपतेकडे जाणे आणि लैंगिक आरोग्य उत्तम ठेवणे हाच आनंदी सहजीवनाचा राजमार्ग आहे.

संबंधित बातम्या