बदलणाऱ्या भूमिका 

गौरी कानिटकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

लग्नविषयक

हे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सगळे यातली पात्रे...’ अशा आशयाची वाक्‍ये आपण अनेकदा कथा-कादंबऱ्या आणि ललित लेखनांत वाचली असतील. पण मला अनेकदा असे वाटते, की आपले आयुष्य असे ते एकच नाट्य नसते. आपल्या आयुष्यात अनेक चित्रपट असतात; जणू आणि या चित्रपटांमध्ये आपण वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो. विद्यार्थी, मित्र, खेळाडू, कर्मचारी, बॉस अशा कितीतरी भूमिका आपण निभावत असतो.. आणि या सगळ्यात आपल्या लग्नाचा चित्रपट जेव्हा प्रत्यक्षात येऊ लागतो तेव्हा एकदम खूप भूमिका आपल्याला एकत्र वठवायच्या असतात. जणू कमल हसनचाच एखादा चित्रपट! 

लग्न झाले की एकदम नवरा, बायको, सून, जावई, वहिनी, नणंद, मामी, काका, काकू अशी कितीतरी नाती एकदम उदयाला येतात. या सगळ्या नात्यांत वठवण्याची भूमिका वेगवेगळी असते. पूर्वीच्या काळी या नव्या भूमिका मुख्यतः स्त्रियांसाठी ‘जबाबदारी’ म्हणून यायच्या. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. बदललेल्या काळात पुरुषांवरदेखील नवीन भूमिकांची काही जबाबदारी येते आणि एखादा कसलेला अभिनेता जसा आपल्या भूमिकेचा अभ्यास करतो, तयारी करतो; तशी या नव्या भूमिकांची तयारी करणे शहाणपणाचे ठरते. त्याचबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. 

थोडे पुन्हा एकदा बदललेल्या काळाकडे बघितले पाहिजे. माझ्या लहानपणी जवळपास प्रत्येक घरात कोणत्याही मुलीची ‘सासरी सहज निभावून नेता येणे’ या दृष्टीने तयारी करून घेतली जायची. आई किंवा घरातला ज्येष्ठ स्त्री-वर्ग मुलींना कसून तयार करायचा. माझ्या आईनेदेखील हे केले आहे. याचे कारण असे, की लग्न या नात्याने निर्माण होणाऱ्या भूमिकांची व्याख्या ठरलेली होती. स्त्रीने काय करायला हवे, पुरुषाने काय करायला हवे हे नेमके ठरलेले होते. त्याचा साचा ठरलेला होता. पण काळ बदलला आहे. जीवनशैली, मूल्यव्यवस्था बदलली आहे. त्याबरोबर भूमिकांची साचेबद्धता मोडीत निघत आहे. आजच्या मुलींना आपण जुन्या साचेबद्ध पद्धतीने ‘तयारी करून घेण्याच्या दृष्टीने’ वाढवलेले नाही. मुलींना अधिक स्वतंत्र आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतील असेच त्यांचे संगोपन करण्यात येत आहे. त्यांचे स्वतःचे विश्‍व निर्माण करायला शिकवले आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या या काळात संसाराची मुख्य जबाबदारी ही केवळ स्त्रियांकडे न राहता, नवरा-बायको दोघांनी वाटून घेणेच अपेक्षित आहे, आवश्‍यकही आहे. त्यामुळेच लग्नानंतर निर्माण होणाऱ्या नव्या भूमिकेची तयारी असे म्हटल्यावर दोन गोष्टी प्राधान्याने लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे जुन्या काळातली ‘नवरा-बायको’ या भूमिकेची व्याख्या बदलली आहे - ती समजून घेणे. दुसरे म्हणजे या बदललेल्या व्याख्येनुसार निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी करणे. आता ही तयारी अर्थातच मुले आणि मुली अशा दोघांनीही करायला हवी. त्याची पहिली पायरी म्हणजे ‘लग्नाकडून मला काय हवे आहे’ याबद्दलची स्पष्टता. नुकताच एका वर्तमानपत्रात लेख आला होता; ज्यात मुलींचा अविवाहित राहण्याकडे कल वाढतोय याबद्दल मांडणी केली होती. त्यातले अनेक मुद्दे योग्य होते. लग्नाशिवाय आयुष्याला अर्थच नाही असे आजची पिढी मानत नाही, हे माझ्या पिढीने समजून घेतले पाहिजे. लग्नामुळे माझ्या आयुष्यात काही गुणात्मक (qualitative) भर पडणार आहे का, हा प्रश्‍न आज तरुण मंडळी विचारताना दिसतात. लग्नासाठी लग्न न करता माझ्या आयुष्यात गुणात्मक प्रगती होणार आहे म्हणून लग्न करावे अशा विचारापर्यंत ही मंडळी आली आहेत. व्यक्तिशः मला हे चूक वाटत नाही. फक्त थोडेसे अर्धवट वाटते. ‘लग्नामुळे माझ्या आयुष्यात गुणात्मक भर पडावी’ इथेच न थांबता ‘माझ्या जोडीदाराच्या आयुष्यात गुणात्मक प्रगती व्हावी यासाठी हातभार लावायला सक्षम आणि तयार असावे,’ या वाक्‍याची जोड दिली तर गोष्टी अधिक सोप्या होतील. 

नव्या भूमिकांचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की सोयीसोयीने आधुनिकता स्वीकारत पुढे जाता येणार नाही. विशेषतः जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षा ठरवताना. आजही अनेक मुली प्रत्यक्ष जोडीदार शोधत असताना आपल्यापेक्षा अधिक पगार, शिक्षण असणाऱ्या मुलाचीच अपेक्षा करताना दिसतात. ‘चालेल माझ्यापेक्षा कमी पगार आणि शिक्षण असणारा नवरा’ असे आमच्या गप्पांमध्ये अनेक जणी सांगतात, पण प्रत्यक्ष शोध घेताना, निवड करताना बोलण्यात आणि वागण्यातला फरक दिसून येतो. अजूनही आर्थिकदृष्ट्या ‘घर चालवण्याची’ प्राथमिक जबाबदारी मुलांचीच आहे असे मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्याही मनात आहे हे जाणवते. बाकी बाबतीत समानता पण या बाबतीत मात्र पारंपरिक दृष्टिकोन हा दुटप्पीपणा इथून पुढे फारसा स्वीकारार्ह नाही. मुलांनीही आपल्या समाजाने ठरवून दिलेली पारंपरिक भूमिका सोडून, पुरुषी अहंकार बाजूला ठेवून शोध घ्यायला हवा. सहजीवनात ‘ड्रायव्हिंग सीट’वर बायको असू शकते या शक्‍यतेचा स्वीकार करायला हवा. लग्नानंतर जी समानता आज नवरा-बायकोच्या बदललेल्या भूमिकांमध्ये दिसून येते त्याची तयारी ही अशी अपेक्षा ठरवण्याच्या पायरीपासून सुरुवात केली पाहिजे. नाही तर आपण भविष्यातल्या बेबनावाची बीजे पेरतो आहोत हे लक्षात घेऊया. 

आपल्या सध्याच्या जीवनशैलीची गरज म्हणून केवळ याकडे बघावे असे नाही, तर या आधी आपण जो गुणात्मक भर पडण्याचा जो मुद्दा बोललो, त्या दृष्टीनेही हे आवश्‍यक आहे. लग्न ही गोष्ट मला माणूस म्हणून समृद्ध करणारी हवी असेल तर हे असे बदल जोडीदार निवडीच्या पारंपरिक अपेक्षा ठरवतानादेखील केले पाहिजेत. 

पूर्वी बायकोच्या आई-वडिलांची त्यांच्या म्हातारपणी नवऱ्याने जबाबदारी घेण्याची रीत नव्हती. अपवाद आहेतच; पण एकूण सामाजिक वास्तव बघितले तर हे अपवाद अगदी कमी. बदललेल्या काळाच्या पार्श्‍वभूमीवर नुसती म्हातारपणी काळजी घेणे नव्हे, तर त्यापेक्षाही जास्त म्हणजे लग्न झाल्यापासूनच आपल्या बायकोच्या कुटुंबाबरोबर नाते निर्माण करण्याचे प्रयत्न मुलांनी केले पाहिजेत. आमच्या गप्पांच्या कार्यक्रमात ‘माझ्या आई-वडिलांची जबाबदारी घेणे’ हा एक मुद्दा नेहमी चर्चेला येतो. मुले-मुली दोघांकडून येतो. नव्या भूमिकेत मुला-मुलींनी ‘आपण दोघे मिळून चारही पालकांची जबाबदारी घेऊ’ असे म्हटले, तर किती छान! जसे जोडीदाराच्या आई-वडिलांबाबत तसेच जोडीदाराच्या इतर नात्यांबाबतही! जावई-सून यासह वाहिनी, नणंद, काका, अशी निर्माण होणारी नातीही त्या त्या भूमिकेत शिरून समृद्ध करता येतात. या दृष्टिकोनामुळे दोन फायदे होतात. एक म्हणजे नवीन नाती निर्माण होऊन आपले जीवन समृद्ध व्हायला मदत होते, आपल्या आयुष्यात गुणात्मक भर पडते. त्याबरोबर आपल्या जोडीदाराच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी आपलेही जवळचे नाते निर्माण होते. आपल्या जोडीदाराबरोबरच्या नात्यांत हे गुणात्मक भर टाकते. केवढी सोपी, तरीही मोठी गोष्ट आहे नाही का?  लग्नाच्या बाबतीत नेहमी येणारा एक शब्द म्हणजे ‘तडजोड.’ तडजोड हा शब्द मला आवडत नाही. केवढी नकारात्मकता आहे ना यात! खरेतर आपली नवीन भूमिका म्हणजे एक तडजोड आहे असाच आपण मानत गेलो, तर भूमिका नीट वठवणे तर सोडाच पण साध्या साध्या आनंदालाही मुकू. ‘बदल’ आला की कम्फर्ट झोन जातोच. कोणत्याही बाबतीत हेच सत्य आहे. पण प्रत्येक बदल हा आपण तडजोड म्हणून थोडीच बघतो? उलट बदल झाल्यावर जुने कम्फर्ट झोन्स सोडून नवीन आपले असे कम्फर्ट झोन आपण तयार करत जातो आणि त्याची स्वतःची एक वेगळीच मौज असते. लग्न हा असाच एक बदल आहे. जुने कम्फर्ट झोन्स सुटणार आहेतच. पण नव्याने काही निर्माण करण्याची संधी इथे मिळते. बदलांकडे तडजोडीपेक्षा स्वीकाराच्या नजरेने बघितले तर या संधीचे सोने करता येईल. उदाहरणच द्यायचे तर बघा, शाहरुख खानच्या नाचण्याच्या आणि रोमान्स करण्याच्या भूमिका हा त्याचा कम्फर्ट झोन आहे. पण हा कम्फर्ट झोन सोडून त्याने स्वदेस, चक दे इंडिया यातल्या भूमिका घेतल्या. तडजोड म्हणून नव्हे तर संधी म्हणून. आणि त्याचे त्याने सोने केले की नाही? 

आजची मुले-मुली आधीपेक्षा अधिक स्वतंत्र आणि सर्वार्थाने स्वतःच्या पायावर उभी आहेत. पारंपरिक कुटुंबव्यवस्थेसह, मित्रपरिवारासह स्वतःचे असे एक कुटुंब तयार करणारी ही पिढी आहे. त्यामुळे भावनिक बाबतीतसुद्धा पुरेशा स्वतंत्र असणाऱ्या तरुण-तरुणींनी आपल्याला लग्नाकडून काय हवे आहे याची व्याख्या करताना अधिकाधिक नेमकेपणाकडे जायला हवे. आज लग्नाला काहीशी अनुत्सुक असणारी मुले-मुली ‘लग्न म्हणजे बंधन’, ‘लग्न म्हणजे स्वातंत्र्य संपणे’ अशा विचारांनी बिचकतात. हे घडते कारण लग्नाबरोबर येणाऱ्या पारंपरिक भूमिका मनात घर करून असतात. पण या भूमिका बदलल्या आहेत, अधिक सकारात्मकपणे या गोष्टीकडे बघणे आणि एकमेकांना नात्यात वैयक्तिक ‘स्पेस’ देणे या दोन्ही गोष्टी समजावून घेतल्या तर लग्नाच्या भोवती निर्माण झालेला बागुलबुवा कमी होईल. लग्न म्हणजे एकमेकांसाठी सर्वस्व त्यागणे नव्हे, तर लग्न म्हणजे एकमेकांच्या बरोबरीने आयुष्यात गुणात्मक भर टाकत, माणूस म्हणून अधिकाधिक प्रगल्भ होत, दोघांचेही आयुष्य समृद्ध होणे! आपल्या सहजीवनाच्या सिनेमात आपणच हिरो-हिरॉईन. या भूमिका नीट तयारी करत मन लावून स्वीकारल्या तर हा सहजीवनाचा सिनेमा सुपर हिट होणारच!

फोटो फीचर

संबंधित बातम्या