लग्नाचं वय 

गौरी कानिटकर
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

लग्नविषयक
 

‘आमच्या मुलीचं मला काही समजत नाही. सत्ताविसावं लागलं तिला आत्ता जुलैमध्ये; लग्नाला किती उशीर करायचा अजून?’ साधनाताई मला सांगत होत्या. जेव्हापासून मी लग्न या क्षेत्रात काम करते आहे अगदी तेव्हापासून या प्रश्‍नात आणि चिंतेत फरक पडलेला नाही. सत्तावीसऐवजी कधी चोवीस-पंचवीस असे वेगळे आकडे येतात एवढाच काय तो फरक. हा प्रश्‍न पुण्या-मुंबईत विचारला गेलाय, तसा नागपूर, सांगली, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर नाशिक, इंदूर, बडोदा अशा सगळीकडे विचारला गेलाय. लग्नाचं वय झालं हे नेमकं ठरवायचं कोणी आणि कसं? 

जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक ‘संमतीवयाचा वाद’ झाला होता. सुधारक मंडळींच्या पाठपुराव्यानंतर ब्रिटिश सरकारने लग्नाचं किमान कायदेशीर वय वाढवण्याचा निर्णय घेतला आणि सुधारक आणि परंपरावादी यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर हा किमान वयाचा आकडा नेहमी वाढत गेला आणि आता मुलींसाठी १८ आणि मुलांसाठी २१ यापाशी येऊन स्थिरावला आहे. मुलं होणं, कुटुंब वाढणं या गोष्टीशी लग्नव्यवस्थेचा थेट संबंध असल्यानं पुरुष आणि स्त्री मुलांना जन्म देण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम झाले, की ते लग्नाला तयार आहेत असं मानलं जाई. मानसिकदृष्ट्या सक्षम होणं हा विषय फारसा विचारात घेतला जात नव्हता आणि पारंपरिक व्यवस्थेत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय लग्न न करण्याचा विचारही नव्हता. कुटुंबव्यवस्था अधिक घट्ट होती. कुटुंबाचं आर्थिक नियोजन मध्यवर्ती स्वरूपाचं होतं. त्यामुळं लग्नाच्या सुरुवातीपासून आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याला कमी महत्त्व होतं. ‘ते होईलच पुढं जाऊन’ अशी स्वाभाविक समजूत होती. गेल्या शंभर वर्षांत शिक्षणाचा प्रसार, औद्योगीकरण, शहरीकरण या गोष्टींनी या पारंपरिक मध्ययुगीन परंपरेला जबरदस्त धक्का दिला. पारंपरिक कुटुंबव्यवस्था हळूहळू सैल होत गेली. जोडप्याला होणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली. कुटुंबनियोजन प्रत्यक्षात आलं. विभक्त कुटुंबं अस्तित्वात येऊ लागली आणि त्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा निकष महत्त्वपूर्ण ठरू लागला. पन्नास - साठ वर्षांपूर्वी ‘काय करतो? होतकरू आहे ना?’ अशा पद्धतीचे संवाद महत्त्वपूर्ण ठरू लागले. बघता बघता लग्नाचं वय मुलीसाठी सतरा - अठरावरून सहजपणे वीस-बावीसपाशी आलं आणि मुलांसाठी ते तेवीस-पंचवीसपर्यंत गेलं. ही स्थित्यंतरं घडत होती तेव्हा ती तुलनेनं संथ गतीनं झाली. गेल्या वीस वर्षांत मात्र एका नवीन गोष्टीची भर पडली आणि ती म्हणजे तंत्रज्ञान! ज्या वेगानं आज तंत्रज्ञान बदलतं आहे आणि ज्या वेगानं आपल्याला याच्याशी जुळवून घ्यायचं आहे तो वेग केवळ अचाट आहे. म्हणून त्याचा लग्न, लग्नाचं वय यावर झालेले परिणाम याबद्दल बोलायला हवं. 

आधुनिक तंत्रज्ञानाचा एक थेट परिणाम दिसला तो म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातली नेत्रदीपक प्रगती. भारताच्या बाबतीत बोलायचं, तर सरासरी आयुर्मान प्रचंड वाढलं. आज शहरी मध्यमवर्गाचं सरासरी आयुर्मान ७५ च्या आसपास आहे जे पूर्वी ६० च्या आसपास असे. अधिक उत्तम वैद्यकीय सुविधा असणाऱ्या ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशांत हेच ऐंशीच्या पुढं आहे. आपलीही आज वाटचाल तिकडंच सुरू आहे. थोडक्‍यात पंचविशीत लग्न झालेलं जोडपं पुढची जवळपास पन्नास वर्षं एकत्र असणार आहेत. एवढी लांबवरची बांधिलकी स्वीकारताना तरुण पिढी काहीशी बावरली नसती तरच नवल. साहजिकच या सगळ्यात पडण्याआधी ‘मी सर्व दृष्टीनं सक्षम आहे ना?’ हा प्रश्‍न मुलं-मुली स्वतःला विचारू लागले. त्यातही आर्थिक आणि मानसिक सक्षम होण्याच्या प्रश्‍नाला प्राधान्य मिळू लागलं. शहरी सुशिक्षित मध्यमवर्गाचं लग्नाचं वय हळूहळू तिशीकडं सरकू लागलं. आता यातली गंमत अशी, की अजूनही शारीरिकदृष्ट्या लग्न करण्यासाठीच्या सर्वोत्तम वयात फरक पडलेला नाही. आजही यातले तज्ज्ञ डॉक्‍टर्स नैसर्गिकपणं मूल होण्यासाठी विशी-पंचविशीच उत्तम मानतात. त्यात बदललेल्या जीवनशैलीमुळं अगदी पंचविशीनंतरदेखील नैसर्गिकपणे गर्भधारणा होताना अडचणी येतात, ट्रीटमेंट घ्यावी लागते अशी उदाहरणं वाढत चालल्याचे दाखले आहेत आणि अशा आजूबाजूच्या उदाहरणांमुळं आज लग्नाच्या पारंपरिक वयात असणाऱ्या मुलामुलींची पालक पिढी चांगलीच चिंतेत आहे. ‘पुढं सगळं नीट कसं होणार? बॉडी क्‍लॉक काय कोणासाठी थांबतं का?’ असे प्रश्‍न समोर येतात आणि ते साहजिकही आहे. आता यावर तोडगा काय? 

‘आमच्या एका कार्यक्रमात एक पालक मला म्हणाले, खरंतर जसा लग्नाच्या किमान वयाचा कायदा असतो तसा कमाल वयाचा पण कायदा पाहिजे. अमुक अमुक वर्षापर्यंतच लग्न करता येईल, नंतर नाही, असा काहीतरी धाक असेल तर मुलं लग्नाला उभी राहतील बघा पटपट..’ त्यांच्या बोलण्यावर हसूच आलं. त्यांची चिंता प्रामाणिक होती यात शंका नाही. पण मला वाटतं आजच्या पिढीची मानसिकता आणि लग्नाचं त्यांच्या आयुष्यात त्यांना वाटणारं स्थान याबाबत पालक पिढीनं अधिक समजून घेऊन विचार करण्याची गरज आहे. ‘लग्न आणि कुटुंब’ याला आयुष्यात सर्वोच्च प्राधान्य ही पिढी देत नाही. आर्थिक आणि भावनिकदृष्ट्याही अत्यंत स्वतंत्र असणारी आजची तरुण मंडळी लग्न या गोष्टीकडं ‘पुढचं आयुष्य अधिक मजेत जगण्यासाठी पार्टनर’ या दृष्टीनं बघते. यातला ‘अधिक मजेत’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आजही ही मंडळी मजेतच आहेत. यातून अधिक आनंदी आयुष्याकडंच आपण जाणार आहोत याची खात्री झाल्याशिवाय लग्नाचा विचार ही मंडळी मनात फिरकू देत नाहीत. अधिक आनंदी आयुष्याच्या त्यांच्या त्यांच्या व्याख्यादेखील ढोबळपणे ठरलेल्या आहेत. त्यात ‘नवीन पिढीला जन्म देणं’ ही गोष्ट प्राधान्याच्या क्रमवारीत फारच खाली आहे. एक गंमत सांगते. लताताई आणि त्यांची मुलगी सायली एकदा मला भेटायला आल्या होत्या आणि हाच विषय चालला होता. तेव्हा सायली पटकन म्हणाली, ‘रोज नवनवीन संशोधन होतं आहे. मूल होण्यासाठीचं वय हा काय फार मोठा मुद्दा उरलेला नाही. उद्या ट्रीटमेंट घ्यावी लागली तर घ्यायची आणि तरीही नाहीच काही झालं तर मी सरळ मूल दत्तक घेईन की! मला हवा तसा पार्टनर मिळाला नाही तरी मी पुढं एक मुलगी दत्तक घेईन आणि आम्ही दोघी मजेत राहू..’ आपल्या मुलीचे विचार ऐकून लताताईंची चिंता वाढलीच. पण हा विचार करणाऱ्या आज असंख्य मुली आणि मुलगेही आहेत. नवीन पिढीला जन्म देणं हा प्राधान्याचा विषय नसल्यानं ही तरुण मंडळी त्यांच्या निकषांवर, त्यांच्या परीनं पर्याय शोधत आहेत. या सगळ्याबरोबर जुळवून घेणं पालक पिढीला कठीण जातंय हे वास्तव आहे. 

यात चूक काय, बरोबर काय, हा फार स्वतंत्र विषय आहे. आहे ही परिस्थिती अशी आहे आणि यात काही बदल होण्याची चिन्हं आज तरी दिसत नाहीत. मग हा विषय हाताळावा कसा? याचं उत्तर म्हणजे - संवाद आणि संवादातून निर्णयाच्या जबाबदारीची जाणीव. आपल्या मुलांच्या एका ठराविक वयानंतर पालकांनी त्यांचं मित्र व्हावं असं म्हटलं जातं. कधीकधी गंमत अशी होते, की मुलं मोठी झाल्यावर त्यांच्याशी मैत्री करण्याच्या दिशेला जाऊ लागलेले पालक लग्नाचं पारंपरिक वय आल्यावर अचानक आधीपेक्षाही जास्त पालक बनतात! अगदी ‘घर घर की कहाणी’ आहे ही. हे टाळायला हवं. आता मित्र होण्यासाठी संवाद महत्त्वाचा. संवादासाठी आवश्‍यक पोषक वातावरण हवं. नव्या पिढीच्या समजुती काय आहेत, मान्यता काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे, त्याही पुढं जाऊन त्यावर टीकाटिप्पणीच्या फंदात पडण्याआधी समजून घेतलं पाहिजे. मैत्रीच्या नात्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक हाच तर असतो. इंग्रजीत याला ‘नॉन जजमेंटल’ असणं म्हणतात. ‘तू तुला हवं ते ठरव, आम्ही तुझ्याबरोबर आहोत’ हा विश्‍वास मुला-मुलींना मिळाला की संवाद सुरू होईल. एकदा संवाद सुरू झाला, की निवडलेल्या मार्गावरचे खाचखळगे काय आहेत, काय प्रश्‍न निर्माण होऊ शकतात, अडचणी काय येऊ शकतात याबद्दल संवाद घडू लागेल. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक वर्गालादेखील अभ्यास करावा लागेल. लवचिक राहावं लागेल. तुम्ही एक अडचण सांगू बघाल तर तुमची स्मार्ट मुलं त्यावर चार उपाय सुचवतील. असं काहीतरी झालं म्हणजे एकदम पालकांचा अहं दुखावला जाऊन मग, ‘आम्हाला काही अक्कल नाहीये का? तुझ्या भल्यासाठी सांगतोय ना..’ अशा वाक्‍यांनी गाडी सुसंवादाकडून विसंवादाकडं जाऊ लागते. मैत्रीकडून पालकत्त्वाकडं गाडी गेल्याचं लक्षात घेऊन पुन्हा ती रुळावर आणण्यात शहाणपण आहे. 

संवादातून मार्ग निघतो. पर्याय निघतात. लग्नाचं वय काय असलं पाहिजे, शारीरिक-मानसिक-आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं/नसणं या सगळ्यावर संवाद व्हायला हवा. चर्चा किंवा व्याख्यान नव्हे हं, मी संवाद म्हणते आहे. आपल्या मुला-मुलींनी सर्व बाजूंनी विचार केला आहे ना, अडथळ्यांची कल्पना आहे ना यासाठी, म्हणजे योग्य तो निर्णय घ्यायला सक्षम करण्यासाठी पालकवर्ग सजग असला तरी पुरेसं आहे. पुढं निर्णय मुला-मुलींनीच घ्यायचा आहे. या निर्णयाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकायला हवी. हे केलं तर तुमच्याच लक्षात येईल की पालक आपल्या मुला-मुलींचे छान मित्र तर झाले आहेतच पण त्याबरोबर मुलं-मुली स्वतःहून त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेत आहेत, त्यांची जबाबदारीदेखील घेत आहेत. या पेक्षा अधिक काय हवं असतं आपल्याला?

फोटो फीचर

संबंधित बातम्या