राशीचक्राच्या विळख्यात

गौरी कानिटकर
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

लग्नविषयक
 

‘काल तुम्ही सगळे आमच्या घरी येऊन गेलात. किती गप्पा मारल्या आपण आणि आज काय नवीनच शोधून काढलंत? परत पत्रिका बघायची आहे असा तुझ्या आईचा सकाळी फोन आला. मग काल भेटायचा फार्स कशाला करायचा? आम्हाला काय उद्योग नाहीये का?’ - रसिकाचा पारा चढला होता. 

वेदांत आणि रसिका या आधी दोन वेळा भेटले होते. कालच्या संध्याकाळी दोन्ही कुटुंबे रसिकाच्या घरी भेटली होती. एकुणात सगळे जमेल असे वाटत असतानाच आज सकाळी वेदांतच्या आईचा फोन आला होता. ते ऐकताच रसिका जाम भडकली होती. लगेच तिने वेदांतला फोन करून भेटायला बोलावले होते. 

‘हे आधी नव्हतं का सांगता येत तुला? आणि एकदा बघून झाल्येय ना पत्रिका? आता इतक्‍या पुढं गेल्यावर हे कारण काय सांगता तुम्ही?’ 

‘अगं आई असं काही म्हणेल हे मलाही माहीत नव्हतं. कमाल आहे आईची. मी आता घरी गेलो की बघतो काय झालंय ते! आईचा आहे तसा पत्रिकेवर विश्‍वास. त्यात त्या आधीच्या ज्योतिषानं सांगितलं होतं की नक्षत्र जुळत नाहीयेत म्हणून. पण बघूया.’ 
* * *

रसिका आणि वेदांतमधला हा संवाद खूप काही सांगून जाणारा आहे. अशा तऱ्हेचे प्रसंग नित्याचेच असतात. आमचा असा अनुभव आहे, की शंभरातले किमान ८० ते ८५ जण पत्रिका पाहतातच. लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये कुंडली मोठी भूमिका पार पाडत असते. समोरचे लोक बघतातच, मग आम्हीच का बघायची नाही? असा एक बिनतोड सवालही करत असतात. अनेकांचे मत असते, की पत्रिकेवरून स्वभाव कळतो. मला नेहमीच या वाक्‍याची गंमत वाटते. एक तर माणूस कळायला इतका सोपा आहे का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठलाच माणूस प्रत्येक प्रसंगात एकसारखा वागत नाही. माणूस नेहमीच प्रसंगपरत्वे वागत असतो. समोरच्या माणसाच्या प्रतिसादावरही त्याचे वागणे ठरत असते. शिवाय समजा एखाद्याच्या पत्रिकेवरून कळले, की हा माणूस रागीट आहे. तरीही तो माणूस सदासर्वकाळ रागावणारा कसा काय असू शकतो? आणि दुसरी गंमत म्हणजे, रागाच्या कितीतरी शेड्‌स आहेत. म्हणजे अगदी साध्या चिडचिडीपासून ते तळपायाची आग मस्तकाला जाणे वगैरेपर्यंत... ती शेड नेमकी कशी कळेल? अगदी आपल्या स्वतःच्या वागण्यावरूनदेखील आपल्याला याचा अंदाज येऊ शकेल. 

मला नेहमी वाटते, की एखाद्या माणसाबरोबर राहात असताना हळूहळू त्या माणसाला उलगडत, त्याला जाणून घ्यायला अवधी देत, स्वतःला अवधी घेत घेत जगणे.. हा प्रवास जास्त रंजक नाहीये का? पण हे सगळे करायचे म्हणजे काही कौशल्ये शिकायला लागणार! त्यापेक्षा पत्रिका पाहणे तुलनेने सोपे वाटते. पण त्यामुळे आपल्या मनात त्या व्यक्तीच्या बाबतीत आधीच पूर्वग्रह तयार होणार नाहीत का? आणि कशावरून त्या ज्योतिष्याने सांगितले तसेच घडेल? याची खात्री काय? 

शिवाय पत्रिका ज्या व्यक्तीला आपण दाखवू त्याचे त्या विषयातले ज्ञान किती सखोल आहे हे कसे कळणार? जरी ती व्यक्ती ज्योतिष विशारद असली किंवा होराभूषण असली, तरी त्या व्यक्तीची मानसिक बैठक या सगळ्यात फार महत्त्वाची ठरते. त्याला वागण्याचा पोच असायला हवा. शिवाय समाजशास्त्राचे ज्ञान असायला हवे. त्याच्या धारणा मधे मधे यायला नकोत. त्याला आध्यात्मिक विचारांची बैठक असायला हवी. 

हे सगळे लिहीत असताना मला आत्ता एक गोष्ट आठवली. एक माणूस एका ज्योतिष्याकडे गेला आणि त्याला त्याने स्वतःचे भविष्य विचारले. तो म्हणाला, ‘वा वा काय सुंदर पत्रिका आहे, भाग्ययोग आहे तुमच्या पत्रिकेत.’ हा माणूस फार खूष झाला. पण आपल्याकडे ‘सेकंड ओपिनियन’ घेण्याची खोड आहे ना! त्यामुळे तो आपली पत्रिका घेऊन दुसऱ्या ज्योतिष्याकडे गेला. तो म्हणाला, ‘हां हां ठीक आहे तुमचे आयुष्य एकूण. जाईल आत्ता आहे तसे. विशेष काही घडणार  नाही.’ ती व्यक्ती जरा खट्टू झाली, कारण त्याच्या मनात त्याचा राजयोग त्याला खुणावत होता. ‘असे कसे घडले? दोघांचे भविष्य दोन टोकाचे कसे?’ या उदाहरणामध्ये एक गंमत आहे. ज्याची पत्रिका दाखवली होती, तो एका सरकारी खात्यात काम करत होता आणि निवृत्तीनंतर छान पेन्शन देणारी त्याची नोकरी होती. जो ‘राजयोग’वाला ज्योतिषी होता, तो एका प्रश्‍नाची फी शंभर रुपये आकारत होता आणि स्वतःही मध्यम आर्थिक स्थितीतला होता. त्याच्या दृष्टीने सरकारी नोकरी आणि निवृत्तीनंतर पेन्शन हा ‘राजयोग’च होता. पण दुसरा ज्योतिषी होता, त्याचे मोठे ऑफिस होते. तो एका प्रश्‍नाची फी एक हजार रुपये आकारत होता. त्याच्या दृष्टीने सरकारी नोकरी म्हणजे ठीकठाक होते. फार काही नव्हते. 

वरच्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात आलेच असेल, की भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीवर खूप काही अवलंबून असते. 

आत्ता जे पन्नास - पंचावन्न वर्षे वयात आहेत, अशा पिढीला त्यांच्या लहानपणी त्यांची राससुद्धा माहीत नसायची. पण आता एखाद्या छोट्या मुलालादेखील त्याची रास माहिती असते. रोज टीव्हीवर सकाळी सांगणारे भविष्य ऐकून त्याप्रमाणे आपले कार्यक्रम पुढे - मागे करणारे महाभाग कमी नाहीत. 
लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत कुंडली ऊर्फ पत्रिका या गोष्टींनी खूप गोंधळ घातला आहे. पत्रिकेमुळे चांगली चांगली स्थळे हातची जातात, याची कल्पना सगळ्यांना आहे. पत्रिका पाहण्यामध्ये पालकांच्या बरोबरीने वधू-वरदेखील मागे नाहीत. इतकी शिकलेली मुले-मुली असूनही ती स्वतःच्या कर्तृत्वावर विश्‍वास न ठेवता आकाशस्थ ग्रहांच्या मागे का लागत असतील? 

एकुणातच सध्या सगळीकडेच असुरक्षिततेचे वातावरण आहे. लग्नाच्या बाबतीत तर फारच! सगळे नीट होईल ना, हा किडा प्रत्येकाच्या डोक्‍यात आहे. जबाबदाऱ्या, कामाचे टेंशन आणि कमालीचे तणावग्रस्त आयुष्य यातून अनेक चिंता आपणच आपल्या मनात तयार करत असतो आणि नकळत आपल्याच चिंतांचे ओझे सतत वागवत असतो. काही जण तर पत्रिकेवर, त्यातल्या भविष्यावर इतके अवलंबून असतात, की त्यातून चुकीचे निर्णय घेण्याची शक्‍यता वाढत जाते. अनेक माणसे या राशीचक्राच्या विळख्यात अडकली आहेत. मला तर वाटते, की पत्रिका, कुंडली पाहणे, भविष्य पाहणे हा सध्या अनेकांना जडलेला आजार आहे. तारतम्याने विचार करून वेळीच त्याला रोखले नाही तर त्याच्या विळख्यात आपण संपून जाऊ. 

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जगात एका बाजूला नेत्रदीपक प्रगती चालू आहे; तर आपल्या भारतासारख्या विकसनशील देशात मात्र लोकांच्या मानेवरील कुंडली, पत्रिकेचे भूत कायम आहे. पत्रिका पाहून लग्न केलेली कितीतरी दांपत्ये आज घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभी असताना दिसतात. त्यामुळे विवाह ठरवताना या भ्रामक कल्पनांना थारा न देता परस्परांना जाणून घेत योग्य जोडीदाराचा शोध घ्यायला हवा. त्यासाठी लागेल ती तयारी करायला हवी. काही कौशल्ये शिकायला हवी असतील तर ती शिकायची तयारी हवी.  कितीही कुंडली - पत्रिका बघा, पती आणि पत्नी एकमेकांसोबत चोवीस तास एकत्र राहायला लागतील त्याच वेळी माणूस उलगडण्याची प्रक्रिया सुरू होईल. मग ते लव्ह मॅरेज असूदे किंवा अरेंज्ड मॅरेज! त्याच वेळी आपला आत्मविश्‍वासही आपल्याला दगा देणार नाही. कारण तो आपला असतो. एक समाज म्हणून या प्रगल्भतेकडे आपण वाटचाल करायला हवी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या