अनुरूपता म्हणजे नक्की काय?

गौरी कानिटकर
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

लग्नविषयक
 

लग्नाच्या संदर्भात अपेक्षा ठरवत असताना ‘जोडीदार अनुरूप हवा’ ही मागणी कायमच असते. हा अनुरूप जोडीदार म्हणजे नक्की कोण? माझ्या आईवडिलांना वाटतो तो किंवा ती? की माझ्या कल्पनेत असतो किंवा असते ती? की माझी जन्मपत्रिका सुचवते आहे तो किंवा ती? की माझ्या मित्रासारखा असतो किंवा मैत्रिणीसारखी असते ती? 

अनेकदा वधू - वर अनुरुपतेचा संबंध स्वतःसारखे असणे या गोष्टीशी लावतात. मानसी मला म्हणाली, ‘जशा माझ्या आवडी निवडी आहेत ना, तशाच त्याच्या असाव्यात.’ 

नरेंद्र म्हणाला, ‘डॉक्‍टर आहे, त्यामुळे मला डॉक्‍टरच मुलगी पार्टनर म्हणून हवी आहे. कारण मग ती मला समजून घेऊ शकेल.’ 
आर्या म्हणाली, ‘माझ्याच फिल्डमधला जोडीदार हवा आहे. मी इंजिनिअर आहे, तसाच तोही त्याच क्षेत्रातला हवा.’ 

‘वय, उंची, पगार, शिक्षण, पत्रिका, लुक्‍स.. सगळं कसं अनुरूप हवं’ ही अजून एका मुलीच्या आईची मागणी. या सगळ्या गोष्टी जमल्यानंतर मगच  स्वभाव अनुरुपतेचा मुद्दा अनेकांच्या मनात येतो. तसे पाहता जेवढी वेगळी फिल्ड्‌स तेवढा एकमेकांमधला आदर जास्त! 

ज्या माणसाबरोबर आपण आयुष्यभर राहणार आहोत (निदान तशी अपेक्षा आहे) आणि जो भाग कायमच आपल्याबरोबर असणार, त्याचे वागणे, बोलणे, समोरच्याचा आदर करणे या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या नाहीत का? पण त्याची  मातब्बरी जोडीदार निवडीच्या पहिल्या पायरीवर वाटत नाही. 

अनेकदा मनातल्या जोडीदाराविषयीच्या कल्पना आदर्शत्वाकडे झुकलेल्या असतात. कोणतेच नाते आदर्श नसते, कारण माणसे आदर्श नसतात. आणि आदर्श जोडीदार किंवा perfect partner हे एक मिथक आहे. अनुरूपता ही अशी तयार नसते, रेडिमेड नसते याची खरे तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आदर्श जोडीदार आणि अनुरूप जोडीदार हे दोन्ही ट्रॅक्‍स एकाच वेळी चालू असतात. आदर्शत्व आपल्याकडे निसर्गाबरोबर आलेले असते. पण अनुरूपता ही आपल्याला जाणीवपूर्वक निर्माण करावी लागते. 

अनुरूपता म्हणजे सेम असणे नाही, सारखे असणे नाही. अनुरूपता म्हणजे क्‍लोनिंग नाही. अनुरूपता ही स्वीकारात आहे. आधी स्वतःचा स्वीकार, स्वतःच्या क्षमता, कमतरता यांचा स्वीकार ज्याला जमला त्याला समोरच्याचा स्वीकार करता येण्याच्या शक्‍यता वाढतात. कधी कधी माझ्यात काहीच कमी नाही अशा धारणाही असतात किंवा माझ्यात विशेष असे काहीच नाही अशाही धारणा असतात. दोन्ही घातक आहेत. अनुरूपता हा एक अथक चालणारा प्रवास आहे. माझ्या जोडीदारासमवेत वेगवेगळे अनुभव घ्यायची माझी तयारी आहे का? आपण दोघेही एका खूप लांबच्या प्रवासाला निघालो आहोत, अशी कल्पना केली तर भावना, अनुभव आणि पूर्वग्रहांचे ओझे - बॅगेज माझ्याकडे किती आहे, मी मोकळ्या मनाने प्रवासाला तयार आहे का? तो अनुभव आमच्या दोघांचा असेल का? मला सगळे फिक्‍स असलेले पाहिजे का? माणूस म्हणून असणारा आदर द्यायची माझी तयारी आहे का? माझ्याकडे लवचिकता हा गुण आहे का? असे विविध प्रश्‍न स्वतःला विचारले पाहिजेत. 

सुरेखा म्हणाली, ‘आधीच जर त्याचा स्वभाव माहीत असेल तर मला आवडेल. स्वभाव आधी कळला पाहिजे. त्या हल्ली टेस्ट असतात ना, त्या आहेत का तुमच्याकडे?’ 

म्हटले, ‘हो आहेत की तशा टेस्ट्‌स. तू थोडे गुगल सर्च केलेस तर तिथेही तुला सापडतील. पण अगं स्वभाव म्हणजे काही काळ्या दगडावरची रेघ आहे का? प्रत्येक टेस्टचा रिपोर्ट दर थोड्या दिवसांनी वेगळा येऊ शकतो. ती टेस्ट देताना आपला मूड वेगळा असू शकतो. कारण आपण सगळे जण बदलणारे आहोत. पाच वर्षांपूर्वी तू जशी होतीस तशी आज आहेस का?’ 

असा प्रश्‍न विचारल्यावर ती संभ्रमात पडली. म्हणाली, ‘खरंच की. मी हा विचारच केला नव्हता. पण मग कसा ओळखायचा त्याचा स्वभाव?’ 

खरे सांगायचे तर स्वभाव समजून घेण्याच्या फंदात न पडता, कारण आपल्या प्रत्येकाच्या स्वभावाला असंख्य पदर आहेत, आणि ते एकाच वेळी कसे उलगडतील? त्यापेक्षा मला कसे जगायचेय, हा विचार प्रत्येकाने करणे आवश्‍यक आहे. कसे जगायचेय याची बेसिक मूल्ये एक असायला हवीत. एकमेकांमधल्या विविधतेचा स्वीकार करणे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचवेळी दोघांमधले साधर्म्यपण शोधता यायला हवे. ज्यावेळी आपण म्हणतो न की त्या दोघांचे स्वभाव जुळत नाहीत, अशावेळी खरे तर त्यांची जीवनमूल्ये आणि जीवनशैली जुळत नसते. 

संतोष आणि ऋचा - त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. नात्यातला प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जरुरीपुरता पैसा असावा, एकमेकांना वेळ द्यावा ही तिची जीवनमूल्ये आहेत. पण संतोषला पैसा हेच त्याचे सर्वस्व होते. त्यामुळे कोणत्याही मार्गाने पैसा मिळाला पाहिजे, असे त्याचे मत होते. अशा दोन टोकाच्या विचारसरणीचे पटणे कठीण असते. 

सीमाचा प्रेमविवाह होता. सीमाचा नवरा जयेश एक चित्रकार होता. सीमा एका मोठ्या कंपनीत फायनान्स मॅनेजर होती. लग्नापूर्वी तिला जयेशच्या कलेचा खूप अभिमान होता. तू तुझ्या मर्जीप्रमाणे तुझी कला वाढव असेही तिने त्याला सांगितले होते. पण लग्नानंतर मात्र तो स्वतःहून त्याची चित्रे विकण्यासाठी प्रयत्न करीत नाही, तो स्वतःहून चित्रांचे प्रदर्शन भरवण्यासाठी प्रयत्नशील नाही आणि त्याने त्याच्या मूडनुसार चित्रे न काढता रोज चित्रे काढलीच पाहिजेत असा तिचा आग्रह होता. जयेशला ते जमत नव्हते. तो कलंदर व्यक्तिमत्त्वाचा होता. लग्नापूर्वीच्या तिला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये आता बदल झाला होता. आता तिला तो तिच्यासाठी अनुरूप वाटत नव्हता. 

हा सगळा विचार लग्नापूर्वी करणे आवश्‍यक ठरते. त्यामुळे एखाद्याच्या जीवनशैली आणि जीवनमूल्यांना तपासणे गरजेचे आहे. 

आपले सहजीवन उत्तम रीतीने फुलण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्या आसपासची आजूबाजूची बहरलेली नाती जरूर पाहावीत. त्यांचे नाते फुलवण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले याची आवर्जून माहिती घ्यावी. 

माझ्या ओळखीत एक जोडपे आहे. स्वाती आणि सुहास. ते दोघेही एकमेकांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. तिचा एकूण साहित्याचा व्यासंग पाहून त्याने तिला पीएच. डी. करण्याचा खूप आग्रह केला. तिचा विषय ठरल्यावर त्यानेही त्या विषयाचा अभ्यास केला. तिच्यासाठी वेगवेगळी पुस्तके शोधली. तिचा अभ्यास चालू असताना घरातल्या अनेक गोष्टींची जबाबदारी त्याने स्वतःहून उचलली. तिला निश्‍चिंतपणे अभ्यास करता आला. एकमेकांना आदर द्यायला हवा असे ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी तो आदर कृतीतून दिसायला हवा. आपले जवळचे नातेवाईक हादेखील आपल्या वर्तुळाचा एक भाग आहेत याची जाणीव ठेवणे आवश्‍यक असते. त्यांना वगळून आपण आपले सहजीवन फुलवू शकत नाही. अनेकदा जवळचे नातेवाईक आपल्या म्हणण्याप्रमाणे वागतीलच असे नाही. पण त्यांच्यावर पूर्ण फुली न मारता त्यांना एका ठराविक अंतरावर ठेवू शकतो. त्यामुळे त्यातून येणारी कटुता टळू शकते. अनुरूपता फुलवण्यासाठी स्त्री-पुरुषांच्या साचेबद्ध प्रतिमांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. 

अनुरूपतेसाठीचा प्रवास करत असताना कोणत्याही नात्यांमध्ये दोन्ही बाजूंनी देवाणघेवाण असते. तरच ते नाते फुलते, बहरते, प्रगल्भ होते. एकमेकांमधली अनुरूपता शोधली आणि जाणीवपूर्वक ती वाढवली तर नाते प्रगल्भ व्हायला मदत होते. स्वतंत्रपणे कुणी चांगला किंवा वाईट, बरोबर किंवा चूक असतो असे नाही. पण एकमेकांवर आरोप न करता एकमेकांच्या वाढीमध्ये प्रोत्साहन कसे देता येईल, याचा विचार नक्की करता येतो. एकमेकांना मदत करण्याने नाते बळकट व्हायला मदत होते. नॉन-जजमेंटल झाल्याशिवाय अनुरूपता येणे अवघड असते. या प्रवासाचा आनंद एकदा का घेता यायला लागला, की अनुरुपतेच्या मुक्कामाच्या  थांब्याची वाट पाहण्याची आवश्‍यकताच नाही. पाठीवर कमी बॅगेज असले की प्रवास आनंददायीच होणार यात शंका नाही. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या