समजूतदारपणाचे रहस्य 

गौरी कानिटकर
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

लग्नविषयक
 

‘एवढं कसं कळत नाही?’ 
‘इतकं तरी समजायला हवं..’ 
‘समजून सांगायची गरजच पडू नये.’ 
‘तुम्ही कुणीच मला 
समजून घेत नाही.’ 
‘समजूतदारपणाचा मक्ता 
फक्त मीच घेतलाय का?’ 

अशी अनेक वाक्‍ये आपण सगळेच जण वेगवेगळ्या वेळी आणि असंख्य वेळा वापरत असतो. तसे पाहता समजूतदारपणा किंवा understanding या शिकण्याच्या गोष्टी आहेत. गंमत म्हणजे त्या शिकून येतातदेखील! पण तरीही वरची सगळी वाक्‍ये अगदी वारंवार सहजपणे बोलली जातात. या सगळ्या वाक्‍यांमध्ये आपल्याला हेका किंवा अट्टहास दिसून येतो. ‘कुणीच मला समजून घेत नाही’ हे वाक्‍य तर कायमच ऐकायला येते. हा हेका सोडला तर गोष्टी सोप्या होऊन जातात. 

कोणत्याही नात्यामध्ये समजूतदारपणा हा कळीचा मुद्दा असतोच; पण पती-पत्नी नात्यात तर त्याची जास्तच गरज असते. पती पत्नी नाते समृद्ध करत असताना परस्परांशी सहकार्याची भूमिका हवी. समजून घेण्याची भूमिका हवी. अनेकदा असे म्हटले जाते, की समोरच्या माणसाला जसे आहे तसे स्वीकारायला हवे. परंतु हे वाक्‍य जितक्‍या साधेपणाने किंवा सहजपणाने उच्चारले जाते तितके ते सहज किंवा सोपे नाहीच. माणसाला आहे तसे स्वीकारणे, समजून घेणे यासाठी एक वेगळ्या प्रकारची प्रगल्भता लागते. ‘आमचे पती पत्नी हे नाते माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे,’ असे सातत्याने आपल्या मनाशी म्हणावे लागते. त्यावेळी ‘समजूतदारपणा’चा मक्ता मीच घेतलाय का? या वाक्‍याला तसा अर्थच नाही. कारण नाते कुणासाठी महत्त्वाचे? माझ्यासाठी ना? मग त्यासाठी प्रयत्न तर मीच करायला हवेत. तसे पाहता समजून घेणे म्हणजे त्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे. अमुक एका प्रसंगात त्या व्यक्तीला नेमके काय वाटते आहे, हे समजून घेणे. 

अगदी लग्न ठरवत असतानासुद्धा हा समजूतदारपणा कसा कामाला येतो, त्याचे एक उदाहरण पाहूया. 

रिया आणि संकेत दोघे आज दुसऱ्यांदा भेटत होते. आज संकेतने रियाचे प्रोफाइल पूर्ण वाचले होते. पहिल्या भेटीच्या वेळी संकेतने अशी भेटीची कोणतीच तयारी केली नव्हती.. आणि रिया मात्र त्याची पूर्ण माहिती वाचूनच त्याला भेटली होती. हे जेव्हा संकेतच्या लक्षात आले, त्यावेळी त्याला खूप ओशाळवाणे वाटले होते. त्याने तिला ‘सॉरी’ म्हटले होते. त्याच्या अशा प्रकारच्या प्रतिसादामुळे रियाचा चढलेला पारा थोडा कमी झाला होता आणि त्यामुळे आज ते दुसऱ्यांदा भेटत होते. रियाच्या माहितीमध्ये तिचे ब्रेकअप झाल्याचे तिने लिहिले होते. पहिल्या पाच एक मिनिटांच्या गप्पा झाल्यावर संकेतने रियाला विचारले, ‘तुझी माहिती वाचत असताना मला तुझा पहिला ब्रेकअप झाल्याचे समजले आहे. सर्वप्रथम तुझे अभिनंदन की तू ही माहिती लपवली नाहीस आणि दुसरे, तू आता कशी आहेस? कुठलाही मानसिक आघात हा त्रासदायकच असतो. तू कशी त्यातून बाहेर आलीस? कुठलाही ब्रेकअप हा पेनफुलच असतो. Are you ok now?’ 

रियाला क्षणभर कळेचना, काय उत्तर द्यावे? किती गाभ्यालाच हात घातलाय याने?.. तिच्या मनात आले. जेव्हा हे तिचे ब्रेकअप झाले होते, त्यावेळी तिने ते तिच्या आईला सांगितले होते. त्यावेळी तिची आई तिला म्हणाली होती, ‘अगं जाऊ दे. तुझ्यात काय कमी आहे? अशी छप्पन्न मुले तुझ्या पुढ्यात आणून मी उभी करीन.’ तिला वाटले होते, आईपर्यंत काही पोचतच नाहीये, मला नेमके काय वाटतेय ते! आणि आज मात्र कोण कुठला हा मुलगा किती हळुवारपणे मला विचारतोय की तू कशी आहेस? तसे पाहता संकेत फोटोवरून तिला आवडला नव्हता. पण आत्ताच्या त्याच्या बोलण्यामुळे त्याचे दिसणे, त्याचे लुक्‍स तिच्या नजरेतून केव्हाच गायब झाले होते. समोर तिला जाणवत होता तो फक्त त्याचा ओलावा असलेला आवाज! त्याची समजून घेण्याची क्षमता. रियाचे आणि संकेतचे अजून काहीच नाते तयार झालेले नाही तरीही त्याच्या मनात हा विचार आला होता, आणि त्याने तो मांडलाही योग्य शब्दांत आणि योग्य स्वरांत. 

समजूतदारपणा ही वृत्ती आहे. ती वृत्ती एकदा अंगी बाणवली, की सगळीच नाती समृद्ध बनत जातात. 

प्रतिभाने खूप मन लावून बिर्याणी केली होती, पण तरीही तिच्या मनासारखी जमली नव्हती. सुरेश ऑफिसमधून आल्यावर तिने त्याला जेवायला वाढले. पहिला घास घेताक्षणीच तो म्हणाला, ‘त्या अमक्‍या तमक्‍या हॉटेलसारखी नाही बुवा जमली.. आणि जमत नाही तर तू करतेसच कशाला?’ 

अनेकदा आपल्याला पदार्थ आवडलेला नसतानादेखील आपण खोटे खोटे कौतुक करतो किंवा सुरेशने आत्ता दिली तशी प्रतिक्रिया देतो. यामध्ये जरी बिर्याणी चांगली झाली नसली तरी तिच्या प्रयत्नांना दाद द्यायला हरकत नसते. तिने त्याच्यासाठी बिर्याणी करणे हे खरे तर प्रेम व्यक्त करण्याची तिची पद्धत आहे. (expression of love) ती समजून घ्यायला हवी. पण नाते भावनिक दृष्टीने जितके जवळचे तितके समजून घेणे कमी कमी होत जाते. आपण जवळच्या माणसांना गृहीत धरायला लागतो. नात्याला गृहीत धरायला लागतो. गृहीत धरायला लागलो, की तिथे हक्क प्रस्थापित होतो आणि हक्क प्रस्थापित झाला की त्या व्यक्तीच्या अवकाशावर (space) अतिक्रमण होते. खरे तर अशा जवळच्या नात्यांमध्येच जास्त काळजी घ्यायला हवी. 

मध्यंतरी एक गोष्ट वाचनात आली होती. एक जपानी मुलगा आणि स्पॅनिश मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्या दोघांना एकमेकांशी लग्न करावेसे वाटत होते. त्या आधी ते दोघेही एका धर्मगुरूकडे गेले आणि त्यांनी विचारले की आम्ही लग्न करू का?  तेव्हा त्या धर्मगुरूने त्यांना विचारले, की तुम्हाला दोघांना एकमेकांच्या भाषा समजतात का? ते म्हणाले, नाही. आम्हाला अजिबात भाषा समजत नाहीत. धर्मगुरू तत्काळ उत्तरले, जरूर लग्न करा. नक्की टिकेल. 

यातला विनोदाचा भाग सोडला तरी खरोखरच आपण आपल्या बोलण्याने समोरच्याला दुखावत असतो. अनेकदा हे जाणूनबुजून करत असतो. एखाद्या व्यक्तीला जर कौतुक करता येत नसेल किंवा त्याला जर कौतुक करायचे सुचत नसेल तर त्यावर टोमणे न मारता, तू केलेले कौतुक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असे निःसंदिग्ध शब्दात सांगणे गरजेचे आहे. त्यावर त्याला/तिला कळायला नको का? त्यात काय सांगायचे आहे? असे म्हणू नये. लेखाच्या सुरवातीची वाक्‍ये या संदर्भात खूप महत्त्वाची आहेत. 

Sense of contribution आणि sense of belonging या दोन महत्त्वाच्या गोष्टींमधून ‘समजूतदारपणा’चा प्रत्यय येतो. सहकार्य आणि बांधिलकी या दोन्ही गोष्टी नाते उभारणीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सहकार्याची जाणीव आणि बांधिलकीची जाणीव जरी असेल तरी पुरेसे असते. समजून घेणे तसे खूप कठीण नाहीच. स्वतःला समजून घेतले की समोरच्याला समजून घेणे सोपे होऊ शकते.. आणि प्रयत्नांती ते शक्‍यही होते.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या