समृद्ध सहजीवनासाठी

गौरी कानिटकर
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

लग्नविषयक
 

‘आजकाल लग्न टिकण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात...’ मध्यंतरी एके ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले होते तेव्हा संयोजकांनी आपले मत व्यक्त केले. मी पटकन म्हणाले, ‘नुसती टिकून काय उपयोग? नाती टिकण्याच्या पुढे जाऊन फुलली पाहिजेत, बहरली पाहिजेत, प्रगल्भ व्हायला हवीत...’ तो विषय तेवढ्यावर संपला खरा; पण डोक्‍यात कुठेतरी तो विचार राहिला. ‘लग्न केले की ते काय वाटेल ते झाले तरी ‘निभावून’ न्यायचे अशी काहीशी शिकवण असणारी पिढी आणि ‘नाते जर समृद्ध नसेल तर नुसत्या टिकण्यात काय मजा!’ असे म्हणणारी आजची पिढी; या दोघांचे मला भेटणारे असंख्य प्रतिनिधी डोळ्यासमोर आले आणि मग डोक्‍यातल्या विचारचक्राला गती आली. 

माझा असा अनुभव आहे, की हा ‘निभावून’ नेण्याचा सल्ला नकळतपणे माझ्या पिढीकडून दिला जातो तो आजकालच्या तरुण मुला-मुलींना आवडणारा नाही. स्वाभाविकही आहे ते! आजची मुले-मुली स्वतंत्र वृत्तीची आहेत, स्वतःच्या पायावर उभी आहेत. ‘निभावून नेण्या’ची वेळ कशाला येऊ द्यायची? असा प्रश्‍न त्यांच्याकडून विचारला जातो, यात मला आश्‍चर्य वाटत नाही. ‘पटले नाही तर वेगळे होऊ’ असे ठामपणे म्हणणारी ही पिढी. शिवाय आता या विचाराला आर्थिक पाठबळ तर आहेच, पण त्याबरोबर पूर्वी होता तसा सामाजिक पातळीवर अ-स्वीकारदेखील नाही. हा बदल समजून न घेता, ‘त्यात काय एवढे? टिकवले की टिकते लग्न..’ अशा स्वरूपाचे संवाद पालक मंडळींकडून मुला-मुलींशी होतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम दिसून येतो तो मुलामुलींच्या लग्नाच्या ‘रेडीनेस’बाबत, मानसिक तयारीबाबत. ‘हे असे असेल तर मला लग्नच नको...’ असे म्हणत लग्न पुढे ढकलण्याकडे त्यांचा कल होऊ लागतो. अर्थात हे काही एकमेव कारण नाही. पण लग्नाबाबत नकारात्मक भावना निर्माण करणारे हे एक महत्त्वाचे कारण आहे. म्हणूनच याकडे गांभीर्याने बघावे लागते. 

म्हणजे सरळ ‘पटले नाही तर वेगळे व्हा’ अशा पद्धतीचे सल्ले द्यायचे की काय? मुळीच नाही. एका बाबतीत कोणत्याही पिढीतली असोत, बहुतांश मंडळींचे एकमत आहे की ‘नात्यात स्थैर्य असावे, वेगळे होणे हा काही फारसा चांगला पर्याय नाही.’ पहिली गोष्ट म्हणजे नाते नुसते टिकवण्यात मजा नाही ही नव्या पिढीची मनोभूमिका समजून घ्यायलाच हवी. पण त्याबरोबर नाते टिकवण्याच्या पलीकडे फुलवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हेही बोलावे लागेल. आपोआप कशा होतील या गोष्टी? त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. ‘इमोशनल इन्व्हेस्टमेंट’च असते ही! कोणत्याही गुंतवणुकीवर तत्काळ चांगला परतावा थोडीच मिळतो? उलट बराच काळ, नित्यनेमाने थोड्या थोड्या प्रमाणातसुद्धा केलेल्या गुंतवणुकीवर जास्त मोठा परतावा मिळतो, हे तर अगदी स्वाभाविक व्यवहारज्ञान आहे. ते नात्याच्या बाबतीत नेमके गुंडाळून ठेवून कसे चालेल? तिथेही ते जसेच्या तसे लागू होते. सुसंवाद, इमोशनल इन्व्हेस्टमेंट अशा गोष्टींमधून हळूहळू नाती नुसती टिकत नाहीत तर फुलतात आणि हळूहळू प्रगल्भही होतात. 

याबद्दल आपण आधीच्या लेखांमध्ये सविस्तर चर्चा केली आहेच. त्याबरोबरच समृद्ध सहजीवनाचा विचार करताना, आजच्या या शेवटच्या लेखात, अजून एका गोष्टीबद्दल बोलायला हवे आणि ते म्हणजे, बदललेले सहजीवनाचे रूप. घडते काय, वैवाहिक जीवन किंवा सहजीवन असे म्हटल्यावर अतिशय पारंपरिक आणि ठरलेल्या प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर येतात. कितीही नाही म्हटले, तरी या प्रतिमांवर स्त्री-पुरुष भेदाचा पगडा आहेच. या ठरलेल्या प्रतिमा आपल्याबरोबर नवरा-बायको या दोघांसाठीही ठरलेल्या भूमिका घेऊन येतात. आपण त्याच चष्म्यातून नव्या पिढीतल्या जोडप्यांच्या सहजीवनाकडे बघू पाहतो.. आणि तसे दिसले नाही की भांबावून जातो. काहीतरी चुकते आहे असे वाटत राहते. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे, की नव्या पिढीचा सहजीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि तो पारंपरिक चष्म्याहून बराच निराळा आहे. त्यामुळे नवरा-बायको यांना चिकटवल्या जाणाऱ्या पारंपरिक भूमिकाही या पिढीला मंजूर नाहीत. अगदी छोटेसे उदाहरण देते. आमच्याकडूनच लग्न जमलेली स्नेहा लग्नानंतर दोन-तीन वर्षांनी मला भेटायला, गप्पा मारायला आली होती. ‘कसे चाललेय सगळे?’ या माझ्या प्रश्‍नावर ती अगदी हसतमुखाने उत्तरली, ‘एकदम मस्त चाललेय मावशी. तो अतिशय स्वतंत्र आहे, मी तशीच आहे. एकमेकांचे पायात पाय नाहीत. मला वाटले होते त्यापेक्षा लग्न फारच मोकळेढाकळे आहे.’ मला गंमत वाटली आणि एका बाजूला असेही वाटले, ‘नात्यात इतका कोरडेपणा कसा चालेल?’ पण बहुतेक माझ्या मनातला प्रश्‍न तिने ओळखला असावा. ती पटकन पुढे म्हणाली, ‘आम्ही एकमेकांसाठी आहोत आणि गरज पडेल, आधार लागेल तिथे असू असा विश्‍वास आहे. ते वागणुकीतल्या छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा दिसून येतेच. एकत्र मजा करतो, फिरायला जातो. पण त्याचे बंधन नाही. दोघांनाही मोकळीक आहे, स्पेस आहे.’ मला हे फार आवडले. तिच्या बोलण्यातून विचारांची स्पष्टता दिसत होती. स्नेहा आणि तिच्या नवऱ्यासारखी अनेक जोडप्यांची उदाहरणे मला दिसतात. प्रत्येक गोष्टीत मला माझ्या जोडीदाराची सर्वच दृष्टीने साथ असलीच पाहिजे हा अट्टहास इतिहासजमा झाला आहे. 

दृष्टिकोनात पडलेला अजून एक फरक म्हणजे, आता लग्नाकडे निव्वळ प्रपंच या अर्थी न बघता समान पार्टनरशिपच्या दृष्टीने बघितले जाते. समान पार्टनरशिप याला विशेष महत्त्व आहे. स्त्री किंवा पुरुष म्हणून ठरवलेल्या भूमिकांना मुलींकडून तर स्वीकारले जात नाहीच, पण मुलेही मुलींच्या मतालाच दुजोरा देतात. योग्यही आहे ते. अजून एक उदाहरण देते. आमच्या एका कार्यक्रमात अभिनेत्री संपदा जोगळेकर आणि तिचे पती यांची मुलाखत आम्ही घेतली होती. त्यात बोलताना संपदाने किस्सा सांगितला - तिच्या नवऱ्याने नोकरी सोडून वेगळे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संपदाने घराची जबाबदारी सहजपणे स्वतःच्या खांद्यावर घेतली. इतकी वर्षे त्याच्या नोकरीमुळे मला हवे तसे काम करता आले, आता मला जबाबदारी घेतली पाहिजे म्हणजे त्याला हवे ते करता येईल असा समंजस विचार त्यामागे होता. पारंपरिक भूमिकेतल्या नवरा या घरातल्या कर्त्या व्यक्तीची भूमिका त्यांच्या सहजीवनात सहजपणे बदलली आणि बायको ही घरातली कर्ती व्यक्ती झाली. कोण स्त्री आहे किंवा कोण पुरुष आहे हा विषय महत्त्वाचा ठरला नाही. अगदी नुकतेच तरुण अभिनेत्री आरती वडगबाळकर आणि लेखक-दिग्दर्शक आशुतोष परांडकर यांचीही आम्ही मुलाखत घेतली. त्यांनीही हेच सांगितले, ‘कोणा एकावर घराची जबाबदारी नसते. दोघेही ‘इक्वल’ आहोत.’ मला वाटते हे असे सहजीवन हे नवरा-बायकोतल्या अतिशय सुदृढ आणि निरोगी वातावरणाचे उदाहरण आहे. या अशा नात्यांमध्ये नवरा-बायको दोघेही, एकमेकांसह, स्वतःचे विचार, दृष्टिकोन, क्षितिजे विस्तारायचा प्रयत्न करत असतात. दोघांची व्यक्ती म्हणून होणारी प्रगती अपेक्षिलेली असते. अशा नात्यांत प्रगल्भता येणार नाही हे जवळपास अशक्‍यच, नाही का? 

ही उदाहरणे आहेत लग्न झालेल्या जोडप्यांची. पण आत्ता लग्नाला उभी मुलेमुली हे सगळे अशा स्पष्ट शब्दांत मांडू शकतातच असे नाही. स्वाभाविकही आहे ते. पण त्यांची विचारधारा, त्यांच्या आकांक्षा आपण आत्ता बघितलेल्या जोडप्यांपेक्षा मुळीच वेगळ्या नाहीत. लग्नाकडे, सहजीवनाकडे अशा वेगळ्या दृष्टीने बघणाऱ्या पिढीसाठी जोडीदार निवडताना, स्थळे शोधताना पारंपरिक अपेक्षा ठेवून कसे चालेल? त्या चौकटीतून बाहेर येण्यातच शहाणपण आहे. मुलेमुली नेमकेपणे हे सगळे मांडू शकली नाहीत, तरी पालकवर्गाने आपण होऊन या नव्या सहजीवनाच्या अपेक्षांकडे सकारात्मकपणे बघायला हवे. म्हणजे मग जोडीदार निवड तर सोपी आणि आनंददायी होईल. अनुरूप जोडीदार निवड ही समृद्ध सहजीवनाची पहिली पायरी आहे. सर्वार्थाने समृद्धता- भौतिकदृष्ट्या तर आहेच; पण भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्यादेखील आहे. 

गेले पूर्ण वर्षभर आपण लग्न आणि लग्नाशी संबंधित असंख्य विषयांवर इथे चर्चा केली. ‘लग्न’ हा विषय खरोखरच इतका महत्त्वाचा आहे का? का बरे आहे? केवळ परंपरा म्हणून? नक्कीच नाही. आजच्या लग्नव्यवस्थेला निव्वळ परंपरा, धर्म, संस्कृती यापलीकडेही काहीएक अर्थ आहे. म्हणूनच तर ही व्यवस्था जगभर पाय रोवून अस्तित्वात आहे. लग्नव्यवस्थेतून कुटुंब तयार होते आणि अशा कुटुंबांचा समाज! लग्न व्यवस्थेविषयी बोलणे, चर्चा करणे, मंथन करणे, काळानुसार त्यात बदल करणे, आवश्‍यक तिथे सुधारणा करणे हा सगळा व्यापक समाजाच्या हिताचा विषय आहे. केवळ याच उद्देशाने सुरू झालेल्या या लेखमालेच्या शेवटी, ‘लग्नाबरोबर सुरू होणारे सहजीवन समृद्ध व्हावे आणि अशा समृद्ध कुटुंबांमुळे एकूण सर्व समाजजीवनच समृद्ध व्हावे,’ एवढीच सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते.  
(समाप्त)

संबंधित बातम्या