बंध वाचनालयाचे 

गौतम पंगू  
सोमवार, 18 मार्च 2019

ललित
 

आयुष्यात.. बाप रे, कुठल्याही लेखाची सुरुवात ‘आयुष्य’ वगैरे शब्दांनी करेन असं कधी वाटलं नव्हतं. वय वाढत चाललं असलं, तरी मागं वळून आत्तापर्यंतच्या आयुष्याचं अवलोकन वगैरे करावं - ज्याला इंग्रजीत ‘टेकिंग स्टॉक ऑफ लाइफ’ म्हणतात - अशी बुद्धी कधी झाली नाही. तर म्हणायचं असं होतं, की आयुष्यात काही स्थळं आपल्याला अगदी पहिल्यापासून आपलीशी वाटतात आणि त्यांच्याशी एकदा जमलेले ऋणानुबंध उत्तरोत्तर अजूनच घट्ट होत जातात. (इथं ‘स्थळ’ या शब्दाचा अर्थ ‘जागा’ असा आहे, लग्नासाठी सांगून आलेल्या स्थळांचा यांच्याशी संबंध नाही. कारण तिथं एकाच स्थळाशी जमलेले ऋणानुबंध आयुष्यभर पुरून उरतात). माझ्यासाठी असंच एक स्थळ म्हणजे वाचनालय. 

वाचनालयाचा आणि माझा पहिला संबंध अगदी लहानपणी आला. बरीच वर्षं कोल्हापुरातल्या आमच्या घरी एक छोटंसं मोफत वाचनालय चालायचं. तिथं दररोजची काही वृत्तपत्रं आणि साप्ताहिकं वाचायला ठेवलेली असायची. घरातल्या मोठ्या चौकात वाचायला येणाऱ्या लोकांसाठी एक-दोन बाक ठेवलेले असायचे. गल्लीत राहणारे काही लोक आणि घरातल्या वसतिगृहात राहणारे विद्यार्थी तिथं नित्यनेमानं वाचत बसायचे. चौकात बऱ्याच गोष्टी चाललेल्या असायच्या. घरी येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांची तिथूनच ये-जा असायची. तिथंच आमचं क्रिकेट चालायचं. कधीकधी वाचणाऱ्या लोकांना बॉलचाही प्रसाद मिळायचा. ते आमच्याकडं वैतागून बघायचे, पण आमच्याच घरी वाचनालय असल्यानं बिचारे आम्हाला काही बोलू शकायचे नाहीत. इतक्‍या वर्षांनी हे सगळं आठवून आश्‍चर्यमिश्रित गंमत वाटते, पण वाचायच्या गोष्टी विकत घ्याव्या न लागता उपलब्ध करून देणारी वाचनालय नावाची एक जागा असते, या संकल्पनेची माझी पहिली ओळख ही तिथं झाली. 

नंतर हायस्कूलमध्ये गेल्यावर वाचनाची आवड वाढली आणि सार्वजनिक वाचनालयांतून पुस्तकं आणायला लागलो. कपिलतीर्थ मंडईतलं भास्करराव जाधव वाचनालय आणि बिंदू चौकातलं करवीरनगर वाचन मंदिर या दोन वाचनालयांतून पुस्तकं आणायचो. ‘भास्करराव जाधव वाचनालय’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर होतं असं आठवतंय. ऐन मंडईत वाचनालय असल्यानं तळमजल्यावर भाजीचा वास येत असायचा, पण वर जाईपर्यंत त्याचं वाचनालयाच्या त्या विशिष्ट वासात रूपांतर व्हायचं. बारावीपर्यंत या वाचनालयांतून भरपूर पुस्तकं आणून वाचली. उन्हाळ्याच्या सुटीत तर वाचनाचा सपाटाच असायचा. शक्‍यतो फ्रंट डेस्कवर असलेल्या पुस्तकांतलं कुठलंच पसंत पडायचं नाही. मग पुस्तकांच्या रजिस्टरमधून हव्या असलेल्या पुस्तकांचे नंबर कागदावर लिहून ती यादी ग्रंथपालांना द्यायचो. यादी घेऊन आतल्या बाजूला असलेल्या शेल्फमधून त्यांना ती पुस्तकं शोधून आणायला लागायची. त्यामुळं बहुधा मला बघून ‘आता हे कारटं पिटाळतंय आपल्याला आत!’ या भावनेनं ते आधीच वैतागत असावेत. 

या काळात लायब्ररीमुळं अनेक लेखकांची ओळख झाली. भा. रा. भागवत, रत्नाकर मतकरी, नारायण धारप, मिरासदार, शंकर पाटील, माडगूळकर बंधू, जयंत नारळीकर, बाळ फोंडके ही विशेष लक्षात राहिलेली नावं. सुहास शिरवळकर, बाबा कदम यांसारखे ‘बेस्टसेलर’ लेखकही यांत होते. विजय देवधर, रवींद्र गुर्जर वगैरे लोकांनी केलेले सिडने शेल्डन, रॉबिन कुक, जेम्स हॅडले चेस यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद याच काळात वाचले. या कादंबऱ्यांमधली काही विशिष्ट वर्णनं रंजक वाटू लागण्याचा हा काळ होता. बरेचदा एखाद्या परोपकारी वाचकानं अशा वर्णनांना आधीच खुणा करून ठेवलेल्या असायच्या, त्यामुळं ती शोधणं सोपं जायचं. पुस्तक आवडलं नसेल, तर लेखकाबद्दल अतिशय लडिवाळ भाषेत शेरेही मारून ठेवलेले असायचे. ते वाचायला मजा यायची. एकूणच ही वाचनालयं तेव्हा माझ्या छोट्याशा विश्‍वाचा एक महत्त्वाचा भाग होती. सुटीत गावाला गेलं तरी परत आल्याआल्या वाचनालयातून नवीन पुस्तक आणायची ओढ लागलेली असायची. 

बारावीनंतर मुंबईला युडीसीटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंग शिकायला गेलो आणि एका रिसर्च इन्स्टिट्यूटची लायब्ररी कशी असते याची झलक बघायला मिळाली. अर्थात पहिली तीन वर्षं आमच्या फेऱ्या लायब्ररीपेक्षा त्याच्याच खाली असलेल्या कॉलेज कॅंटिनकडे जास्त झाल्या. लायब्ररीत अगदीच कधी गेलो नाही असं नाही. कॉलेजमधलं एखादं प्रेक्षणीय स्थळ लायब्ररीत आलंय हे कळल्यावर आम्ही पटपट लायब्ररी कार्ड शोधून आमची पायधूळ तिथं झाडून यायचो. पण लायब्ररीची खरी गोडी लागली ती फायनल इयरमध्ये - सेमिनार आणि प्रोजेक्‍टची तयारी करताना! आत्तापर्यंत शिकलेल्या संकल्पनांचा उपयोग करून अभ्यासक्रमाबाहेरचा एखादा विषय समजून घेणं, त्यावर लेखी आणि तोंडी प्रेझेंटेशन करणं ही प्रक्रिया खूप काही शिकवून गेली. लायब्ररीतली पुस्तकं, जर्नल पेपर्स, पेटंट्‌स यांच्या माध्यमातून एखाद्या विषयावर पद्धतशीर लिटरेचर सर्च कसा करायचा याचा पहिला धडा या काळात मिळाला. लायब्ररीतल्या शांततेत, ज्ञानाच्या अपार साठ्याच्या मधोमध एखाद्या विषयाच्या खोलात तासन्‌तास बुडी मारून बसणं हवंहवंसं वाटू लागलं. अंडरग्रॅज्युएट झाल्यावर पुढं शिकत राहायचं हा निर्णय पक्का होण्यात या दिवसांचं अतिशय महत्त्वाचं योगदान होतं. 

पुढं अमेरिकेत पीएच.डी. करायला आल्यावर तिथल्या युनिव्हर्सिटीची लायब्ररी सिस्टिम जवळून बघायला आणि पुरेपूर वापरायला मिळाली. प्रत्येक डिपार्टमेंटची वेगळी लायब्ररी आणि शिवाय पूर्ण युनिव्हर्सिटीची एक मुख्य मोठीच्या मोठी लायब्ररी ही व्यवस्था पहिल्यांदा बघितल्यावर आश्‍चर्य वाटलं होतं. या लायब्ररीजमधली पुस्तकं, थिसिस आणि जर्नल्स यांचं प्रचंड कलेक्‍शन, तिथं सेमिनार्ससाठी, स्टडीग्रुप्ससाठी किंवा फक्त आपापलं येऊन वाचत बसण्यासाठी असलेली भरपूर जागा, काम करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले अनेक काँप्युटर्स आणि डिजिटल मीडिया लॅब्ज या गोष्टींनी सुरुवातीला ‘अमेरिकेतलं सगळंच काय भारी आहे!’ या धर्तीवर खूप थक्क व्हायला झालं होतं, पण हळूहळू हे सगळं सवयीचं होत गेलं. युनिव्हर्सिटीतलं कॅम्पस लाइफ काही ठराविक जागांभोवती फिरत असतं आणि त्यामध्ये लायब्ररी ही एक मध्यवर्ती जागा असते हे लक्षात आलं. ही पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पण तेव्हाही कागदावर असलेल्या ज्ञानाचं ‘डिजिटायझेशन’ करण्याचे आणि हे ज्ञान वेगवेगळ्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमधल्या लोकांना डिजिटल माध्यमात ताबडतोब उपलब्ध व्हावं यासाठी त्या संस्थांना एकत्र जोडण्याचे या लायब्ररीजचे प्रयत्न प्रभावित करून गेले होते. आमच्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत जगातल्या अनेक भाषांतले चित्रपट आणि पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्यात चक्क हिंदी चित्रपट आणि मराठी पुस्तकांचाही समावेश आहे, हे जेव्हा कळलं तेव्हा तर एक खजिनाच गवसल्यासारखं झालं होतं. पीएच.डी. चालू असताना वेगवेगळ्या भाषांतले अनेक उत्तमोत्तम चित्रपट मी लायब्ररीतून घरी आणून पाहिले, शिवाय अनेक मराठी आणि इंग्रजी पुस्तकंही वाचली. अगदी कोल्हापुरातल्या वाचनालयात मिळाली नव्हती, अशी मराठी पुस्तकं मला तिथं वाचायला मिळाली. कधीकधी तर आमचा पीएच.डी. गाइड लॅबमध्ये डोकावण्याची शक्‍यता नसलेली एखादी दुपार सापडली, की एखादा एक्‍स्पेरिमेंट इनक्‍युबेशन किंवा मिक्‍सिंगसाठी लावून मी लायब्ररीत जायचो आणि आरामात एखाद्या सोफ्यावर पडून कॉफी घेत पुस्तक वाचण्यात दोन-तीन तास घालवायचो! 

शिक्षण संपलं आणि नोकरी लागली. लग्न झालं, एक मूल झालं. संसाराचं रहाटगाडं वगैरे म्हणतात ते सुरू झालं. या काळात जमेल तशी पुस्तकं विकत घेऊन वाचणं चालू होतं, कंपनीतल्या कामासाठी लागणारी रिसर्च आर्टिकल्स सहजासहजी ऑनलाइन मिळत होती आणि आत्तापर्यंत वेगवेगळ्या रूपांत बरोबर असलेल्या लायब्ररीची संगत मात्र सुटली होती. पण हळूहळू, झोपताना गोष्टी वाचून दाखवायच्या मुलीच्या मागण्या सुरू झाल्या. रोज रात्री ‘अजून एक स्टोरी, अजून एक स्टोरी...’ हे ऐकून आमची झोप उडायला लागली. शिवाय जेवण भरवताना यूट्यूबवर नर्सरी ऱ्हाइम्स दाखवण्यापेक्षा ‘पुस्तकं’ वाचून दाखवणं जास्त चांगलं आहे हे लक्षात आलं, आणि एके दिवशी आम्ही मुलीला घेऊन जवळच्या पब्लिक लायब्ररीची मेंबरशिप घ्यायला गेलो. आत पाऊल टाकलं आणि पुस्तकांनी आणि सीडीडिव्हीडीजनी गच्च भरलेली तिथली शेल्व्हज, वाचत अगर कॉम्प्युटरवर काम करत बसलेले लोक, लायब्ररीतल्या विविध उपक्रमांची माहिती देणारे बोर्ड, गंभीर चेहऱ्याचे लायब्ररियन्स आणि लोकांच्या कुजबुजत्या बोलण्यानं अजूनच अधोरेखित होणारी शांतता बघून अक्षरशः कित्येक वर्षांनी जुना मित्र परत भेटल्यासारखं वाटलं. मुलीलाही लायब्ररीत जाणं आवडायला लागलं आणि लहानपणापासून आयुष्यात असलेला, पण मध्यंतरी काही वर्षं तुटलेला एक दुवा पुन्हा जोडला गेला! 

माझ्यासारखंच अनेक लोकांचं वाचनालयाशी असंच जवळचं नातं असेल हे नक्की. एकंदरीतच वाचनालय या संस्थेचं व्यक्तिमत्त्व बाहेरून शिस्तप्रिय आणि गंभीर वाटणाऱ्या, पण प्रत्यक्षात अतिशय उदार आणि सगळ्यांना जवळ करणाऱ्या शिक्षकासारखं असतं. वाचनालयं आपल्याला विनामूल्य किंवा अत्यंत माफक किमतीत ज्ञानाचं आणि माहितीचं मोठं भांडार खुलं करून देतात. इंटरनेट, सोशल मीडिया, इ-बुक्‍स यांच्या युगात वाचनालयं टिकून राहतील का किंवा त्यांची खरंच आवश्‍यकता आहे का, असा प्रश्‍न सध्या विचारला जातो. वाचनालयांना मिळणारं फंडिंगही दिवसेंदिवस कमी होत चाललंय. पण थोडा विचार केला, की लक्षात येतं की आजच्या काळात वाचनालयांचं महत्त्व किंवा आवश्‍यकता कमी तर झालेली नाहीच, उलट ती वाढलेली आहे. ‘गूगल’ किंवा ‘विकिपीडियां’सारख्या माध्यमांचा उदय होण्याच्या कित्येक वर्षं आधीपासून वाचनालयांनी सर्वसामान्य लोकांना मोफत ज्ञान उपलब्ध करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. सध्या इंटरनेटवर किंवा न्यूज मीडियामध्ये ‘न्यूज’चा सुकाळ झालेला आहे. फेसबुक, ट्‌विटर, व्हॉटसॲप या माध्यमांतून मिळणारी माहिती आपल्याला समजणारसुद्धा नाही अशा प्रकारे विकृतीकरण करून आपल्यापर्यंत आलेली असू शकते हे सिद्ध झालंय. या माध्यमांचा वापर करून फक्त आपल्याच विचाराच्या लोकांना जवळ करायचं आणि दुसऱ्या विचाराच्या लोकांवर तुटून पडायचं ही प्रवृत्ती बळावत चाललेली आहे. अशावेळी सार्वजनिक वाचनालयं ही ‘खऱ्या’, निःपक्षपाती माहितीचा एक निरपेक्ष स्रोत होऊ शकतात आणि एखाद्या विषयावरच्या सुसंस्कृत आणि सभ्य चर्चेसाठी माध्यम उपलब्ध करून देऊ शकतात. अमेरिकेतील बरीच सार्वजनिक वाचनालयं नुकत्याच इथं आलेल्या इमिग्रंट लोकांना अमेरिकेबद्दल, इथल्या व्यवस्थांबद्दल मोफत माहिती उपलब्ध करून देतात, त्यांना इंग्रजी भाषा शिकायची, अमेरिकेत राहायला उपयोगी पडतील अशी नवीन कौशल्यं शिकण्याची, नवीन लोकांना भेटण्याची संधी उपलब्ध करून देतात. सध्याच्या वाढत्या असहिष्णुतेच्या वातावरणात इथली सार्वजनिक वाचनालयं समाजातल्या बेघर लोकांसाठी, अल्पसंख्याक लोकांसाठी, LGBTQ (lesbian, gay, bisexual, transgender, queer) कम्युनिटीसाठी एक ‘सेफ स्पेस’ असतात. बेरोजगारांना नोकऱ्या शोधण्यासाठी किंवा छोट्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगांची वाढ करण्यासाठी अनेक साधनं मिळवून देऊन भरपूर मदत करतात. अशाप्रकारे वाचनालयं फक्त पुस्तकांचा साठाच करून ठेवायचं काम करत नाहीत, तर समाजाच्या जडणघडणीत एक मोलाची भूमिकाही निभावतात. 

‘अमेरिकन लायब्ररी असोसिएशन’नं मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेत जितक्‍या मॅकडॉनल्ड्‌स किंवा स्टारबक्‍सच्या शाखा आहेत, त्यापेक्षा जास्त सार्वजनिक वाचनालयं आहेत. ही माहिती खरंच थक्क करणारी आहे. अर्थात किती अमेरिकन्स या वाचनालयांचा प्रत्यक्षात फायदा करून घेतात हा वेगळा विषय आहे, पण बदलत्या डिजिटल युगाप्रमाणं स्वतःला बदलून या लाटेत टिकून राहण्यात इथली वाचनालयं यशस्वी झाली आहेत हे यावरून दिसतं. भारतातली वाचनालयंही अशाच स्वरूपाच्या आव्हानांचा सामना करत आहेत, असं अलीकडं वाचलेल्या काही बातम्यांवरून जाणवलं. पण अमेरिकेप्रमाणं आपल्याकडची वाचनालयंही या समस्यांवर मात करण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतील. अर्थात याची जबाबदारी आपल्यावरही आहेच. वर्षानुवर्षं निरपेक्षपणे, कोणत्याही भेदभावाशिवाय ज्ञान, विचार आणि कल्पनांची देवाणघेवाण करून एक सशक्त समाज उभा करण्यात कार्यरत असलेल्या ‘वाचनालय’ या संस्थेचं सध्याच्या काळातलं महत्त्व समजून घेणं आणि पुढच्या पिढ्यांना समजावून देणं आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे, हे निश्‍चित!

संबंधित बातम्या