कौतुक...

केतकी मांडपे 
गुरुवार, 26 एप्रिल 2018

ललित
 

रात्रीचे दहा वाजले असतील, २-३ दिवसापूर्वीच नवीन घरात सामान शिफ्ट केलं होतं. त्या सगळ्या धावपळीने खूप दमायला झालं होतं. बिछान्यावर आडवी होणार इतक्‍यात दारावरची बेल वाजली. नवीन ठिकाण, कोणीही फारसं ओळखीचं नसताना, इतक्‍या रात्री कोण आलं असेल म्हणून जरा घाबरले, खरं तर वैतागलेच !

नवरा गाढ झोपला होता. त्यामुळे मीच दरवाजा उघडला. जरा त्रासिक चेहऱ्याने समोर बघितला, 
म्हटलं कोण हवंय? 

तर ती म्हणाली ‘‘मी समोर राहते अंकिता, आत्ताच प्रवासातून आले. सॉरी एवढ्या रात्री तुमचं दार वाजवलं.’’ 
मला वाटलं प्रवासातून आली तर काही दूध- पाणी नसेल घरात म्हणून आली, की काय? तसं मी तिला विचारलंही. तर हसायला लागली आणि म्हणाली, ‘‘छे हो, मी आत्ता प्रवासातून आले. खरं तर खूप कंटाळले होते प्रवासाने, पण दार उघडताना सहज तुमच्या घरापुढे काढलेल्या रांगोळीकडे लक्ष गेले. इतकी सुबक रांगोळी बघून खूप प्रसन्न आणि छान वाटलं... आज-काल कुणाच्या दारापुढे सहसा नाही बघायला मिळत रांगोळी. मी पण नेहमी नाही काढत रांगोळी आणि खरं तर मला येतच नाही. पण या रांगोळीने क्षणभरात प्रवासाचा सगळा थकवा मी विसरले म्हणून हेच सांगायला तुमचं दार वाजवलं. खरंच खूप छान, रेखीव आहे रांगोळी...’’ 

तिचं हे बोलणं ऐकून मला एकदम आश्‍चर्य वाटलं आणि जरा रागही आला. एवढंच सांगायचं होतं तर ते नंतरही सांगता आलं असतं ना? त्यासाठी रात्री दहा वाजता साधी तोंडओळखही नसताना दारावरची बेल वाजवून सांगायची काय गरज? असे विचार मनात सुरू होते. तिने बहुधा ओळखलं असावं, मला काय वाटत असेल म्हणून ती पटकन म्हणाली, ‘‘खरं तर उद्याही सांगता आलं असतं होऽऽ पण कसयं ना मनात आलं, की पटकन समोरच्याच कौतुक करून मोकळं व्हावं, फार विचार करू नये. तरीही एवढ्या रात्री दार वाजवल्याबद्दल पुन्हा सॉरी आणि हो रांगोळी खूपच छान आहे,’’ एवढं बोलून ती तिच्या घरात निघून गेली.

मी पण घरात गेले, पण तिच्या त्या एका वाक्‍याने पुन्हा डोक्‍यात विचारांची मालिकाच सुरू झाली. 
खरंच किती लाख मोलाचं वाक्‍य होतं ते. आपण किती वेळा असं मनमोकळेपणे कुणाचं कौतुक करतो? एखादी गोष्ट आवडली नाही, पटली नाही तर सरळपणे नाराजी/ राग व्यक्त करून मोकळे होतो. पण कौतुक? कौतुकाचा एखादा शब्द बोलायचा तरी पटकन आपण बोलू शकत नाही.

 खूप छोटी गोष्ट असते आपल्यासाठी... पण समोरच्यासाठी तो कौतुकाचा शब्द खूप महत्त्वाचा असतो, हे लक्षातच येत नाही आपल्या. अशा छोट्या शब्दांचा आपलं एकमेकांशी असणारं नातं दृढ होण्यात खूप महत्त्वाचा वाटा असतो. मग ते नातं सासू-सुनेचं असो, नवरा-बायकोच असो किंवा ऑफिसमधल्या मैत्रीणींचं. ऑफिसमध्ये कित्येक वेळा एकत्र डबा खाताना, एखाद्या मैत्रिणीने केलेली भाजी आवडली, तर काय हरकत आहे भाजी चांगली झालीये हं... असं म्हणायला? कुणाचा ड्रेस आवडला, ड्रेसचा रंग आवडला, तर म्हणा, की मोकळेपणाने खुलून दिसतोय गं हा रंग तुला... चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणण्यात कसला आलाय कमीपणा?

आज-काल प्रत्यक्ष कौतुक करणं तर सोडाच, पण फेसबूक, व्हॉट्‌स ॲपवर एखाद्याने शेअर केलेल्या पोस्टला सुद्धा आपण पटकन लाईक करत नाही. खरं तर प्रत्येक जण कौतुकाच्या एका शब्दासाठी भुकेला असतो. जर आपण अपेक्षा करतो कुणाकडून कौतुकाची, तर आपणही समोरच्याला चांगल्या गोष्टीसाठी दाद ही दिलीच पाहिजे. ऑफिसमध्ये बॉसने एखाद्याला चांगलं काम केल्याबद्दल दिलेली शाबासकी, नवऱ्याने बायकोला केवळ नजरेतूनच दिलेली दाद, सासूबाईंनी सूनबाईंच्या अनेक गोष्टींसाठी दिलेली शाबासकी... अशा अनेक छोट्या वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा जगण्याचं वेगळंच बळ देऊन जातात.

आता तुम्ही म्हणाल, कौतुक करायचं म्हणजे चुकीच्या गोष्टीलाही चांगलं म्हणायचं? खोटं बोलायचं? अर्थातच नाही. 

खरंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगली गोष्ट असतेच, आणि आपण ती ओळखली असेल, तर एखादा कौतुकाचा शब्द बोलण्याइतका मनाचा मोठेपणा नक्कीच आपण दाखवू शकतो. दिलखुलासपणे बोललेला एक कौतुकाचा शब्दसुद्धा जादूच्या काठीप्रमाणे असतो? नाही का? या सगळ्या विचारांच्या मालिकेत कधी झोप लागली, कळलंच नाही. सकाळी जरा उशिराच जाग आली. बघते तर काय, नवरोबांनी चक्क चहाचा कप अगदी हातात आणून दिला आणि मी पण लग्गेच म्हणाले, ‘‘वाऽऽ मस्त झालाय चहा... झक्कास अगदी मला आवडतो तस्साच... ’’

नवराही मिनिटभर चक्रावलाच म्हणाला, ‘‘नवीन घरात आल्या आल्या देवाने दृष्टांत दिला, की काय तुला?’’ नवऱ्याचं कौतुक कर असं सांगणारा? 

खऱ्या देवाने नाही, तर माणसातल्या देवाने नक्कीच दृष्टांत दिला होता. अंकिता... थॅंक यू. ! 
खूप महत्त्वाची गोष्ट अगदी एका वाक्‍यात सांगितलीस तू... 

संबंधित बातम्या