स्टॉप लॉस

प्रिया साठे
सोमवार, 1 जुलै 2019

ललित
 

आज सकाळची मीटिंग रोजच्याप्रमाणं रोजच्या वेळेस, अगदी बरोबर नऊ वाजता सुरू झाली होती. इनामदार सरांचं पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन सुरू होतं. टेबलाच्या भोवती बसलेल्या १३ जणांपैकी कुणीच त्या स्लाइड्‌स बघत नव्हतं. प्रत्येक जण काहीतरी निराळं करत होता. पण कान मात्र सरांच्या बोलण्याकडं होते. मुक्ता नोटपॅडवर नोंदी करत होती. आजचे बाय आणि सेल कॉल्स, फंडामेंटल स्टॉक्‍स, ट्रेंडिंग रेंज सवयीप्रमाणं सगळं लिहीत होती. लिहिताना तिला तिचे क्‍लायंट्‌स आपोआपच आठवत होते. समोरच्या भिंतीवर सतत टिकर हलत होता. टीव्हीचा आवाज बंद होता, पण दृश्‍य दिसत होतं. त्यातले लाल, हिरवे, निळे रंग सगळ्यांच्या डोळ्यांत नाचत होते. 

‘येस बॅंक २६ टक्के पडला आहे, कालच्या रिझल्ट्‌स नंतर आपल्याला कल्पना होतीच,’ सर म्हणाले. 

‘ॲव्हरेज करा, कुणी गेल्या दहा दिवसात घेतला असेल तर,’ असं सर म्हणायच्या आत मुक्तानं चार नावं कागदावर लिहिली होती. त्या चौघांनीही गेल्याच आठवड्यात येस बॅंकेमध्ये मोठी गुंतवणूक केली होती.

‘बॅंकेत चेक टाकायला आज तरी सवड झाली का नाही इन्व्हेस्टमेंट बॅंकर मॅडमना? का ही लहानसहान कामं तुमच्या स्टेटसला शोभत नाहीत आता?’ सुव्रतचा आवाज चढला होता. 

मुक्ता नुकतीच घरी आली होती आणि लगेच स्वयंपाकाला लागली होती. ती घरात शिरल्यापासून सुव्रत काहीतरी बडबड करत होता, रोजच्यासारखाच. ती मुकाट्यानं ऐकून घेत होती, रोजच्यासारखीच. त्याला हल्ली तोंडीलावणं काहीही चालायचं. आज हे कारण होतं, उद्या दुसरं काही! कधीकधी तर बऱ्याच जुन्यापुराण्या घटना एकत्र हाती लागायच्या त्याच्या. 

‘आज जेमतेम वेळेत पोचले मी ऑफिसला आणि नंतर फार बिझी...’

‘टाइम मॅनेजमेंटचा कन्सेप्टच नाही ना मॅडम तुमच्या आयुष्यात! मग होणारच उशीर! कसं काय प्रमोशन दिलं तुला इनामदाराने ईश्वरच जाणे!’ 

मुक्ता काहीही न बोलता काम करत राहिली. काही अर्थच नसायचा बोलून त्याचा पारा आणखी वाढवण्यात. सुव्रतनं स्वतःची बडबड सुरू ठेवली. ग्लासमध्ये स्कॉच ओतेपर्यंत ती थांबणार नाही याची कल्पना होती मुक्ताला. 

‘मुक्ता, चहा सोडलास की काय?’ शेजारी बसलेल्या शुभमनं तिला विचारलं आणि ती भानावर आली. मीटिंग सुरू असताना अचानक तिचं मन भरकटून अनेक महिने मागं गेलं होतं. शुभमला एव्हाना तिच्याकडं बघूनच कळायचं, की ती कुठंतरी हरवली आहे. ती आणि तो एकत्रच इथं जॉईन झाले होते. तिच्यात होत गेलेले बदल त्यानं बघितले होते. त्यानं अनेकवेळा तिच्याशी त्याबाबतीत बोलायचाही प्रयत्न केला होता. पण त्याच्या हाती काहीच लागलं नव्हतं. वीकएंडला ऑफिसनंतर सगळे मिळून एखाद्या बारमध्ये किंवा जेवायला जायचे, तेव्हा मुक्ता कधीच त्यांच्याबरोबर जायची नाही. तिचा आणि तिच्या नवऱ्याचा नेहमीच प्लॅन असायचा. सगळं सुरळीत आहे, असं वरवर दर्शविणाऱ्या मुक्ताच्या आयुष्यात काहीतरी वादळ होतं. पण ते काय आहे हे तिनं शुभमला किंवा इतर कुणालाच कधीच कळू दिलं नव्हतं. 

‘घेते घेते!’, असं म्हणत मुक्तानं चहाच्या कपाऐवजी पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. शुभमसाठी हे ही नवीन नव्हतंच. पण तो काहीच म्हणाला नाही.

मीटिंग संपवून ती स्वतःच्या डेस्कपाशी गेली आणि तिनं लॅपटॉपवरचा ऑर्गनायझर उघडून दिवसभराचा आराखडा डोळ्याखालून घातला. 

मुक्ता हुशार होती, कामातल्या परफेक्‍शनसाठी तर तिची कॉलेजपासूनच ख्याती होती. स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी लागणारं ज्ञान आणि इन्स्टिंक्‍ट या दोन महत्त्वाच्या गोष्टींचं उत्कृष्ट मिश्रण होतं तिच्यात. तिचे क्‍लायंट्‌स तिच्या शब्दावर बंद डोळ्यांनी विश्वास ठेवायचे. या फर्ममध्ये सर्वांत कमी कालावधीत आणि कमी वयात काही महत्त्वाचे एच.एन.आय क्‍लायंट्‌स तिला देण्यात आले होते आणि ते सर्वच तिच्यावर खुश होते. दर आठवड्यात तिच्या डेस्कवरून अनेक कोटींची उलाढाल व्हायची. 

आजचं सर्वांत पहिलं काम त्या चार क्‍लायंट्‌सना फोन करून येस बॅंक ॲव्हरेज करणं हे होतं. त्यात एक मेहता नावाचे बऱ्यापैकी नवीन मिळवलेले क्‍लायंट्‌सही होते. त्यांना तिनं सर्वांत शेवटी फोन लावला. शेअर चांगलाच आहे, पण काही कारणांमुळं तो ३० टक्के खाली आला आहे, वगैरे तिनं तिच्या पद्धतीनं सांगितलं. मेहतांनी लगेच ‘गो अहेड’ दिला. 

तिला या फर्ममध्ये कामाला लागल्यावर केलेला पहिला कॉल आठवला. अचानक सोडून गेलेल्या लीना कपूरचे छोटे-मोठे क्‍लायंट तिला देण्यात आले होते. त्यातल्या एक होत्या डॉक्‍टर खरे. त्यांना तिनं चार महिन्यांपूर्वी घेतलेला टाटा स्टील ॲव्हरेज करण्याचा सल्ला दिल्यावर त्या अजिबात तयार झाल्या नव्हत्या. बुडीत शेअरमध्ये अजून पैसे ओतण्याची जोखीम त्यांना घ्यायची नव्हती. कंपनी चांगली आहे आणि ही संधी घ्यायलाच हवी हे त्यांना पटवून द्यायला मुक्ताला स्वतःची सर्व शक्ती पणाला लावावी लागली होती. ब्लू चीप कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक सहसा चुकीची नसते, शेअर बाजारात चढउतार सुरू असतात, मुळात चांगल्या असलेल्या शेअरवरचा विश्वास पटकन ढळू द्यायचा नसतो, त्याची किंमत खाली आली, की त्यात आणखी पैसे गुंतवायचे.. हे आणि बरंच काही तिला त्यांना सांगावं लागलं होतं आणि अखेर त्यांना ते पटलं होतं. थोड्याच दिवसांत डॉक्‍टरीण बाईंसाठी गुंतवणुकीच्या बाबतीत मुक्ता म्हणेल ती पूर्व दिशा झाली होती. त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं, तेव्हा ‘ब्लू चीप जावई शोधलाय लेकीनं, तुझ्या भाषेत सांगायचं तर,’ असं सांगून त्यांनी तिला खास आमंत्रण दिलं होतं. 

तसं बघता मुक्ताच्या आईवडिलांनीही ब्लू चीप जावईच शोधला होता. स्वतःचा व्यवसाय असणारा सुव्रत घैसास उच्चशिक्षित, सुस्वभावी आणि देखणा होता. सुशिक्षित आणि श्रीमंत आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या सुव्रतची आणि मुक्ताची पत्रिकाही जुळत होती. दोघांची जोडीही अतिशय अनुरूप होती. नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच. मुक्ता त्याला दोनदा भेटून लगेच हो म्हणाली होती. सुरुवातीचं वर्ष कसं गेलं ते तिला समजलंच नाही. सुव्रतचं काम जोरात सुरू होतं, मुक्ताला एका बॅंकेत नोकरी मिळाली होती. दोघं व्यग्र असूनही एकमेकांना शक्‍य तितका वेळ द्यायचे. त्यांची कामं आणि करिअर भिन्न असूनही भरपूर चर्चा करूनच दोघंही सगळे निर्णय घ्यायचे. सुव्रत सतत कारणं शोधत असायचा तिला सरप्राईज करण्याची आणि गिफ्ट्‌स देण्याची. ती त्याचा जास्तीत जास्त सहवास मिळावा म्हणून बॅंकेला सुटी असली, की त्याच्याबरोबर फॅक्‍टरीत जायची. संधी मिळायचा अवकाश, की दोघंजण लगेच कुठंतरी भटकून यायचे. त्यांचे इतके छान सूर जुळले होते, की ते बोलताना एकमेकांची वाक्‍यं पूर्ण करायचे. त्यांच्या आवडीनिवडीही सारख्या होत्या आणि ज्या नव्हत्या त्या आता सारख्या झाल्या होत्या. तिचीच दृष्ट लागेल त्यांच्या संसाराला असं वाटायचं तिला. 

...आणि मग तिची भीती खरी ठरल्यासारखं त्यांच्या संसारतलं सुख उंबरठ्यावर अडखळायला लागलं. मुक्ता समजूतदार होती, ती कधीच त्यानं सुरू केलेलं भांडण वाढू द्यायची नाही. तिच्यात काही उणीव असेल का, ती त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये का, त्यांच्या नात्याला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये का, कुठं कमी पडतीये का असे प्रश्न दर वेळेस ती स्वतःलाच विचारायची. मुक्ताकडून साधा शाब्दिक प्रतिकारही होत नाही, हा तिचीच चूक असण्याचा पुरावा आणि तिच्या दुबळेपणाचं लक्षण समजून सुव्रत जास्तच चेकाळल्यासारखं वागायला लागला. एकीकडं त्याला व्यवसायात आलेलं अपयश आणि दुसरीकडं मुक्ताची होणारी प्रगती त्याच्या अहंकाराला आतून कुरतडत होती. 

घराबाहेर नफा आणि तोट्याच्या जगात वावरणाऱ्या आणि त्यात प्रावीण्य असणाऱ्या मुक्तानं तिच्या लग्नातही त्याच जगातला एक उपाय नकळत लागू केला. तिचं आणि सुव्रतचं नातं एक आनंदाची उंची गाठून दिवसेंदिवस चिडचिड, राग आणि क्‍लेशाच्या पायऱ्या उतरत खाली येतंय हे तिच्या लक्षात येत होतं. तिनं त्यात शक्‍य तितक्‍या प्रेमाची गुंतवणूक करायचा निर्णय घेतला. ती सुव्रतमध्ये भावनिक पातळीवर गुंतली होतीच, तो मुळात चांगलाच आहे यावर तिचा विश्वास होता. त्याच्या बदललेल्या स्वभावाला तिच्या आपुलकीचा आधार मिळाला, की सगळं ठीक होईल आणि त्यांचा संसार परत सुरळीत मार्गावर येईल याची तिला खात्री होती. 

‘वेलिंगकरमध्ये दोन आठवड्यांनी एक सेशन घ्यायचं आहे, तुझं नाव पाठवतो. तू फ्री आहेस ना पंचवीस तारखेला?’ इनामदार कधी येऊन तिच्या मागं उभे राहिले हे विचारांमध्ये हरवलेल्या मुक्ताला कळलंच नाही. 

‘सर, मी? मला कुठं याचा अनुभव आहे?’ 

‘विषय साधा आहे मुक्ता आणि तुझ्यासाठी फारच सोपा! गुंतवणुकीत स्टॉप लॉसचं महत्त्व. या प्रेझेंटेशनसाठी तुला तयारीचीसुद्धा गरज नाही!’ 

‘पण सर...’

‘मी फक्त तुला वेळ आहे ना एवढंच विचारायला आलोय मुक्ता, तुझं नाव फायनल आहे,’ असं सांगून इनामदार निघून गेले. 

मुक्ताचा उरलेला दिवस मीटिंग्स, कॉल्स, दुसऱ्या दिवशीची पूर्वतयारी आणि क्वार्टर एन्डिंगच्या स्प्रेडशीट्‌स तयार करण्यात गेला. ऑफिसमधून घरी जाताना तिच्या मनावर थोडंसं दडपण असायचं. आज सुव्रतचा मूड कसा असेल त्यावर संध्याकाळ कशी जाईल हे ठरायचं. कधीकधी ठीक असायचा तो, अगदी पूर्वीसारखा, पण जास्तकरून नसायचाच. काहीही कारण पुरायचं मग त्याला टोचून बोलायला किंवा वाद घालायला. बऱ्याच वेळा तो अबोला धरायचा आणि त्याचं ते न बोलणं तिला असह्य व्हायचं. एक अक्षरही न बोलता त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांवरून त्याचा संताप, त्याची निराशा आणि तिच्याबद्दल वाटणारा तिरस्कार हे सगळं वाचता यायचं तिला. 

घरी जाताना वाटेत वाण्याच्या दुकानात डोकावली, तर त्या काकांनी नवीन आलेल्या मेथी स्टिक्‍स तिला घ्यायला लावल्या. घरी गेली तर सुव्रतच्या हातात तिला ग्लास दिसला. तिनं घड्याळाकडं बघितलं. ‘आज रोजच्या पेक्षा लवकर...,’ ती मनातल्या मनात म्हणाली आणि तिनं कपाटातला बाउल काढून त्यात त्या मेथी स्टिक्‍स घालून त्याच्या समोर नेऊन ठेवल्या. त्यानं निर्विकार चेहऱ्यानं तिच्याकडं बघितलं. 

‘झालं का काही बोलणं कोल्हापूरच्या कंपनीतल्या लोकांशी?’ ती शेजारची खुर्ची ओढून बसत त्याला संभाषण सुरू करायच्या हेतूनं म्हणाली. सुव्रत काहीच बोलला नाही. त्याच्या कपाळावरची फडकणारी शीर तिला स्पष्ट दिसत होती. तिनं विषय बदलायचा ठरवला.

‘तुला माहितीये मला आज कोण भेटलं घरी येताना?’ तिनं त्याच्याकडं बघून हसत विचारलं. 

‘आपल्याला पॅरिसला भेटले होते ना अमोला आणि अभिजित, ते भेटले अरे! तुझी चौकशी करत होते. भेटूया म्हणाली अमोला.’ 

‘मग? सांगितलं नाहीस त्यांना, की मी घरीच असतो, काहीच काम करत नाही, तुझ्या जिवावर जगतो!’ 

‘सुव्रत, असं नको म्हणूस रे...’

‘मग काय म्हणू? अजून काय काय म्हणाली अमोला? परत पॅरिसला जाऊ नाही म्हणाली? जाऊया की! घैसास मॅडमना इतक्‍या तगड्या पगाराची नोकरी आहे, सहज शक्‍यय. चांगलं फर्स्ट क्‍लासनं जाऊ!’ 

मुक्ताच्या मनाला त्याचा प्रत्येक शब्द लागला पण तिनं सवयीप्रमाणं तो लावून घेतला नाही. 

‘फार गोड मुलगी आहे त्यांना. आरिता नाव ठेवलं आहे तिचं,’ तिनं विषय बदलायचा प्रयत्न केला. 

‘छान! आता हे पण माझ्या डोक्‍यावर थाप तू! आपल्याला मूल बाळ नाही ही माझीच चूक आहे. माझाच दोष आहे तोही...’ 

मुक्ताला कुठून विषय काढला असं झालं होतं. तिचे डोळे भरून आले होते. ती तिथून उठली आणि स्वयंपाकघरात निघून गेली. सुव्रतची बडबड सुरूच होती, ती आता झोपेपर्यंत सुरूच राहणार हे मुक्ताला माहीत होतं. तिनं कान बंद करून घेतले. असं केल्यानं त्याचं बोलणं आतपर्यंत पोचायचं नाही. तिनं रात्रीचा स्वयंपाक उरकला, सगळं अन्न झाकून टेबलवर मांडून ठेवलं आणि स्वतः नुसतं सिरीयल खाऊन झोपायला गेली. सुव्रत फुटबॉलची मॅच बघत सोफ्यावर बसलेला होता. त्याचं लक्षही नव्हतं तिच्याकडं.

सकाळी ती ऑफिसला गेली, तेव्हा तो झोपेतून उठलाही नव्हता. थोडक्‍यात मुक्ताचा दिवस रोजच्यासारखाच असणार होता. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या मुक्ताच्या मनात रोजचेच विचार येत होते. काय मार्ग काढता येईल यातून? तो काउन्सेलिंगलाही जायला तयार होत नाही, त्याचं मन कसं वळवावं? त्याचं नैराश्‍य घालवायला मी काय करू शकते? त्याच्या आईबाबांना त्याच्याशी बोलून बघायला सांगावं का? ते तरी बिचारे कितीदा त्याला सांगणार, त्यांना किती वाईट वाटत असेल? काहीतरी उपाय असणारच याला. मी विश्वास ठेवायला हवा. फंडामेंटली स्ट्राँग आहे तो! व्हॉट कम्स डाऊन डझ गो अप इव्हेंचुअली! आय ॲम गोइंग टू स्टे इन्व्हेस्टेड इन धिस मॅरेज. 

ऑफिसला पोचली, तर शुभम तिला दारातच भेटला. मुक्ता सकाळी सकाळीच थकल्यासारखी दिसत होती. सुरुवातीला किती टवटवीत आणि आनंदी दिसायची ही मुलगी. मग नंतर काहीतरी बदललं. महिनाभर सुट्टी घेतली तिनं, ती ही सिक लीव्ह आणि त्यानंतर आधीची मुक्ता हरवलीच कुठंतरी. ‘ऑल वेल ना? यू लूक टायर्ड,’ त्यानं तिला विचारलं. ‘हो हो, ऑल वेल, काल सुव्रतबरोबर सिनेमाला गेले आणि झोपायला उशीर झाला म्हणून असेल,’ तिनं सांगितलं. हे सांगताना तिनं त्याच्याकडं बघितलं नाही. त्याला कळलं, की ती काहीतरी लपवतीये, हे कारण खरं नाही. पण त्याच्या मनानं तिनं आखलेली लक्ष्मणरेषा पार करायची त्याला परवानगी दिली नाही. ‘ओह ओके! सी यू इन फिफ्टीन.’ तो म्हणेपर्यंत मुक्ता तिच्या डेस्कच्या दिशेनं चालायला लागली होती. 

दिवस चांगले असोत की वाईट, ते त्यांच्या गतीनंच सरतात, तसेच ते जात होते. मुक्ताच्या डेस्कवरच्या डिजिटल कॅलेंडरवरची तारीख वार रोज बदलायचे, पण तो बदल सोडल्यास तिच्या आयुष्यात काहीच बदल घडायचा नाही. तिला रोज घरी जाताना आशा असायची, की आज काही वेगळं, काहीतरी चांगलं घडेल. पण अलीकडं तसं कधीच व्हायचं नाही. सुव्रतचा मूड एखाद्या दिवशी चांगला असला, तरी तो फार वेळ टिकायचा नाही. तिला त्याला सतत सांभाळून घ्यायची, त्याच्या आवाजात होणारे चढउतारही निमूटपणे सोसायची सवय झाली होती. पण त्यानं ती थकून जायची. 

विकेंडला मुक्ताचे सासू-सासरे घरी राहायला आले. ते आले की मुक्ताला खूप बरं वाटायचं. पण सुव्रतच्या वागण्यामुळं त्यांना त्रास होत असेल याचं वाईटही वाटायचं. ते दोघं मुक्ताचेच आईबाबा वाटावे इतका जीव लावायचे तिच्यावर. त्यामुळं त्यांच्या येण्यानं घरातलं वातावरण बदलून जायचं. या वेळेसही बाबांनी सुव्रतशी बोलून बघितलं, त्याच्या व्यवसायातल्या प्रॉब्लेम्सबद्दल त्याच्याशी चर्चा करून त्याला मदत करायची इच्छा दर्शवली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 

‘आई, तुम्ही नका हो इतकं मनाला लावून घेऊ, होईल सगळं ठीक,’ आईंचा पडलेला चेहरा बघून मुक्ता त्यांना म्हणाली.

‘कधी होणार गं सगळं ठीक पोरी? तुझी कमाल वाटते मला. किती सहन करणार आहेस तू? किती दिवस पोटात घालणार आहेस त्यानं केलेल्या चुका?’

‘तो मुळात चांगलाच आहे ना आई? तुम्हालाही माहीत आहेच ना?’ मुक्ता त्यांची समजूत काढत म्हणाली.

‘माहीत आहे... माहीत होतं, पण तुझं मिसकॅरेज झालं, तेव्हा त्याचं वागणं बघून...’

‘आई, प्लीज! नको ना तो विषय..,’ मुक्ताचा आवाज कापत होता. 

त्यांनी तिला घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून वाहिलेले अश्रू तिच्या खांद्यावर पडले. तिनं तो दिवस आणि त्यादिवशी झालेलं सगळंच मनातून हद्दपार करून टाकलं होतं. कायमचं! 

रात्रीचं जेवण झाल्यावर बाबा आणि मुक्ता गप्पा मारत गच्चीत बसले होते. बाबांना तिच्याकडून स्टॉक टिप्स घ्यायला आवडायच्या. एफ.डी. आणि फार फार तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे बाबा मुक्तामुळं शेअर बाजारात पैसे गुंतवायला लागले होते आणि त्यात चांगला नफा झाल्यामुळं त्यांना त्याचं व्यसन झालं होतं अलीकडं. 

‘यू शुड नेव्हर पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, हो ना सूनबाई?’ बाबा खुर्चीतून उठत म्हणाले.

मुक्तानं मानेनंच होकार दर्शवला. 

‘हे सरसकट लागू करायला पाहिजे ना?’ 

‘म्हणजे?’ मुक्ताच्या लक्षातच आलं नाही, की बाबांनी बोलता बोलता संभाषण शेअर्सवरून आयुष्यावर आणलंय. पण आता काहीतरी गंभीर म्हणणार आहेत हे तिला कळलं होतं. कारण तसा विषय असला, तरच ते तिला सूनबाई वगैरे म्हणायचे.

‘तू सुव्रतची बायको आहेस. पण याचा अर्थ असा नाही, की तू तुझ्यातली सर्व ऊर्जा त्याच्यावर खर्च करावीस. तू मनापासून प्रेम केलंस त्याच्यावर, अजूनही जीव लावतेस तो कसाही वागला तरी. त्याच्या व्यवसायाला हातभार लावायला तू सुरुवातीपासून पैसेही गुंतवत आली आहेस. गेली कित्येक वर्षं त्याच्या दोन्ही फॅक्‍टऱ्या बंद आहेत, तरी तू तिथल्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलली आहेस. त्याला माहीत आहे ना हे? किंमत आहे का त्याला याची आणि तुझीही? तुझा एव्हाना एक फ्लॅट झाला असता याच बिल्डिंगमध्ये तुझ्या नावावर. आमचं जे काही आहे ते तुझंच आहे, पण म्हणून तू स्वतःच्या दमावर मिळवलेलंही...,’ बाबांना दम लागला होता बोलून.

‘बाबा याचा आणि त्याचा काय संबंध आहे? मी आणि सुव्रत वेगळे आहोत का?’

‘तुझ्या हाती काय येणार आहे याचा विचार कर मुक्ता. आपण सर्व प्रयत्न करून बघितलेत आता. तो जोपर्यंत मनावर घेत नाही तोपर्यंत  त्याच्या आयुष्यात काहीच बदल होणार नाही. त्याचं हे वागणं दिवसेंदिवस जास्त जास्त खालच्या थराला जायला लागलं आहे. तो गृहीत धरतोय तुला, तुझ्या प्रेमाला. तू तुझ्याकडं आहे नाही ते सगळं त्याच्यात गुंतवून बसली आहेस. ते सगळं बुडलं तर?’

‘तुमचं काय म्हणणं आहे बाबा नक्की?’ 

‘तुला कळतंय मी काय म्हणतोय ते. माहितीये मला. विचार कर, इतकंच म्हणणं आहे माझं. तू आमची सून म्हणून या घरात आली असलीस, तरी आता मुलगीच आहेस आमची. पोटची मुलगी असतीस, तर तिच्या आयुष्याची अशी वाताहत झालेली बघून आम्ही काही न करता नुसते बघत बसलो असतो का सांग? तुझ्या आईवडिलांनाही तुला समजवायला सांगितलं, पण ते म्हणतात तू त्यांचंही म्हणणं ऐकत नाहीस. त्यांनाही बघवत नाही तुझा असा विस्कटलेला संसार!’ बाबा येरझाऱ्या घालत बोलत होते.

‘बाबा, शांत व्हा बरं तुम्ही. सांगितलं आहे ना डॉक्‍टरांनी स्ट्रेस घ्यायचा नाही म्हणून? अँजिओप्लास्टी होऊन एक वर्षही झालं नाही अजून. चला झोपा बरं आता, किती उशीर झालाय!’

मुक्तानं पुन्हा एकदा हा विषय बंद केला होता, पण तिच्या डोक्‍यात तो रात्रभर चालू राहिला आणि त्यामुळं डोळ्याला डोळा लागला नाही. सुव्रत रात्रभर बाहेरच्या सोफ्यावरच झोपून राहिला. 

मुक्ताच्या आग्रहाखातर सोमवारी मित्राच्या नातवाची मुंज झाली, की जायच्या ऐवजी आई-बाबा आठवडाभर राहायला तयार झाले. आई सकाळी स्वयंपाकघर ताब्यात घ्यायच्या. मुक्ताला चहासुद्धा करू द्यायच्या नाहीत. तिचा डबापण भरून तयार ठेवायच्या. संध्याकाळी घरी आल्यावर रोज काहीतरी नवीन करून त्यांना दोघांना खायला घालण्याचं वचन मात्र तिनं त्यांच्याकडून घेतलं होतं. स्वतःच्या मुलाच्या वागण्यानं तिला होणाऱ्या त्रासाची नुकसानभरपाई केल्यासारखं ते दोघं तिचे शक्‍य तितके लाड करून तिचं मन राखायचा प्रयत्न करायचे. दिवसभर काहीही न करता घरात बसून असलेला त्यांचा मुलगा त्यांना बघवत नव्हता. कॉलेजात पहिला आलेला आणि उत्तमोत्तम नोकऱ्यांच्या ऑफर्स आलेल्या असताना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न साकार करायला धडपड करणारा हाच मुलगा आहे, यावर विश्वास बसणं कठीण व्हायचं त्यांना. जमेल तसं, जमेल तितकं त्याच्याशी बोलायचा, त्याचं समुपदेशन करायचा प्रयत्न करायचे दोघं, पण कशाचाच परिणाम व्हायचा नाही. 

गुरुवारी सकाळी मुक्तानं आईंना सांगितलं, की दुपारनंतर तिला एका प्रेझेंटेशनसाठी जायचं आहे. त्यामुळं तिला कदाचित घरी यायला उशीर होणार आहे. तिनं घरातून निघताना सुव्रतलाही तसं सांगितलं. 

‘मी कुठं वाट बघत बसतो नाहीतरी तुझ्या येण्याची? यायचं तेव्हा या मॅडम. जगाला शहाणपणा शिकवून झाला, की येऊन थोडंसं ज्ञान मलाही द्यालच!’ 

बाबा सुव्रतला काही म्हणणार तेव्हढ्यात मुक्तानं त्यांना खुणावलं आणि ते काहीच बोलले नाहीत. संताप संताप झाला होता मात्र त्यांचा. मुक्ताला आज पार्किंगपर्यंत सोडायला गेले ते आणि तिला म्हणाले, ‘बेस्ट ऑफ लक बेटा!’ मुक्तासाठी हे बेस्ट लक लाखमोलाचं होतं.

ऑफिसमधला दिवस रोजच्यासारखाच बिझी जात होता. वर्तक इंडस्ट्रीजच्या वर्तकांना फोन करून त्यांनी एका ब्रोकरच्या सल्ल्यानं घेतलेला शेअर विकून टाकायला सांगणं हे पहिलं काम होतं. कंपनी कर्जबाजारी झाली होती. शेअर धडाधड कोसळत होता. शिवाय हा ट्रेडिंगचा शेअर असून बिना स्टॉप लॉसचा इतके दिवस होल्ड केला होता. आत्ता ५३ टक्के नुकसान होत होतं. आज विकला नाही, तर काहीच हातात राहणार नव्हतं. वर्तकांना यापूर्वीही तिनं सल्ला दिला होता. या स्टॉकमधून बाहेर पडून हीच रक्कम दुसरीकडं गुंतवण्याचा. कधीकधी लोक भावनिक पातळीवर गुंततात एखाद्या शेअरमध्ये तसं काहीसं झालं होतं त्यांचं. आज परत एकदा त्यांचं बौद्धिक घेऊन त्यांना मुक्तानं भांडवल इथून सोडवून घ्यायला तयार केलं आणि तेच पैसे त्यांच्या वतीनं कजारिया सिरॅमिक्‍समध्ये गुंतवले. 

लंचटाइममध्ये तिनं डबा उघडला, तर त्यात तिची फेव्हरेट भरली भेंडी होती. एका ग्लासमध्ये ताक, एका छोट्या डब्यात एक काजू कतली आणि लंचबॅगच्या तळाशी एका पेपर नॅपकिनवर आईंच्या हस्ताक्षरात ‘शुभेच्छा’. तिनं मायक्रोव्हेवमध्ये भाजीचा डबा टाकला आणि तितक्‍यात तिचा फोन वाजला. नंबर ओळखीचा नव्हता, पण तरीही तिनं उचलला.

‘हां, बोला जाधव साहेब...’ मुक्ता फोनवर बोलत बोलत कॅफेटेरियाच्या बाहेर गेली ती पाऊण तासानेच आत आली. तिचा भाजीचा डबा मायक्रोवेव्हमधून काढून कुणीतरी टेबलावर ठेवला होता. तिनं तो बंद केला आणि बाकी सगळेच डबे बंद करून लंचबॅगमध्ये ठेवून दिले. त्या फोननंतर तिला भूकच राहिली नव्हती. 

बरोबर चार वाजता तिचं वेलिंगकरमधलं सेशन सुरू झालं. उदाहरणानं सुरुवात करून निरनिराळ्या मुद्द्यांवर बोलत बोलत मुक्ताचं प्रेझेंटेशन तासभर सुरू राहिलं. नंतर प्रेक्षकांना प्रश्न विचारण्यासाठी राखून ठेवलेला अर्धा तास जेमतेम पुरला. सगळेजण आपसांत तिची तारीफ करत होते. तिचं सखोल ज्ञान आणि बोलण्यातली सहजता सर्वांना खूपच भावली होती. इनामदार सर म्हणाले तसं हा विषय मुक्तासाठी फारच सोपा होता. त्यामुळं तिला काहीही तयारी न करता आजचं सेशन घेता आलं होतं. दुपारपासून तिचं चित्त थाऱ्यावर नसूनही तिला हे अवघड गेलं नव्हतं. पण खरंतर ती तोंडानं बोलत असली, तरी मनानं त्या हॉलमध्ये नव्हतीच. दुपारी आलेल्या फोनवरचं संभाषण तिच्या डोक्‍यात घुमत होतं.

घरी पोचली, तेव्हा घरात अंधार होता. ती चाचपडत आत आली. टीव्ही सुरू होता आणि त्याच्या बदलत्या रंगांचा अस्वस्थ उजेड घरभर पडत होता. तिनं पर्स टेबलवर ठेवली आणि दिवे लावले. सुव्रत टीव्हीसमोर कार्पेटवर पाय पसरून बसला होता. शेजारी एक रिकामा ग्लास आडवा पडला होता. त्याचं सगळं लक्ष टीव्हीत होतं. ती घरात आलेली त्याला कळलंसुद्धा नाही. मॅचमध्ये जाहिरात लागल्यावर मुक्ता त्याच्या आणि टीव्हीच्या मधे जाऊन उभी राहिली. 

‘आई-बाबा कुठं आहेत?’

त्यानं उत्तर दिलं नाही. तिनं परत विचारलं. त्यानं तिला खुणेनं बाजूला व्हायला सांगितलं. तिनं रिमोट उचलला आणि टीव्ही बंद करून टाकला. सुव्रत उठला पण तो रिमोट घेणार इतक्‍यात तिनं तो उचलला आणि स्वतःच्या कुर्त्याच्या खिशात टाकला. 

‘हाऊ डेअर यू!’ असं म्हणत सुव्रतनं मुक्तावर हात उगारला. आई-बाबा त्याच क्षणी घरात शिरले. सुव्रतचा उगारलेला हात आणि चढलेला आवाज बघून आईंच्या हातातल्या पिशव्या फरशीवर पडल्या.

‘सुव्रत’ दोघंही एका सुरात ओरडले. मुक्तानं त्याचा हात घट्ट पकडून शांतपणे खाली केला होता. 

‘आज जाधव साहेबांचा फोन आला होता!’ ती त्याच्यावर तिचे थंड डोळे रोखून म्हणाली. 

तिच्या आवाजातला आणि नजरेतला वेगळेपणा त्याला जाणवला. तिनं आज प्रतिकार केल्यानं आणि जाधवांचं नाव निघाल्यामुळं त्याचा घसा कोरडा पडला होता. 

‘त..त... तु.. तुला... तुला कसा येईल... तुझा नंबर...’ 

‘कोण जाधव, मुक्ता? ते कोल्हापूरच्या फाऊंड्रीवाले? त्यांनी तुला का फोन केला? काय म्हणाले?’ बाबांनी प्रश्नावर प्रश्न विचारायला सुरुवात केली.. 

‘हो बाबा, तेच जाधव. त्यांनी सुव्रतला अनेकवेळा ई-मेल केल्या. त्यांचं मोठं काम आहे जे त्यांना सुव्रतकडून करून घ्यायचं आहे. त्यांनी याला कोटेशन पाठवायची विनंतीही केली बरेचवेळा. पण यानी पाठवलंच नाही. साधा त्यांच्या ई-मेलला रिप्लायसुद्धा केला नाही. सर्वांत पहिलं कॉन्ट्रॅक्‍ट याच जाधवांनी दिलं, म्हणून सुव्रत मार्केटमध्ये एस्टॅब्लिश झाला. हो ना सुव्रत? आणि तू, त्यांचे कित्येकदा तुला फोन आले, तरी तू ते उचलू नयेस?’

आई मुक्ताच्या शेजारी जाऊन उभ्या राहिल्या. आता तिघंही सुव्रतच्या उत्तराची वाट बघत होते. 

‘नाही उचलला फोन, नाही करायचं मला त्यांचं काम. फक्त २० टक्के ॲडव्हान्स देतात ते! कुठून आणणार पैसे काम पूर्ण करायला? कुणासमोर हात पसरणार...’

‘काय म्हणालास? कुठून उभे करणार पैसे? कुठून आणणार भांडवल? मी तुला किती दातरी मदत करायची तयारी दाखवली, अगदी चार दिवसांपूर्वीसुद्धा! तुला आपणहून मागायला तर सोड समोरून तुझा बाप मदत करतोय तर कमीपणा वाटतो? मी मेल्यावर आहे ते सगळं तुझंच आहे ना? इतका तुझा अहंकार आड येत होता, तर बॅंकेतून लोन काढायचंस. इच्छा असेल ना सुव्रत, तर हजार मार्ग निघतात. पण गुर्मी असेल तर...’ 

‘बाबा, प्लीज नको, तुमचं ब्लड प्रेशर वाढतंय. खाली खुर्चीत बसा बरं जरा तुम्ही..,’ मुक्ता बाबांकडं बघत म्हणाली.

‘बॅंकेतून लोन? तुमच्या कमावत्या सुनेच्या जोरावर? प्रत्येक शब्दातून, प्रत्येक कृतीतून ती तिचं वर्चस्व दाखवते ते पुरेसं नाहीये का? पूर्णच दबू तिच्या उपकारांच्या ओझ्याखाली?’

‘काय म्हणालास? वर्चस्व? दुसरी कुणी कधीच सोडून गेली असती या घराला आणि तुला!’ आईंना आता बोलल्याशिवाय राहवलंच नाही. 

‘तुझ्या फॅक्‍टरीची सगळी बिलं भरतीये तुझी बायको गेली अनेक वर्षं! ते उपकार चालतायेत तुला सोईस्करपणे?’, 

बाबांच्या बोलण्याला मधेच तोडत सुव्रत म्हणाला, ‘मी म्हणत होतो त्या बंद करू! तुम्हीच तयार झाला नाहीत. तिला तर हवंच होतं ना हे, तेच तर झालं आज... आणि तुम्ही मला जाब विचारताय आणि तीही!’ 

‘जाब विचारायचा असता ना, तर तिचं मूल गेलं त्या दिवशी विचारला असता तिनं तुला.’ आईंचा आवाज आता अगदी रडवेला झाला होता. 

‘हेच हवं होतं ना तुला मुक्ता? हेच ऐकून घ्यायचं होतं? आधीही उगारला आहे का काय त्यानं तुझ्यावर हात? सांगत होतो तुला, चुकतीयेस तू! वाया घालवतियेस तुझे श्रम, तुझी माया, तुझा पैसा या कृतघ्न माणसावर! बघ कशी फेड करतोय आमचा सुपुत्र. हाच दिवस बघायला थांबली होतीस तू इतकी वर्षं या घरात?’ बाबांना संताप अनावर झाला.

‘आत्ताच्या आत्ता चालती हो या घरातून! आधीही म्हणालो होतो जा असं. तूच लोचटासारखी गेली नाहीस. तुला मजा येत होती ना मला हरलेलं बघण्यात? मुक्ता घैसास द ग्रेट, झाला का नाही मिळवून पुरेसा मोठेपणा? का अजून काही बाकी आहे?’ सुव्रत तरातरा बाल्कनीमध्ये निघून गेला. 

‘झालं समाधान तुझं सूनबाई? अजून ट्रिगर नाहीच झाला का स्टॉप लॉस? कधी पडणार आहेस यातून बाहेर? इथं नको शोधूस आता आनंद. नाही सापडणारे तो तुला आता इथं कधीच.’ बाबा डोकं हातात घेऊन डायनिंग टेबलापाशी बसले.

आईंनी जाऊन आमटी गरम केली आणि पानं वाढून घेतली. ‘बराच उशीर झालाय. चार घास खाऊन घ्या. मुक्ताही दमली आहे. आता उद्या बोला काय बोलायचं ते.’ भूक सगळ्यांचीच मेली होती. आपण इथं नसतानाही असा तमाशा वरचेवर होत असेल का आणि जर होत असेल, तर मुक्ता तो का सहन करते हे आईबाबांना समजतच नव्हतं.

पहाटे मुक्ता उठली, तेव्हा आईबाबा, आधीच उठलेले होते. 

‘पुरे झालं आता पोरी. ऐक आमचं आणि तुझ्या आई बाबांचं,’ आई तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणाल्या. ती त्यांच्या गळ्यात पडून ओक्‍साबोक्‍शी रडली... आणि मग अचानक थांबली. ‘उशीर झालाय फार..,’ एवढंच म्हणून पटापट तयारी करून ऑफिसला जायला निघाली. जायच्या आधी तिनं स्वतःचे थोडे कपडे, पासपोर्ट, एखाद दोन अल्बम, चेकबुक्‍स आणि लॉकरची किल्ली एका छोट्याशा बॅगेत भरून ठेवलं.’ 
ऑफिसला जाता जाता तिनं जाधवांना फोन लावला आणि त्यांना सत्तर टक्के रक्कम ॲडव्हान्स देण्याची विनंती केली. 

संबंधित बातम्या