कॅलिडोस्कोप 

विजय तरवडे
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

महाभारत एक अद्‍भुत चीज आहे. त्याच्या कथानकाचा सांगाडा किंवा त्यातले आवडलेले पात्र केंद्रस्थानी घेऊन लेखक आपापल्या मगदुराप्रमाणे स्वतंत्र कलाकृती निर्माण करीत असतात. कर्ण आणि श्रीकृष्ण ही सर्वाधिक लेखकांना आवडलेली व्यक्तिमत्त्वे होत. 

‘महाभारत’ लहानपणी गोष्टींच्या पुस्तकांत, ‘चांदोबा’ मासिकात वाचले. आठवीतल्या दिवाळीच्या सुटीत  ‘मृत्युंजय’ आणि ‘श्रीकर्णायन’ आणून वाचल्या आणि भारावून गेलो. त्या वेळी आमचे इंग्रजीचे शिक्षक श्याम अत्रे यांनी इरावती कर्वे यांचे ‘युगान्त’ पुस्तक वाचायला सुचवले. पुढच्या तीन महिन्यांत रवंथ केल्यासारखे वाचले. 

‘युगान्त’ पहिल्या वाचनात नीटसे समजले नव्हतेच. पण त्या रसाळ भाषेचा गोडवा खूप भावला होता. कर्णाची बुलंद आकृती इरावतीबाईंनी काटूनछाटून अचूक मूळ आकारात आणली आहे. त्यांनी कर्णाच्या चुका सांगितल्या, वेळोवेळी झालेले त्याचे पराभव जसे अधोरेखित केले, तसेच शेवटच्या युद्धापूर्वी कृष्ण आणि कुंतीच्या भेटीच्यावेळी कर्ण एक असामान्य व्यक्ती, खरा मित्र, दत्तक घराण्याला निष्ठेने-प्रेमाने बांधलेला पुरुष, कोणत्याही लाचेला बळी न पडणारा सेवक, अशा अनेक गुणांनी उठून दिसतो असे त्या कौतुकाने म्हणतात. मात्र कर्णाची धडपड वैयक्तिक होती. तो सर्व सूतांना क्षत्रियत्वाचे दार मोकळे करू इच्छित नव्हता. त्याला फक्त स्वतःला क्षत्रिय सिद्ध करायचे होते. ‘राधेय’मधले कर्णाला भेटायला गेलेल्या कृष्णाचे वर्णन मात्र मोहक आहे - पीतांबर धारण केलेल्या कृष्णाच्या खांद्यावर हिरवे रेशमी उत्तरीय होते. त्या मेघ-सावळ्या रूपात एक वेगळेच देखणेपण लपले होते. 

‘युगान्त’, ‘राधेय’ आणि ‘पर्व’ या कादंबऱ्यांनी महाभारताचा विशाल सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक कालखंड देखण्या रंगात चितारला आहे. मानवी प्रयत्न निष्फळ असतात. घडायचे ते घडतेच हे महाभारताचे सार सांगणारे ‘युगान्त’ अग्रस्थानी. भीष्माच्या ब्रह्मचर्याचे, पराक्रमाचे, इच्छामरणाचे कौतुक बाजूला ठेवून इरावतीबाई म्हणतात, ‘भीष्माने वंशाच्या वृद्धीपायी या कुलस्त्रियांची मानहानी व विटंबना केली. त्यांचे आत्मे किती तळतळले असतील...’ नियोगासाठी ज्या व्यासांची निवड केली ते व्यास राण्यांच्या शयनगृहात जाताना किमान प्रसाधनही करून गेले नाहीत. त्यांना पाहून थोरली राणी बेशुद्ध पडली. दुसरी भीतीने पांढरी पडली. दोघींच्या पोटी जन्मतः सदोष धृतराष्ट्र व पांडू जन्मले. दासीच्या पोटचा विदुर निरोगी, पण त्याला राजपद मिळाले नाही. 

एखादी वास्तू कुटुंबाला ‘लाभते’ किंवा कधी विपरीतही घडते. मयसभेत पांडवांनी आपल्या वैभवाचे नेत्रदीपक प्रदर्शन केले. पण तिथे त्यांना बारा-तेरा वर्षेही सुखाने राहता आले नाही. खांडववन जाळून मयसभेचा जन्म क्रौर्यात झाला. द्युताच्या उन्मादात अंत झाला. इरावतीबाई म्हणतात, ‘इंद्रप्रस्थाशी कोणताही राजवंश निगडित नाही. खांडवदाहाच्या भयानक गोष्टीखेरीज संस्कृत वाङ्‍मयातील कोणतीही कथावस्तू या शहराचा आसरा घेऊन नाही. मयसभेची वास्तू नुसती अपशकुनीच नाही, तर आभासमयच राहिली.’ 

द्रौपदी आणि श्रीकृष्णावर ‘युगान्त’ समरसून आणि उत्कटपणे बोलते. ती दोन प्रकरणे अतिशय वेधक आहेत. विशेषतः कृष्ण. त्याची वासुदेव ही पदवी. त्याचे अर्जुनावरचे निरतिशय, निरपेक्ष प्रेम. कृष्ण दिसायला कसा होता? ‘डोळे दिपतील अशा तऱ्हेचे दैवी तेज व असामान्य वैभव त्याच्याजवळ होते. त्याचा रथ, त्याचे घोडे, तो स्वतः कोठेही असला तरी लोकांचे डोळे दिपत असत. तो रत्ने व संपत्ती यांचा स्वामी होता.’ पण इथे नरकासुराच्या वधाचा उल्लेख नाही. नरकासुराकडून कैदेतल्या राण्यांची मुक्तता केल्यावर त्यांची कुटुंबे त्यांना स्वीकारायला तयार नव्हती, कृष्णाने त्यांना पत्नीचा दर्जा देऊन स्वीकारले हे फार फार उदात्त आहे. 

भैरप्पांची ‘पर्व’ कादंबरी मराठीत उशिरा आली. कादंबरी असूनही महाभारतातल्या सर्व अद्‍भुत घटना भैरप्पांनी तर्काच्या चौकटीत बसवल्या आहेत. ज्योतिष्यांनी वर्तवलेले कंसवधाचे भाकीत, जरासंधवध, जयद्रथाला ठार करताना सूर्यास्ताचा आभास आणि इतर सर्व. यात द्रोणाचार्य-एकलव्य आणि परशुराम-कर्ण यांचे संबंध चक्क सौहार्दाचे दाखवले आहेत. जरासंधाला कृष्ण ‘थोडा सुंदर, पण विलक्षण आकर्षक चेहरा’ असा दिसतो! अनेक फ्लॅशबॅक्स असूनही कादंबरी रटाळ होत नाही. शेवटच्या प्रकरणात युद्धाचे भीषण परिणाम आणि नैसर्गिक आपत्ती सामोऱ्या येतात. 

महाभारताची कहाणी व्यासांनी लिहिली. पण स्वतः त्यांचा इथल्या घडामोडींशी संबंध वरवरचाच दिसतो. सत्यवतीच्या सुनांना आणि दासीला पुत्रप्राप्ती करून दिल्यानंतर इथल्या घटनांमध्ये ते फारसे डोकावत नाहीत. यादवकुलाचा क्षय झाल्यावर ते अर्जुनाचे सांत्वन करायला आवर्जून येतात.  

युगान्त, राधेय आणि पर्व या ग्रंथांनी देखणा रेखाटलेला हा कालखंड इतके दिवस मनात जपला. तो काही क्षणांपुरता कोलमडला नुकत्याच वाचलेल्या वि. का. राजवाडे यांच्या ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या पुस्तकामुळे. इरावती कर्वे यांच्यानुसार महाभारताची शेवटची आवृत्ती ख्रिस्तपूर्व आठव्या-नवव्या शतकामागे जात नाही. राजवाडे यांच्या मते, महाभारत ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातले. तत्कालीन समाजजीवन, विवाहसंस्था राजवाड्यांनी वेगळीच रंगवली आहे. त्यांच्या मते व्यासांनी या समाजजीवनाचे बरेच उदात्तीकरण केले. राजवाड्यांचे विवेचन नाकारता येत नाही आणि स्वीकारायला मन धजत नाही असे धर्मसंकट आहे.

संबंधित बातम्या