कामगार चळवळीचा उदय

डॉ. सदानंद मोरे
शुक्रवार, 9 मार्च 2018

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

लोकमान्य टिळक हे चौकस बुद्धी आणि चौफेर व्यासंग असणारे विद्वान होते, हे सर्वज्ञातच आहे. ब्रह्मदेशातील मंडाले येथे सहा वर्षांचा तुरुंगवास भोगीत असताना टिळकांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहिला. गीतारहस्य हा तौलनिक तत्त्वज्ञानातील ग्रंथ आहे. गीता हे हिंदूंचे नीतिशास्त्र आहे, अशी भूमिका घेऊन टिळकांनी गीतेतील नीतिशास्त्राची तुलना पाश्‍चात्त्य नीतिशास्त्रीय सिद्धांतांशी या ग्रंथात केली व गीतोक्त नीतिशास्त्राचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

आता गीतेतील विचारांशी पाश्‍चात्त्य - युरोपियन विचारांची तुलना करायची झाल्यास पाश्‍चात्त्य ग्रंथांचे वाचन करायला हवे हे ओघाने आलेच. भारतावर इंग्रजांचे राज्य असल्यामुळे टिळकांना इंग्रजी भाषा उत्तमरीत्या अवगत होतीच. पण तत्त्वज्ञानाचे ग्रंथ इंग्रजीप्रमाणे जर्मन आणि फ्रेंच या भाषांमध्येही लिहिले गेले होते आणि ते इंग्रजी ग्रंथकारांच्या ग्रंथांपेक्षा कमी दर्जाचे नव्हते. त्यांच्यापैकी काही ग्रंथ इंग्रजी भाषेत अनुवादरुपाने असले तरी काही नव्हते. मुख्य म्हणजे मूळ ग्रंथ वाचणे हे त्यांची भाषांतरे वाचण्यापेक्षा केव्हाही अधिक फलदायी. त्यासाठी टिळकांनी तुरुंगात जर्मन आणि फ्रेंच भाषांचा अभ्यास केला व संबंधित ग्रंथ त्या-त्या भाषांमधून मुळात वाचून काढले.

कार्लचे मार्क्‍सचे लिखाण मुख्यत्वे जर्मन भाषेत होते व जर्मनीत कम्युनिस्टांची, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या समाजवाद्यांची चळवळही झाली होती. मार्क्‍सचे मूळ ग्रंथ टिळकांच्या वाचनात आले असल्याची शक्‍यता कमीच; परंतु एक पत्रकार आणि अभ्यासक या नात्याने त्यांना मार्क्‍सच्या विचारांची आणि त्याच्या युरोपातील प्रभावाची माहिती झाली होती.
टिळकांनी केलेल्या वर्गवारीनुसार मार्क्‍सचे विचार ‘आधिभौतिक सुखवाद’ या वर्गातच मांडणार हे उघड आहे. मार्क्‍सचे नाव न घेता त्यांनी गीतारहस्यात  ‘आधिभौतिक  सुखवाद’ असा जर्मनीतील नवा पंथ म्हणून मार्क्‍सवादी विचारांचे सूचन केले आहे. मात्र महाराष्ट्रात आणि भारतातही आधुनिक सुखवादाचे प्रवक्ते म्हणून बेंथॅम आणि मिल यांना मान्यता मिळाली होती. टिळकांचे मुख्य प्रतिस्पर्धी गोपाळ गणेश आगरकर हे मिलच्या उपयुक्ततावादी विचारांचा पुरस्कार करणारे होते. त्यामुळे गीतारहस्यातील विचार विशेषतः मिलला पुढे ठेवूनच मांडण्यात आले आहेत. दुसरे असे की मार्क्‍स हा आधिभौतिक (materialist) ऊर्फ जडवादी विचारांचा असला तरी तो मिलच्या सुखवादाच्याच विरोधात होता व दुसरे असे की त्याचे नीतिशास्त्र या विषयाला काही विशेष योगदान नव्हते. टिळक तुरुंगात असताना महाराष्ट्रातील एक अभ्यासक धर्मानंद कोसंबी अध्ययनासाठी पाश्‍चात्त्य राष्ट्रांची भटकंती करून आले. इंग्लंड व अमेरिकेत असताना त्यांना तेथील भांडवलशाही पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे भांडवलशाहीला विरोध करणारी मार्क्‍सच्या विचारांनी भारलेली कामगारांची चळवळही बघायला मिळाली. त्याचा परिणाम म्हणून स्वतः कोसंबी डाव्या मार्क्‍सवादी विचारांकडे झुकले. परंतु कोसंबींवर बौद्ध धर्माचाही प्रभाव होता. त्यांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पाली बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यांचा मराठीत अनुवादही केला. अर्थात हे भारतात परतल्यावर! पश्‍चिमेत असताना ते ‘केसरी’साठी तिकडची वार्तापत्रे व लेख पाठवीत. त्यांच्याच माध्यमातून ‘केसरी’च्या वाचकांना मार्क्‍स आणि कामगार संघटना (युनियन) कामगार चळवळ यांचा परिचय झाला. अशा प्रकारे कोसंबी हे महाराष्ट्रातील पहिले मार्क्‍सवादी होत.
मंडालेचा तुरुंगवास संपवून टिळक भारतात परतले आणि पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. ‘टाइम्स’चा पत्रकार चिरोल याच्यावर त्यांनीच भरलेल्या बदनामीच्या खटल्याच्या निमित्ताने इंग्लंड गेले. तेथे त्यांनी अर्थातच होमरूलचा प्रचारही केला. इंग्लंडमधील वास्तव्यात टिळकांना इंग्लंडमधील कामगार संघटना व कामगार चळवळी जवळून पाहता आल्या. इंग्लंडमध्ये प्रत्यक्ष कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव नसला तरी मार्क्‍सच्या विचारांनी प्रभावित झालेल्या मजूर पक्षाशी (लेबर पार्टी) त्यांनी संधान बांधले. भारतीय स्वातंत्र्याच्या कामासाठी प्रस्थापित स्थितिवादी (कॉन्झर्व्हेटिव) हुजूर पक्षाचा काही उपयोग होणार नाही. मजूर पक्षाचा होईल हे त्यांच्याच लक्षात आले. त्यांनी मजूर पक्षाला देणगीदेखील दिली !

जगाच्या भावी राजकारणात कामगार वर्गाचे महत्त्व लक्षात येण्याइतके टिळक निश्‍चितच चाणाक्ष होते. दरम्यान, रशियात कम्युनिस्ट क्रांती होऊन लेनिन सत्तारूढ झाला. त्यामुळे मार्क्‍सवादी विचारांचा दबदबा सर्व जगभर पसरण्यास मदत झाली.

इकडे भारतातील भांडवली जगात टाटांचे घराणे औद्योगिक घराणे म्हणून प्रस्थापित झाले होते. टाटांचे औद्योगिक व व्यापारी हितसंबंध इंग्लंडमध्येही होते. ते सांभाळण्यासाठी टाटांनी नात्याने भाचा लागणाऱ्या शापुरजी सकलातवाला या तरुणाला इंग्लंडमध्ये पाठवले. हे सकलातवाला एंगल्सेच नवे अवतार निघाले. एंगल्स हा धनाढ्य भांडवली उद्योजक असूनही तो मार्क्‍सच्यामुळे कम्युनिस्ट नेता बनला. त्याप्रमाणे सकलानवालांनी कम्युनिझमची दीक्षा घेतली. विसाव्या शतकातील तिसऱ्या दशकाच्या अखेरीस ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा एकच खासदार होता. तो म्हणजे सकलानवाला!

मजूर पक्ष कामगारांच्याच बाजूचा असला तरी तो कम्युनिस्टांइतका जहाल नव्हता. त्यामुळे ज्यांना कम्युनिस्टांइतकी टोकाची भूमिका घेत येत नव्हती त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय ठरला. स्वतः सकलातवाला टिळकांनी भारतात मजूर पक्ष काढावा म्हणून त्यांच्या मागे लागले होते. त्यावर टिळकांनी दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे.‘I do not want to set up labour against capital in my country.’

कारण उघड आहे. खुद्द मार्क्‍सच्याच अधिकृत मानल्या गेलेल्या मतानुसार कम्युनिझम प्रगत भांडवली देशातच येऊ शकतो, आणि तोही अर्थात क्रांतीच्याच माध्यमातून! आता भारतासारख्या आशियायी खंडातील देशांचा विचार केला तर ते अद्याप मध्ययुगीन सरंजामशाही युगातच अडकून बसले होते. शेती हीच त्यांची उत्पादनव्यवस्था होती. तेथे भांडवलनिर्मितीच व्हायची होती. भारत तर ब्रिटिश सत्तेच्या जोखडात असल्यामुळे तेथे भांडवलनिर्मितीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा पडल्या होत्या. अशा परिस्थितीत भारतातील अर्ध्या कच्च्या भांडवलदारांविरोधात कामगारांना कम्युनिझचा पर्याय देणे हे देशाच्या दृष्टीने आत्मघातकी ठरेल असे टिळकांना वाटत असणे स्वाभाविक होते किंवा त्यांना कामगार चळवळ मान्य नव्हती असा मात्र नव्हे. त्यांना कामगारांचे हित साधायचे होते, त्यासाठी कामगार चळवळही वाढवायची होती. फक्त ती कम्युनिझमच्या वळणावर जाऊ नये ही त्यांची इच्छा होती. भारतामध्ये पहिली ट्रेड युनियन काँग्रेस भरणार होती. तिचे अध्यक्षपद स्वीकारण्यास टिळकांनी नकार दिला हे खरे आहे. तथापि त्याचे कारण टिळकांचे कार्यबाहुल्य हे होते. त्यांनी उपाध्यक्ष व्हायचे मान्य केले यात सर्व काही आले. या काळात प्रसिद्ध कामगार नेते दिवाण चिमणलाल हे टिळकांच्याच निकट संपर्कात होते. दुर्दैवाने दरम्यान टिळकांचेच निधन झाल्यामुळे टिळकांचा हा कामगार नेत्याचा अवतार लोकांना पहायला मिळाला नाही. टिळकांना कामगार हिताच्या विरुद्ध न जाणारी नियंत्रित भांडवलशाही मान्य झाली असती असेच म्हणावे लागते. याचा अजून एक पुरावा म्हणजे त्यांनी श्रीपाद अमृत डांगे या तरुणाला कामगारांच्या क्षेत्रात राहून त्यांची सेवा करण्याचा दिलेला सल्ला! टिळक हे डांग्यांचे आराध्यदैवतच होते. टिळकांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण होता. त्यामुळे टिळकांचा सल्ला त्यांनी आज्ञा म्हणून मान्य केला  ते कामगार चळवळीत उतरले. दरम्यान मुंबईमधील डाव्या विचारांचे एक धनिक गुजराती लोटवाला हे डांग्यांच्याच सहवासात आले. स्वतः लोटवाला मार्क्‍सच्याच विचारांनी भारावून गेले होते. त्यांनी मार्क्‍सवादावरील अनेक संदर्भग्रंथ मिळवले होते. ते डांग्यांना वाचायला मिळाले आणि डांगे टिळकांचा नियंत्रित भांडवलशाहीचा विचार सोडून पूर्णपणे कम्युनिस्ट बनले. टिळक आणखी काही काळ जगले तर कम्युनिस्ट झाले असते असे डांग्यांचे मत होते. त्याची पाश्‍वभूमी ही अशी आहे.

लोटवालांच्या मदतीने डांग्यांनी ‘सोशॅलिस्ट’ नावाचे नियतकालिक सुरू केले. त्याची छपाई ते दामोदर सावळाराम यंदे या प्रख्यात प्रकाशक मुद्रकाच्या इंदू प्रेस छापखान्यात करीत. या जोडीने यंद्यांचा आत्मविश्‍वासही संपादन केला. प्रकृतीच्या कारणाने यंदेशेठ नाशिकला राहायला गेले असता अशा काही घडामोडी झाल्यात की इंदुप्रकाशची इतिश्री होऊन स्वतः यंद्यांनाच आपल व्यवसायाचा ‘पुनःश्‍च हरिॐ’ करावा लागला!

डांग्यांच्या प्रारंभिक म्हणजेच घडत्या काळातील हालचालींचे चित्रण तेव्हा त्यांच्या मित्रमंडळात समाविष्ट असलेल्या गजानन त्र्यंबक माडखोलकर यांनी लिहिलेल्या ‘मुक्तात्मा’ या कादंबरीत वाटायला मिळते. अर्थात माडखोलकरांना कम्युनिझमबद्दल आकर्षण होते व टिळक कम्युनिस्ट झाले असते, या डांग्यांच्या मताशी ते सहमत होते. विशेष म्हणजे या चर्चेत न. चिं. केळकरांनी मात्र टिळक फॅसिस्ट झाले असते असे मत व्यक्त करून एकच खळबळ माजवली होती. अर्थात हा एकोणीसशे तीस सालानंतरचा भाग आहे. केळकरांनी तरुण डांगे गायकवाडवाड्यात राहात असताना त्यांच्याकडून मार्क्‍सचे विचार अधिकृतपणे समजावून घेतले होते. मात्र या शिकवणीचा त्यांच्यावर काही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही!

इकडे धर्मानंद कोसंबी लेखन आणि वक्तृत्व यांचा उपयोग करून बौद्ध विचारांचा प्रसार करीत होते. तेव्हाही त्यांचा डावा कल लपून राहिला नव्हता. त्यांनी बडोदे येथे बुद्ध जयंतीच्या दिवशी दिलेले व्याख्यान महाराष्ट्रात गाजले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हेही बुद्धविचारांचे चाहते होते. त्यांनी यंद्यांच्यामार्फत बौद्ध धर्मावरील अनेक प्राचीन ग्रंथ प्रकाशित करवले. बुद्धजयंती सुरू करण्याची प्रेरणा महाराजांचीच होती.

हा काळ ब्राह्मणेतर चळवळ जोमात असण्याचा काळ होता. महाराष्ट्रातल्याच मराठ्यांनी तेव्हा शाहू महाराजांच्या वेदोक्त चळवळीचा पुरस्कार करीत क्षत्रियत्वाचा दावा केला. साहजिकच धर्माच्या क्षेत्रात कर्तबगारी गाजवणाऱ्या क्षत्रियांच्या प्रतिमा पुढे आणणे ही त्यांच्या ब्राह्मणेतर चळवळीची गरज बनली. त्यांच्या शोधमोहिमेत यश येणे अवघड नव्हतेच. जनक, कृष्ण आणि बुद्ध हे क्षत्रिय ब्राह्मणेतर होते. त्यातील जनक आणि कृष्ण यांच्या विचारांत कोठे ब्राह्मणांवर किंवा ब्राह्मण्यावर प्रत्यक्ष टीका केल्याचे आढळत नाही. बुद्धाने मात्र हा विषय हाताळला आहे. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीला बुद्ध सोयीचा वाटला. अर्थात, त्यातून बौद्ध धर्म स्वीकारायचा विचार मात्र पुढे आलेला दिसत नाही हे पाऊल नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उचलले.

बाबासाहेबांनी उभारलेल्या अस्पृश्‍य समाजाच्या चळवळीत कामगारांचे प्रश्‍न येणार हे उघड होते. इंग्रजी राज्यात अनेक खात्यांमध्ये अस्पृश्‍यांची भरती होऊ लागली. १९२५ नंतर डांगे, जोगळेकर, निमकर, रणदिवे अशा कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रयत्नांमुळे डाव्या साम्यवादी कामगार संघटनांचे बळ वाढले. ‘जगातील कामगारांनी एक व्हा’ असा जाहीरनामा प्रसृत करणाऱ्या कार्ल मार्क्‍सच्या विचारांनी चालणाऱ्या सवर्ण कामगार पुढाऱ्यांसाठी कनिष्ठ वर्णजातीच्या कामगारांना चळवळीत सामील करून घेण्यात तात्त्विक अडचण नव्हतीच, पण येथेही जातिव्यवस्था आड झाली. सवर्णांनी चालवलेल्या चळवळीत अस्पृश्‍य कामगारांचे प्रश्‍न सुटणार नाहीत असे वाटल्यामुळे बाबासाहेबांनी अस्पृश्‍य कामगारांची स्वतंत्र संघटना व चळवळ उभारली. इतकेच नव्हे तर तिच्याशी अनुरूप अशी राजकीय ध्येयधोरणे असलेला स्वतंत्र मजूर पक्षही स्थापन केला. मात्र तरीही कम्युनिस्ट आणि बाबासाहेब यांचे जमलेले दिसत नाही ते एकमेकांना प्रतिस्पर्धीच मानत असावेत. ब्राह्मणेतरांनीही स्वतंत्र कामगार आघाडीचे प्रयत्न केले. खरे तर त्यांना लोखंडे, बाबासाहेब, नरे अशी परंपरा होती. पण त्यांना तिचा उपयोग करून घेता आला नाही. त्यांच्यात गांभीर्य व चिकाटी नव्हती. परिणामतः कामगार चळवळ उच्चवर्णीय व मध्यमवर्गीय नेतृत्वाच्या ताब्यात गेली. 

संबंधित बातम्या