नायक आणि महानायक

डॉ. सदानंद मोरे
गुरुवार, 5 जुलै 2018

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

मार्क्‍सवादी इतिहासलेखन पद्धतीत व्यक्तीला फारसे महत्त्व दिले जात नाही. इतिहास घडतो तो वर्गसंघर्षातून आणि त्यामागच्या प्रेरणा मुख्यत्वे आर्थिक असतात असे मार्क्‍सवादी मीमांसकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पद्धतीने इतिहास लिहायचा म्हटले, तर इतिहासाचे ‘नायक’ ‘महानायक’ अशा व्यक्तिनिष्ठ कल्पनांना महत्त्व उरत नाही.

या मुद्यांकडे आपण सैद्धांतिक दृष्टीनेच पाहू या. कारण एरवी रशियात लेनिनला क्रांतीचा महानायक केले गेले होते आणि त्याची विभूतिपूजा करणाऱ्यांनी धार्मिकांनाही लाजविले असे म्हणावे लागते. प्राचीन इजिप्तमध्ये राजाविषयीचा पूज्यभाव व्यक्त करण्यासाठी त्याच्या शवाचे शाश्‍वतीकरण करून ते पिरॅमिडमध्ये जतन करून ठेवले जायचे. आपल्याकडे गोव्यामध्ये एका ख्रिस्ती संतांचे शरीर काही वर्षे जतन करून ठेवले आहे. रशियात अगदी गेल्या शतकात लेनिनचे शव रासायनिक प्रक्रियांनी असेच जतन केले गेले. लेनिन आणि नंतर स्टॅलिन यांचे देवदेवतांच्या मूर्तींना लाजवतील असे पुतळे सर्वत्र बसवण्यात आले. मूळ मार्क्‍सवादात अशा प्रवृत्तीला स्थान नाही. इतिहास शेवटी माणसेच घडवतात हे सत्य असले, तरी मार्क्‍सवादी विचारसरणीप्रमाणे माणसे इतिहासाची कर्ते नसून वाहक असतात असे म्हणता येईल. म्हणजे असे, की इतिहास हा त्या त्या काळातील आर्थिक रचनेचा परिपाक असून तो त्या वाहकांच्या माध्यमातून जणू व्यक्त होत असतो. म्हणजे समजा, नेहरू झाले नसते तरी त्या काळच्या परिस्थितीनुसार नेहरूंसारखा दुसरा कोणीतरी झाला असता व त्याने पुढे येऊन, नेहरूंनी जे केले, ते तसेच काहीतरी केले असते.

मार्क्‍सवाद काहीही सांगो; वस्तुस्थिती अशी आहे, की सर्वसामान्य माणसे अशा जर-तरच्या मुद्याला महत्त्व देत नाहीत. नेहरू झाले नसते तर - असा विचार करायची त्यांना गरज भासत नाही. नेहरू झाले ना? मग प्रश्‍न मिटला असे म्हणून ते नेहरूंना नायक मानून मोकळे होतात.

विसाव्या शतकातच पहिल्या चरणात महाराष्ट्रात जो इतिहास घडला त्याचे दोन महानायक होते. एक लोकमान्य टिळक आणि दुसरे राजर्षी शाहू महाराज! आता या महानायकांच्या छायेखाली त्यांच्या त्यांच्या छावण्यांमध्ये वावरणारे जे कर्तृत्ववान पुरुष होते त्यांना नायक म्हणायला हरकत नाही. हे महानायक हरपल्यानंतर जो संघर्ष झाला, तो नायकानायकांमधील संघर्ष होय. विसाव्या शतकाच्या पहिल्या चरणाच्या शेवटी तिसऱ्याच एका नव्या महानायकाचा उदय झाला व संघर्षास नायकांपैकी काही नायक त्याच्या छावणीत दाखल झाले. हा महानायक म्हणजे महात्मा गांधी! विशेष म्हणजे या महानायकामुळे टिळकांच्या छावणीतील नायकांमध्येच अापापसातील संघर्ष सुरू झाला!

याचा अर्थ असाही होतो, की टिळक आणि शाहू या महानायकांना त्यांच्या पश्‍चात आपल्यातून दुसरा महानायक निर्माण करता आला नाही. त्यांच्यातील काहींनी गांधी या नव्या महानायकाचा आश्रय घेतला, तर काहींनी आपणच महानायक आहोत अशी समजूत करून लढा करण्याचा पवित्रा घेतला, तसा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यांना महानायक मिळाला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांचा हा महानायक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. रत्नागिरी येथे युद्धकैदी असलेल्या सावरकरांची मुक्तता १९३७ मध्ये झाली व त्यांच्यावरील राजकारणात भाग घ्यायला असलेली बंदीही उठवण्यात आली. या महानायकाच्या नेतृत्वाखाली मग केळकर, जयकर असे मागील पिढीतील नायक नांदू लागले.

शाहू महाराज या महानायकाच्या छावणीतील एक नायक म्हणजे दिनकरराव जवळकर! १८९९ मध्ये चोराची आळंदी या गावातील पाटलाच्या घरात जन्मलेले जवळकर तरुण वयातच सामाजिक, राजकीय कार्याकडे खेचले गेले. पुण्यात काही दिवस टिळकपंथीय नारायणराव गुंजाळ यांच्याकडे उमेदवारी करणारे जवळकर लवकरच त्या प्रभावातून बाहेर पडून जेधे मॅन्शनमध्ये दाखल झाले. जेथे मॅन्शनमधील बाबूराव आणि केशवराव या बंधूंनी शाहू महाराजांच्या सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यांना विठ्ठल रामजी शिंद्यांसारख्या ज्येष्ठाचा आशीर्वाद लाभला होता. शिंद्यांच्या पुढाकाराने पुण्यात मराठा भ्रातृमंडळ नावाची संस्था स्थापन झाली होती. या संस्थेची एक कलाशाखाही होती. तिच्यात बाबूराव जगतापांसारखी मंडळी हौसेने काम करायची. विशेष म्हणजे नाना चापेकर या नंतर स्त्रीभूमिकांमुळे खूप पुढे आलेल्या ललित कला दर्शनमधील नटाचे मार्गदर्शनही होई.

दरम्यान कौन्सिलमध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी मांडलेले एक विधेयक चर्चेस आले. आंतरजातीय विवाहातून जन्माला आलेल्या संततीला वारसाहक्काची संपत्ती मिळावी अशी तरतूद करणारे हे विधेयक ‘पटेलबिल’ म्हणून प्रसिद्ध आहे. आंतरजातीय विवाहातून जन्मलेल्या अपत्यांना संकरज आणि अनौरस मानणाऱ्या सनातन्यांच्या हे पचनी पडणे शक्‍यच नव्हते. पुण्यात या बिलाविरुद्ध हालचाली सुरू झाल्या. स्वतः टिळकांनाही या वादात खेचायचे प्रयत्न झाले. जवळकरांच्या आणि आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवायला ही आयतीच चालून आलेली संधी होती. त्यांनी आंतरजातीय विवाह हा विषय घेऊन त्यावर ‘संगीत प्रणयप्रभाव’ नावाचे नाटकच लिहिले. नाटकाच्या तालमीही सुरू झाल्या, पण ही बातमी बाहेर फुटली व नाटक जातीजातींमधील वैमनस्य वाढवणारे आहे असा आक्षेप घेऊन त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. मागणीला यशही आले व एका प्रक्षोभक नाटकाच्या गर्भावस्थेतच मृत्यू ओढवला. तिकडे कोल्हापूरला राजाश्रमाने चालणाऱ्या ‘तरुण मराठा’ या साप्ताहिकाला सक्षम ब्राह्मणेतर संपादक मिळत नव्हता. म्हणून खास महाराजांच्या सूचनेवरून जवळकरांनी तेथे जाऊन ते पद स्वीकारले. जवळकरांच्या भडक व आक्रमक भाषेमुळे ते पत्र चालू लागले खरे, पण त्यामुळे दुखावलेल्या अनेकांनी सरकारदरबारी तक्रारी केल्या, तेव्हा खुद्द ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी शाहू महाराजांना जाब विचारला व महाराजांनीही जवळकरांना संस्थान सोडून बाहेर जाण्याचा हुकूम बजावला.

काही दिवस अज्ञातवासात राहून जवळकरांनी परत पुणे गाठले तेव्हा टिळक आणि शाहू या दोन्ही महानायकांचा मृत्यू ओढवला होता. 

गांधी या नव्याने उदयाला येत असलेल्या महानायकाचे नेतृत्व स्वीकारायला पुण्यातील टिळकनुयायी उत्सुक नव्हते. ब्राह्मणेतरांनाही गांधींबद्दल आदर असला तरी गांधींचा नेता म्हणून विचार करायची त्यांची अद्याप तयारी झाली नव्हती. खरे पाहता विठ्ठल रामजी शिंदे नावाच्या महानायक बनण्याची क्षमता असलेला नेता त्यांच्याजवळ होता, पण त्याची किंमत या मंडळींना समजली नव्हती. आणि स्वतः शिंद्यांना तरी ती कळली असेल, की नाही याबाबत शंका आहे.

शाहू महाराजांच्या पश्‍चात निदान पुण्यातील ब्राह्मणेतरांचे नेतृत्व तरी केशवराव जेधे या नायकाकडे गेले. त्यावेळी पुण्यात केशल सीताराम ठाकरे आणि श्रीपतराव शिंदे अनुक्रमे ‘प्रबोधन’ आणि ‘बिजली मराठा’ या पत्रांचे संपादक टिळकपक्षीयांवर जोरदार हल्ले चढवीत होते. तथापि, लोकनेता म्हणता येईल अशा गुणांचा दोघांकडेही अभाव होता. ठाकरे तर फर्डे वक्ते, उत्तम लेखक, चांगले विचारवंत होते. पण नेता आणि नायक होण्यासाठी लागणारी माणसे सांभाळण्याची कला त्यांच्याकडे नव्हती. ते स्वभावाने फटकळ होते. तुलनाच करायची झाली, तर शंकरराव मोरे यांच्याशी करून पाहायला हरकत नसावी. ते काहीही असो जेधे, जवळकर, ठाकरे, शिंदे, केशवराव बागडे वकील, ‘मजूर’कर लाड इत्यादी मंडळी एकत्र आल्यावर टिळकांविना पोरक्‍या झालेल्या ‘केसरी’ पक्षाची अवस्था नाही म्हटले तशी शोचनीय झाली. पूर्वी मवाळ किंवा नंतर गांधीवादी यांच्याशी मुकाबला करणे तसे सोपे होते. कारण त्यांच्यात ‘अरे’ला ‘कारे’ करण्याची प्रवृत्ती नव्हती. आता परिस्थिती बदलली. ब्राह्मणेतरांनी शाहू महाराजांच्या नंतरही आपले आव्हान कायम ठेवले नव्हे, तीव्र केले.

टिळकांच्या अनुयायांच्या हातातील एक महत्त्वाचे अस्त्र म्हणजे मेळे. मेळ्यांच्या माध्यमातून त्यांनी मवाळ, सुधारक आणि प्रसंगी सरकार यांना सळो की पळो केले होते. मेळ्यांचा वरवरचा उद्देश जरी गणेशोत्सवात संगीताच्या माध्यमातून गणेशाची उपासना करणे हा असली तरी प्रत्यक्षात मोक्‍यातील पदांमध्ये उपरोक्त मंडळींची टिगलटवाळी असे. या मेळ्यांचा प्रतिकार करू शकेल अशी यंत्रणा प्रतिस्पर्ध्यांकडे नव्हती.

परंतु, आता दिवस पालटले. जेथे आणि जवळकर एकत्र आल्यावर त्यांनी ब्राह्मणेतरांचे मेळे काढले व या मेळ्यांच्या पदांमधून टिळकांच्या अनुयायांवर तसल्याच ग्राम्य आणि गलिच्छ भाषेतून टीका करण्यात येऊ लागली. विशेष म्हणजे मेळ्यातील पदांच्या पुस्तिका वाटण्यात येत असल्यामुळे शिमगा संपला तरी कवित्व वर्षभर पुरेल अशी सोय आपोआपच होई. गणेशोत्सवातील हे मेळे प्रत्येक सार्वजनिक गणपतीपुढे जाऊन हजेरी लावीत म्हणजे गाणी सादर करीत. टिळकपक्षातील वरच्या फळीतील नेते स्वतः अशा मेळ्यांत भाग न घेता पोराटोरांना पाठवून आपण नामानिराळे राहात. येथे मात्र दस्तूर खुद्द केशवराव जेधे स्वतः गाणी रचित व मेळ्यात अग्रभागी उभे राहून सादरही करीत. एकदा तर ब्राह्मणेतरांचा हा मेळा थेट गायकवाड्यातील म्हणजे टिळकांच्या गणपतीपुढे जाऊन ठाकला व आपली कला सादर करण्याची परवानगी मागू लागला. वाड्यातील मंडळींच्या विरोधाला न जुमानता मेळेवाल्यांनी आपली ठेवणीतील पदे सादर केली. ज्यांच्यात टिळकपक्षीयांवर व ब्राह्मणांवर कडक टीका केलेली होती.

पुण्यात ब्राह्मणब्राह्मणेतरवाद असा शिगेला पोचला असताना अचानक ‘पुतळायुद्धा’ला तोंड फुटले. त्याचे असे झाले, की पुण्याच्या नगरपालिकेत पुण्यात पालिकेच्या खर्चाने विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक यांचे पुतळे बसविण्याचा ठराव संमत झाला. त्यानुसार ते बसलेसुद्धा! यावर केशवराव जेधे यांनी पालिकेने महात्मा फुले यांचा पुतळा बसविण्याचा ठराव पालिकेत आणला. पालिकेत टिळकपक्षाच्या सभासदांचे संख्याधिक्‍य असल्यामुळे तो ठराव फेटाळला गेला. पण या प्रक्रियेत फुले यांच्याविषयी अनेक आक्षेपार्ह विधाने केली गेली. पुस्तिका छापल्या गेल्या. यात स्वतः फुले यांचे तेव्हाचे नातेवाईकही सामील होते. या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहिली नाही. दिनकरराव जवळकरांचे ‘देशाचे दुश्‍मन’ नामक शिवराळ भाषेतील पुस्तक हा या प्रतिक्रियेचाच एक भाग समजावा लागतो. या पुस्तकामुळे व इतरही मजकुरामुळे व्यथित झालेल्या टिळकांचे पुत्र श्रीधर पंत यांनी जेथे, जवळकर, लाड या त्रिकुटावर बदनामीचा खटला भरला. न्यायाधीशांनी जेधे व जवलकरांना दोषी ठरवून शिक्षा फर्मावली. जेधे-जवळकर वरच्या कोर्टात गेले, तेथे त्यांची बाजू बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली. कोर्टाने आंबेडकरांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जेधे जवलकरांची निर्दोष मुक्तता केली.

या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. जेधे हे नेते आणि जवळकर लेखक आणि वक्ते म्हणून पुढे आले. नायक तर दोघेही झाले होतेच. परंतु, जेध्यांचे नेतृत्व स्वतंत्रपणे पुढे येऊ न शकल्याने त्यांना महानायक होता आले नाही. त्यांच्यात राजकीय कारकिर्दीत ते वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या सहकाऱ्यांबरोबर वावरताना दिसतात. आधी जेधे-जवळकर, मग जेधे-गाडगीळ आणि शेवटी जेधे-मोरे असे तीन राजकीय द्वंद्वसमास महाराष्ट्राने पाहिले.

पहिला म्हणजे जेधे - जवळकर हा टप्पा ब्राह्मणेतर चळवळीचा होता. दुसरा जेधे (काकासाहेब) गाडगीळ हा टप्पा काँग्रेसमध्ये जाऊन केलेल्या स्वातंत्र्यचळवळीचा होता, तर तिसरा जेधे-मोरे हा टप्पा शेतकरी कामगार पक्षाचा म्हणजे काँग्रेसविरुद्ध लढायचा होता.

तिसऱ्या टप्प्यावरील मोरे यांची संगत व अर्थातच शे. का. पक्ष सोडून परत काँग्रेसमध्ये आले, तेव्हा त्यांच्याशी ‘समास’ करायला कोणी नव्हते. स्वतः जेध्यांचेच नायकपणच उतरणीला लागून यशवंतराव चव्हाण हा नवा नायक उदयाला येत होता. पंडित नेहरू हे तेव्हा महानायकाचा दर्जा पावले होते. 

संबंधित बातम्या