सहकार्य पर्वाची समाप्ती

डॉ. सदानंद मोरे
गुरुवार, 19 जुलै 2018

विसाव्या शतकाच्या तिसऱ्या (म्हणजे वीस ते तीस या दरम्यानच्या) दशकात महात्मा गांधींचा महानायक म्हणून उदय होत असताना त्यांना विरोध करणाऱ्या शक्ती हळूहळू अस्तंगत होत गेल्या. टिळकांचे केळकरप्रभृती अनुयायी, होमरुलवाल्या ॲनी बेझंट, नेमस्त पक्षाचे शास्त्री परांजपे, बिपिनचंद्र पाल इत्यादींचा उल्लेख करावा लागतो. बंगालचे चित्तरंजन दास हे खरे तर खूप क्षमता असलेले नेते. त्यांनी स्वराज्य पक्ष काढून गांधींनी शह दिला होता खरा. मोतीलाल नेहरुंसारख्या मातब्बरांना बरोबर घेण्यातही  ते यशस्वी झाले होते. पण त्यांच्या अकाली निधनामुळे एक शक्‍यता परस्परच लुप्त झाली. या संदर्भात आणखी तीन नावांचा विचार करावा लागतो.

विसाव्या शतकाच्या तिसऱ्या (म्हणजे वीस ते तीस या दरम्यानच्या) दशकात महात्मा गांधींचा महानायक म्हणून उदय होत असताना त्यांना विरोध करणाऱ्या शक्ती हळूहळू अस्तंगत होत गेल्या. टिळकांचे केळकरप्रभृती अनुयायी, होमरुलवाल्या ॲनी बेझंट, नेमस्त पक्षाचे शास्त्री परांजपे, बिपिनचंद्र पाल इत्यादींचा उल्लेख करावा लागतो. बंगालचे चित्तरंजन दास हे खरे तर खूप क्षमता असलेले नेते. त्यांनी स्वराज्य पक्ष काढून गांधींनी शह दिला होता खरा. मोतीलाल नेहरुंसारख्या मातब्बरांना बरोबर घेण्यातही  ते यशस्वी झाले होते. पण त्यांच्या अकाली निधनामुळे एक शक्‍यता परस्परच लुप्त झाली. या संदर्भात आणखी तीन नावांचा विचार करावा लागतो. पहिले अर्थात बॅ. महंमद अली जिना यांचे. जिना स्वतःला गांधींच्याच काय परंतु गोखले - टिळकांच्या बरोबरीचे नेते समजत असत. त्यांना मानणाऱ्या हिंदूंची संख्याही उपेक्षणीय नव्हती. त्यामुळे टिळकांच्या पश्‍चात लीगप्रमाणेच काँग्रेसचेही म्हणजे पर्यायाने देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न जिना पाहात होते. परंतु मधल्या काळात घडलेल्या तीन गोष्टींनी जीनांचे मनसुबे विरुन गेले. अनपेक्षितपणे खिलाफतीचा प्रश्‍न उद्‌भवला. त्यात भाग घेणे जीनांना शक्‍यच नव्हते. तेव्हा तेवढ्यापुरते का होईना महंमद अली  व शौकत अली बंधू यांचे नेतृत्व उदयाला आले व जिना लीगमध्येही मागे पडले. इकडे काँग्रेसमध्ये गांधींचा उदय झाला व त्यांच्या प्रभावाने काँग्रेसने खिलाफत प्रश्‍नात लीगबरोबर सहकार्य करायला सुरवात केली; म्हणजे तेथेही जीनांचे दरवाजे बंद झाले आणि मुख्य म्हणजे गांधींमुळे काँग्रेसच्या राजकारणापासून बदललेल्या शैलीशी जुळून घेणे जीनांना अशक्‍यप्राय ठरले.  परिणामतः जिना मागे मागे पडत गेले. स्वतःच्या नेतृत्वाचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना अखेर कट्टर इस्लामिक धर्मवादाची भूमिका घ्यावी लागली. याच काळातील अपार क्षमतेचा नेता म्हणजे अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर. परंतु जातिव्यवस्थेच्या पोलादी चौकटीमुळे सवर्ण हिंदू त्यांचे नेतृत्व मानतील हे शक्‍य कोटीतील नव्हतेच. त्यामुळे त्यांना त्यांची शक्ती जातिव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करीत आपल्या अस्पृश्‍य बांधवांना प्रतिष्ठा मिळवून देण्यातच खर्च करणे भाग पडले. गांधींना आव्हान देत पुढे हिंदूंच्या एका गटाचा महानायक होण्यात यशस्वी झालेल्या वि. दा. सावरकर हे तिसऱ्या दशकात रत्नागिरी येथे स्थानबद्ध होते. शिवाय त्यांच्यावर राजकीय कृती करण्यास बंदी होती. ती १९३७ मध्ये उठली व त्यानंतर ते गांधींना आव्हान देऊ लागले. पण तोपर्यंत गांधी इतके पुढे गेले होते, की त्यांना गाठणे सावरकरांनाच काय परंतु कोणालाच शक्‍य झाले नसते. शिवाय सावरकरांनी आपले नेतृत्व हिंदू समूहापुरते सीमित केल्यामुळे लोक त्यांची तुलना जीनांशी करू लागले; गांधींशी नाही हे लक्षात घ्यायला हवे. अशा परिस्थितीत गांधींच्या महानायकत्वास शह देणारा अन्य कोणी नेता भारतात उरला नाही. कार्ल मार्क्‍स एकतर परदेशी होता व कालवशही झाला होता. तो विचारांच्या रूपात जिवंत होता. मात्र त्याच्या विचारांच्या आधारे क्रांती करून रशियात कम्युनिस्ट राजवटीची स्थापना करण्यात  लेनिन यशस्वी झाला होता. पण तो पडला रशियाचा. तरीही कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी १९२१ मध्येच ‘गांधी व्हर्सेस लेनिन’ ही पुस्तिका लिहून विचारांच्या माध्यमातून का होईना पक्षीय राजकारण करीत लेनिनला गांधींचा प्रतिस्पर्धी म्हणून उभे करता येईल हे सूचित केले होते. अर्थात स्वतः डांगे यांचा तेव्हाचा दृष्टिकोन लेनिनला गांधींचा पर्याय म्हणून उभा न करता पूरक व पोषक म्हणून उभा करण्याचा होता हे लक्षात ठेवले पाहिजे. अर्थात, कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाच्या चौकटीत हे शक्‍य नसल्याचे आणि असले तरी ते देशातील कम्युनिस्टांच्या पचनी पडणे शक्‍य नसल्याचे स्वतः डांगे यांच्याच लक्षात आल्यामुळे त्यांना तो नाद सोडून द्यावा लागला. तरीही त्यांना पक्षांतर्गत संघर्ष करीतच राहावे लागले व त्यात त्यांची खूप घुसमट व दमछाक झाली. पण तो मुद्दा वेगळा.

गांधी आणि डावे यांच्यातील संबंध हा आणखी एक वेगळा मुद्दा. येथे डावे किंवा कम्युनिस्ट महत्त्वाचे यासाठी ठरतात की महाराष्ट्राने डाव्या चळवळीला अधिक प्रतिसाद दिला. मुंबईसारख्या औद्योगिक शहरांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार संघटनांनी चांगलीच मुळे रोवली. स्वतः डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्‍य कामगारांची स्वतंत्र युनियन उभारलीच पण व्यापक भूमिका घेऊन स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापनासुद्धा केली. हा पक्ष समाजवादी भूमिका मानणारा होता हे जरूर नमूद करायला हवे. ब्राह्मणेतर चळवळीतल्या धुरीणांवरही मार्क्‍सवादी विचारांचा प्रभाव पडल्याखेरीज राहिला नाही आणि त्याला विठ्ठल रामजी शिंद्यांसारखा धार्मिक कल असलेला नेताही अपवाद नव्हता. १९२८ च्या सुमारास ‘नव्या पिढीचे राजकारण’ नावाच्या माधवराव बागलांनी लिहिलेल्या पुस्तकाला शिंद्यांची प्रस्तावना आहे. बागलांनी (पूर्वी डांगे यांनी) गांधी आणि मार्क्‍स यांच्याच विचारांची सांगड घालून ब्राह्मणेतर चळवळीने पुढे जावे असा विचार मांडला होता. (अर्थात डांगे यांना ब्राह्मणेतर चळवळ अभिप्रेत नव्हती.) बागलांसाठी जोतिराव फुले यांचा विचार ब्राह्मणेतरी विचारात गृहित धरला गेला होता. पुढे स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर ब्राह्मणेतर बहुजनांनी काँग्रेसवर रुष्ट होऊन शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली तेव्हा बागलांचाच विचार प्रत्यक्षात आणला असे म्हणावे लागेल. पण त्यात आता गांधीविचारांना स्थान नव्हते. तो मार्क्‍स आणि फुले यांच्या विचारांचा समन्वय करायचा एक प्रयोग होता व त्यात मार्क्‍सने फुले यांच्यावर मात केली होती. मार्क्‍सचा विचार म्हणजे वैज्ञानिक (scientific) समाजवाद अशी खात्री पटलेल्या शे. का. पक्षाच्या शिखर नेतृत्वाने आपले मार्क्‍सवादाचे आकलन हे भारतातील डांगे रणदिवे प्रभृति पारंपरिक मार्क्‍सवाद्यांपेक्षाही अचूक असल्याचा दावा करीत त्यांना जणू आव्हान दिले. इतकेच नव्हे, तर हा आपला दावा सोव्हिएत नेतृत्वाला पोचवून आपण भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे स्थान घेण्यास अधिक सक्षम असल्याचा संदेशही दिला.

  या सर्व घटना वरकरणी राजकीय वाटत असल्या तरी त्यांचे सामाजिक संदर्भ तितकेच महत्त्वाचे आहेत. शेतकरी कामगार पक्षाची पाळेमुळे खेड्यापाड्यांतील बहुजन शेतकरी समाजात रुतली असून काँग्रेसपुढे खरेखुरे आव्हान उभे करण्याची क्षमता त्याच्यात होती. तशी अपेक्षा निर्माण करून त्याने काँग्रेस नेतृत्वाला धडकी भरवली होती. पण काँग्रेसच्या सुदैवाने त्याला अगोदर भाऊसाहेब हिरे आणि नंतर यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व लाभल्यामुळे या अपेक्षा फोल गेल्या व शे. का. पक्ष; मार्क्‍स आणि फुले या द्वंद्वात अडकून दिवसेंदिवस क्षीण होत गेला. 

   शे.का.पक्षाप्रमाणेच मार्क्‍सचे मूलभूत विचार मान्य असलेला परंतु तरीही कम्युनिस्टांपासून फटकून राहिलेला आणखी एक पक्ष म्हणजे समाजवादी नंतरचा प्रजा समाजवादी पक्ष होय. शे.का.पक्ष जसा ग्रामीण भागात पसरला तसा समाजवादी पक्ष शहरी तोंडावळ्याचा होता. परंतु त्यामुळेच तो कम्युनिस्ट पक्षाला शेतकरी कामगार पक्षापेक्षा प्रभावी प्रतिस्पर्धी वाटत असे. खरे तर हे शहरांतील समाजवादी पक्ष आणि खेड्यांतील शेतकरी कामगार पक्ष यांची युती झाली असती तर कम्युनिस्ट पक्षापुढे निश्‍चितच एक आव्हान उभे राहिले असते. तथापि, शे.का.पक्ष आणि समाजवादी पक्ष हे एकमेकांना जातीयवादी मानीत त्यामुळे अशा प्रकारची युती शक्‍य होणार नव्हतीच! १९५२ च्या सार्वजनिक निवडणुकांत राजकीय युती करण्याचा प्रसंग आला तेव्हा डॉ. आंबेडकरांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाने शेतकरी कामगार पक्षाऐवजी समाजवाद्यांबरोबर जाणे पसंत केले. कम्युनिस्टांबरोबर जाण्याचा प्रश्‍नच नव्हता.  कारण त्यावेळी बाबासाहेब बौद्ध धर्माकडे आकर्षित होत असून कम्युनिस्ट पक्षाची प्रतिमा धर्मविरोधक अशीच होती आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे चीनमध्ये क्रांती होऊन तेथे कम्युनिस्टांची राजवट आली होती. ती बौद्ध तिबेटच्या मुळावरच उठली होती. या संदर्भात बाबासाहेब आणि ब्राह्मणेतर चळवळ यांच्यातील संबंधांचीही चर्चा करणे प्रस्तुत ठरेल. खरे तर करवीर शाहू छत्रपती हयात असेपर्यंत बाबासाहेबांची दलित चळवळ ब्राह्मणेतर चळवळीचा एक भाग होती असे म्हणण्यात काही अतिशयोक्ती नाही. शाहू छत्रपतींनी दलित चळवळीला आणि व्यक्तिशः बाबासाहेब आंबेडकरांना सर्व प्रकारचे सहाय्य करून सक्षम केले हे जाणकारांना ठाऊकच आहे. अस्पृश्‍य समाजाचे अघोषित नेतृत्व करणाऱ्या विठ्ठल रामजी शिंद्यांना, ते टिळकांच्या राष्ट्रीय चळवळीला सहकार्य करतात या कारणामुळे अस्पृश्‍य चळवळीपासून बाजूला करणे ही महाराजांची गरजच होती. सुदैवाने त्यांना त्याच वेळी बाबासाहेबांच्या रुपाने पर्याय सापडला. ‘मूकनायक’ हे पत्र काढण्यासाठी महाराजांनी बाबासाहेबांना सर्वतोपरी सहाय्य केले. इतकेच नव्हे, तर माणगाव येथे अस्पृश्‍य समाजाची परिषद भरवून तिच्यात बाबासाहेबांच्या नेत्तृत्वाचा पुरस्कार करून अन्य कोणताही, विशेषतः सवर्ण नेत्यांपेक्षा आंबेडकर हे अस्पृश्‍यांसाठी स्वाभाविक नेते कसे ठरतात हे पटवून दिले. मात्र तरीही महाराजांच्या पक्षात आंबेडकर आणि त्यांची चळवळ ब्राह्मणेतर चळवळीपासून दुरावत गेली व त्याचे पर्यवसान आंबेडकरांनी  बहिष्कृतांचा स्वतंत्र सुभा मांडण्यात झाले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य आणि शूद्र या चातुर्वणी हिंदू समाजात बहिष्कृत अस्पृश्‍य समाजाचे स्थान कोठे आहे असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. ब्राह्मण हे समाजपुरुषाच्याच शीर्षस्थानी, क्षत्रिय म्हणजे बाहू, वैश्‍य मांड्या आणि शूद्र पाय असे समाजपुरुषाचे स्वरूप असेल तर अतिशूद्र अस्पृश्‍य त्या पायातील पायताण म्हणजे वहाण ठरतात अशी मांडणी त्यांना करावी लागली. बाबासाहेब या निष्कर्षापर्यंत यायला तात्कालिक कारणेही होती. दरम्यानच्या काळात माँटेग्यू चेम्स्फर्ड सुधारणांच्या माध्यमातून प्रांतिक कायदेमंडळ अस्तित्वात येऊन त्यात ब्राह्मणेतर पक्षाचे सदस्य निवडून आले होते. हे सदस्य ग्रामीण शेतकऱ्यांच्याच हितसंबंधांचा कौन्सिलात पाठपुरावा करीत. प्रसंगी हे हितसंबंध खेड्यांमधील अस्पृश्‍य समाजाच्या हितसंबंधांच्या विरोधी असत. स्वतः बाबासाहेबांनीच पुरस्कृत केलेला महारवतन खालसा करण्याचा ठराव हे त्याचे एक उदाहरण होय. मुंबई प्रांतिक कायदेमंडळातील ब्राह्मणेतर सदस्यांनी या बिलाला विरोध केला. ग्रामव्यवस्थेत शेतकऱ्यांना हक्काने उपलब्ध होणाऱ्या हरकाम्या वतनी महाराची सेवा 

संपुष्टात आणण्याची या सदस्यांची तयारी नव्हती. याच दरम्यान बाबासाहेबांनी महाड येथील चवदार तळ्यात जलसत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. चवदार तळ्यातील पाणी पिण्याचा अधिकार अस्पृश्‍यांना नव्हता. तलावाचे पाणी गाई-म्हशीसारखी जनावरे पितात आणि अस्पृश्‍यांना पिता येत नाही ही गोष्ट मानवतेला काळिमा फासणारी असून बाबासाहेबांनी तिच्याविरुद्ध दंड थोपटले. या सत्याग्रहात ब्राह्मणेतर मंडळी आपल्या पाठीशी उभी राहतील असे त्यांना वाटत होते. परंतु प्रत्यक्षात केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर वगळता कोणीही ब्राह्मणेतर पुढे आला नाही. जेधे - जवळकर सत्याग्रहात भाग घ्यायला निघाले होते परंतु रस्त्यात त्यांच्या मोटरगाडीचे चाक पंक्‍चर झाल्यामुळे ते वेळेवर पोचू शकले नाहीत.

ब्राह्मणेतरांचे असे अलिप्त राहाणे हे एक 

गोष्ट. शिवाय आता खुद्द ब्राह्मणेतरांमध्येच काँग्रेसप्रवेश करण्याच्या विचारांचे वारे वाहू लागले होते. एव्हाना काँग्रेसमधील टिळकपक्षियांचे नेतृत्व मागे पडले असून नेतृत्वाच्या नाड्या गांधींच्या हाती असल्यासारख्याच होत्या. स्वतः गांधी ब्राह्मणेतरच असल्यामुळे नेतृत्वाच्या 

मुद्यावरून काँग्रेसपासून अलिप्त राहायचे
काहीच कारण ब्राह्मणेतरांसाठी उरले नव्हते. ‘नव्या पिढीचे राजकारण’ हे माधवराव 
बागलांचे पुस्तक या प्रक्रियेची जणू नांदी होती. एवढ्या गोष्टी आंबेडकरांनी अस्पृश्‍यांची चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ यांच्यातील सहकार्याच्या पर्वाची परिसमाप्ती होण्यासाठी पुरेशा होत्या. 
 

संबंधित बातम्या