कार्यक्षेत्राची निवड

डॉ. सदानंद मोरे 
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

महाराष्ट्राची लोकयात्रा      

भारताच्या इतिहासात १९२० नंतरचा कालखंड हा ‘गांधीयुग’ म्हणून ओळखला जातो. त्या अगोदरचा अर्थातच ‘टिळकयुग.’ टिळकयुगातील राजकीय धुरीण सामाजिक सुधारणांबाबत उदासीन असत. काही तर समाजसुधारणांच्या विरोधीच होते. आणि त्यांनी आपला विरोध कधी लपवूनही ठेवला नाही. त्यामुळे  दुर्दैवाने राजकीय आणि सामाजिक चळवळी या जणू परस्परविरोधी आहेत असा समज निर्माण झाला. इतकेच नव्हे, तर ज्यांना आपली सामाजिक स्थिती सुधारण्याची जास्त निकड होती, ते समूह राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीपासून अलिप्त राहू लागले. प्रसंगी तिला विरोधही करू लागले. महाराष्ट्रातील सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ ही या प्रकारचे उत्तम उदाहरण आहे.

असा पेचप्रसंग निर्माण होण्याचे कारण म्हणजे राजकीय चळवळीचे नेतृत्व उच्च वर्णातील नेत्यांच्या हाती होते. त्यातील काही नेत्यांना उच्चवर्णीयांचे पारंपरिक वर्चस्व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कायम राहावे असे वाटत होते. काही नेते इतके टोकाचे वर्चस्ववादी नसले, तरी सामाजिक सुधारणांसाठी काही वेगळ्या कृती जाणीवपूर्वक कराव्यात असे त्यांना वाटत नव्हते.

काँग्रेसमधील काही नेत्यांना मात्र सामाजिक-राजकीय हे द्वैत मान्य नव्हते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे त्यांचे अग्रणी. न्यायमूर्तींनी पहिल्यापासूनच काँग्रेसच्या अधिवेशनास जोडूनच सामाजिक परिषद भरवायचा पायंडा पाडला होता. पण १८९५ मधील पुणे अधिवेशनात टिळकांच्या अनुयायांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे रानड्यांना सामाजिक परिषद वेगळ्या मंडपात भरवावी लागली. त्यामुळे सामाजिक-राजकीय या द्वैतावर जणू शिक्कामोर्तबच झाले आहे असे म्हणायला हरकत नाही.

टिळकांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या गांधीयुगात ही परिस्थिती पालटली. गांधींनी अस्पृश्‍यता निवारणाला काँग्रेसच्या चळवळीचाच एक भाग बनवले. त्यांच्या प्राधान्यक्रमात राजकीय स्वातंत्र्याला पहिला क्रमांक असला, तरी सामाजिक समतेच्या चळवळी या स्वातंत्र्यलढ्याच्या विरोधी नाहीत आणि स्वातंत्र्येच्छुकांनी त्यांच्यापासून अलिप्त राहाता कामा नये असा संदेश मात्र त्यांच्या भूमिकेतून समाजापर्यंत पोचू शकला. त्यामुळे काँग्रेसमधील सनातनी गट त्यांच्या विरोधात गेला. त्याने गांधींना वेगवेगळ्या मार्गाने विरोध करून पाहिला. परंतु, गांधींच्या पुढे कोणाचीच मात्रा चालू शकली नाही. गांधी उच्चवर्णीय नाहीत ही या मंडळींनाही खंत तर होतीच, तसेही वैयक्तिक पातळीवर गांधींच्या आचरणशुद्धतेमुळे त्यांचे नेतृत्व एकवेळ खपवून घेता येईल एवढा व्यावहारिक दृष्टिकोन त्यांच्याजवळ होता. पूर्वीच्या काळी कनिष्ठ जातींच्या साधुसंतांना वंद्य मानण्याचा प्रघात होता. त्यात ही भर समजावी. तथापि गांधींनी या प्रश्‍नाला सामाजिक स्वरूप दिले, त्यामुळे ही मंडळी रुष्ट झाली. एकीकडे गांधी धर्मात ढवळाढवळ करतात व दुसरीकडे राजकारणात धर्म आणतात असा त्यांचा गांधींवर दुहेरी आरोप होता.

पुढे याच मंडळातील एका नेत्याने हिंदुधर्मियांची ही भूमिका आत्मघातकी आहे, तिचे पर्यवसान हिंदूंमधील अस्पृश्‍य समूहांनी धर्मांतर करण्यात होईल. त्याचा परिणाम म्हणून हिंदूसमाज आणखी दुबळा होईल हे ओळखून अस्पृश्‍यतानिवारणाला सक्रिय पाठिंबा दिला. विनायक दामोदर सावरकर हे त्या नेत्याचे नाव होय. गांधींना विरोध करू शकणारा तुल्यबळ प्रतिस्पर्धी एवढ्यापुरते सावरकरांचे नेतृत्व सनातनी मंडळींनी स्वीकारले. मात्र सावरकरांच्या अस्पृश्‍यता निवारणाच्या कार्यक्रमाशी ते कधीच समरस झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

एकूणच सामाजिक सुधारणांना पाठिंबा देणारे काय किंवा अस्पृश्‍यतेच्या दुष्ट रुढीला विरोध करणारे काय, आपल्या समर्थनार्थ तार्किक युक्तिवादांचा आधार घ्यायचे. आमचे म्हणणे बुद्धिवादाला धरून आहे असा दावा करायचे. हा दावा मान्य करूनही पारंपरिक धर्मशास्त्रात त्यासाठी आधार सापडला, तर बरेच असे समजून काही मान्यवरांनी तो पर्यायही आजमावून पाहिला. वाई येथे मराठेशास्त्री ऊर्फ स्वामी केवलानंद यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या धर्मनिर्णयमंडळाचा असा पवित्रा होता. अस्पृश्‍यता व तत्सम गोष्टी बुद्धीला पटणाऱ्या तर नाहीतच पण त्यांना मुळात शास्त्रातच आधार नाही असे दाखवण्याची या मंडळाची धडपड होती. त्यासाठी त्यांना धर्मशास्त्रीयच ग्रंथांचा वेगळ्या पद्धतीने अन्वयार्थ लावायची खटपट करावी लागेल. ती त्यांनी पुष्कळ केलीही.

गांधींनी १९३० च्या दशकाच्या सुरूवातीलाच येरवड्याच्या तुरुंगात असताना अस्पृश्‍यतेच्या रुढीविरुद्ध उपोषण सुरू केले तेव्हा अस्पृश्‍यता या हिंदुधर्माचा भाग आहे असे मानणाऱ्या सनातनी पंडितांनी त्यांना आव्हान दिले. अशावेळी अस्पृश्‍यतेला धर्मशास्त्राचे आधार नसल्यामुळे ती धर्माचा भाग होऊ शकत नाही, असा पक्ष घेऊन सनातन्यांचा प्रतिवाद करणाऱ्या पुरोगामी पंडितांचा समूह गांधींच्या मदतीला धावला.

खरे तर एका बाजूला धर्मशास्त्र आणि दुसऱ्या बाजूला बुद्धिवाद असा सामना होऊच शकत नाही. धर्मशास्त्रातील वचने प्रमाण मानणे हा श्रद्धेचा मुद्दा आहे, त्याचे बुद्धीच्या साहाय्याने समर्थन होऊच शकत नाही, याउलट बुद्धी याच प्रमाणाने एखाद्या गोष्टीची युक्तायुक्तता जोखणाऱ्या मंडळींच्या धर्मशास्त्रातील वचने प्रमाण म्हणून पुढे करणे काहीच कामाचे नाही. अशावेळी त्यांच्यात संवादही होऊ शकत नाही आणि वादही.

अशावेळी काही सनातनी पंडितांनी धर्मशास्त्रातील वचनांचे बुद्धीला अनुसरून समर्थन करू पाहणे तर बुद्धिवादी विचारवंतांनी आपल्या बौद्धिक मुद्यांना अनुकूल असे शास्त्राधार शोधून काढणे किंवा शास्त्रवचनांचा वेगळा अर्थ लावणे स्वाभाविक म्हणावे लागते.

महाराष्ट्रातील बुद्धिवादाच्या आद्य आचार्यांना म्हणजे गोपाळराव आगरकरांनासुद्धा हा प्रकार चालवण्यासारखा होता. शेवटी मुद्दा व्यावहारिक पातळीवरील होता.

थोडक्‍यात सांगायचे झाल्यास महाराष्ट्रातील विचारवंत आपापल्या मुद्यांचे समर्थन करण्यापुरता बुद्धिवादाचा आश्रय करीत असत. मात्र विशुद्ध बुद्धिप्रामाण्यवादाचा अंगीकार करून त्यातून जे जे निष्पन्न होते, ते सर्व स्वीकारण्याची व तसे जाहीरपणे सांगण्याची हिंमत दाखवणारा कोणी विचारवंत असेल तर तो म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे.

रघुनाथरावांचे वडील धोंडो केशव तथा महर्षी कर्वे यांचे उल्लेख आपण विशेषतः स्त्री शिक्षणाच्या चळवळीच्या संदर्भात वाचलेले आहेत. महर्षींच्या या क्षेत्रातील कार्याची दखल घेतली जाऊन त्यांना उत्तरायुष्यात ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताबही देण्यात आला. मात्र या अल्प आयुष्य लाभलेल्या रघुनाथरावांची मात्र समाजाने उपेक्षा नव्हे तर अवहेलनाही केली हे स्वेदकारक वास्तव स्वीकारावेच लागते.

वस्तुतः स्वतः धोंडो केशव तथा अण्णा कर्वे यांची वैचारिक बैठकही बुद्धिवादाचीच होती. अर्थात त्या काळात बुद्धिवाद याचा अर्थ जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांचे उपयुक्ततावादी आणि उत्क्रांतिवादी विचार असे जणू समीकरणच झाले होते. मिलचे ‘Subjegation of women’ हे पुस्तक वाचूनच आगरकरादिक मराठी विचारवंतांच्या डोक्‍यात स्त्रीविषयक सुधारणांचे विचार येऊ लागले. अण्णांचा मिलचा स्पेन्सरच्या पुस्तकांनी मराठी भाषांतरे करण्याच्या प्रक्रियेतही हातभार होता. मिलचा प्रभाव त्यानंतरच्या पिढीवरही पडला होता. स्वतः विनायकराव सावरकर त्याला अपवाद नव्हते.

मिलचा बुद्धिवाद उपयुक्ततावादात पर्यवसित होत असल्यामुळे त्याने प्रभावित झालेल्या मराठी विचारवंतांनी धर्माच्या माध्यमातून प्रसृत झालेल्या प्रत्येक प्रथापरंपरेची छाननी ‘उपयुक्तता’ या कसोटीने केली. सावरकरांनी गाईला उपयुक्त पशू मानणे हा याच विचारसरणीचा परिणाम होता.

सावरकरांनंतरची पिढी कर्तीसवरती होईपर्यंत मिलप्रणीत बुद्धिवाद मागे पडत चालला होता. तोपर्यंत मार्क्‍स, फ्रॉईड आणि रसेल या तीन विचारवंतांनी महाराष्ट्रातील विचारवंतांवर प्रभाव पाडायला सुरवात केली होती. १९३०-४० या दशकात तर या तीन विचारवंतांच्या विचारांचे मिश्रण होऊन ते ‘नवमतवाद’ या नावाने प्रसिद्ध झाले होते. 

पुढे लवकरच या विचारसरणीला उतरती 
कळा लागली, हा भाग वेगळा. मार्क्‍सचा विचार मात्र कामगार चळवळ आणि कम्युनिस्ट पक्ष यामुळे बरेच दिवस टिकला. अजून म्हणजे सोविएत रशियाच्या विघटनानंतरही टिकून आहे.

उपयुक्ततावाद (Utilitarianism) हा खरे पाहता सुखवादाचाच (Hedonism) एक आविष्कार आहे. उपयुक्त कृती म्हणजे ज्या कृतीमुळे कर्त्याला सुख प्राप्त होते, अशी ढोबळ व्याख्या करता येईल. अर्थात सुखाची कक्षा कर्त्यापुरत्या मर्यादित ठेवण्याऐवजी ‘पुष्कळांचे पुष्कळ सुख’ येथपर्यंत विस्तारून स्वार्थ सुखवाद परार्थसुखवादात रूपांतरित करण्यात आला.

जाता जाता याही गोष्टींची नोंद घ्यायला हवी, की मिलप्रणीत आणि आगरकरादि आधुनिक आंग्लशिक्षित स्वीकृत या सुखवादाचा प्रतिवाद लोकमान्य टिळकांनी आपल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथामधून केला. अर्थात तो वाचायला स्वतः आगरकर जिवंत नसले, तरी तेव्हाचे तरुण पत्रकार व ब्राह्मणेतर चळवळीचे एक खंदे कार्यकर्ते वा. रा. कोठारी यांच्या गीतारहस्यावरील टीकात्मक निबंधातून आगरकरांनी टिळकांचा प्रतिवाद कसा केला असता याची चुणूक पाहायला मिळते.

आगरकर काय किंवा अण्णा कर्वे काय, आधुनिक बुद्धिवादाचा पुरस्कार करणारे असले तरी परंपरेचा संबंध पूर्णतः तोडून टाकावा असे त्यांनाही वाटत नव्हते. ज्या संस्थेला हिंगण्याच्या स्त्री शिक्षण संस्थेचे मूळ रूप म्हणता येईल तिचे नाव अण्णांनी ‘निष्काम कर्म मठ’ असे ठेवले होते हे विसरता कामा नये. ‘निष्काम कर्म’ ही पक्की भारतीय कल्पना असून, भगवद्‌गीता हे तिचे उगमस्थान असल्याचे जाणकारांना ठाऊकच आहे.

अर्थात संस्थेच्या नावात जरी निष्काम कर्माचा उल्लेख असला, तरी अण्णांचा कल मात्र सकाम कर्माकडे होता हे मात्र निश्‍चित. त्याची प्रांजळ कबुली त्यांनीच शंभरी निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत दिलेली आढळते. कर्व्यांच्या तरुणपणी टिळकांचा फार मोठा प्रभाव होता. त्यात सापडून ते राजकारणात का गेले नाहीत या प्रश्‍नावर कर्व्यांनी सांगितले, की राजकारणाच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्ती कधी होईल, मुळात होईल किंवा नाही याची तेव्हा खात्री देता येत नव्हती. निदान आपल्या आयुष्यात तरी ते मिळण्याची शक्‍यता कमी होती म्हणून फळाची खात्री असलेल्या क्षेत्रात ते गेले. ते ध्येय म्हणजे स्त्रीशिक्षण! अण्णांना त्यांच्या हयातीतच त्यांनी केलेल्या कर्माची फळे चाखायला मिळाली. टिळकांना नाही आणि रा.धों.ना सुद्धा नाही. 

महात्मा गांधींनी अस्पृश्‍यता निवारणाला काँग्रेसच्या चळवळीचाच भाग बनवले. त्यांच्या प्राधान्यक्रमात राजकीय स्वातंत्र्याला पहिला क्रमांक असला, तरी सामाजिक समतेच्या चळवळी या स्वातंत्र्यलढ्याच्या विरोधी नाहीत आणि स्वातंत्र्येच्छुकांनी त्यांच्यापासून अलिप्त राहाता कामा नये, असा संदेश त्यांच्या भूमिकेतून समाजापर्यंत पोचू शकला.

संबंधित बातम्या