‘समाजस्वास्थ्य’चा उदय

डॉ. सदानंद मोरे
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

कोणे एके काळी म्हणजे महर्षी वात्स्यायन यांनी कामशास्त्रावरील ग्रंथ लिहिला, तेव्हा भारतात स्त्री-पुरुषांच्या कामजीवनावर मुक्तपणे चर्चा होत असेल यावर शंका घ्यायचे काही कारण नाही. देशभर डोंगरकपारींमध्ये आढळणारी कामशिल्पे हा अंदाज पुष्ट करणारी आहेत. ग्रांथिक पुराव्याला प्रत्यक्ष भौतिक पुराव्याचीही जोड येथे मिळते. या अर्थाने तेव्हाचा भारतीय समाज पुरोगामी व प्रगतच मानायला हवा. विशेष म्हणजे हे सर्व करताना भारतीयांनी बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा किंवा व्यक्तिस्वातंत्र्य अशा प्रकारच्या विचारसरण्या स्वीकारल्या होत्या असे म्हणायला वाव नाही.

कोणे एके काळी म्हणजे महर्षी वात्स्यायन यांनी कामशास्त्रावरील ग्रंथ लिहिला, तेव्हा भारतात स्त्री-पुरुषांच्या कामजीवनावर मुक्तपणे चर्चा होत असेल यावर शंका घ्यायचे काही कारण नाही. देशभर डोंगरकपारींमध्ये आढळणारी कामशिल्पे हा अंदाज पुष्ट करणारी आहेत. ग्रांथिक पुराव्याला प्रत्यक्ष भौतिक पुराव्याचीही जोड येथे मिळते. या अर्थाने तेव्हाचा भारतीय समाज पुरोगामी व प्रगतच मानायला हवा. विशेष म्हणजे हे सर्व करताना भारतीयांनी बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा किंवा व्यक्तिस्वातंत्र्य अशा प्रकारच्या विचारसरण्या स्वीकारल्या होत्या असे म्हणायला वाव नाही. तो समाजही श्रुतिस्मृतिपुराणोक्त मानणारा, निदान वेदप्रामाण्य मानणाराच होता.

मध्यंतरीच्या काळात केव्हातरी समाजाचा कामसंबंधाकडे पाहायचा निकोप दृष्टिकोन हरपला असेच म्हणावे लागते. त्यात पुरुषसत्तेची भर पडलेली असल्यामुळे या संबंधांचा विचार एकतर्फी म्हणजे पुरुषांच्याच बाजूने व्हायला लागला. अठराव्या - एकोणिसाव्या शतकात भारतात ब्रिटिश अंमल सुरू झाला हे खरे असले तरी या अमलाचा बराचसा काळ व्हिक्‍टोरियन नीतिकल्पनांनी भारलेला होता व या कल्पनांमध्ये प्रतिगामी बुरसटलेपणा होता हे मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही.

आपल्याकडे पाश्‍चात्त्य किंवा युरोपीय या शब्दप्रयोगांतून जणू काही एकच एक एकजिनसी विचारांची व वर्तनाची प्रणाली निर्देशित होत असते. याच प्रणालीसाठी आपण ‘आधुनिकता’ हा शब्दही स्वीकारलेला आहे. खरे तर युरोपियन विद्वानांनी जी ‘पौर्वात्य’ किंवा ‘प्राच्य’ ही संरचनात्मक संज्ञा रूढ केली तिचेच हे देशी प्रत्यंग (counter part) समजायला हरकत नाही. पण प्रत्यंगसुद्धा आपण घडवले असे नसून तेही या युरोपीय अभ्यासकांनीच घडवले आहे किंबहुना त्यामुळेच विशेषतः युरोपीय राष्ट्रांना आपापल्या वसाहतींमधील लोकांना सुसंस्कृत करणे हे आमचे जणू ईश्‍वरदत्त, निदान इतिहासदत्त कार्य आहे अशी भूमिका घेता आली. भारताच्याच संदर्भात इंग्लंडचा हाच दावा होता.

ब्रिटिश हे जेते आणि भारतीय हे जित असल्यामुळे अशा कल्पनांचा स्वीकार भारतातही आपसूकच होत राहिला. इंग्लंडच्या एकतर्फी वर्चस्ववादाला आव्हान देताना युरोपमधील अन्य राष्ट्राचे संदर्भ उदाहरणार्थ, विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्यांचा लेखामधून येत राहातात हे खरे असले तरी त्यांचे प्रमाण तसे अल्पच म्हणावे लागते. बहिष्काराच्या चळवळीच्याच भरात इंग्लंडमधील वस्तू विकत घेण्याला, (ती वस्तू भारतात उत्पादित होत नसेल तर) दुसऱ्या एखाद्या युरोपीय देशातून विकत घ्यावी अशी कल्पना पुढे येऊन तिची अंमलबजावणीही झाल्याचे दाखले आहेत. मात्र युरोप खंडातील वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्कृतीमध्ये विकसित झालेल्या वैचारिकतांचा तौलनिक अभ्यास करून त्या प्रकाशात ब्रिटिशांच्या वैचारिकतेची समीक्षा करण्याचा महाप्रकल्प कोणी सिद्ध करू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. युरोपमधील ख्रिस्ती धर्मावर हल्ला चढवण्यापुरते अहिताग्नी शं. रा. राजवाडे यांनी जर्मन तत्त्ववेत्ता नित्शे याच्या पुस्तकाचे मराठी रूपांतरही केले. युरोपातील इंग्लंडच्या शत्रुराष्ट्रांची मदत घेऊन भारताचा स्वातंत्र्यलढा पुढे न्यायलाही अनेकांची हरकत नव्हती. सुभाषचंद्र बोस यांनी तर ती प्रत्यक्षातही आणली. काही पुनरुज्जीवनवादी परंपरानिष्ठ मात्र भारतीय संस्कृतीच सर्वश्रेष्ठ असण्याच्या दावा करीत तिच्यातील विविध इष्टानिष्ट रुढीप्रथांचे समर्थन पाश्‍चात्त्य संस्कृतीत विकसित झालेल्या वैज्ञानिक पाश्‍चात्त्य संस्कृतीत विकसित झालेल्या वैज्ञानिक सिद्धांताच्या आधारे करण्याच्या प्रयत्नात दंग झालेले दिसतात.

थोडक्‍यात सांगायचे म्हणजे बुद्धिवाद, पुरोगामित्व आणि परंपरा या तीन गोष्टी या काळात कळीच्या बाबी ठरल्या. विशेषतः राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय झाल्यानंतर त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी त्यांच्याच विरोधकांनी आपण पुरोगामी आणि बुद्धिनिष्ठ असण्याचा दावा करीत गांधी प्रतिगामी व बुद्धिप्रामाण्याला धाब्यावर बसवणारे आहेत, अशा पवित्रा घेतला. गांधींच्या विरोधकांमध्ये पुष्कळच मतभेद असले आणि त्या प्रत्येकाच्या बुद्धिवादाची तऱ्हा वेगवेगळी असली तरी गांधी हे बुद्धिवादी नाहीत याविषयी त्यांचे मतैक्‍य होते.

अशा परिस्थितीत ‘बुद्धिवादी’ किंवा ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ या शब्दांचा जर कोणी निःसंशय हक्कदार असेल तर तो म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे. सावरकर बुद्धिवादी खरे, परंतु त्यांच्याच बुद्धिवादाला त्यांच्या हिंदुत्वनिष्ठेच्या मर्यादा पडल्या होत्या. कधी कधी ते बुद्धिवादाचा वापर हिंदूंच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी किंवा समर्थनासाठी करताना दिसतात आणि अर्थातच सावरकरांनी अशा मर्यादा ओलांडल्या असत्या तर त्यांचे होते तेवढेही राजकीय अनुयायी त्यांना सोडून गेले असते! असे म्हणायला हरकत नाही, की सावरकरांनी हिंदुत्वाच्या मर्यादा ओलांडल्या असत्या तर त्यांचा बुद्धिवाद  र.धों. कर्वेंच्या बुद्धिवादाच्या निकट पोचला असता; पण तसे न झाल्यामुळे, र. धों. हे एकमेवाद्वितीय उरतात. र. धों. चा बुद्धिवाद हा धर्म, संस्कृती अशा मर्यादा उल्लंघून जाणारा होता. याचा अर्थ त्यांनी केलेले प्रत्येक विधान अचूक होते असा घ्यायचे कारण नाही. मात्र एकदा बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारला म्हणजे त्याच्याच पद्धतीशास्त्राला अनुसरून विचार करीत तो विचार त्याच्या तार्किक टोकाला न्यायचा हे जर खऱ्या बुद्धिवादाचे वैशिष्ट्य असेल तर ते र. धों.च्या विचारसरणी लागू पडते यात संशय नाही. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश यांचे वर्णन करतानाही त्यांना बुद्धिवादी म्हणायचा मोह होत असतो. पण एक तर केतकरांच्या मांडणीत धरसोड दिसून येते व दुसरे असे, की त्यांच्या विचारात धर्म, वर्ण, जात, राष्ट्र कधी अवतरेल याची खात्री नसायची. 

अर्थात सावरकर काय किंवा केतकर काय, त्यांना इतर अनेक गोष्टी करायच्या असल्याने बुद्धिवादाचा उद्‌घोष करूनही त्यांना प्रसंगी बुद्धिवादाच्या अपेक्षा पूर्ण करता यायच्या नाहीत. अर्थात अशा इतर गोष्टींनाही समाजजीवनात महत्त्व असल्यामुळे त्यांच्यात कार्य कर्तृत्वाला कोठे बाधा येत नाही हे लक्षात घ्यायला हवे. र. धों. चे वैशिष्ट्यच हे, की त्यांनी प्रज्वलित केलेल्या बुद्धीच्या कुंडात कोणतीही गोष्ट टाकायला ते कचरले नाहीत. मग त्या धार्मिक परंपरा असतो, सामाजिक रूढी असोत किंवा गांधींसारख्याच विभूती मानायला गेलेल्या व्यक्तीचे विचार असोत. त्यांचा बुद्धिवाद अशा प्रकारे सर्वंकषच नव्हे, तर सार्वभौम आणि सर्वभक्षक होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकयात्रेत एकटे र. धों. एकटेच कित्येक कोस पुढे आहेत व इतरांची जमेल त्याप्रमाणे पावले टाकीत वाटचाल चालू आहे, असे चित्र दिसून येते. र. धों. ना अपवादच म्हणावे लागते. नियम नाही. लोकांना बरोबर घेऊन चालणे हे र. धों. च्या प्रकृतीस मानवणारे नाही. मी माझ्या गतीने चाललो आहे, ज्यांना यायचे आहे त्यांनी माझ्या मागे यावे. मी कोणासाठी थांबणार नाही, असा र. धों.चा बाणा होता. त्यामुळे समाजात राहून समाजासाठी काम करीत असूनही ते एकाकीच राहिले. असे निःसंग नेतृत्व समाजाला पुन्हा - पुन्हा मिळत नसते. महाराष्ट्राला र. धों. ची किंमत कळली नाही हेच खरे. अर्थात त्यात र. धों.चे जेवढे नुकसान झाले असेल त्यापेक्षा अधिक नुकसान महाराष्ट्राचे झाले यात संशय नाही. र. धों.चे नुकसान म्हणजे त्यांचे झालेले आर्थिक नुकसान, शारीरिक झीज, मनस्ताप एवढेच. बाकी त्यांना स्वतःला ना कोठे मिरवून घ्यायची हौस होती, ना कोणाचे नेतृत्व करण्याची. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यातून निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञान मांडले खरे, पण निष्काम कर्मयोग प्रत्यक्षात जगून जर कोणी दाखवला असेल तर तो रघुनाथ धोंडो कर्वे यांनीच.

आपल्या चर्चेचा विषय पाश्‍चात्त्य अर्थात युरोपियन विचारविश्‍व व त्यांच्यामधील बुद्धिवाद हा होता. ब्रिटिश वळणाच्या बुद्धिवादाचा परिचय भारताला व पर्यायाने महाराष्ट्राला ब्रिटिश सत्तेमुळे आधीच झाला होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस गोपाळ गणेश आगरकरांनी विशेषतः मिल (व स्पेन्सर)चा उपयुक्ततावादी बुद्धिवाद महाराष्ट्रात रुजवला. र. धों.चे पिताश्री धोंडो केशव हे याच आगरकरी वळणाचे किंबहुना संप्रदायाचे म्हटले तरी चालले. सुरुवातीच्या काळात तेही तितकेच जोमात व जोषात होते. पण व्यावहारिक (म्हणजे वैयक्तिक पातळीवरील स्वार्थाचा व्यवहार नव्हे तर सामाजिक) कारणांमुळे त्यांनी त्या ब्रिटिश बुद्धिवादालाही मुरड घातली.

बुद्धिवादाचे बाळकडू घरच्या घरीच लाभलेल्या रघुनाथरावांनी मात्र उच्च शिक्षणासाठी फ्रान्सला गेल्यावर ब्रिटिश बुद्धिवादाच्या मर्यादा जाणल्या. बुद्धिवाद खरा कसोटीला लागतो तो स्त्री-पुरुषसंबंधांचा प्रश्‍न उपस्थित होतो तेव्हा मिल काय किंवा मॅकॉले काय, व्हिक्‍टोरियन काळाची अपत्ये असल्याने त्यांच्या या संबंधातील विचारांना मर्यादा होत्या. मेकॉलेने फौजदारी कायद्यात या संदर्भातील कलमे करताना ज्या मेखा मारून ठेवल्या त्या उपटायला भारतीय न्यायव्यवस्थेला दीड-दोनशे वर्षे वाट पाहावी लागली व तेव्हाही हे करताना या कायद्यांमुळे पूर्वी ज्यांना जे काही सोसायला लागले त्यांची पूर्वलक्ष्यी (retrospective) लागली!

आपल्या फ्रान्समधील वास्तव्याच्या काळात रघुनाथरावांची कामशास्त्रावरील आणि लिंगविज्ञानावरील अत्याधुनिक ग्रंथ वाचून त्यातील अद्ययावत प्रवाह आत्मसात केले यात शंका नाही. संततिनियमनाच्या आधुनिक साधनांचा परिचयही त्यांनी तेथेच करून घेतला. मनातल्या मनात ते पॅरिस आणि पुणे यांच्यात तुलनाही करीत असणार.

फ्रान्समधून परतल्यावर त्यांनी मुंबई येथे सुरू केलेले संततिनियमानाचे केंद्र हे भारतातील पहिले केंद्र होते एवढे समजले तरी त्यांच्या या क्षेत्रातील कार्याचे महत्त्व पटते आणि त्याचबरोबर हेच वर्ष इंग्लंडमध्येही असे केंद्र सुरू व्हायचे वर्ष आहे, हे समजले म्हणजे इंग्रजांच्या मागासलेपणावरही प्रकाश पडतो. इंग्लंडमधील केंद्रे मरी स्ट्रोप यांनी सुरू केले. त्यापूर्वी १९१६ मध्ये अमेरिकेत हे काम मार्गारेट सॅंगर यांनी केले होते.

रघुनाथरावांनी १९२३ मध्ये संततिनियमन या विषयावर पुस्तक लिहिले तेही अशा प्रकारचे पहिलेच पुस्तक होते. विशेष म्हणजे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी पत्राने या पुस्तकाची जाहिरात छापायला नकार दिला. मग न. चिं. केळकरांची त्यावर ‘केसरी’त परीक्षण छापले नाही यातचे आश्‍चर्य वाटायचे कारण उरत नाही. केळकर स्वतःला बुद्धिवादी समजत आणि आपल्या ‘बुद्धिवादी’ भूमिकेतून गांधी आणि गांधीविचारांची चिरफाड करीत. पण संततिनियमन त्यांच्या बुद्धिवादानुसार सार्वजनिक चर्चेचा विषय होऊ शकत नव्हता!

याच दरम्यान महाराष्ट्रातील किर्लोस्कर उद्योगाने ‘किर्लोस्कर कबर’ हे मासिक सुरू केले होते. मासिक बुद्धिवादी विचारांनी चालत असे. रघुनाथरावांना त्यांच्या रूपात एक व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यांचे लेख या मासिकातून प्रसिद्ध होऊ लागले.

पण हे मासिकही कसोटीच्या क्षणी कचखाऊ निघाले. त्याच्या बुद्धिवादाच्या मध्यमवर्गीय मर्यादा त्या निमित्ताने स्पष्ट 

होत गेल्या. रघुनाथरावांचा ‘विनय म्हणजे काय?’ हा लेख ‘खबर’ने न छापता परत केला. विनय म्हणजे एक सामाजिक ढोंग असून पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या नग्न शरीराकडे तटस्थ पाहण्यास लाज वाटण्यासारखे काही नाही असे नग्नतेचे समर्थन त्यांनी त्यात केले होते.

‘किर्लोस्कर खबर’ने हा लेख न छापणे ही एक प्रकारची दृष्टापत्रीच ठरली. रघुनाथरावांनी स्वतःच्या मालकीचे ‘समाजस्वास्थ्य’ हे नवे मासिक सुरू केले. त्याच्या पहिल्याच अंकात ‘विनय म्हणजे काय?’ हा लेख प्रसिद्ध झाला. 

‘समाजस्वास्थ्य’ ही महाराष्ट्राला एक ‘शॉक ट्रीटमेंट’च ठरली.   

संबंधित बातम्या