अस्सल आणि आरपार

डॉ. सदानंद मोरे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

(किर्लोस्कर) ‘खबर’शी फारकत घेऊन र. धों.नी आपल्या स्वतःच्या मालकीचे ‘समाजस्वास्थ्य’ मासिक सुरू केले आणि त्यामुळे ते त्यांना हवा असलेला मजकूर छापायला स्वतंत्र झाले. त्यांनी या मासिकातून संततीनियमनाचा पुरस्कार व प्रचार केला. इतकेच नव्हे, तर संततीनियमनाचे केंद्र स्वतःच्या घरी चालवून गरजूंना साधनेही उपलब्ध करून दिली. कामजीवनाशी निगडित समस्यांची उत्तरे ते ‘समाजस्वास्थ्य’मधून देत. त्याचप्रमाणे केंद्रात म्हणजे घरी आलेल्या जिज्ञासूंना आणि गरजूंना सल्ला देत.

अर्थात र.धों.चे नाव जे काही थोड्याफार प्रमाणात लोकांना माहीत असते ते त्यांनी केलेल्या पायाभूत अशा संततीनियमनाच्या कार्यामुळे. या क्षेत्रातील आद्यत्वाचा मान त्यांचाच. परंतु तेव्हा त्यांच्या या कार्याचीही उपेक्षाच झाली. पुढे म्हणजे र.धों.च्या मृत्यूनंतरच लोकसंख्यावाढीच्या संकटाची जाणीव जागतिक पातळीवर होऊ लागली, ती भारतातही झाली. त्यानंतर लोकसंख्या नियंत्रणाचा म्हणजेच संततीनियमनाचा कार्यक्रम सरकारी पातळीवर राबविण्यात येऊ लागला. तेव्हा कोठे र.धों. च्या मोठेपणाची जाणीव होऊ लागली. आणीबाणीच्या काळात संजय गांधींनी व त्यांच्या अनुयायांनी याबाबतीत केलेल्या अतिरेकी कृत्यांचा धसका घेऊन नंतर सरकारी पातळीवरही या कार्याविषयीचा उत्साह मंदावला. आता जे काही होत असेल ते शिक्षणाचा व जागृतीचा परिणाम म्हणून. अर्थात ते पुरेसे नाहीच. त्यासाठी शासनाचा उत्साही हस्तक्षेपच आवश्‍यक आहे.

र.धों.नी जेव्हा संततीनियमनाचे कार्य सुरू केले तेव्हा त्यांना ना समाजाचा पाठिंबा होता ना सरकारचे पाठबळ. इतकेच काय, परंतु समाजातील स्वतःला बुद्धिनिष्ठ व बुद्धिवादी म्हणविणाऱ्या मातब्बरांचीही त्यांना सहानुभूती नव्हती. या काळातील बुद्धिवाद्यांचे एकमेव लक्ष्य महात्मा गांधी हे होते. एम.एन.रॉयपासून न.चिं.केळकरांपर्यंतच्या बुद्धिवाद्यांनी गांधींच्या विचारांमधील तार्किक विसंगती उघडकीला आणून गांधी बुद्धिवादी नाहीत हे दाखवून देण्यातच आपापल्या बुद्धीचा उपयोग चालविला होता. विशेष म्हणजे रॉयना जेवढा पाठिंबा बंगालमध्ये मिळत नव्हता तेवढा महाराष्ट्रातून  मिळत होता.

रॉय यांच्या कारकिर्दीचे दोन भाग पडतात. पूर्व भागातील रॉय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. थेट लेनिन-स्टॅलिनच्या मांडीला मांडी लावून कम्युनिस्ट पक्षाचे आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्यात त्यांचा सहभाग होता.

उत्तरार्धातील रॉय यांनी पूर्णपणे घूमजाव केले. कम्युनिस्ट विचार लोकशाहीच्या विरुद्ध असल्याचा साक्षात्कार झालेल्या रॉय यांनी दुसरे टोक गाठून ‘रॅडिकल डेमॉक्रसी’च्या गोष्टी सुरू केल्या. आता या दोन्हीही टप्प्यांवर रॉय बुद्धिवादावर दावा करीत होते हे विशेष. रॉय यांच्या प्रभावात त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील रुबाबदारपणाचा (करिष्मा) मोठा हिस्सा असल्याचे त्यांच्या मराठी अनुयायांनी कबूल केले आहे. पण तो मुद्दा वेगळा. वस्तुस्थिती अशी आहे, की कम्युनिस्टांनी बौद्धिक कसरत करीत परिस्थितीचा अन्वयार्थ लावण्याचे एक प्रभावी पद्धतिशास्त्र विकसित केले. हाच आमचा बुद्धिवाद असल्याचा त्यांचा दावा होता. पण मौजेची गोष्ट ही, की या सर्व पद्धतिशास्त्राचा, बुद्धिवादाचा मूलाधार मार्क्‍सचे ग्रंथ हाच होता. म्हणजेच त्यांनी मार्क्‍सच्या साहित्याची जणू पोथीच केली. पोथी ही पोथीच असते मग ती वेदांची असो किंवा मार्क्‍सच्या ‘दास कॅपिटल’ची ! मार्क्‍सवादी पद्धती ही वैज्ञानिक (म्हणजेच बुद्धिवादी) नसल्याचे प्रसिद्ध तत्त्ववेत्ते कार्ल पॉपर यांनी १९२०-२१ च्या दरम्यान दाखवून दिले होते. पॉपरच्या मते कोणत्याही सिद्धांताला विज्ञानाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी तो सिद्धांत कोणत्या परिस्थितीत असत्य समजून त्याचा त्याग करण्याची तयारी आहे हे संबंधित वैज्ञानिकांनी तो सिद्धांत मांडतानाच स्पष्ट करायला हवे. तसे नसेल तर तो सिद्धांत वैज्ञानिक नव्हे. सिद्धांताच्या विरोधी जाणारा पुरावा पुढे आला तर त्या सिद्धांताचा त्याग करण्याऐवजी ही मंडळी त्या सिद्धांतात तात्पुरती डागडुजी करतात व वेळ मारून नेतात. मार्क्‍सवादी सिद्धांताच्या विरोधी जाणारे किती तरी पुरावे सोव्हिएत रशियाच्या निर्मितीपासून त्याच्या   काळापर्यंत म्हणजे जवळपास सत्तर वर्षे पुढे येत राहिले; पण त्याकडे दुर्लक्ष करून बुद्धिवादी मार्क्‍सवादी सिद्धांताची डागडुजी करीतच राहिले. या कामात जो जास्त बुद्धी वापरतो तो मोठा मार्क्‍सवादी, असा त्यांचा दावा असे.

याचा अर्थ असा नाही, की भारतामधील कम्युनिस्टांनी गरिबांचा कैवार घेऊन त्यांच्यासाठी जे कष्ट केले, क्‍लेश सोसले, त्याग केला ते निरर्थक होते किंवा त्यामुळे काही फायदा झाला नाही. मुद्दा एवढाच आहे, की हे करताना त्यांनी आपण बुद्धिवादी असून, आपला सिद्धांत वैज्ञानिक आहे असा जो दावा केला होता, तो टिकणारा नाही. कर्वे ज्या वेळी वाढत्या लोकसंख्येच्या समस्येकडे लक्ष वेधून संततीनियमनाचा प्रसार करीत होते, तेव्हा मार्क्‍सवादी मंडळी मार्क्‍सने मास्थस या अर्थशास्त्रज्ञानाचा प्रतिवाद करताना लोकसंख्येचा प्रश्‍न हा खरा प्रश्‍न नसल्याचे म्हटले होते त्याचाच पुनरुच्चार करीत होते. रशियन कम्युनिस्टांच्या वर्चस्वाखाली जाऊन कम्युनिस्टांनी मार्क्‍सला जणू ज्युडो-ख्रिश्‍चन परंपरेतील, मोझेस, जीझस यांच्यासारखे एक प्रेषितच बनवून टाकले. आपले काम उरते ते या प्रेषिताच्या वचनांचा अन्वयार्थ लावायचा. त्यासाठी बौद्धिक कसरती करायच्या.

ज्यांना मार्क्‍स सोडवत नव्हता पण पुरेसाही वाटत नव्हता, अशा मराठी विचारवंतांनी मार्क्‍सला  मनोविश्‍लेषक फ्रॉइड आणि अनुभववादी ब्रिटिश तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांची जोड देऊन बुद्धिवादाचे एक वेगळेच रसायन सिद्ध केले. त्याचे नाव ‘नवमतवाद.’

केसरीकार न. चिं. केळकर यांच्या विचारांना बुद्धिवादी म्हणायचे असेल, तर मुळात ‘बुद्धिवाद’ या शब्दाचा अर्थ व्यावहारिक शहाणपण असा घ्यावा लागेल आणि व्यावहारिक शहाणपण म्हणजे आपल्या पोटातले पाणीही हलू न देता सामाजिक, राजकीय बदल घडवून आणायचा असा असेल तर गांधींचे जाऊ द्या, पण शिवाजी महाराजांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत कोणीही थोर पुरुष बुद्धिवादी ठरणार नाही?

महाराष्ट्राच्या या बुद्धिवादाची कल्पना यावी असे वाटत असेल तर प्रभाकर पाध्ये आणि श्री. रा. टिकेकर यांनी लिहिलेले ‘आजकालचा महाराष्ट्र’ हे पुस्तक पाहावे. या पुस्तकात लेखकद्वयीने असे विधान केले आहे, की महाराष्ट्रात बुद्धीशिवाय काहीच पिकत नाही !

याचा अर्थच असा होतो, की महाराष्ट्रातील विद्वानांना आपण बुद्धिवादी असल्याची नुसती जाणीवच नव्हती, तर त्या जाणिवेला एक दर्प होता. त्याला अहंकार म्हटले तरी चालण्यासारखे आहे. या अहंकाराचा एक परिणाम म्हणजे इतरांकडे तुच्छतेने पाहणे. या तुच्छतावादाचा फटका गांधीवाद्यांनाच काय, पण खुद्द गांधींनाही बसल्याशिवाय राहिला नाही.

राजकारणाच्या क्षेत्रात याच बुद्धिवादाला मुत्सद्देगिरी असे म्हणतात. महाराष्ट्राला समर्थ रामदास, नाना फडणीस, लोकमान्य टिळक अशी मुत्सद्देगिरीची ऊर्फ बुद्धिवादाची परंपरा लाभली असून, त्याला राजकारणाचे धडे गिरविण्यासाठी अशी कोणतीही परंपरा नसलेल्या गांधींची कास धरायचे कारण नाही असा समज तेव्हाच्या बुद्धिमान लोकांनी करून घेतला होता.

आता स्वतः पाध्ये यांच्या बुद्धिवादावरील निष्ठेचा विचार केला तर त्यांनी त्या काळात र. धों. कर्वे यांच्या मागे उभे राहून त्यांचे समर्थन करायला हरकत नव्हती; परंतु तसे काही झाल्याचे दिसून येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

आता गांधी आणि गांधींच्या अनुयायांच्या भूमिकेचा विचार केला तर मुळात त्यांची सुरवातच मानवी बुद्धीच्या मर्यादा ओळखून अंतःकरणाच्या शुद्ध सात्त्विक अवस्थेतील अंतःप्रेरणांना प्रतिसाद देण्यापासून झालेली असल्यामुळे त्यांनी आपल्यावरील टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी बुद्धिवादाचा आश्रय घेणे संभवतच नव्हते. या अंतःप्रेरणेची अथवा आतल्या आवाजाची टवाळी करणे ही या काळातील एक फॅशनच झाली होती. 

साहजिकच बऱ्याच मंडळींना गांधी हे एक भोळेभाबडे, सरळ, सत्प्रवृत्त गृहस्थ वाटायचे. राजकारण हा त्यांचा प्रांतच नव्हे अशी त्यांची धारणा होती. राजकारणी हा आतल्या गाठीचा, पाताळयंत्री, कारस्थानी, या कानाची खबर त्या कानाला लागू न देणारा कोणीतरी; असेही त्यांना वाटे. गांधींनी भारताचे राजकारण नासवले या निष्कर्षापर्यंत यायला त्यांना काहीच अडचण नव्हती. गांधीवादी हा महाराष्ट्रातील मध्यमवर्गासाठी कुचेष्टेचा विषय बनला होता आणि मध्यमवर्गीय माणूस स्वतःला बुद्धिवादी मानत होता हे त्याचे कारण होय. पु. ल. देशपांडे यांचे ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे आपण जाणतो. नाटक म्हणून ती एक चांगली कलाकृती असेलही; पण या प्रतिसादामागे आपण स्वतः बुद्धिवादी असल्याचा समजही प्रबळ होता हे लक्षात घ्यायला हवे.

स्वतः र. धों.नीही गांधींच्या विचारांवर टीका केली होती आणि मुख्य म्हणजे ती बुद्धिवादी दृष्टिकोनातूनच केलेली होती. फरक असा आहे, की र. धों.चा बुद्धिवाद हा अस्सल आणि आरपार (genuine and thorough) बुद्धिवाद असल्यामुळे त्यांना तशी टीका करण्याचा नैतिक हक्क होता. इतर अनेकांचे बुद्धिवाद हे अर्धेकच्चे व धरसोडीचे होते. त्यामुळे  हे लोक गांधींवर ज्या प्रकारचे आक्षेप घेत होते त्याच प्रकारचे आक्षेप त्यांच्यावरही घेण्यासारख्या जागा त्यांच्या विचारात शोधणे अवघड जात नसे. तसे र. धों.नी घेतलेल्या आक्षेपांबद्दल म्हणता येणार नाही.

गांधींच्या राजकीय शैलीविषयी र. धों. समाधानी नव्हते; पण ते त्यांचे क्षेत्र नसल्यामुळे त्यांनी या असमाधानाचा फारसा विचार केलेला दिसत नाही. तथापि, गांधी जेव्हा माणसाच्या कामजीवनाबद्दल  अधिकारवाणीने  आपली मते व्यक्त करू लागले तेव्हा मात्र र.धों. गप्प बसणे शक्‍य नव्हते.

मुळात गांधी आणि र.धों. यांचे मानवी जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोनच भिन्न होते. गांधी मानवी जीवनातील संयम या घटकाला अत्यंत महत्त्व देत असत. स्त्री-पुरुष संबंध केवळ प्रजोत्पादनापुरतेच मर्यादित असावेत. ‘लैंगिक सुख’ हा शब्दप्रयोगच त्यांना मानवणारा नव्हता. साहजिकच ते ब्रह्मचर्याचा पुरस्कार करीत. र.धों.च्या मते हा एकूणच प्रकार मानवी स्वभावाविरुद्ध व अवैज्ञानिक आहे याचा अर्थ र.धों. स्वैराचाराचे किंवा मुक्त संबंधांचे पुरस्कर्ते होते असा मात्र नव्हे. स्त्री-पुरुष संबंध ही सज्ञान स्त्री-पुरुषांच्या सहमतीची गोष्ट आहे. त्यांच्यावर विवाहादि सामाजिक संस्थांनी, धार्मिक संस्कारांनी, कायद्याच्या कलमांनी किंवा आध्यात्मिक उन्नतीच्या नावाखाली या स्वाभाविक प्रेरणेला दाबून टाकणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे आणि मुख्य म्हणजे या आरोग्यात वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रकारच्या स्वास्थ्यांचा समावेश होतो.

र.धों. ‘समाजस्वास्थ्य’च्या माध्यमातून आपले नाजूक विषयांसंबंधीचे गंभीर विचार वैज्ञानिक पद्धतीने मांडत होते. त्या वेळी ना. सी. फडके मध्यमवर्गीय तरुण-तरुणींचे प्रणयकथा लिहून स्वप्नरंजन करीत होते, तर दुसरीकडे मराठीत कामजीवनासंबंधीची पिवळी पुस्तकेही अवतीर्ण होऊ लागली होती. समाजस्वास्थ्याऐवजी चोरून वाचायची ही अवास्तव व अवैज्ञानिक पुस्तके पसंत करीत. यावर वेगळे भाष्य करायला नको. 

संबंधित बातम्या