महाराष्ट्रातील धर्मचिकित्सा

डॉ. सदानंद मोरे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

धर्मचिकित्सा हा सर्व सर्व चिकित्सांचा प्रारंभ असल्याचे कार्ल मार्क्‍सने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर स्पष्ट केले होते. युरोप खंडाला तर ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांच्या, तसेच ख्रिस्ती धर्मातीलच प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक या पंथांच्या संघर्षाचा मोठा इतिहास आहे. ज्यू धर्मीयांचे शोषण व छळ हा एक वेगळाच मुद्दा ठरतो. शिवाय धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील सत्तासंघर्षही कमी महत्त्वाचा नव्हता. थोडक्‍यात सामाजिक व राजकीय क्षेत्रातील धर्माचा प्रभाव दुर्लक्षणीय असा कधीच नव्हता.

अर्थात स्वतः मार्क्‍सच्या विचारव्यूहात धर्माला एक वेगळा आयाम आहे. मार्क्‍सच्या मतानुसार इतिहासामधील मुख्य संघर्ष हा वर्गावर्गांमधील संघर्ष असून; तो मूलतः आर्थिक स्वरूपाचा असतो. जगाच्या ताब्यात उत्पादनाची साधने आहेत तो वर्ग अशा साधनांपासून वंचित असलेल्या वर्गाचे आर्थिक शोषण करतो. त्यामुळे शोषक आणि शोषित वर्गांमधील संघर्ष अपरिहार्य ठरतो.

पण या शोषणात वा संघर्षात धर्माचा मुद्दा कोठे येतो असे कोणीही विचारेल. मार्क्‍सच्या मतानुसार समाजातील अनेक व्यवहारांमधील उत्पादनाच्या म्हणजेच आर्थिक व्यवहार सर्वांत महत्त्वाचा, मूलभूत व निर्णायक असतो. हा व्यवहार म्हणजे त्या समाजाचा आर्थिक पाया होय. या पायावरच समाजातील वैचारिक इमला उभा असतो. साहित्य, कला, तत्त्वज्ञान, नीती आणि मुख्य म्हणजे धर्म या अन्य सर्व गोष्टी या वैचारिक इमल्याचा अथवा ऊर्ध्ववास्तूचा भाग होय. ज्या वर्गाकडे उत्पादनाच्या पायाचे नियंत्रण असते त्याला वैचारिक (Ideological) इमल्याचे नियंत्रण करणे सहज शक्‍य होते. भौतिक उत्पादनकर्ता विचारांचा म्हणजेच कल्पनांचाही उत्पादक ठरतो तो असा. आता हा वर्ग अशाच प्रकारच्या कल्पना प्रसृत करणार, की ज्यात त्याच्या स्थानाला पोषक व पूरक ठरतील. म्हणूनच व्यवस्थेचे व व्यवस्थेतील शोषणाचे समर्थन करतील. इतकेच नव्हे, तर शोषित वर्गाला त्याच्या शोषणाची जाणीवच निर्माण होऊ नये, अशा व्याज जाणिवेचीही (False Consciosness) निर्मिती करतील. समाजातील नीतिकल्पना, साहित्य हे अशा प्रकारे व्यवस्थेला सावरणारे, टिकविणारे असते. उत्पादन संबंधांची पुनर्निर्मिती होऊन ते अबाधित राहणे त्याच्यामुळे शक्‍य होते.

धर्म हा सुद्धा याच वैचारिक ऊर्ध्ववास्तूचा भाग आहे. साहित्य, कला, नीती या वैचारिक इमल्याच्या अन्य भागांपेक्षा धर्माचे वैशिष्ट म्हणजे तो व्यवस्थेभोवती एक प्रकारचे पावित्र्यवलय तयार करतो. त्यामुळे व्यवस्थेला अनैतिक, दैवी समर्थन मिळून ती स्थिर राहण्यास मदत होते. साहजिकच व्यवस्था मोडून काढून शोषण संपुष्टात आणायचे असेल, तर पहिल्यांदा तिच्याभोवतीचे पावित्र्यवलय भेदले पाहिजे. म्हणजेच धर्माला भिडले पाहिजे. धर्मचिकित्सा केली पाहिजे.

फसवणुकीचे आणि पिळवणुकीचे साधन म्हणून धर्माचा उपयोग केला जाऊ शकतो म्हणून धर्माची चिकित्सा करणाऱ्यांमध्ये संत एकनाथांना अग्रक्रम द्यावा लागेल. एकनाथांनी वेगवेगळ्या धर्मांमधील व पंथांमधील दुष्प्रवृत्तींवर टीका केली तर केलीच, पण धर्म या संस्थेचेही विश्‍लेषण केले. धर्माला शारीरिक, वाचिक, मानसिक आणि आर्थिक बाजू असतात हे स्पष्ट केले. धर्माचे पोटा, खोटा, अव्हाटा असे प्रकार करून समकालिनांना सावध केले.

आधुनिक काळात अशा प्रकारची धर्मचिकित्सा महात्मा जोतिराव फुले यांनी केली. धर्माच्या नावाखाली अडाणी शूद्रातिशूद्रांची फसवणूक कशी होते यावर प्रकाश टाकला.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रात चिकित्सेची सुरुवातही धर्मचिकित्सेतून झाली असे म्हणण्यास अडचण नाही. आपली सामाजिक व राजकीय दुर्गती झाली असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याला कारण धर्माची दुर्गती आहे असे तेव्हाच्या विद्वानांच्या ध्यानात आले. फुले हे त्यांच्यातील एक, तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख दुसरे.

आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांचेही नाव या संदर्भात घ्यावे लागते. दयानंदांनी हिंदू धर्माचे स्पर्धक असलेल्या ख्रिस्ती, मुसलमान यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे ज्याला पौराणिक हिंदू धर्म म्हणता येते त्याची तर त्यांनी सालटीच काढली असे म्हणावे लागते. त्यांनी प्राचीन काळातील आर्यांच्या धर्माचे म्हणजेच वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. रानडे भांडारकरांच्या प्रार्थना समाजातील धुरीणांनीही सौम्य व आणि नेमस्त पद्धतीने का होईना धर्मचिकित्सा केलीच केली.

अर्थात उपरोक्त सर्व विचारवंतांचा कल धर्मशुद्ध व धर्मसुधारणांकडे होता. त्यांच्या धर्मचिकित्सेत बुद्धीचा पुरेसा वापर केला गेला असला, तरी त्यांची गणना बुद्धिवादी या कोटीत केली जात नाही किंवा त्यांच्या विचारांनाही बुद्धिवाद असे म्हटले जात नाही. याचे कारण एवढेच, की ते सर्व धर्म मानणारे होते आणि बहुतेक ईश्‍वराच्या अस्तित्वावर विश्‍वास ठेवणारे होते. बुद्धिवादी पद्धतीने धर्मचिकित्सा करणारा पहिला विचारवंत म्हणून अर्थातच गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव घ्यावे लागते. उत्क्रांतिवादाचा पुरस्कार करणाऱ्या आगरकरांना धर्म ही गोष्ट आता कालबाह्य झाली आहे असेच वाटत होते. तथापि, आपल्याला हव्या असणाऱ्या सुधारणांच्या आड येणारा जबरदस्त प्रतिरोधक या नात्याने धर्माची दखल घेणे त्यांना भाग पडले आणि तेवढ्यापुरती धर्मचिकित्सा त्यांनी हिरिरीने केली. या अर्थाने र. धों. कर्वे, आगरकरांचीच परंपरा पुढे नेत होते असे म्हणता येते.

महाराष्ट्रातील मार्क्‍सवाद्यांनाही, (मार्क्‍सचेच तत्त्व अंगीकारल्यामुळे) धर्मचिकित्सा टाळता आली नाही. त्यांचाही दावा आपण बुद्धिवादाचीच कास धरून धर्मचिकित्सा करीत असल्याचाच होता. तथापि, त्यांनी मार्क्‍सवाद हाच खरा बुद्धिवाद असल्याची संकुचित भूमिका घेतली, तर तिकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मच नाकारू पाहात असणाऱ्या मार्क्‍सवादावर टीका करीत त्याची ही भूमिका चुकीची असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनीही धर्मचिकित्सा केली. आपण ही चिकित्सा बुद्धिवादाच्या अंगाने करीत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. अर्थात त्यांच्या बुद्धिवादाला बौद्ध धर्म स्वीकार्य वाटला. पण याचा अर्थ असाही होतो, की त्यांचा बुद्धिवाद बौद्ध धर्माच्या सीमेत बंदिस्त झाला.

याचा अर्थ असा नाही, की हिंदू धर्माच्या चौकटीत राहून त्याची बुद्धिवादी चिकित्सा कोणी केली नाही. दयानंदांच्या चिकित्सेला वेदप्रामाण्याचे कुंपण होते. विसाव्या शतकातील वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत मात्र हिंदू धर्माच्या बुद्धिवादी चिकित्सेची जी परंपरा सुरू झाली तिच्यातून वेदही सुटू शकले नाहीत. या परंपरेचे एक पर्यवसान म्हणजे बुद्धिवादाचा आश्रय घेत आधी मार्क्‍सवादाचा आणि नंतर रॉयवादाचा आश्रय घेत त्यांचा अंगीकार करणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी.

नारायणशास्त्री मराठे उपाख्य स्वामी केवलानंद यांनी स्थापन केलेल्या प्राज्ञ पाठशाळेत परंपरेचे डोळस शिक्षण दिले जाई. विशेष धर्म ही एक प्रवाही वस्तू असून तिच्यात कालमानाप्रमाणे परिवर्तन घडवून आणावे लागते ही या वाईकरांची भूमिका होती. या भूमिकेला अनुसरूनच त्यांनी धर्मनिर्णय मंडळाची स्थापना केली. अस्पृश्‍यतेला शास्त्राधार नसल्याचे स्पष्टपणे प्रतिपादन करून या मंडळात तयार झालेल्या विचारवंतांनी महात्मा गांधींच्या अस्पृश्‍यनिवारण चळवळीला वैचारिक पाठबळ दिले. या अर्थाने त्यांनी समाजसुधारणांचे पौरोहित्य केले असे म्हणायला हरकत नाही.

या संदर्भात नागपूरच्या केशव लक्ष्मण तथा भाऊजी दप्तरी यांचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे. वाईसंप्रदायाशी संबंध असल्याने हिंदू धर्म प्राचीन काळी कसा प्रवाही व परिवर्तनशील होता हे दाखवायचा प्रयत्न केला. त्यांच्या मते सप्तर्षी ही अशा प्रकारचे परिवर्तन करणाऱ्या वैचारिक नेत्यांची संस्था होती. दर चार वर्षांनी या सप्तर्षींची सभा भरून तिच्यात धर्मनिर्णय केले जात व आवश्‍यकतेनुसार फेरफारही घडविले जाते. हा सर्व व्यवहार अर्थातच बुद्धिवादी पद्धतीने चालत असे.

वाई संप्रदायाचे आणखी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे पं. महादेवशास्त्री दिवेकर. दिवेकरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्या काळात बोकाळलेल्या बुवाबाजीवर चढविलेले हल्ले. दिवेकर शास्त्री यांना या काळात शं. वा. किर्लोस्कर आणि कंपनीच्या किर्लोस्कर या मासिकाची मोलाची साथ मिळाली याचीही नोंद घ्यायला हवी. या झटापटीत काही प्रकरणांच्या कोर्टकचेऱ्या झाल्या पण ही मंडळी हटली नाहीत.

किर्लोस्कर मासिक हे स्वतःच एक संप्रदाय (school) होते असे म्हणायला हरकत नाही. अर्थात हा संप्रदाय बुद्धिवादाचा संप्रदाय होता. हा बुद्धिवाद तेव्हाच्या नवशिक्षित मध्यमवर्गाने उचलून धरलेला दिसतो. या संप्रदायातील अनेक मंडळी गांधींच्या विचारांनाही बुवाबाजीच्या सदरात टाकीत. एवढा अतिरेक सोडला तर त्यांचे कार्य महत्त्वाचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रुढींवर बुद्धिवादी पद्धतीने चढविलेल्या वैचारिक हल्ल्यांनाही किर्लोस्करने यथोचित स्थान दिले.

किर्लोस्करची बुवाबाजीवरील हल्ल्याची परंपरा एक अर्थाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुनरुज्जीवित केली असे म्हणता येते. त्याला त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन असे नाव दिले. अर्थात त्यांच्या चळवळीत किर्लोस्करपेक्षा बरेच काही अधिक होते. एक मुद्दा असा, की किर्लोस्करला व्यापक लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही. तो मध्यमवर्गीयांचाच खेळ राहिला. दाभोळकरांनी एक व्यापक चळवळच उभी केली.

ते काहीही असो, सनातन्यांचा अड्डा व परिवर्तनवाद्यांचे केंद्र अशी वाई शहराची दोन्ही रूपे महाराष्ट्राला एकाच वेळी पाहायला मिळाली ही एक विशेष बाब मानावी लागते.

आणखीही एका गोष्टीची नोंद घ्यायला हवी. स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रात आणखी एक परिवर्तन घडले. हे परिवर्तन राजकीय होते. बहुजनसमाजाकडे झालेले राजकीय सत्तेचे संक्रमण हे ते परिवर्तन होय.

यशवंतराव चव्हाण हे त्या परिवर्तनाचे प्रतिनिधी होत.
यज्ञसंस्थेचे पारंपरिक रूपक वापरून सांगायचे झाल्यास- महाराष्ट्रातील या राजकीय यज्ञाचे यजमान यशवंतराव होते. यज्ञाचे पौरोहित्य करण्याचे कार्य तर्कतीर्थांनी केले.

संबंधित बातम्या