कम्युनिस्ट, बाबासाहेब व धर्म

डॉ. सदानंद मोरे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

भारताच्या राज्यघटनेने ‘सेक्‍युलॅरिझम’चे तत्त्व स्वीकारले आहे, हे आपण, सर्वच जाणतो. सेक्‍युलॅरिझम या संकल्पनेचा नेमका अर्थ काय करायचा याविषयी दोन मतप्रवाह आहेत. एका प्रवाहानुसार सेक्‍युलॅरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता याचा अर्थ धर्माविषयीची उदासीनता, तटस्थता, राज्याचा स्वतःचा असा विशिष्ट धर्म नसणे, धर्माने नागरी जीवनामध्ये हस्तक्षेप न करणे व राज्यसंस्थेने कोणत्याही धर्माचा पुरस्कार न करणे.

सेक्‍युलॅरिझमचा दुसरा अर्थ ‘सर्वधर्मसमभाव’ असा घेतला जातो. धर्मनिरपेक्षता हा काहीसा नकारात्मक शब्द आहे. ‘सर्वधर्मसमभाव’ शब्द सकारात्मक असून, तो सर्वच धर्माकडे सारख्या आदरभावाने पाहणे व त्यांना तसे वागविणे ध्वनित करतो. विशिष्ट धर्माला पुरस्कृत करतो वा झुकते माप देणे हे सर्वधर्मसमभावाच्या संकल्पनेतही बसत नाही.

अशा घोटाळ्याचे मुख्य कारण म्हणजे सेक्‍युलॅरिझमची संकल्पना युरोपखंडात विकसित झाली. युरोपची ऐतिहासिकता आणि भारताची ऐतिहासिकता यांच्यात भेद आहे. युरोपात ख्रिस्ती धर्माच्या चर्चचे म्हणजे सर्वोच्च धर्माधिकारी असलेल्या पोपचे वर्चस्व लक्षणीय होते. पोप आपल्याकडे असलेल्या धर्मसत्तेच्या जोरावर वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांना म्हणजेच राजकीय सत्ताधीशांना, राजांना वेठीला धरू शकत होता. पोपच्या संमतीशिवाय राजाच्या कितीतरी कृत्यांना अधिमान्यता मिळत नसे. अशा वेळी युरोपमधील राजसत्तांनी आपल्या स्वायत्त अधिकारक्षेत्राच्या स्वायत्ततेची घोषणा केली. पोपने आपल्या क्षेत्रात म्हणजे धर्माच्या अलौकिक प्रांतात सत्ता गाजवावी, त्याने राजाच्या लौकिक प्रांतात हस्तक्षेप करायचे कारण नाही. ते स्वायत्त आहे व त्यावर राजसत्तेचेच आधिपत्य असेल. राजसत्तेच्या या भूमिकेला ‘सेक्‍युलर’ असे म्हटले गेले. भारत देशात ‘राजसत्ता’ आणि ‘धर्मसत्ता’ यांच्यात या प्रकारचा संघर्ष झाला असे दिसत नाही. वैदिक धर्मात शंकराचार्यांचे प्रस्थ जरूर होते, पण त्यांच्या संमतीशिवाय राजाचे पानही हलू नये अशी स्थिती केव्हाच नव्हती. (बौद्ध व जैन धर्मात तर अशी पीठेही अस्तित्वात नव्हती.) स्वतः राजाचा असा स्वतंत्र धर्मगुरू किंवा आचार्य किंवा पुरोहित असे. त्याला पुरेशी प्रतिष्ठा होती, यात शंका नाही. तथापि, ती इतकीही नव्हती, की जिच्यामुळे राजावर दाती तृण धरून त्याला शरण जायची पाळी यावी. प्रसंगी राजाने मूळ पुरोहिताला बाजूला सारून दुसऱ्या कुळातील पुरोहित नेमला अशीही उदाहरणे सापडतात. राजाला राज्याभिषेक करताना पुरोहित राजाच्या राजदंडापेक्षा आपला धर्मदंड अधिक सामर्थ्यवान असल्याचा दावा करीत असे व आपण स्वतः राजदंडाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर असल्याचेही घोषित करीत असे. तथापि, हा एक प्रकारचा अर्थवादच म्हणायला हवा. व्यवहारात पुरोहितांना, आचार्यांना वा गुरूंना आपल्या चरितार्थासाठी राजाकडून मिळणाऱ्या वृत्तींवर, इनामांवर अवलंबून राहावे लागले. त्यांची संपत्ती पोपच्या संपत्तीच्या तुलनेत नगण्य असे. किंबहुना असा निःस्पृहपणे व अनुषंगाने येणारे दारिद्र्य (हा शब्द शब्दशः घेऊ नये) हेच त्यांचे भांडवल असे.

या प्रकारामुळे भारतातील सेक्‍युलॅरिझम राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्यातील संघर्षातून विकसित होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नव्हता. भारतात ही संकल्पना रुजली, ती ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळात रुजलेल्या समता, स्वातंत्र्य व बंधुता या संकल्पनांच्या बरोबरीने हिंदू आणि मुसलमान या दोन धर्मांमधील संघर्षाची व्यवस्था लावण्यासाठी काँग्रेसमधील हिंदू धर्मियांनी ही संकल्पना आत्मसात करून तिला वेगळा व सकारात्मक आशय दिला.

ब्रिटिशांनी भारत घेईपर्यंत भारतात काही शतके मुसलमानांची सत्ता होती. ती संपुष्टात आणून भारतात आपले सार्वभौमत्व स्थापन करण्याचा मराठ्यांचा प्रयत्न यशस्वी होण्याची चिन्हे होती. तथापि, ब्रिटिशांच्या आगमनामुळे इतिहासाचा प्रवाह बदलला व ब्रिटिश भारताचे सत्ताधीश बनले. कालौघात ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून स्वतंत्र होण्याची इच्छा भारतीयांच्या मनात उत्पन्न होणे स्वाभाविकच होते. मात्र स्वतंत्र भारतात आपण अल्पसंख्याक झाल्यामुळे आपल्यावर बहुसंख्य हिंदूंच्या वर्चस्वाखाली नांदायची वेळ येईल, अशी भीती एकेकाळी या भूमीवर राज्य केलेल्या मुसलमानांना वाटणेही तितकीच स्वाभाविक होते. सेक्‍युलॅरिझम हे येथील हिंदू बहुसंख्य असलेल्या काँग्रेसने मुसलमानांना आश्‍वस्त करण्यासाठी शोधलेले उत्तर होय. परत या उत्तराचा अर्थ युरोपप्रमाणे धर्मसत्तेची व्याप्ती पारलौकिक व्यवहारापुरती मर्यादित ठेवायची असा असेल तर ते इस्लामच्या मूल तत्त्वांशी विसंगत असल्यामुळे तो मुसलमानांना मान्य होणे शक्‍यच नव्हते. त्यातून सर्वधर्मसमभावाची कल्पना पुढे आली. अर्थात तरीही शेवटी पाकिस्तान व्हायचे ते झालेच ! पण तो वेगळा मुद्दा. या संदर्भात आणखी एक मुद्दा स्पष्ट करायची गरज आहे. मार्क्‍सचा विचार मानणारे मार्क्‍सवादी ज्यांची कम्युनिस्ट किंवा साम्यवादी अशी ओळख असते, सेक्‍युलर आहेत असे अनेकांना वाटते, पण हे वाटणे चुकीचे आहे. मार्क्‍सवादामध्ये मुळात धर्म ही संस्थाच शोषक वर्गाच्या हातातील एक वैचारिक (Ideolegical) हत्यार मानले गेल्यामुळे नाकारण्यात आलेली आहे. सेक्‍युलॅरिझममध्ये धर्मसंस्था नाकारण्यात आलेली नसून, केवळ धर्माचे अधिकारक्षेत्र मर्यादित करण्यात आलेले आहे, ते म्हणजेच पारलौकिकाचे क्षेत्र ओलांडून ऐहिक व्यवहाराच्या क्षेत्रावर अतिक्रमण करू नये असे सेक्‍युलॅरिझमला, या अर्थाने इहवादाला अभिप्रेत आहे. मार्क्‍सवादात मात्र व्यक्तींमध्ये उफराटी जाणीव निर्माण करणाऱ्या धर्मसंख्येचेच उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यांचे हे ध्येय मार्क्‍सवादी पद्धतीचाच एक भाग आहे. किंवा या पद्धतीतून निष्पन्न झालेले आहे असे म्हणता येते. सेक्‍युलर विचारांचा पुरस्कार करणाऱ्यांमध्येही धर्मउच्छेद इच्छिणारे काही कट्टर असतात, नाही असे नाही पण, त्यांचा हा धर्मविरोध त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या बुद्धिवादातून निष्पन्न होतो. त्यांच्यासाठी मार्क्‍सवादावर पूर्ण विश्‍वास ठेवून तो जसाच्या तसा स्वीकारणे हे बुद्धिवादाशी विसंगत आहे. याउलट मार्क्‍सवादी आपला विचार हाच खरा व परिपूर्ण बुद्धिवाद असल्याचे सांगतात. मात्र, त्यांच्या विचारांची एकूण मांडणी पाहिली असता, तो एक प्रकारचा नास्तिक म्हणजे देव न मानणारा धर्मच वाटतो. एखाद्या धर्माच्या अनुयायांचा आपल्या प्रेषितावर व धर्मग्रंथावर असते, तितकाच विश्‍वास मार्क्‍सवाद्यांचा मार्क्‍सवर आणि त्याच्या ग्रंथावर असतो. धर्मग्रंथाचा अर्थ लावणारे विशिष्ट पीठ धार्मिकांसाठी आवश्‍यक असते, तसेच काही मार्क्‍सवाद्यांसाठी मॉस्को तर काही मार्क्‍सवाद्यांसाठी बीजिंग ही अशी अधिकृत धर्मपीठेच होती. त्यातील मॉस्कोचे पीठ नष्ट झाल्याने आता त्यांची भिस्त एकाच पीठावर आहे. धर्मग्रंथाच्या अधिकृत पीठाकडून लावण्यात आलेल्या अर्थाच्या विरुद्ध जाऊन जो कोणी वेगळ्या आचारविचारांचा पुरस्कार करतात, त्यांना वा त्यांच्या पंथाला बहिष्कृत करून ते आमच्या धर्माचे खरे अनुयायी नाहीत, असा धर्माच्या मुख्य प्रवाहातील मंडळींचा आग्रह असतो, मॉस्कोमध्ये होणाऱ्या मार्क्‍सच्या अधिकृत अर्थापासून दुरावलेल्या कम्युनिस्टांचीही अशीच गत झाली होती, हे वेगळे सांगायची गरज नाही.

हे सर्व विवेचन करायचे कारण म्हणजे विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात महाराष्ट्रात मार्क्‍सवादाचे बीजारोपण झाले. या विचारांचा स्वीकार करणारी मंडळी अर्थात मार्क्‍सवादाच्या अधिकृत म्हणजेच मॉस्कोप्रणित अर्थानुसार वागत नसतील, तरच नवल. या अन्वयार्थात धर्माला स्थान नसणारच हे उघड आहे. त्यामुळे विशेषतः पारंपरिक धर्मवादी अभ्यासक विचारवंतांमध्ये या मंडळींविषयी अटी असणार हे स्पष्ट आहे. मार्क्‍सवादाची भांडवलशाही कुटुंबसंस्था व विवाहसंस्था यांच्याकडे पाहण्याचीही एक दृष्टी होती. तिच्यामुळे विरोधकांना मार्क्‍सवाद हे स्वैराचाराचा पुरस्कार करणारे तत्त्वज्ञान आहे, अशी टीका करण्याची संधी मिळाली. 

वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या कामगार संघटना म्हणजे ट्रेड युनियन्स ही कम्युनिस्टांची नुसती यंत्रणाच नव्हे तर बलस्थान होते. या काळातील महाराष्ट्रातील अस्पृश्‍य समाज मोठ्या प्रमाणात गावाकडून विशेषतः मुंबईसारख्या शहरांत स्थलांतरित होऊन रेल्वे, कापडगिरण्या, कारखाने यांच्यात काम करीत होता. कामगार या नात्याने त्यांचे प्रश्‍न स्पृश्‍य कामगारांच्या प्रश्‍नांसारखेच होते, ते सोडवायचे, म्हटले तर त्यासाठी संघटनेचे बळ हवेच. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्‍यांच्या कामगारसंघटना बांधण्याचे धोरण पत्करले. कम्युनिस्टांच्या (व दरम्यानच्या काळात निघालेल्या काँग्रेसप्रणित)सर्वच कामगार संघटना या स्पृश्‍य हिंदूंच्या असून अस्पृश्‍य कामगारांचे प्रश्‍न त्यांच्याकडून सोडवले जाऊ शकत नाहीत, असा बाबासाहेबांचा दावा होता.

सजग होऊन क्रांतीस सज्ज होऊ शकणाऱ्या कामगारवर्गाला मार्क्‍सवादी वर्तुळात ‘प्रॉलिटेरिएट’ असे म्हटले जाते. बाबासाहेबांचे असे म्हणणे होते, की अस्पृश्‍य व्यक्ती जन्मतःच ‘प्रॉलिटेरिएट’ असते, हे लक्षात घेतले, तर कम्युनिस्ट आणि अस्पृश्‍य स्वाभाविक मित्र ठरले पाहिजेत. परंतु, त्यासाठी कम्युनिस्टांनी जातीचा प्रश्‍न गंभीरपणे घेतला पाहिजे. दुर्दैवाने वर्गाच्या परिभाषेत अडकलेल्या मार्क्‍सवाद्यांना जातीच्या प्रश्‍नाचे स्वरूप आणि गांभीर्य समजलेच नाही, त्यांनी आर्थिक अंगावर अतिरिक्त भर देऊन सामाजिक बाजूकडे दुर्लक्ष केले. (अर्ध्या शतकानंतर कॉ. शरद पाटील यांनी हा मुद्दा समजावून सांगताना असे म्हटले, की कम्युनिस्टांसाठी वर्ग हेच सत्य असून, जाती मिथ्या - आभासात्मक विचारप्रणालीचा (Idealogy) भाग ठरतात. त्यामुळे कम्युनिस्ट आणि अस्पृश्‍य यांच्या चळवळी एकत्र येऊ शकल्या नाहीत. पण बाबासाहेब आणि कम्युनिस्ट यांच्यामधील मतभेदाचा मुद्दा येथेच संपत नाही. मार्क्‍सवादाने धर्माला दिलेली वागणूक बाबासाहेबांना पटली नाही. माणूस हा केवळ भाकरीवर जगत नसतो असे ते आवर्जून सांगतात. धर्मभावना ही माणसासाठी आवश्‍यक असलेली बाब असल्याने धर्म ही अफूची गोळी हे मार्क्‍सवादी प्रतिपादन त्यांना मान्य नाही. धर्माचा अभ्यास, विशेषतः तौलनिक अभ्यास हे बाबासाहेबांचे एक वैशिष्ट्य होते; हे बाळकडू त्यांना बालपणी घरातल्या घरातच मिळाले. त्यांचे आजोबा मालोजीराव हे रामानंदी पंथाचे होते, तर वडील रामजीबाबांनी कबीर पंथाचा स्वीकार केला होता. त्यामुळे बाबासाहेबांना लहानपणीच रामायण-महाभारताचा व संतसाहित्याचा परिचय झाला. पुढे इतर धर्मांचा अभ्यास केल्यावर त्यांची तौलनिक दृष्टी अधिक व्यापक झाली. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे धडे गिरवताना तेव्हाचे अर्थशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक सेलिग्मन यांच्याकडून मार्क्‍सवादाचाही परिचय झाला. बाबासाहेब जात्याच जिज्ञासू आणि बुद्धिमान असल्यामुळे त्यांच्या अभ्यासाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावतच गेल्या. त्यांचा स्वतःचा कल भांडवलशाहीपेक्षा समाजवादाकडेच राहिला. तथापि मार्क्‍सचा धर्मविरोध त्यांना कधीही मान्य झाला नाही. बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवातच अस्पृश्‍यतेविरुद्धच्या लढ्यातून झाली आणि ते स्वाभाविकही होते. अस्पृश्‍यतेच्या दुष्ट रुढीला हिंदू धर्माचे पाठबळ आहे आणि हिंदूंचे धर्मग्रंथ हेच तिचे उगमस्थान आहे, अशी त्यांची अभ्यासकांची खात्री पटली. त्यामुळे त्यांना हिंदू धर्माविरुद्ध बंड पुकारावे लागले. मात्र, त्यांची धर्म भावना बळकट असल्यामुळे त्यांच्या बंडाला धर्माविरुद्धच्या संघर्षाचे स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही. हिंदू धर्माचा त्याग करून त्याला योग्य असा पर्याय शोधण्याची त्यांची धडपड होती आणि बौद्ध धर्माचा स्वीकार हे या धडपडीचे अंतिम पर्यवसान ठरले. बाबासाहेबांचा कल भांडवलशाहीपेक्षा समाजवादाकडे असला, तरी समाजवादी राष्ट्रांमध्ये होणारी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी व व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे अवमूल्यन त्यांना मान्य नव्हते. लोकशाहीवादी तर ते होतेच.

आणि मुख्य मुद्दा म्हणजे धर्मकारण आणि राजकारण यांच्यात सुसंगतता आणि एकवाक्‍यता असली पाहिजे, असेही यांचे मत होते, ही एकवाक्‍यता हा सुद्धा त्यांच्या धडपडीचा एक भाग होता.   

संबंधित बातम्या