वातावरण ढवळून निघाले!

डॉ. सदानंद मोरे
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

अगोदरच्या लेखनातून वेळोवेळी स्पष्ट केल्याप्रमाणे विसाव्या शतकातील तिसऱ्या दशकाचा काळ हा सामाजिक व राजकीय दृष्टीने पाहता नेतृत्वहीनतेचा, अराजकाचा, पोरकेपणाचा, एकमेकांना जोखण्याचा व आजमावण्याचा काळ आहे. पण दुसऱ्या एका सकारात्मक दृष्टीने पाहिले असता, तो नव्या नेतृत्वाच्या उदयाचाही काळ आहे. हे नेतृत्व घडण्याचा काळ आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास  लोकमान्य टिळक आणि शाहू छत्रपती हे दोन मातब्बर नेते कालवश झाल्यामुळे त्यांचे अनुयायी पोरके झाले. या नेत्यांची जागा घेऊ शकणारे नेते त्यांच्या नसल्यामुळे उरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वासाठी स्पर्धा व संघर्ष सुरू झाला. टिळकांच्या अनुयायांमध्ये फूट पडून एक गट गांधींचे नेतृत्व स्वीकारता झाला. दुसऱ्या गांधीविरोधी गटात नेतृत्व करून या अनुयायांना टिळक काळातील प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ शकणारा समर्थ नेता नव्हता. त्यातल्या त्यात ‘केसरी’ची गादी सांभाळणारे न. चिं. केळकर यांच्याकडे लोक आशेने पाहू लागले, पण नेतृत्वासाठी आवश्‍यक असणारा ठामपणा, खंबीरपणा, दृढ निश्‍चय अशा गुणांचा केळकरांकडे अभाव असल्यामुळे त्यांच्या गटाचा हळूहळू संकोच होऊ लागला. या संकोचाचे पर्यवसान १९३७ मध्ये विनायकराव सावरकरांच्या नेतृत्वाखाली स्वतः केळकरांनीच कार्य करण्यात झाले. टिळकांच्या अनुयायांचा हा संकोच झालेला गट म्हणजेच हिंदू महासभा होय.

इकडे शाहू छत्रपतींच्या अनुयायांची काही वेगळी अवस्था होती अशातला भाग नाही. शाहू छत्रपतींनी विठ्ठल रामजी शिंदे यांचा राजकीय नेतृत्वाचा अवेळी अस्त घडवून आणल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचे पुनरुज्जीवन होणे काही काळ तरी शक्‍य नव्हते. उरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पात्रापात्रतेचा प्रश्‍न बाजूला ठेवला, तरी छत्रपतींप्रमाणे ब्राह्मणेतर बहुजनांमधील (अस्पृश्‍य मानल्या गेलेल्या मंडळींसह) सर्व जातींना एकत्र ठेवून एका पक्षात नांदायला लावू शकेल असा समर्थ नेता त्यांच्याकडेही नव्हता. शाहूंच्या जवळील सत्तेमुळे आणि साधनासंपन्नतेमुळे त्यांचे ‘मराठा’ असणे इतरांना खुपत नसे. पण शाहूपश्‍चात ही खुपाखुपी सुरू झाली. ब्राह्मणेतर चळवळीत मराठा व मराठेतर अशी फूट पडली.

टिळक-शाहूंच्या निधनाने निर्माण झालेल्या पोकळीतून एका बाजूला गांधींचे नेतृत्व उभे राहिले, दुसऱ्या बाजूला उर्वरित ब्राह्मणेतरांपासून फारकत घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व पुढे आले. तिसरीकडे हिंदू-मुसलमानांचा प्रश्‍नही याच वेळी ऐरणीवर आल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूंची स्वतंत्र संघटना आणि तिचे डॉ. केशव बळिराम हेडगेवार हे  नेते यांचाही उदय याच काळात झाला. पैकी संघाला थेट राजकारण करायचे नसल्यामुळे त्याची चर्चा करायचे कारण नाही. मात्र याच काळात निर्माण झालेल्या कामगार चळवळ आणि कम्युनिस्ट पक्ष यांना विचारात घेतले, तर पक्ष, जात, धर्म आणि वर्ग यांच्या आधारे समाजाची सामाजिक व राजकीय विभागणी स्पष्ट होण्याचा हा काळ असल्याचे निश्‍चितच म्हणता येते. अर्थात या विभागणीचा अर्थ असा नाही, की तिच्यामुळे उत्पन्न झालेल्या वेगवेगळ्या गटांचे हितसंबंध फक्त जात, धर्म किंवा यांच्यापुरतेच मर्यादित होते. उलट या संबंधांमध्ये विलक्षण अशी सरमिसळ झालेली असून कोणता हितसंबंध कोणावर कधी मात करील हे सांगणे दुरापास्त होते. येथे याचाही उल्लेख करायला पाहिजे, की या काळात सशस्त्र क्रांतिकारकांचा गट सरस्वती नदीच्या प्रवाहाप्रमाणे गुप्त झालेला दिसतो. १९३७ मध्ये सावरकरांची रत्नागिरीतील स्थानबद्धतेतून मुक्तता झाली. तेव्हा तो उसळून वर येईल असे काहींना वाटणे शक्‍यच नव्हे, तर स्वाभाविक आहे. पण ३७ नंतरच्या सावरकरांच्या राजकारणातील साध्य आणि साधन या दोन्हींमध्ये बदल झाल्यामुळे तो प्रश्‍न परस्परच निकालात निघाला. (पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ती सरस्वती थेट जपानमध्ये सुभाषबाबूंच्या रूपाने अवतीर्ण झाली. पण तो मुद्दा वेगळा.)

दरम्यान, पक्ष म्हणून पाहिले तर कम्युनिस्टांना राजकीय मान्यता मिळणे अशक्‍यप्राय होते. ब्राह्मणेतर पक्ष हळूहळू लयास जाऊन काँग्रेसमध्ये विसर्जित झाला. हिंदुत्ववादी विचारांच्या हिंदूंना निदान सावरकरांच्या उदयापर्यंत काँग्रेसमध्ये स्थान होते. अशा प्रसंगी देशाचा विचार केला, तर काँग्रेस व मुस्लिम लीग हे दोनच पक्ष राजकीय अवकाशात शिल्लक राहिले असे म्हणण्यास हरकत नाही. स्वराज्य पक्षासारखे पक्ष धूमकेतूसारखे आले आणि गेले.

शाहू महाराजांच्या पक्षात ब्राह्मणेतर पक्षातील सवर्णच आपापल्या जातींनुसार सवतेसुभे उभे करून आपापसांत संघर्ष करीत आहेत व त्यामुळे त्यांच्याकडून अस्पृश्‍यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक होणे शक्‍य नाही. हे लक्षात यायला बाबासाहेब आंबेडकरांनी फारसा वेळ घेतला नाही. जोतिराव फुले शूद्र आणि अतिशूद्र असा समास करून पुढे जाऊ पाहात होते व स्वतः शाहू महाराजांनीही हीच दिशा धरली होती. त्यांच्या लेखी ब्राह्मणेतरांमध्ये शूद्र आणि अतिशूद्र या दोन्ही समूहांचा समावेश होत होता. तथापि शूद्रांवर पारंपरिक व्यवस्थेकडून कितीही अन्याय झाला असला तरी शेवटी ते चातुर्वर्ण्याव्यवस्थेचा खालचा का होईना भाग होते, हे लक्षात ठेवले पाहिजे.  या व्यवस्थेतील उपनयनाचा व वेदांचा त्रैवर्णिकांपेक्षा त्यांचे स्थान खालचे होते आणि व्यवस्थेतील वरच्या तिघांशी बरोबरी करण्याची त्यांची धडपड होती. याउलट अतिशूद्रांचा म्हणजेच अस्पृश्‍यांचा समूह हा वर्णव्यवस्थेचाच बाहेरचा म्हणजे बहिष्कृत समजला गेला होता. उच्चवर्णियांशी बरोबरी करायला व त्यासाठी संघर्ष करायला सिद्ध झालेल्या शूद्रांना अतिशूद्रांचा उपयोग होण्याऐवजी कदाचित लोढणे होण्याची शक्‍यताही वाटली असावी.

वेगळ्या भाषेत सांगायचे झाल्यास उच्चवर्णीय सवर्णांशी बरोबरी करू इच्छिणाऱ्या शूद्रांनी अतिशूद्र समूहाला बरोबर घेऊन जाणे म्हणजे तो समूह आपल्या बरोबरीचा असण्याची मान्यता देणे असा अर्थ झाला असता. त्यामुळे एका बाजूने कदाचित त्यांचे बळ वाढले असते. पण दुसऱ्या बाजूने पाहाता, जे उच्चवर्णीय शूद्रांनाच बरोबरीचे मानायला तयार नव्हते ते अतिशूद्रांना बरोबरीने मानायला तयार नव्हते ते अतिशूद्रांना बरोबरीचे मानतील. हे असंभाव्य असल्याने या बळाचा काही उपयोगही झाला नसता, कदाचित अडथळाही आला असता.

या प्रकाराचे धार्मिक व सामाजिक पदर लक्षात आलेल्या आंबेडकरांनी ब्राह्मणेतर चळवळीपासून फारकत घेऊन अस्पृश्‍यांची म्हणजेच बहिष्कृतांची स्वतंत्र चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला असल्यास आश्‍चर्य वाटायचे कारण नाही. या निर्णयाची पहिली चुणूक त्यांनी सुरू केलेल्या ‘बहिष्कृत भारत’ या पत्राच्या पहिल्या अंकातच स्पष्ट दिसते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य आणि शूद्र या चार वर्णांनी सिद्ध झालेल्या समाजपुरुषाच्या रुपकाचा आधार घेत ते निदर्शनास आणतात, की या ब्राह्मण मुख, क्षत्रिय बाहू, वैश्‍य मांड्या अशा अवयवांनी बनलेल्या पुरुषाच्या देहात शूद्रांचे स्थान पायाचे आहे. मस्तकापासून पायापासून एकच अखंड देह असतो. त्यात अस्पृश्‍यांना स्थान नाही. ते बहिष्कृत म्हणजे या देहाबाहेरचे मानले जातात. उपरोधाने सांगायचे झाल्यास हा समूह म्हणजे या समाजपुरुषाच्या पायातील पायताण, की जे घरात, देवळात प्रवेश करताना बाहेर काढून ठेवावे लागते! पारंपरिक पुरुषसूक्तातील रूपकाचा उपयोग करीत बाबासाहेब समाज व्यवस्थेतील अस्पृश्‍यांच्या तुच्छ मानल्या गेलेल्या स्थानाकडेच लक्ष वेधतात असे नाही. हा समाजव्यवस्थेचे अंगच नाही. तो व्यवस्थेच्या बाहेरील, बहिष्कृत समाज आहे. हे 
वास्तव ते अधोरेखित करतात. त्यामुळे बहिष्कृतांच्या स्वतंत्र चळवळीचे आपोआपच समर्थन होते.
 
बाबासाहेबांचे मत केवळ सैद्धांतिक किंवा शास्त्रार्थाच्या पातळीवरील होते असे समजायचे कारण नाही. तसा अनुभवही त्यांना आला होता. मुंबई राज्याच्या कायदेकौन्सिलात नव्याने निवडून आलेले सदस्य ब्राह्मणांविरुद्ध असलेले जोशी वतनाचे बिल मांडून त्याचा कायदा करण्याविषयी उत्सुक होते. मात्र महार वतनाच्या बिलाला मान्यता देण्यातील त्यांची कुचराई तितकीच स्पष्ट होती. महार वतनामुळे गावातील महार समाजाच्या माणसांवर पडणारा कामाचा बोजा या कायद्याने खाली उतरवला, तर गावगाडा कसा चालेल अशी त्यांची चिंता होती. साहजिकच, व्यवस्थेचे प्रवक्ते म्हणून वर्णजातींचे समर्थन करणारे ब्राह्मणांनी शत्रुस्थानी मानले तरी इतर सवर्ण काही अस्पृश्‍यांचे स्वाभाविक मित्र नव्हेत याचा प्रत्यय बाबासाहेबांना आला. 

‘बहिष्कृत भारत’ हे पत्र आणि महाड येथील चवदार तळ्याचा जलसत्याग्रह यांचा विचार एकत्रितच करावा लागतो. देशातील इतर अनेक पाणवठ्यांप्रमाणे महाडच्या तळ्याच्या बाबतीतही तेथे अस्पृश्‍यांना पाणी पिण्याच्या, भरण्याचा अधिकार नव्हता. हा हक्क मिळवण्यासाठी सत्याग्रहाचा लढा करायचे बाबासाहेबांनी ठरवले. वस्तुतः या लढ्याला ब्राह्मणेतर नेत्यांनी सक्रिय पाठिंबा देणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर या दोन तरुणांखेरीज कोणी उत्साह दाखवला नाही. दरम्यानच्या काळात जेथे जवळकर यांच्याबरोबर बाबासाहेबांचे एक नातेही निर्माण झाले होते. ‘देशाचे दुश्‍मन’ या पुस्तकातून लोकमान्य टिळकांची बदनामी केल्याच्या आरोपावरून टिळकांच्या पुत्रांनी त्यांना कोर्टात खेचले होते. खालच्या कोर्टात त्यांचा गुन्हा शाबीतही झाला होता. मात्र, उच्च न्यायालयात बाबासाहेबांनी त्यांचे वकीलपत्र घेऊन खटला लढवून निर्दोष मुक्तता घडविली. खेदाची गोष्ट म्हणजे, सत्याग्रहासाठी  पुण्याहून महाडला मोटरकारने निघालेल्या जेधे, जवळकरांची मोटर रस्त्यातच नादुरुस्त होऊन बंद पडली व तयंना नियोजित वेळेपर्यंत महाडला पोचता आले नाही. ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत यांच्या सहकार्याची ही शक्‍यता अशाप्रकारे दैवानेच संपुष्टात आणली.

याच काळात बाबासाहेबांनी समता सैनिक दल, समता संघ अशा संस्थांचीही उभारणी केली. समता दल ही लढाऊ कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध संघटना होती. काँग्रेसमध्ये ना. सु. हर्डीकर यांचे सेवादल हे या आधीच कार्यान्वित झाले होते. हिंदुत्ववाद्यांनी डॉ. हेडगेवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केला होता. त्यामुळे बाबासाहेबांची ही कृती कालोचितच म्हणावी लागते. कम्युनिस्टांच्या युनियन्स अर्थात कामगार संघटना असल्यामुळे अशा वेगळ्या संघटनेची त्यांना गरजच नव्हती. खरे तर उपरोक्त तीन संघटनांचा तौलनिक अभ्यास होण्याची गरज आहे.  जाता जाता, ब्राह्मणेतरांच्या गटातून शाहू सेवक संघ उभारण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. ते काहीही असो, वातावरण ढवळून निघाले हे मात्र खरे. 

संबंधित बातम्या