आंबेडकर आणि सावरकर

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 11 मार्च 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

महाराष्ट्रामधील सामाजिक वातावरण ढवळून निघण्याची सुरुवात तशी लोकहितवादी आणि जोतिराव फुले यांच्या काळापासून आणि खरे तर त्यांच्यामुळेच झाली, असे म्हणण्यास हरकत नसावी. लोकहितवादींचे लेखन कितीही प्रक्षोभक असले, तरी ते मुख्यत्वे ज्या उच्च वर्णाला उद्देशून केले गेले होते, त्याने त्याकडे काणाडोळा केला असेच लक्षात येते. तथापि, जोतिरावांनी कनिष्ठ वर्णजातींमध्ये जागृती आणि गती निर्माण केली. आपल्या अवनत अवस्थेची जाणीव त्यांना झाली. या अवस्थेची जोतिराव प्रणीत कारणमीमांसाही त्यांना पटली व त्यांच्यातील अनेक जण जोतिरावांच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीत सामील झाले. सत्यशोधक चळवळ मुख्यतः धार्मिक चळवळ होती आणि तिला अर्थातच सामाजिक व आर्थिक परिमाणे होती. शूद्रातिशूद्रांनी तूर्त राजकारणापासून अलिप्त राहात ब्रिटिश सत्तेच्या छत्रछायेत आपली होईल तितकी उन्नती करून घ्यावी, अशी सत्यशोधकांची धोरणात्मक नीती होती. खरे तर तिलाच त्यांचे राजकारण म्हणता येईल. 

जोतिरावांच्या पश्‍चात स्वतः सावित्रीबाई, कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील यांनी सत्यशोधक चळवळ आपापल्या परीने व पद्धतीने पुढे नेण्याचे प्रयत्न निश्‍चितच केले. पण छत्रपती शाहू महाराजांनी सक्रिय पाठिंबा दिल्यानंतर चळवळीला खरी गती मिळाली. शाहू महाराजांनी तिचा आधार व्यापक केल्यामुळे अण्णासाहेब लठ्ठे, वा. रा. कोठारी, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारखी तडफदार माणसे चळवळीला जोडली गेली. दरम्यान, माँटेग्यू-चेम्सफर्ड योजनेमुळे खुद्द ब्रिटिश सत्ताधिशांनीच भारतीय जनतेला राजकीय सुधारणांचा पुढील हप्ता देण्याचा निर्णय घेतल्यामुळे या चळवळीला राजकारणापासून दूर राहणे अशक्‍यप्राय होऊन बसले. त्यामुळे सत्यशोधक चळवळीतील धार्मिक आशय कमी झाला. सामाजिक आशयाला प्राधान्य मिळालेली ही रूपांतरित ब्राह्मणेतर चळवळ आता राजकीय होऊ लागली. या चळवळीचे पुढील रूपांतर ब्राह्मणेतर नावाच्या राजकीय पक्षातच झाले. राजकीय पक्षात काम करण्यासाठी ब्राह्मण नसणे ही बाब पुरेशी ठरू लागली. मग अशा व्यक्तींची जोतिरावांच्या धार्मिक विचारांशी किंवा शाहू महाराजांच्या सामाजिक धोरणांशी कितपत बांधिलकी आहे, हा प्रश्‍न गैरलागू ठरू लागला. त्याचा परिणाम म्हणून - ज्यांना त्यांच्या वेगळ्या धार्मिक, सामाजिक पार्श्‍वभूमीमुळे हिंदू धर्मांतर्गत पुरोहितशाहीचा यत्किंचितही जाच होणे शक्‍य नव्हते, अशा पारशी लोकांनासुद्धा चळवळीत प्रवेश मिळू लागला. धनजीशहा कपूर हे त्याचे सर्वांत नमुनेदार उदाहरण होय. ब्राह्मणेतर पक्षाचा प्रवास याच दिशेने होत राहिला तर मुसलमानही त्यात शिरू शकतील अशी साधार भीती वाटू लागल्यामुळेच की काय दामोदर सावळाराम यंदे यांच्यासारख्या धुरीणांनी पक्षाचे नाव बदलून ते हिंदू ब्राह्मणेतर पक्ष असे करावे, अशी सूचना केली. उत्तरकाळात बाबासाहेब बोले यांच्यासारखा मातब्बर नेता तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या छावणीत शिरला. 

बाबासाहेब आंबेडकर या सर्व घडामोडी जवळून पाहात होते. ब्राह्मणेतर पक्ष किंवा चळवळ या पायघोळ अंगरख्यामध्ये एकमेकांच्या विरोधी हितसंबंध असलेले अनेक देह आच्छादित झाले आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्यापैकी कोणाही एकाची बाजू घेणे त्यांच्यासाठी चुकीचे ठरले असते. त्यांनी सवतासभा उभारण्याची भूमिका घेतली. 

जोतिरावांनी प्रवाहित केलेला आणि शाहू महाराजांनी जपलेल्या धर्मविचारांचा प्रवाह राजकीय हितसंबंधांचे प्राबल्य वाढल्यामुळे क्षीण होत होता. आंबेडकरांनी तो पुनरुज्जीवित केला, असे आपण निश्‍चितपणे म्हणू शकतो. अस्पृश्‍यांच्या मंदिर प्रवेशासाठी झालेल्या चळवळी हा त्याचाच भाग होत्या. जेधे, जवळकरांसारखे ब्राह्मणेतरच काय; परंतु काकासाहेब गाडगीळ, वि. रा. भुस्कुटे यांच्यासारखे सुज्ञ ब्राह्मणही याबाबतीत त्यांच्या पाठीशी होते. पुण्यातील पर्वती आणि नाशिकमधील काळाराम या मंदिरांमध्ये अस्पृश्‍यांना प्रवेश मिळावा, यासाठी केल्या गेलेल्या सत्याग्रहात अशा अनेक सवर्णांचा सहभाग होता. सावरकरच काय पण करवीर सोडून नाशिक येथे स्थायिक झालेल्या कुर्तकोटी शंकराचार्यांचाही अशा चळवळींना पाठिंबा मिळू लागला होता. 

अर्थात बाबासाहेबांसाठी या चळवळी म्हणजे प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी केलेले लक्षवेधक उपाय होते. ती मूळ समस्या नव्हती. मूळ समस्येचे अनेक आविष्कार होते. पाणवठ्यावरील बंदी, मंदिर प्रवेश बंदी, स्पर्शबंदी इत्यादी मूळ समस्याही धर्मात कोठेतरी दडलेल्या होत्या. त्यामुळे धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारणा हाच त्यावरील उपाय होता आणि अर्थातच धर्मसुधारणा शक्‍य होत नसेल तर धर्मांतर. ज्या धर्मात अस्पृश्‍याला स्पृश्‍य समजून त्याच्याशी व्यवहार केला जात नाही, त्या धर्मात राहणे व्यवहार म्हणूनच लाभदायक नाही ही गोष्ट तर स्वयंस्पष्टच होती. अस्पृश्‍यांशी करण्यात येणाऱ्या व्यवहारात धर्मातील किंवा धार्मिक मानल्या गेलेल्या कल्पनांचा आधार व समर्थन असेल तर त्या कल्पनांचा त्याग केला जाईपर्यंत तसा व्यवहारही थांबणार नाही. या कल्पनांच्या उगमस्थानाचा शोध घेतला, तर हिंदू धर्माच्या प्रमाण व पवित्र मानल्या गेलेल्या शास्त्रापर्यंत पोचता येते. साहजिकच हिंदूंनी त्यांच्या वेदादि प्रमाण ग्रंथांचा त्याग करायला हवा. 

बाबासाहेबांच्या या मूलगामी मागणीला हिंदू धर्माच्या आचार्यांकडून पाठिंबा मिळण्याची शक्‍यता नव्हतीच. लाहोर येथील आर्य समाजाच्या मंडळींनी चालवलेल्या जातपात तोडक मंडळाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून बोलण्यासाठी बाबासाहेबांनी जे भाषण तयार केले होते, त्यात हा शास्त्रत्यागाचा मुद्दा आला होता. संयोजकांना हा मुद्दा खटकला व त्यांनी तो वगळण्याची सूचना केली. बाबासाहेबांनी अर्थातच ती फेटाळून लावली. परिणामतः परिषदच रद्द झाली. अखेर बाबासाहेबांनी ते भाषण स्वतःच प्रसिद्ध केले. ‘Annihilation of Castes’ या शीर्षकाचे गाजलेले भाषण ते हेच होय. खरे तर आर्य समाजाने बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला शास्त्रत्याग पूर्वीच म्हणजेच महर्षी दयानंद सरस्वती यांच्या काळात अंशतः केला होता. दयानंदांनी हिंदू धर्माच्या प्रमाणव्यवस्थेतील पुराणांचा भाग वगळून वेदांचा मात्र राखला होता. एकदा पुराणे वगळली, की मनूसारख्या स्मृतिग्रंथाचासुद्धा ते वेदांचा हिस्सा नसल्याचे कारण पुढे करीत त्याग करणे तत्त्वतः अशक्‍य नव्हते. ते दयानंदांच्या पुढचे पाऊल ठरले असते. पण प्रवर्तकाने टाकलेले पाऊल हेच शेवटचे, असा समज बहुतेक सर्वच धर्मपंथांचा असल्यामुळे त्यांची वाढ खुंटते. या नियमाला आर्य समाजाने तरी अपवाद का असावे? 

बाबासाहेबही सरसकट वेदांचाच त्याग करावा, या मताचे नसावेत. त्यांची मांडणी हा त्यांच्या वक्तृत्व प्रभावाचा (Rhetoric) भाग समजावा. कारण उपरोक्त भाषणातच त्यांनी (वेदांच्याच) उपनिषदे नावाच्या भागातील ब्रह्मविवेचनाकडेही लक्ष वेधले आहे. त्यानुसार ब्रह्म नावाचा एकच चैतन्यांश सर्व प्राणिमात्रात व्यापून उरला आहे किंवा ते सर्व याच ब्रह्मतत्त्वाचे वेगवेगळे आविष्कार आहेत. बाबासाहेबांच्या मते समतेसाठी उपनिषदांमधील या ब्रह्मवादाइतका ठोस आधार इतरत्र शोधून सापडणार नाही. 

बाबासाहेबांचे हे निरीक्षण महत्त्वाचे असूनही उपेक्षित राहिले आहे. त्याचे एक कारण म्हणजे मुळात हिंदुधर्ममार्तंडांनाच समता नको असल्यामुळे तेच या विचारांकडे दुर्लक्ष करणार किंवा त्याचा विपरीत अर्थ करून समतेचे तत्त्व मर्यादित करणार. 

ते काहीही असो. राजकीय व सामाजिक व्यवहारालासुद्धा आध्यात्मिक पाया हवा हे म्हणणे बाबासाहेबांनाही मान्य होते. त्यांच्या व कम्युनिस्टांच्या/मार्क्‍सवाद्यांच्या मतभेदांमधील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मार्क्‍सवादी जडवादी असल्यामुळे ते सर्वच व्यवहारांचे स्पष्टीकरण जडद्रव्याच्याच किंवा भौतिकतेच्या पायावर करून त्यांची त्याच प्रकाराने संगती लावण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेबांना ते योग्य वाटत नाही. त्यांना भौतिकतेच्या पलीकडे जे काही असते त्याची ओढ आहे. तो प्रांत धर्माचा आहे. त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत त्यांच्या स्वतःच्या धर्मांतराचा (बौद्ध धर्म स्वीकारण्याचा) मुद्दा होता, तोपर्यंत त्यांची त्यामागची प्रेरणा सर्वस्वी आध्यात्मिक होती. त्यांना सर्व प्रकारचे भौतिक लाभ झालेले होते. मात्र, अस्पृश्‍यांना धर्मांतरामुळे इतरही लाभ होणार होते. 

बाबासाहेबांनी १९५६ मध्ये धर्मांतर केले, तेव्हा केलेल्या वक्तव्यांमध्ये त्यांनी एका गोष्टीविषयी खेद व्यक्त केला होता. हिंदू धर्म का सोडता, हा प्रश्‍न त्यांना अनेकांनी विचारला. पण बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला हे त्यांना कोणी विचारले नाही. 

बाबासाहेबांच्या धर्मांतराची चर्चा करताना सावरकरांचा संदर्भ घेतला तर काही मुद्‌द्‌यांचा उलगडा होण्यास मदत होईल. सावरकर हिंदुत्ववादाचे कट्टर समर्थक असल्याचे सर्वज्ञातच आहे. इतकेच नव्हे, त्यांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या व्यापक व समावेशक असून तिच्यात भारतात विकसित झालेल्या सर्वच धर्मांचा समावेश होतो हेही स्पष्ट आहे. त्यामुळे बाबासाहेब बौद्ध झाले तरी सावरकरी व्याख्येनुसार त्यांच्या हिंदू असण्याला बाधा येत नाही. मग तरीही सावरकरांनी त्यांच्या धर्मांतराविषयी तक्रार का करावी हा प्रश्‍न उपस्थित होतो. 

सावरकर हे बुद्धिवादी होते. प्रखर बुद्धिवादाच्या कसोटीला कोठलाच धर्म उतरत नाही हे वेगळे सांगायची गरज नाही. सावरकरांच्या विचारप्रणालीत एक धर्म सोडून दुसरा स्वीकारल्यामुळे मूलभूत असा काहीच फरक पडत नाही. अर्थात असे असेल तर मग ते स्वतः तरी हिंदुत्ववादी कसे हा प्रश्‍न कोणालाही पडेल. 

या प्रश्‍नाचे उत्तर फारसे अवघड नाही. सावरकर ज्याला हिंदू म्हणतात तो वस्तुतः बाबासाहेब ज्या धर्मावर टीका करतात तो हिंदू धर्म नव्हे. ज्याची वांशिक व सांस्कृतिक पाळेमुळे भारतभूमीत रोवली गेली आहेत तो हिंदू; मग त्याचा धर्म वैदिक असेल, बौद्ध असेल, जैन असेल, शीख असेल किंवा तो ब्राह्मो समाजाचा सदस्य असेल. 

विशेषतः ख्रिस्ती व त्यातल्या त्यात परत इस्लाम धर्मांना सावरकर वांशिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या परकीय मानतात. सावरकरांसाठी ‘हिंदू’ हा शब्द ‘भारतीय’ या शब्दाचा पर्याय आहे. 

असे असताना सावरकरांनी बाबासाहेबांच्या बौद्ध होण्यावर आक्षेप का घ्यावा? मला वाटते त्याचे मूळ सावरकरांच्या बौद्ध धर्माच्या आकलनात आहे. बौद्ध धर्मात अहिंसा तत्त्वावर अतिरिक्त भर दिल्यामुळे वायव्य भारतात मुसलमानांना सत्ताग्रहण सोपे झाले, असे त्यांचे इतिहासाचे वाचन होते. दुसरे असे, की प्रचलित राजकारणात त्यांनी अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या गांधींना बुद्धाचे वारसदार ठरवलेच होते. अर्थातच आंबेडकरांवर बुद्धाची अहिंसा गांधींच्या अहिंसेपेक्षा वेगळी होती हे दाखवून देण्याची जबाबदारी आपोआपच येते. 

भारतीयत्वाकडे सावरकरी दृष्टीने पाहिले, तर हिंदुत्ववाद निष्पन्न होतो. जातीय दृष्टीने पाहिले तर अलीकडचा मूलनिवासीवाद पुढे येतो.  

संबंधित बातम्या