राजकीय प्रवाहांची दखल

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 25 मार्च 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

नाशिकमध्ये बालगंधर्वांच्या संगीत शारदा नाटकाचा प्रयोग सुरू असताना अनंत कान्हेरे या कोवळ्या तरुणाने नाशिकचा कलेक्‍टर जॅक्‍सन याचा खून केला. ज्या पिस्तुलातून कान्हेरेने जॅक्‍सनवर गोळी झाडली ते पिस्तूल वि. दा. सावरकरांनी इंग्लंडहून भारतात पाठवलेल्या पिस्तुलांपैकी एक होते. शिवाय लंडनमध्ये मदनलाल धिंग्राने केलेल्या कर्झन वायली वधातसुद्धा सावरकरांचा हात असल्याचा संशय ब्रिटिश सरकारला होता. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी सावरकरांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला नसता तरच नवल! सावरकरांवर चालवलेल्या खटल्यात त्यांना दोन जन्मठेपांची शिक्षा होऊन ती भोगण्यासाठी त्यांची रवानगी अंदमान येथील काळकोठडीत करण्यात आली.

या घटनेनंतर युरोपात पहिले महायुद्ध झाले. भारतातही माँटेग्यू चेम्सफर्ड योजनेनुसार भारतातील लोकांना काही मर्यादित सुधारणांचा हप्ता देऊ केला. या काळात भारतात विलक्षण अशी राजकीय जागृती घडून आली. टिळकांचे निधन होऊन गांधींचे नेतृत्व प्रस्थापित होण्याचा हाच काळ. अशा वातावरणात सावरकरांची सुटका करण्याची मागणी पुढे येणे स्वाभाविकच होते. विशेष म्हणजे ही मागणी करणाऱ्यांमध्ये स्वतः गांधीसुद्धा अग्रभागी होते.

कोणत्या का कारणाने होईना, पण सरकारने सावरकरांची व त्यांचे थोरले भाऊ बाबाराव यांची अंदमानातून सुटका केली. तथापि, बाबारावांची सुटका बिनशर्त होती. विनायकरावांवर मात्र त्यांनी रत्नागिरी सोडून बाहेर जाऊ नये, तसेच राजकीय स्वरूपाच्या हालचाली करू नयेत, असे निर्बंध घालण्यात आले. खुद्द सावरकरांनीही या अटी मान्य केल्या होत्या. अंदमानात खितपत पडण्यापेक्षा भारतात निर्बंधांच्या चौकटीत का होईना, काही एक काम करता येईल अशी त्यांची धारणा होती. ती व्यवहाराला धरूनच होती. त्यासाठी त्यांच्यावर होणारी ‘माफीवीर’ वगैरे टीका अन्यायकारक आहे.

सावरकरांनी रत्नागिरी पर्वात हिंदुसंघटन, शुद्धी, अस्पृश्‍यता निवारण अशी कामे हाती घेतली. राजकीय आशय व्यक्त करण्यासाठी टोपणनावाने लिखाण करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे कादंबरी, नाटक या वाङ्‌मयप्रकारांचा आश्रय घेतला. नागपूर शहरात डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी डॉ. बा. शि. मुंजे यांच्या मदतीने स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदू संघटनेला सावरकरांचे आशीर्वादच नव्हे, तर मार्गदर्शनही होते. या काळात काम करणाऱ्या अनेक हिंदुत्ववाद्यांना सावरकरलिखित ‘हिंदुत्व’ या प्रबंधाचा उपयोग झालेला दिसतो. ‘हिंदुत्व’ हा हिंदुराष्ट्रवादाचा जाहीरनामाच होता, असे म्हणण्यात काही अतिशयोक्ती नाही.

इकडे गांधींनी नेतृत्व केलेल्या खिलाफतीच्या चळवळीला अपयश आल्यामुळे भारतातील मुसलमानांमध्ये असंतोष व अस्वस्थता पसरली. खरे तर खिलाफतीचे पीठ स्वतः तुर्कस्तानचा सत्ताधीश केमाल पाशा यानेच बरखास्त करून टाकल्यामुळे खिलाफतीच्या चळवळीचा पायाच उखडला गेला. त्याला गांधी, काँग्रेस किंवा हिंदू काय करणार? पण हा विवेक हरवलेल्या काही मुसलमानांनी देशभर दंगली उसळवल्या. या दंगलींत मलबारमधील मोपल्यांचे बंड खूपच गाजले. ही दंगल घडवून तेथील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या मुसलमानांचा स्पष्टपणे निषेध वगैरे करण्याऐवजी गांधी व काँग्रेस त्यांना पाठीशी घालत आहेत, असे समजून सावरकरांनी त्यांचा धिक्कार करणारी ‘मोपल्यांचे बंड’ (अर्थात मला काय त्याचे) ही कादंबरीही लिहून प्रसिद्ध केली. अर्थात टोपण नावाखाली!

खिलाफत चळवळीच्या धुमाकुळात हिंदूंचे एक नेते स्वामी श्रद्धानंद यांना अब्दुल रशीद नावाच्या तरुणाने गोळी घालून ठार मारले. त्यामुळे देशात एकच खळबळ माजली. या घटनेचे स्मरण चिरस्थायी व्हावे म्हणून सावरकरांचे धाकटे भाऊ डॉ. नारायणराव यांनी मुंबईत ‘श्रद्धानंद’ नावाचे वर्तमानपत्रच काढले. हे पत्र हिंदुत्वाचे मुखपत्र होते आणि स्वतः विनायकरावच त्याचे प्रेरणास्थान होते, हे वेगळे सांगायची गरज नाही. विनायकराव या पत्रातून नेहमी लिखाणही करीत असत.

गांधींच्या व काँग्रेसच्या अहिंसावादी आणि मुस्लीमधार्जिण्या धोरणाला विरोध म्हणून सावरकरांनी संगीत ‘संन्यस्त खड्‌ग,’ ‘संगीत उःशाप’ अशी नाटकेही लिहिली. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कृतींद्वारे व माध्यमांमधून गांधी काँग्रेस विरोधाचे व अहिंसाविरोधाचे धोरण सातत्याने पुढे नेणाऱ्या सावरकरांना त्यांच्या रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या समाप्तीनंतर नव्याने राजकीय पक्ष होत असलेल्या हिंदुमहासभेचे अध्यक्षपद मिळणे हे क्रमप्राप्तच होते. मर्यादित अवकाशात व निर्बंधांच्या चौकटीत विचार मांडताना होत असलेली सावरकरांची घुसमट आता थांबली व त्यामुळे राहिलेला सर्व अनुशेष त्यांनी १९३७ नंतर भरून काढला, असे म्हणायला काहीच हरकत नाही.

सावरकरांचा प्रयत्न हिंदू धर्मातील बहिष्कृत वर्गाला म्हणजेच अस्पृश्‍यांना हिंदू धर्मात परत आणण्याचा होता, पण नेमक्‍या याच वेळी बाबासाहेब आंबेडकर, याच अस्पृश्‍य बहिष्कृतांना हिंदू धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारण्याचा उपदेश करीत होते. अस्पृश्‍य हिंदू धर्माला सोडचिठ्ठी देऊन मुसलमान झाले, तर हिंदू धर्माच्या संख्याबळावर त्याचा विपरीत परिणाम होईल, ते सावरकरांना स्पष्ट दिसत होते. बाबासाहेबांना अर्थातच अस्पृश्‍यांना अमानुष वागणूक देणाऱ्या हिंदू धर्माविषयी आपुलकी वाटायचे काही कारण नव्हते.

पण या प्रकारचे खरे वर्म वेगळेच आहे. सावरकरांवर रत्नागिरीबाहेर जायचे नाही व राजकारणात भाग घ्यायचा नाही हा निर्बंध जोपर्यंत होता, तोपर्यंत सावरकरांना अस्पृश्‍यता निवारणाच्या कार्याला पुरेसा वेळ देणे आणि त्यासाठी शक्ती खर्च करणे शक्‍य होते. आता त्यांनी हिंदुमहासभा या राजकीय पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर आणि देशात प्रसिद्ध झालेल्या गांधी आणि काँग्रेसच्या राजकारणाला शह देणारे हिंदुराष्ट्रवादाचे राजकारण करायला सुरुवात केल्यावर अस्पृश्‍यतानिवारणाचे कार्य मागे पडणे अगदीच साहजिक होते. तरीही ते जेथे जेथे राजकीय सभा घ्यायला जात, तेथे तेथे सभा संपल्यावर सहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्याचा आग्रह धरीत. विशेष म्हणजे राजकीय सभेत सावरकरांबरोबर व्यासपीठावर विराजमान झालेले सहवक्ते आणि श्रोतृवृंदात बसून सावरकरांच्या मुद्यांना माना डोलावीत व टाळ्या वाजवीत दाद देणारे श्रोते सहभोजनाच्या वेळी दिसेनासे होत. कारण त्यांच्यापैकी बहुतेक जातिभेदाचे समर्थक होते. सावरकरांच्या राजकारणाची शोकांतिका नेमकी हीच होती. त्यांच्या बहुसंख्य अनुयायांना इस्लामविरोधी व हिंदुराष्ट्रवाद मान्य होत, पण जातीय श्रेष्ठत्व सोडायची त्यांची तयारी नव्हती. पुण्यातील पुरोगाम्यांनी पर्वती येथील मंदिरात अस्पृश्‍यांना प्रवेश मिळावा म्हणून जोरदार सत्याग्रह केला. त्यावेळी सनातन्यांच्या समूहांनी सत्याग्रहींना विरोध करीत मारहाण केली व मंदिरप्रवेश रोखला. या प्रसंगी सावरकरांनी या सनातन्यांची ‘पुण्यातील पाच हजार मंबाजी’ अशी संभावना करून त्यांच्यावर कडक टीका केली. परंतु, १९३७ नंतरचे आपले राजकारण सावरकरांना अशाच मंबाजींच्या जोरावर चालवावे लागले!

या शोकांतिकेला एक विनोदाची झालरही होती. राजकीय सभेत सावरकरांनी गांधी आणि काँग्रेस यांच्यावर घणाघाती हल्ला चढवणारे भाषण केल्यानंतर अस्पृश्‍यांच्या वस्तीत वगैरे होणाऱ्या सहभोजनास त्यांच्या हिंदुत्ववादी अनुयायांनी दांड्या मारल्या तरी सहभोजनाचा कार्यक्रम यात व्यवस्थित पार पडत असे. कारण या कार्यक्रमास त्या गावातील गांधींचे व काँग्रेसचे अनुयायी हटवून हजेरी लावून उणीव भरून काढत. याचे एक कारण म्हणजे, या मंडळींना गांधींचा तसा आदेश होता व तो काँग्रेसच्या कार्यक्रमाचा एक भाग होता, हे खरेच. पण दुसरे कारण म्हणजे, त्यातील अनेकांना सावरकर व सावरकरांचे क्रांतिकार्य याविषयी आदरही होता. सावरकरांनी काँग्रेसमध्ये यावे, अशीही अनेकांची इच्छा होती.

महाराष्ट्रातील या काळातील राजकारणाचा विचार केला, तर मुस्लीम लीग, हिंदू महासभा आणि आंबेडकरी चळवळ हे घटक गांधी आणि काँग्रेस यांना वेगवेगळ्या कारणांमुळे विरोध करीत होते. कम्युनिस्टांना उशिरा का होईना गांधी आणि काँग्रेस यांच्या सामर्थ्याची जाणीव झाल्यामुळे त्यांच्याशी मिळतेजुळते घ्यावे, असे वाटू लागले होते. इतकेच नव्हे, तर काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेस ताब्यात घेऊन तिला डावे वळण देण्याचा प्रयत्नही काहींनी करून पाहिला. पण त्यात त्यांना यश येणार नव्हतेच.

तिकडे हिटलरने युरोपात दुसरे महायुद्ध सुरू केले. युद्धात इंग्लंड अर्थातच जर्मनीच्या विरोधात असल्याने भारत सरकारलाही तीच भूमिका घ्यावी लागली. १९३७ च्या निवडणुकांतून अनेक प्रांतांमध्ये बहुमत 
मिळवून सत्तारूढ झालेल्या काँग्रेस सरकारने आपल्याला न विचारताच परस्पर भारताला युद्धात गुंतवले म्हणून प्रांतिक मंत्रिमंडळांना राजीनामे देऊन निषेध व्यक्त केला. गंमत म्हणजे अगोदर युद्धमान राष्ट्रांच्या दोन्ही गटांची साम्राज्यवादी म्हणून संभावना करणाऱ्या कम्युनिस्टांना मात्र, हिटलरने रशियावर आक्रमण केल्याने हे युद्ध लोकयुद्ध असून, हिटलरला विरोध करून दोस्त राष्ट्रांची बाजू घ्यायला हवी असे वाटू लागले, त्यानुसार त्यांनी आपल्या धोरणात बदल केला.

अल्पमतात गेलेल्या मुस्लीम लीगला तर युद्ध म्हणजे दारात चालून आलेली संधीच वाटली. सरकारचा निषेध म्हणून काँग्रेसी मंत्र्यांनी केंद्रावरही बहिष्कारच टाकला होता. अशावेळी निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने काँग्रेसविरोधकांना सरकारमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले. लीगने म्हणजेच बॅ. जिनांनी ते लागलीच स्वीकारले. मंत्रिमंडळात गेल्यामुळे लीग आणि मुसलमान यांचे बळ वाढेल व हिंदुहिताला बाधा येईल म्हणून सावरकरांच्या हिंदुमहासभेनेही हे निमंत्रण स्वीकारले. त्यानुसार डॉ. ना. भा. खरे यांची युद्धकालीन मध्यवर्ती मंत्रिमंडळात वर्णी लागली. बाबासाहेबांचे आणि काँग्रेसचे कधीच सख्य नव्हते. त्यामुळे त्यांनाही हे निमंत्रण स्वीकारण्यात काही अडचण आली नाही.

पण या झाल्या थोड्या नंतरच्या घटना. प्रत्यक्षात काँग्रेसी मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर लीगने देश काँग्रेसपासून मुक्त झाला म्हणून मुक्तिदिन साजरा करायचे ठरवले. त्यात ही सर्वच मंडळी सामील झाली. युद्धकाळात सामाजिक चळवळी तर थंडावल्या होत्याच. सावरकरांनी तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून लेखकांना ‘लेखण्या मोडा, बंदुका घ्या’ असा संदेशच दिला.

देशात त्याच्या संमतीशिवाय युद्धाच्या खाईत लोटल्यामुळे सरकारमधून बाहेर पडलेल्या काँग्रेसला सर्व घटना साक्षीभावाने, तटस्थपणे बघत स्वस्थ बसणे शक्‍य नव्हते. तेवढ्यात, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानने बंदी बनवलेल्या भारतीय युद्धकैद्यांची आझाद हिंद सेना उभारून इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले. सरकारला युद्धकार्यात साथ देणे, हे जसे अहिंसावादी काँग्रेसला मानवणे शक्‍य नव्हते, तसेच परिस्थितीचा फायदा उठवत सुभाषबाबूंना पाठिंबा देत सरकारविरुद्ध हिंसक मार्ग अवलंबणेही काँग्रेसच्या ध्येयधोरणात बसत नव्हते. अशावेळी गांधींनी १९४२ मध्ये ‘चले जाव’ किंवा ‘छोडो भारत’ आंदोलनाचा आदेश दिला. हे आंदोलन हिंसक असेल असा त्यांचा स्पष्ट संकेत नसला, तरी ते पूर्णपणे अहिंसक असावे असा आग्रही नव्हता. तेव्हा काँग्रेसमधील एका गटाने मनुष्यहिंसा अटळ नसली, तरी सरकारी मालमत्तेची व यंत्रणेची नासधूस करून सरकार कोलमडवण्यात हिंसा होत नाही असे ठरवून चळवळीला तसे स्वरूप दिले. त्यासाठी या गटातील नेते भूमिगत झाले.
राजकीय प्रवाहांची दखल घेतल्याशिवाय सामाजिक इतिहासाला पूर्णता येत नाही, हे लक्षात घेतले तर या विवेचनाची आवश्‍यकता लक्षात येईल.   

संबंधित बातम्या