बाबासाहेबांनी आव्हान स्वीकारले!

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 24 जून 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

गांधी आणि आंबेडकर यांचे विशेषतः धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रांमधील मतभेद व्यक्त व्हायला निमित्त मिळाले ते लाहोर येथील आर्य समाज मंडळीने चालवलेल्या जातपात तोडक मंडळापुढे बाबासाहेबांनी न केलेल्या भाषणाचे!
 
आर्य समाज ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी उभारलेली संस्था आणि चळवळ होती, हे जाणकारांना ठाऊकच आहे. हिंदू धर्मात प्रचलित असलेल्या मतमतांतरांच्या गलबत्यातून वाट काढीत काही एक व्यवस्था निर्माण करावी म्हणून स्वामीजींनी आर्य समाजाची स्थापना केली. या समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे हा समाज पौराणिक हिंदू धर्माला पूर्णपणे नाकारतो व केवळ वेदांच्याच प्रामाण्याचा पुरस्कार करतो. वेदांमध्ये जातिव्यवस्था नसून वर्णव्यवस्था आहे व ती जन्मावर आधारित नसून गुणकर्मावर अधिष्ठित आहे. त्यामुळे तेथे जातिभेदांना व उच्चनीचपणास स्थान नाही. तसेच स्त्रियांनाही अधिकार आहेत, असे दयानंदांनी सांगितले. दयानंदांच्या या भूमिकेचे आकर्षण महाराष्ट्रात लोकहितवादी न्या. म. गो. रानडे, महात्मा फुले अशा भल्या भल्यांना होते. 

दयानंदांच्या शिकवणुकीचे अनुसरण करावे, त्यांच्या अनुयायांनी उत्तरेत विशेषतः पंजाबात व्यापक परिवर्तन घडवून आणले. जातिभेदाविरुद्ध मोहीम उभारली. लाहोर येथे कार्यरत असणारी जातपात तोडक मंडळ ही संस्था म्हणजे याच कार्याचा एक भाग. 

बाबासाहेबांनी चालविलेल्या जातिभेद आणि अस्पृश्‍यता यांच्या विरुद्धच्या चळवळीने प्रभावित होऊन लाहोरच्या या मंडळींनी या मंडळाच्या अधिवेशनात बाबासाहेबांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले. बाबासाहेबांनी हे निमंत्रण अर्थातच स्वीकारले. आपले संकल्पित अध्यक्षीय भाषण टंकलिखित करून त्यांनी ते मंडळाकडे पाठवले. 

आर्य समाजाची मंडळी कितीही परिवर्तनवादी असली, तरी त्यांना अपेक्षित व अभिप्रेत असलेले परिवर्तन हे वेद प्रामाण्याच्या चौकटीत घडवायचे परिवर्तन होते. एव्हाना बाबासाहेब ग्रंथ प्रामाण्याच्या पलीकडे पोचले होते. विशेषतः हिंदू धर्मातील शास्त्रप्रामाण्यामुळेच या धर्माची हानी झाली असल्याचे त्यांचे मत झाले होते. शास्त्र प्रामाण्याच्या प्रभावामुळेच हिंदू धर्म एक समाज व एक राष्ट्र उभारण्यात अपयशी ठरला असल्याचेही त्यांना वाटत होते. मग ते शास्त्र पुराणांवर आधारित असो की वेदांवर.

बाबासाहेब जोपर्यंत पुराणांवर टीका करीत होते, तोपर्यंत लाहोरवासीयांना काहीच अडचण नव्हती. परंतु, त्यांच्या भाषणात वेदांसह एकूणच शास्त्रप्रामाण्यावर प्रहार करण्यात आले होते. ते वाचून जातपात तोडक मंडळाचे कार्यकर्ते भलतेच अस्वस्थ झाले. त्यांनी बाबासाहेबांना भाषणात बदल करून संबंधित भाग वगळण्याची विनंती केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेल्या आंबेडकरांनी अशा प्रकारची तडजोड करायचे साफ नाकारले. त्यावर मंडळाने अधिवेशनच रद्द करून टाकले. त्यामुळे बाबासाहेबांचे होणारे भाषण झालेच नाही. 

अर्थात बाबासाहेब स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हते. आपले विचारमंथन असे वाया जाऊ देणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यांनी या भाषणाच्या प्रती स्वखर्चाने छापून वितरित केल्या. त्यांचे विचार संबंधितांपर्यंत पोचले. 

या संबंधितांमध्ये स्वतः गांधीही होते. गांधींनी ‘यंग इंडिया’मधून लेख लिहून बाबासाहेबांच्या मतांशी असहमती प्रकट केली. 

बाबासाहेबांनी अर्थातच विनाविलंब प्रतिक्रिया व्यक्त करण्यात हयगय केली नाही. गांधींनी वेदोत्तर हिंदू धर्माचेही समर्थन, अर्थात त्यातील त्रुटी मान्य करीत, केले होते. याच हिंदू धर्मात ज्ञानेश्‍वर, नानक, तुकारामांसारखे संत निर्माण झाले असल्याचे निदर्शनास आणले. 

बाबासाहेबांचे भाषण नीट वाचले असता असे लक्षात आल्याशिवाय राहात नाही, की आता हिंदू धर्मात काही सुधारणा घडून येईल यावरील त्यांचा विश्‍वास उडाला होता. परंतु, ही झाली व्यावहारिक बाजू. याची तात्त्विक बाजू होती, की अशा हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची त्यांची मानसिक तयारी झाली होती. याउलट गांधींना धर्मांतर ही कल्पनाच मान्य नव्हती. त्रुटी जमेस धरून ते सर्वच धर्मांना ईश्‍वरप्राप्तीची समतुल्य साधने मानीत होते. जातिभेद वा अस्पृश्‍यता यांच्या संदर्भात जे काही करायचे होते ते सर्व त्यांना हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच करायचे होते. 

हिंदू धर्मातील शास्त्रांचा त्याग करायचा सल्ला बाबासाहेब देतात खरा; पण भेदकारक प्रचलित शास्त्रांचा त्याग करून कशाचा स्वीकार करायचा किंवा कोणता नवा पर्याय उभा करायचा हे बाबासाहेब सांगत नाहीत. (त्यातल्या त्यात ते उपनिषदांमधील ब्रह्मवादाची प्रशंसा करतात. पण ते पुरेसे नव्हते.) खरे तर हिंदू धर्मियांनी बौद्ध धर्माचा अंगीकार करावा असे त्यांचे मत झाले होते. पण हे मत या भाषणातून व्यक्त करणे योग्य ठरले नसते आणि मुख्य म्हणजे बौद्ध धर्माकडील आपला कल त्यांनीही अद्याप स्पष्टपणे व्यक्त केला नव्हता. तो त्यांनी केला असता, तर लाहोरवाली मंडळी त्यांना बोलवण्याच्या भानगडीत पडलीच नसती. 

ते काहीही असो. आपण हिंदू म्हणून जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे बाबासाहेबांनी येवला येथील एका परिषदेत जाहीर केल्यानंतरही हिंदू धर्मातील नेत्यांनी व विचारवंतांनी त्यांची ही घोषणा गंभीरपणाने घेतली नाही, ही वस्तुस्थिती आहे. विविध पिठांवरील शंकराचार्य, हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे अध्वर्यू स्वतः गांधी इत्यादींनी या घोषणेकडे डोळेझाक (कानझाक?) केली असे म्हणावे लागते. काहींची मजल तर गोमीच्या शंभर पायांपैकी एखादा मोडल्याने गोम लंगडी होत नाही असे तुच्छतावादी उद्‌गार काढण्यांपर्यंत गेली. 

अर्थात या प्रकारच्या थंड आणि तुच्छतावादी प्रतिसादांमुळे बाबासाहेबांचा निश्‍चय अधिक पक्का झाला असला पाहिजे यात शंका नाही. 

बाबासाहेब पहिल्यांदा विशेषतः त्यांच्या स्वतःच्या जातसमूहाला आणि सामान्यपणे एकूणच अस्पृश्‍यांना विश्‍वासात घेऊन बौद्ध धर्म स्वीकारण्याची आवश्‍यकता पटवून देताना दिसतात. हिंदू धर्म हा अस्पृश्‍यांच्या आध्यात्मिकच नव्हे, तर लौकिक किंवा भौतिक उन्नतीच्या मार्गातही अडथळे निर्माण करणारा धर्म आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तर या दोन्ही प्रकारचे अडथळे दूर होऊन या समूहाची सर्वांगीण उन्नती होईल असे ते पटवून देतात. 

मात्र, त्यांच्याबरोबर आणि स्वतःची बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची भूमिका पूर्णपणे आध्यात्मिक असल्याचेही ते स्पष्ट करतात. आपण सर्व प्रकारचे लौकिक, ऐहिक लाभ प्राप्त केले असून आपल्या धर्मांतराची प्रेरणा विशुद्ध आध्यात्मिक असल्याचे ते सांगतात. कारण उघड आहे - शुद्ध आध्यात्मिक प्रेरणेतून धर्मांतर करणाऱ्यांची संख्या कोणत्याही समाजात अल्पच असणार. दुसरे असे, की स्वतः आंबेडकरांची भूमिका तौलनिक धर्माभ्यासातून सिद्ध झालेली असल्यामुळे तिला कोणीही भौतिक लाभाचे गालबोट लावलेले त्यांना खपले नसते. 

अशा प्रकारे १९२४ च्या बार्शी येथील अस्पृश्‍यांच्या परिषदेत पुढे करण्यात आलेल्या नामांतर, देशांतर आणि धर्मांतर या तीन पर्यांयापैकी धर्मांतराच्या पर्यायाचा व तो धर्म बौद्ध धर्म असल्याचा स्पष्ट उच्चार करताना बाबासाहेब दिसू लागले. याच दरम्यान त्यांनी देहूरोड या गावात मंदिर उभारू इच्छिणाऱ्या अस्पृश्‍यांना बुद्धविहार बांधण्याचा सल्ला दिला. (१९५६ मध्ये सामूहिक धर्मांतर करण्यापूर्वी बाबासाहेबांनी व आपण खासगीरीत्या बौद्ध धर्म स्वीकारला असल्याचे त्यांच्या पत्नी सविताबाई तथा माईसाहेब आंबेडकर सांगतात. पण ही गोष्ट तेव्हा सर्वज्ञात झाली नसल्याने त्याचा फक्त उल्लेख करणे पुरेसे होईल.) भारताची राज्यघटना तयार करण्याच्या मिळालेल्या संधीचा उपयोग करून त्यांनी अशोक चक्र, सिंहशीर्ष अशा बौद्ध प्रतिकांचा समावेश करून घेतला. 

अर्थात यामागची त्यांची दृष्टी केवळ सांप्रदायिक अथवा पंथीय नव्हती, हे लक्षात घ्यायला हवे. या काळात त्यांची अशी खात्री झाली होती आणि याच खात्रीस अनुसरून त्यांनी हिंदू धर्मियांना असे आवाहन केले, की भारतात स्वीकारण्यात येणारी लोकशाही ही जरी राजकीय व्यवस्था असली, तरी ती यशस्वी होण्याच्या मार्गात हिंदू धर्म हा एक अडथळा आहे. राजकीय लोकशाहीतील बहुमत हे खऱ्या अर्थाने विशुद्ध ‘राजकीय’ पाहिजे. हिंदू समाज जातिव्यवस्थेने चालणारा असल्यामुळे हिंदूंच्या लोकशाहीतील बहुमत आपोआपच जातीय होईल. ते राजकीय होण्यासाठी हिंदूंनी जातिनिरपेक्ष धर्माचा स्वीकार करायला हवा आणि हा धर्म म्हणजे अर्थातच बौद्ध धर्म! दुसरे असे, की बौद्ध धर्म हा ख्रिस्ती किंवा इस्लाम धर्माप्रमाणे परभूमीत निर्माण झालेला धर्म नसून तो याच मातीतील व याच संस्कृतीतील धर्म आहे. 

याचा अर्थ असा होतो, की धर्मांतराच्या विचारांच्या दुसऱ्या टप्प्यावर बाबासाहेब आता हिंदूंनीच बौद्ध धर्माचा स्वीकार करावा असे प्रतिपादन करू लागले. म्हणजेच सुरुवातीला एक जात समूहाच्या उद्धारासाठी धर्मांतराची गरज सांगणारे बाबासाहेब नंतर भारत नावाच्या देशातील लोकशाही व्यवस्थित चालावी म्हणून सर्वांनी सवर्णांनी बौद्ध व्हावे असे म्हणू लागलेले दिसतात. त्यांच्या विचारांना आता राष्ट्रीय परिमाण लाभले. नंतरच्या काळात सारा भारत बौद्धमय करीन अशी प्रतिज्ञा त्यांनी केलेली दिसते. तिचा अन्वयार्थ लावताना हे राष्ट्रीय आणि राजकीय परिमाण विसरता कामा नये. 

पण बाबासाहेबांचा धर्मांतरविषयक विचार येथेच न थांबता आणखी पुढे गेला. तो राष्ट्रीय न राहाता आंतरराष्ट्रीय झाला. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

ज्या काळात बाबासाहेब हा विचार मांडीत होते तो काळ विसाव्या शतकातील पन्नासच्या दशकाचा होता हे लक्षात घेतले पाहिजे. या काळातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला, तर असे दिसून येते, की दुसरे महायुद्ध होऊन गेले होते. जर्मनी, इंग्लंड आणि जपान या युद्धनायकांची वेगवेगळ्या पातळ्यांवर वाताहत होऊन अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या नव्या महासत्ता नव्याने उदयाला आल्या होत्या. या महासत्तांमधील संघर्ष केवळ राजकीय व्यवहारांचा नसून तात्त्विकही होता. अमेरिका भांडवलशाहीचे व लोकशाहीचे विचार मान्य असलेला देश होता. तेथे व्यक्तीला व व्यक्तिस्वातंत्र्याला स्थान आणि मान होता. याउलट रशिया हा कार्ल मार्क्‍सचे साम्यवादी विचार अंगीकारलेला देश होता. तेथे खासगी मालमत्तेला मान्यता नव्हती. 

परंतु, मुद्दा या दोन महासत्तांमधील संघर्षापुरता मर्यादित नव्हता. या दोन राष्ट्रांकडे जगातील इतर राष्ट्रांचे नेतृत्व आले होते. कारण भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद या विभागणीची लागण त्यांनाही झाली होती. या राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली होती, त्यांचे नेतृत्व स्वाभाविकपणे अमेरिकेकडे गेले होते. त्याचप्रमाणे साम्यवादी विचारधारेचा स्वीकार केलेल्या राष्ट्रांनी आपोआपच रशियाचे पुढारपण मान्य केले होते. यानुसार जगात या राष्ट्रांचे दोन गट निर्माण होऊन त्या प्रत्येक गटात (अनुक्रमे अमेरिका व रशिया यांच्याशी) संरक्षणविषयक व सहकार्यविषयक अधिकृत करारमदारही झाले होते. दोन नेते देश एकमेकांविरुद्ध युद्ध पावित्र्यात उभे ठाकले होते. त्यासाठी त्यांच्यात प्रत्यक्ष युद्ध होत नसल्यामुळे या नव्या राजकीय परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी राजकीय पंडितांनी ‘शीतयुद्ध’ (cold war) हा शब्दप्रयोग रूढ केला होता. 

विशेष म्हणजे चीनमध्येही साम्यवादी क्रांती होऊन माओ झेडुंग यांच्या नेतृत्वाखालील समाज सत्तावादी शासन तेथे राज्य करीत होते. मुळातच धर्मविरोधी असलेल्या कम्युनिष्टांनी तेथील बौद्ध धर्माचा वारसा नाकारला असल्यास त्याच आश्‍चर्य नाही. 
 
अशा वेळी बौद्ध धर्माचा विचार जागतिक पार्श्‍वभूमीवर करायची गरज निर्माण झाली होती. बाबासाहेबांनी परिस्थितीचे हे आव्हान स्वीकारले.    

संबंधित बातम्या