‘बुद्ध अँड हिज धम्म’

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 8 जुलै 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यामागील एक कारण जसे राष्ट्रीय प्रश्‍नांशी निगडित होते, तसे दुसरे कारण आंतरराष्ट्रीय समस्येशी संबंधित होते. देशात लोकशाही राज्यव्यवस्था मजबूत व्हायची असेल, तर देशात बौद्ध धर्माची आवश्‍यकता असल्याची बाबासाहेबांची खात्री पटली होती. त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमेरिकावादी व्यक्तिनिष्ठ भांडवलशाही आणि रशियावादी समष्टीनिष्ठ साम्यवाद या दोन आर्थिक राजकीय छावण्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी जगाने, विशेषतः रशियाने बौद्ध तत्त्वांचा स्वीकार केला पाहिजे असेही त्यांचे मत झाले होते. त्यांनी लिहिलेल्या व त्यांच्या मृत्युनंतर प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘बुद्ध अँड हिज धम्म’ या पुस्तकाची रचना आणि आशय यांचा सूक्ष्म अभ्यास केला असता ही बाब स्पष्ट होते. 

या ग्रंथाच्या भाषेकडे आणि शैलीकडे लक्ष दिले असता त्याच्यावरील बायबलचा प्रभाव दिसून येतो. कारण उघड आहे, जागतिक पातळीवर विचार केला असता धार्मिक क्षेत्रात सर्वांत लोकप्रिय व प्रमाणभूत ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा बायबल हाच आहे. शिवाय जगातील ज्या प्रमुख राष्ट्रांना समोर ठेवून बाबासाहेब मांडणी करीत होते त्यांच्यापैकी बहुतेक राष्ट्रे धर्माने ख्रिस्ती होती. (अगदी कम्युनिस्ट रशियाचासुद्धा पूर्वीचा धर्म ख्रिस्तीच होता.) साहजिकच बायबलच्या वळणाची भाषा आणि शैली लोकांच्या अंगवळणी पडली होती. 

पण कदाचित याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा ग्रंथाच्या आशयाचा आहे. ग्रंथ अंतिमतः धर्मग्रंथ असला, तरी त्यातील आर्थिक आणि राजकीय आशय लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहात नाही. अमेरिका आणि इंग्लड या देशात शिक्षण घेण्यासाठी कराव्या लागलेल्या वास्तव्याच्या काळात (तसेच भारतातील ब्रिटिश सत्तेच्या कायद्यात वावरताना) बाबासाहेबांनी उदारमतवादी लोकशाहीचा पुरेसा अनुभव घेतला होता. या राज्यप्रणालीत व्यक्तीची प्रतिष्ठा व व्यक्तींच्या स्वातंत्र्याला असलेले मूल्य किती महत्त्वाचे आहे हे त्यांना समजले होते. परंतु, या प्रणालीमधील अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्याचे पर्यवसान आर्थिक विषमतेत होऊ शकते याची कल्पना त्यांना आल्याशिवाय राहिली नव्हती. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याला सामाजिक नियंत्रणाच्या कक्षेबाहेर मोकळे सोडणे योग्य होणार नाही, हेही ते जाणून होते. रशियातील समाजसत्तावादामध्ये अशी नियंत्रणे होती. त्यामुळे एका वर्गाने दुसऱ्या वर्गाचे शोषण करणे हा प्रकार तेथे संपुष्टात आल्याचा बोलबाला होता. परंतु, समतेचा हा परिणाम साधताना रशियात व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचेही स्पष्ट दिसत होते. आंबेडकरांना शोषणमुक्त, पण स्वतंत्र समाजरचना हवी होती. वेगळ्या प्रकारे सांगायचे झाल्यास, त्यांचा कल लोकशाही समतावाद म्हणता येईल अशा प्रणालीकडे होता. या प्रकारच्या प्रणालीत व्यक्तिस्वातंत्र्याला व्यक्तिप्रतिष्ठेला स्थान असते. व्यक्ती (खासगी) संपत्ती निर्माण करणे व त्या संपत्तीवर तिचा हक्क असणे मान्य असते. बाबासाहेब या अर्थाने व्यक्तिवादी होतेच होते. परंतु, अशा प्रकारच्या खासगी मालमत्तेचा हक्क अमर्याद असावा हे त्यांना पटत नव्हते. तेवढ्यापुरते त्यांना डावे साम्यवादी तत्त्वज्ञान मान्य होते. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण त्यांना अमान्य नव्हते. नियंत्रित आर्थिक स्वातंत्र्य असलेली लोकशाही ते मानीत होते. अशा प्रकारच्या लोकशाहीत भांडवलदारांना स्वातंत्र्य असेल, पण ते स्वातंत्र्य श्रमिकांच्या शोषणाचे स्वातंत्र्य नसेल. तसेच समाज, राष्ट्र किंवा शासन इतके सर्वंकष नसेल, की त्याला सहजपणे व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करता यावा. एका बाजूने या प्रणालीचे वर्णन शोषणरहित लोकशाही असे करता येईल. दुसऱ्या बाजूला पण त्याच वेळी तिला दमनरहित समाजवाद असेही म्हणता येईल. शोषण आणि दमन हे दोन दोष टाकून वेगळी व्यवस्था उभारणे बौद्ध धर्माच्या आधारे शक्‍य होईल असे त्यांना वाटत होते आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ मधील त्यांची वेगळी मांडणी यासाठीच आहे. विशेषतः रशियात आज (म्हणजे तेव्हा) जरी श्रमिकांचे हुकूमशाही शासन (dictatorship of prolitaiate) असले, तरी तो संक्रमणाचा एक टप्पा आहे. अंतिम उद्दिष्ट शासनविरहित समाज हेच आहे. या शेवटच्या टप्प्यावर शासनसंस्थेचा लय (withering away of the state) होईल असे मार्क्‍सवाद सांगतो. 

यावर बाबासाहेबांनाच अशी शंका आहे, की शासनसंस्थेच्या म्हणजेच दमनयंत्रणेच्या अभावी समाजाचे नियमन कसे आणि कोण करणार? त्यांचे स्वतःचे उत्तर व अर्थातच रशियाला सल्ला आहे, की हे काम ‘धम्म’ करू शकतो. म्हणून रशियाला अर्थात कम्युनिस्ट राष्ट्रांना बौद्ध धर्म स्वीकारायची गरज आहे. 

बौद्ध धर्मात खासगी संपत्तीची मातब्बरी नाही हे सांगताना बाबासाहेब बौद्ध संघाचे उदाहरण देतात. संघामधील भिक्षूकडे केवळ जीवनावश्‍यक वस्तू असतात. तेथे खासगी संपत्तीचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. 

देशपातळीचा विचार केला असता बाबासाहेब अशी राज्यघटना निर्माण करतात, की जिच्यामध्ये उपरोक्त दोन प्रणालींचा समन्वय आहे. अर्थात या समन्वयमार्गाचे वैचारिक अधिष्ठान बौद्ध धर्म असले, तरी त्याचा स्पष्ट उच्चार घटनेत करता येणे शक्‍यच नव्हते व त्याची तशी गरजही नव्हती. परंतु, अशोकचक्र, सिंहस्तंभ अशा बौद्ध प्रतिकांनी ते सूचित होते. 

या संदर्भात आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणे उचित ठरेल. राज्यघटना लिहिली गेली तेव्हा बाबासाहेब पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री होते. नंतर त्यांचे नेहरूंशी मतभेद झाले. त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि नंतर नेहरूंवर टीका केली हे खरे असले, तरी राज्यघटनेच्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांपैकी इतर कोणाहीपेक्षा त्यांचे सूर नेहरूंशीच जुळले होते, असे निश्‍चितपणे म्हणता येते. राजकीय भूमिकेचा विचार केला, तर नेहरूंची अमेरिका किंवा रशिया यांच्यापैकी कोणाच्याही गोटात न जाता तटस्थ किंवा अलिप्त राहायची राजकीय भूमिका बाबासाहेबांच्या भूमिकेपेक्षा तत्त्वतः फार वेगळी होती असे म्हणता येत नाही. तिला एक प्रकारचा राजकीय मध्यममार्ग असे म्हणता येईल. याही पुढे जाऊन नेहरूंनी राजकीय पातळीवर जो पंचशील तत्त्वाचा प्रयोग करून पाहिला तो बौद्ध विचारांचाच आविष्कार होय. अर्थात कम्युनिस्ट चीनने चालवलेल्या बौद्ध धर्मियांच्या दमनामुळे व तिबेटच्या प्रश्‍नामुळे अस्वस्थ झालेल्या बाबासाहेबांना नेहरूंनी राजकीय व्यवहार म्हणून तरी अमेरिकेशी जुळवून घ्यावे असे वाटत होते. अर्थात ही भूमिका तात्त्विक असण्यापेक्षा व्यावहारिक अधिक होती. 

हिंदूच्या स्मृतीप्रणित कायद्यात बदल व्हावा, असे मनुस्मृतीचेच दहन करणाऱ्या बाबासाहेबांना वाटणे स्वाभाविकच म्हणता येते. पण नेहरूंनाही बदल हवा होता. नेहरूंच्याच संमतीने व पाठिंब्याने बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केले हे विसरता कामा नये. या बिलाला सनातनी हिंदूंनी विरोध केला, तो अनपेक्षित नव्हता. पण स्वतः राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांपासून काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना हा बदल नको होता. त्यांच्या दडपणामुळे नाइलाज होऊन नेहरूंना हे बिल मागे घ्यावे लागले. बाबासाहेबांनी नेहरू मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्यामागचे हेही एक कारण होते. बाबासाहेबांची वृत्ती त्यांच्या एकूण भूमिकेशी सुसंगत होती, असे कोणीही म्हणेल. पण त्याच बरोबर बहुसंख्य काँग्रेसवाल्यांचा विरोध मोडून नेहरूंनी हिंदू कायदा विधेयक तसेच पुढे रेटावे, ही भूमिकाही अवाजवीच म्हणावी लागते. ते बिल जन्माला येण्यापूर्वी मृत्यू पावले आणि न रडता त्याचे दफनही केले गेले. ही बाबासाहेबांची खंतही समजून घेता येते. अर्थात या सर्व घटनांबरोबर या सत्याचाही उल्लेख करायला हवा, की हिंदू कायद्याचे विधेयक जरी मागे घेण्यात आले, तरी त्यातील वेगवेगळ्या तरतुदी वेगवेगळ्या टप्प्यावर पुढे आणून त्यांचे कायद्यात रूपांतर करण्याची हिंमतही नंतरच्या काळात सत्ताधाऱ्यांनी दाखवली. आजमितीला या कायद्यातील बहुतेक सर्व तरतुदी अमलात आणल्या गेल्या आहेत, असे म्हणता येते आणि मुख्य म्हणजे या प्रक्रियेने महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. 

नेहरू मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडल्यानंतर बाबासाहेबांनी १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षांबरोबर युती करून निवडणुका लढवल्या खऱ्या, परंतु त्यात दोघांनाही अपयश आले. जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन अशा समाजबांधवांनी १९४२ च्या चळवळीत केलेल्या कामगिरीमुळे मतदार त्यांच्या या पक्षाला चांगला प्रतिसाद देतील असे अनेकांना वाटत होते. पण तसे झाले नाही. या अपयशाने जयप्रकाशांनी विनोबांच्या आश्रमाची वाट धरली तर अच्युतरावांनी राजकारणाकडे पाठ फिरवून जे. कृष्णमूर्तींबरोबर जाणे पसंत केले. 

या निवडणुकीत काँग्रेस खालोखाल (विरोधी पक्ष म्हणून) कम्युनिस्टांना मिळालेले यश अनपेक्षित होते. ४२ च्या चलेजाव चळवळीत कम्युनिस्टांनी केलेला अवसानघात विसरूनच मतदान झाले असावे यात शंका नाही. 

बाबासाहेबांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास त्यांचा स्वतःचा जो पराभव झाला तो कम्युनिस्टांच्या विशेषतः कॉ. म. डांगे यांच्या कारवायांमुळे असा सार्वत्रिक समज रूढ झाला. कम्युनिस्टांच्या एकूणच धर्मविरोधी भूमिकेमुळे त्यांना विरोध करणे बाबासाहेबांना क्रमप्राप्तच झाले. पण हा झाला स्थानिक पातळीवरील राजकारणाचा भाग. तात्त्विक पातळीवर मात्र बाबासाहेबांनी मार्क्‍सवादाचा गाभा आत्मसात करून त्याची व्यक्तिस्वातंत्र्यवादी लोकशाहीशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. ‘बुद्ध अँड हिज धम्म’ त्यांची बौद्ध धर्माची वेगळी मांडणी हा त्यांच्या या प्रयत्नाचाच एक भाग मानता येतो. 

अर्थात पारंपरिक बौद्धांनी या ग्रंथाकडे, त्यातील मांडणीमुळे तो धर्मग्रंथ असण्यापेक्षा राजकीय ग्रंथ असल्याचा समज करून घेतला. बाबासाहेबांनी या ग्रंथात कार्ल मार्क्‍सच्या शोषण या संकल्पनेचा बुद्धांच्या दुःख संकल्पनेचा मेळ घातला. बुद्ध ज्याला दुःख म्हणत होते त्यालाच मार्क्‍स शोषण म्हणतो असे त्यांचे प्रतिपादन आहे. होनयान, महायान, वज्रयान अशा बौद्ध धर्माच्या पारंपरिक शाखांप्रमाणे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची एक वेगळीच शाखा केली, असे म्हणायला हरकत नाही. तिला नवयान किंवा नामोल्लेख करायचा झाला तर भीमयान असेही म्हणता येते. 

या मांडणीत बाबासाहेबांना बौद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणेच स्वतः बुद्धाच्या चरित्राचाही वेगळा अन्वयार्थ लावावा लागला. सिद्धार्थ गौतमाने तरुणपणी पत्नी व मुलाने घर भरलेले असताना गृहत्याग केला ही महाभिनिष्क्रमणाची कथा सर्वज्ञात होती. तिची कारणमीमांसा करताना पारंपरिक चरित्रकारांनी बुद्धाला जराजर्जर व्यक्तीचे तसेच मृतदेहाचे दर्शन झाल्याने त्याने चिंतनासाठी गृहत्याग केला असे सांगितले होते. बाबासाहेबांनी मात्र शाक्‍य आणि कोलीय यांच्यात नदीच्या पाण्याच्या वाटपावरून होऊ घातलेल्या युद्धात सिद्धार्थाने आपल्या शाका गणांच्या बाजूने लढाईत उतरायला नकार दिला म्हणून तत्कालीन गण नियमानुसार राज्य सोडणे पसंत केले असे प्रतिपादन केले. 

बाबासाहेबांच्या नव्या व परंपराविरोधी मांडणीची वैदिक परंपरेतील अलीकडच्या समांतर मांडणीशी तुलना करायची झाल्यास लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचा उल्लेख करावा लागतो. गीतारहस्यावरही तो ग्रंथ राजकीय असल्याचा आक्षेप घेण्यात आला होताच. हे दोघे महापुरुष महाराष्ट्राचे असण्याचा आपण अभिमान बाळगायला हवा.

संबंधित बातम्या