पासंग फुटतो तेव्हा...

डॉ. सदानंद मोरे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या चर्चेच्या संदर्भात एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. धर्मांतर का केले असा प्रश्‍न वारंवार विचारला जातो, पण नेमक्‍या बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला हे कोणी विचारीत नाही, याची बाबासाहेबांना खंत वाटत असे. ती त्यांनी व्यक्तही करून दाखवली. बौद्ध धर्माची पुनर्मांडणी करताना आपली गाठ कम्युनिस्टांच्या, मार्क्‍सवाद्यांच्या म्हणजेच साम्यवादी विचारसरणीशी आहे, याची खूणगाठ त्यांनी बांधली होती. त्यामुळे ‘बुद्ध अँड हिज धम्म’मध्ये त्यांचा प्रतिस्पर्धी हिंदू धर्म किंवा हिंदू धर्माचा प्रवक्ता पुरोहित नाही तर त्या काळातील विस्तारशीर मार्क्‍सवाद आहे.

याच दरम्यान बाबासाहेबांनी ‘बुद्ध ऑर कार्ल मार्क्‍स’ लिहिले. त्याचप्रमाणे ‘मुक्ती कोन पथे?’ असे महत्त्वाचे व्याख्यानही दिले. ‘बुद्ध ऑर कार्ल मार्क्‍स’ हे शीर्षक कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी १९२० च्या दशकात लिहिलेल्या ‘गांधी विरुद्ध लेनिन’ या पुस्तिकेची आठवण करून देणारे आहे. डांगे यांनी ही पुस्तिका लिहिली, तेव्हा महात्मा गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर होते आणि डांगे नव्याने निर्माण होत असलेल्या मार्क्‍सवादी विचारसरणीला भारतीय भूमीत रुजवू पाहात होते. या पुस्तिकेतील डांग्यांचा पवित्रा गांधींचे उच्चाटन करून त्यांच्या जागी लेनिनला बसवण्याचा नसून, भारतीय परिस्थितीत दोघांच्या विचारांचा समन्वय घडवून आणण्याचा होता. भारतीय परिस्थितीचा संदर्भ डांग्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही व त्याची किंमतही त्यांना चुकवावी लागली. उलट वारंवार स्वदेशाच्या म्हणजे चीनच्या संदर्भात मार्क्‍सवादाची मांडणी करणारा माओ मात्र येथील कम्युनिस्टांना चालला व त्यांचा नायकही झाला. पण तो मुद्दा वेगळा. डांगे यांनी भारतीय परिस्थितीच्या संदर्भात केलेला प्रयोग बाबासाहेब जागतिक पातळीवर करू पाहातात. अर्थात बाबासाहेबांच्या प्रयोगात गांधींचे स्थान बुद्धाने घेतले आहे आणि लेनिनऐवजी लेनिनचाही मूलस्त्रोत असलेल्या खुद्द मार्क्‍सचीच स्थापना झाली आहे. डांगे प्रयोग करीत होते, तेव्हा लेनिनने नुकतीच रशियात क्रांती घडवून आणली होती व इतिहासातील पहिली कम्युनिस्ट राजवट स्थापन करण्याचा मान मिळवला होता. बाबासाहेबांच्या प्रयोगाच्या वेळी लेनिनच काय पण लेनिनचे उत्तराधिकारी स्टॅलिनसुद्धा कालवश झाले असून, रशियाची सूत्रे निकिता कृश्‍चेव्हकडे आली होती. त्यामुळे त्यांनी थेट मूलस्त्रोताच्या म्हणजे मार्क्‍सच्या संदर्भात मांडणी करणे उचितच म्हणावे लागते.

तीच गोष्ट गांधींची. दरम्यानच्या काळात गांधीही कालवश झाले होते. पण मुख्य मुद्दा असा, की तत्कालीन अनेक लोकांसाठी गांधी भगवान गौतम बुद्धाचाच वारसा चालवत होते. विशेषतः गांधींचा अहिंसेवरील भर लक्षात घेता असा समज होणे स्वाभाविकच होते. सावरकरांसारखे गांधींचे विरोधकसुद्धा ही गोष्ट गृहीत धरूनच त्यांच्यावर टीका करीत असत. गांधींचा ‘साबरमतीतील श्रमण’ हा उल्लेख काय किंवा ‘संन्यस्त खङ्‌ग’ सारखे नाटक काय, सावरकर गांधींना आधुनिक बुद्ध समजूनच त्यांच्यावर टीका करीत होते.

साहजिकच बाबासाहेबांपुढील पहिले आव्हान गांधींचे तत्त्वज्ञान (विशेषतः अहिंसाविचार) बुद्धांच्या विचारांपेक्षा वेगळे आहे, असे दाखवणे हे होते, त्यासाठी गांधींची अहिंसा ही बुद्धाच्या अहिंसेपेक्षा वेगळी होती हे सांगण्याची गरज होती. ‘बुद्ध ऑर मार्क्‍स’मध्ये व इतरत्रही बाबासाहेबांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आढळतो.

बुद्धाची अहिंसा गांधींच्या अहिंसेपेक्षा वेगळी आहे, हे सांगण्यासाठी बाबासाहेबांनी प्रसंगी तुकोबांचा आधार घेतला आहे. युद्ध म्हणजे हिंसाच. परंतु, काही युद्धे समर्थनीय असतात (व काही समर्थनीय नसतात) असे बुद्धांचे मत असल्याचे बाबासाहेब सांगतात. ‘दया तिचे नाव भूतांचे पालन। आणिक निर्दळण कंटकांचे।।’ ही तुकोबांच्या अभंगामधील ओळ उधृत करून बाबासाहेब सांगतात, की तुकोबांची दयेची व्याख्या ही अहिंसेची व्याख्या एकांगी नसून, परिपूर्ण आहे. तिच्यात भूतांच्या पालनाबरोबर दुष्टांच्या संहाराचाही अंतर्भाव होतो. असेच बुद्धाच्या अहिंसेचे आहे. याउलट गांधींची अहिंसा एकांगी असून, तिच्यात दुष्टदुर्जनांच्या नायनाटाचा समावेश नाही.

बाबासाहेबांचा उद्देश (कॉ. डांगे यांच्याप्रमाणे) बुद्ध आणि मार्क्‍स यांना एकमेकांचे पर्याय वा प्रतिस्पर्धी म्हणून उभे करण्याचा नसून, बुद्धप्रणित धम्म मार्क्‍सच्या खासगी संपत्तीविषयीच्या मताशी विसंगत कसा नाही हे दाखवण्याचा आहे. पण त्याचबरोबर मार्क्‍सवाद क्रांतीसाठी सर्वंकष हिंसेचा पुरस्कार करीत असेल, तर तो बुद्धविचारात बसत नाही. स्वतः बुद्ध लोकशाहीवादी होते असे बाबासाहेबांचे म्हणणे आहे. म्हणजेच भांडवली लोकशाहीतील शोषण आणि साम्यवादी राजवटीतील हुकूमशाही दमन हे दोष दूर करण्याची क्षमता बुद्धविचारात असल्यामुळे (रशियासह) सर्व जगाने या धर्माचा स्वीकार करावा असे त्यांचे प्रतिपादन आहे.

बाबासाहेबांनी केलेल्या बौद्ध धर्माच्या नव्या मांडणीवर टीका करणारे विचारवंत हे विसरतात, की बाबासाहेब राजकारणी होते आणि स्वतः बुद्धाला राजकारणाचे वावडे नव्हते. राज्यत्याग करून धम्माचा उपदेश करणाऱ्या बुद्धाकडे तेव्हाही वेगवेगळे राज्यकर्ते येत असत. त्यांचा अव्हेर न करता बुद्ध त्यांच्याशी सल्लामसलत करीत असे हे विसरता कामा नये.

बाबासाहेबांच्या पश्‍चात झालेला त्यांच्या अनुयायांचा प्रवास विचारात घेतला असता मार्क्‍सचे व मार्क्‍सवादाचे काय करायचे या मुद्याविषयीचे मतभेद हे त्यांच्यामधील फाटाफुटीचे एक प्रभावी कारण ठरले. काहींची मजल ‘बुद्ध म्हणजे दवा आणि मार्क्‍स म्हणजे दारू’ असे म्हणण्यापर्यंत गेली. स्वतः बाबासाहेबांनीच महात्मा फुल्यांना गुरुस्थानी मानले असल्यामुळे फुल्यांच्या विचारसरणीला मान्यता देण्याविषयी अडचण नव्हती. पण मार्क्‍सचा मुद्दा आला तेव्हा दोन तट पडले. पारंपरिक रिपब्लिकन नेतृत्वात तर मार्क्‍सवादी म्हणता येईल असे कोणी दिसत नाही. नंतरच्या काळात डॉ. रावसाहेब कसबे यांनी मार्क्‍सवाद-फुलेवाद-आंबेडकरवाद (माफुआं) अशी मांडणी केली. (ती डावे विचारवंत कॉ. शरद पाटील यांनी काही प्रमाणात उचलून धरली.) याच दरम्यान पारंपरिक रिपब्लिकन नेतृत्वाला सोडचिठ्ठी देत दलित पॅंथर नावाची कडवी संघटना स्थापन करणाऱ्या आंबेडकरवाद्यांमधील फुटीचे मार्क्‍सवाद हे मुख्य निमित्त ठरले. नामदेव ढसाळ यांचा मार्क्‍सवादी कल मान्य नसलेले राजा ढाले यांनी आपला सवतासुभा मांडला.

पारंपरिक कम्युनिस्ट नेतृत्व समतेच्या चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून बाबासाहेबांचा आदर करीत असले, तरी बुद्ध आणि मार्क्‍स यांच्या समन्वयाचा आंबेडकरी विचार कोणाच्याच पचनी पडणे शक्‍य नव्हते. शरद पाटील यांनी वेगळा विचार केला असला, तरी त्यासाठी त्यांना कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडावे लागले.

बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हाचा काळ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा प्रारंभिक काळ होता. स्वतः बाबासाहेब तत्त्वतः भाषावार प्रांतरचनेला फारसे अनुकूल नव्हते. तथापि, समितीचे नेतृत्व त्यांचे मन वळविण्यात यशस्वी झाले व त्यांनी बाबासाहेबांची अनुकूलता प्राप्त केली. विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या अनुयायांनीही समितीला मनापासून साहाय्य केले. १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी आंबेडकरी उमेदवार खुल्या जागांवर सवर्ण उमेदवारांचा पराभव करून निवडून आले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर समिती फुटली. समाजवादी मंडळी बाहेर पडली. दरम्यान तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांना काँग्रेसकडे वळविण्याचे राजकारण केले. त्याला अनेक नेते त्यांच्या गळाला लागले. या प्रक्रियेपासून आंबेडकरी राजकारण्यांनी अलिप्त राहावे अशी अपेक्षा करणे हे अवाजवी होईल.

हा झाला नंतरचा इतिहास. या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की बौद्ध धर्माची राष्ट्रीय आणि वैश्‍विक पातळ्यांवर फेरमांडणी करू पाहणाऱ्या बाबासाहेबांचे राजकारणही तितकेच व्यापक असले पाहिजे अशी अपेक्षा आपोआपच निर्माण होते. बाबासाहेबांना त्याची अर्थातच जाणीव होती. म्हणून तर त्यांनी जातींचा संदर्भ असलेला शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून नवा रिपब्लिकन पक्ष काढण्याचा मनसुबा व्यक्त केला. हा पक्ष जातनिरपेक्ष असा केवळ राजकीय पक्ष असणार होता. आचार्य अत्रे यांच्यासारख्या अनेक सवर्ण नेत्यांच्या मनात बाबासाहेब आणि त्यांच्या विचारांच्या बाबत आकर्षण उत्पन्न झाले असल्यामुळे त्यांच्यापैकी काही या नव्या पक्षात प्रवेश करण्याची शक्‍यता होती.

ऐतिहासिक घटनाक्रमाच्या योगायोगाचा भाग असा, की बाबासाहेबांचे धर्मांतर अगोदर झाले. रिपब्लिकन पक्षाच्या रीतसर स्थापनेची प्रक्रिया मागे पडली. बाबासाहेबांनी अनपेक्षितपणे अचानक या जगाचा निरोप घेतल्यानंतर ज्याच्या आकर्षणामुळे इतर पक्षांशी संबंधित लोक या पक्षात आले असते असे नेतृत्व उरले नाही. इतकेच नव्हे तर खुद्द आंबेडकरवाद्यांमध्येच नेतृत्वाच्या मुद्यावरून अंतर्गत संघर्ष सुरू झाला.

या सर्व घटनांचा परिपाक म्हणजे आपल्या नव्या पक्षाला सर्वव्यापक व सर्वसमावेशक करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्नही संपुष्टात आले. नव्या पक्षाची वाढ तर खुंटली, पण त्याची अनेक शकले झाली.

आपल्या अनुयायांचे संख्याबळ पुरेसे नाही याची पूर्ण कल्पना असल्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना पूर्वीच इशारा दिला होता. या संदर्भात त्यांनी वजनमापाच्या व्यवहारातील पासंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वजनाचे उदाहरण दिले होते. पासंग हे सर्वांत लहान वजन होय. एरवी त्याचे महत्त्व फार नसते. पण तोलताना तराजूची दोन्ही पारडी सारखी झाली तर ज्या पारड्यात पासंग ठेवला जातो ते जड होते.

बाबासाहेब सांगतात, की आपला पक्ष हा जणू पासंग आहे. निवडणुकीच्या राजकारणात दोन बड्या पक्षांचे बळ सारखे, समसमान झाले तर पासंग ज्याच्या पारड्यात पडेल तो पक्ष वरचढ ठरेल. अशा प्रकारे आपला पक्ष तसा लहान असला तरी निर्णायक ठरू शकतो.

इतिहास असे सांगतो, की रिपब्लिकन पक्षाची अनेक शकले झाली. त्यामुळे त्याचे पासंग म्हणजे लहान तरीही निर्णायक असणे संपुष्टात आले, त्याचा प्रभाव नष्ट झाला. हे निश्‍चितच बाबासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नांशी विसंगत म्हणावे लागते.

रिपब्लिकन पक्षाची रीतसर स्थापना धर्मांतराच्या आधी झाली असती, तर कदाचित त्याच्यावर एका धर्माचा वा जातीचा शिक्का बसला नसता व तो वाढलाही असता. इतिहासात योगायोग महत्त्वाचे ठरतात, ते असे.

संबंधित बातम्या