गांधी-सावरकर-आंबेडकर 

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात डॉ. आंबेडकरांनी केलेल्या सामूहिक धर्मांतराच्या घटनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या घटनेकडे हिंदू धर्माच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातूनही पाहायला हवे. या धर्मांतरामुळे हिंदू धर्मातील लक्षणीय संख्येचा एक समूह त्या धर्माच्या बाहेर गेला ही वस्तुस्थिती आहे. पण हा झाला संख्यात्मक परिणाम. या घटनेची आणखी एक महत्त्वाची निष्पत्ती अभ्यासकांच्या लक्षात आलेली दिसत नाही. 

धर्मांतराच्या पूर्वी, म्हणजे आंबेडकरी समाज हिंदू धर्मात असताना, बाबासाहेब हिंदू धर्मावर टीका करीत असत. या टीकेमुळे हिंदू धर्मावर सुधारणांसाठी एक आंतरिक दबाव निर्माण होत असे. एक प्रकारे ही टीका हिंदूनींच हिंदू धर्मावर केलेली टीका मानली जाई. म्हणजेच तो एक आत्मपरिक्षणाचाही भाग होता. 

या समूहाने हिंदू धर्माच्या बाहेर पडून बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर हिंदू धर्माची आंतरिक टीका जवळपास संपुष्टात आल्यासारखी झाली. याचा अर्थ आंबेडकरांच्या पश्‍चात त्यांच्या अनुयायांनी हिंदू धर्मावरील टीका थांबवली अशातला मुद्दा नाही. किंबहुना दलित पॅंथरच्या काळात ही टीका अधिक तीव्र झाली. पण आता या टीकेला अहिंदूंनी हिंदू धर्मावर केलेल्या टीकेचे स्वरूप प्राप्त झाले. तिची दखल घेतलीच पाहिजे अशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे दोन समूहांमध्ये अशांतता निर्माण होण्याचे प्रसंगही घडले. आंबेडकरांच्या ‘Riddle of Rama and Krishna’चे प्रकाशन हे अशा अशांततेला निमित्त ठरले. प्रकरण उद्‌भवलेल्या दंगलीला काबूत आणताना कराव्या लागलेल्या गोळीबारापर्यंत गेले. 

डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मागेपुढेच प्रसिद्ध समाजसुधारक गाडगे महाराजांचे निधन झाले. महाराज पुरोगामी विचारांचे होते. बहुजन समाजातील चुकीच्या रूढी व परंपरांवर त्यांनी कठोर टीका केली. अंधश्रद्धांवर घणाघाती प्रहार केले. धार्मिक कर्मकांडावर हल्ला चढविला. महाराजांचा विचार खेड्यापाड्यापर्यंत पोचला. स्वतः महाराज आणि बाबासाहेब यांच्यात संवाद होता. धर्मांतराच्या वेळी बाबासाहेबांनी गाडगेबाबांबरोबर चर्चा केली होती हे सर्वज्ञात आहे. 

गाडगेबाबांनंतर (तुकडोजी महाराजांचा अपवाद वगळता) हिंदू धर्माची अंतर्गत समीक्षा खुंटल्यासारखीच झाली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी किंवा नानासाहेब गोरे अशी बुद्धिवादी मंडळी समीक्षा करीत राहिले हे खरे आहे. किंबहुना समाजवादी आणि साम्यवादी विचारवंतांसाठी तर हा विषय नेहमीचाच झाला होता. पण मुद्दा असा आहे, की ही मंडळी प्रायः पुरोगामी व नास्तिकतेकडे कललेली असायची. (स्वतः तर्कतीर्थांची भूमिका सुधारकापेक्षा अभ्यासकाचीच अधिक राहिली.) त्यांना मुळात धर्म या गोष्टीविषयी फारशी आस्था नव्हती. साहजिकच त्यांच्या चिकित्सक मांडणीकडेही दुर्लक्ष करणे सोपे गेले. 

या संदर्भात माध्यमाचा मुद्दाही अर्थपूर्ण ठरतो. उपरोक्त प्रकारच्या समीक्षकांनी वापरलेली माध्यमे म्हणजे नियतकालिके, मुलाखती, चर्चासत्रे, सभा, संमेलने या माध्यमातून व्यक्त झालेले विचार सर्वसाधारण हिंदू धर्मीयांपर्यंत पोचणे तसे अवघडच. पोचले तरी त्यांच्यातील भाषिक दुर्बोधता हा आकलनातील अडथळा. गाडगेबाबांनी धर्मावर टीका केली, ती कीर्तन या धर्मसंमत माध्यमाच्याद्वारे. त्यासाठी त्यांना या पारंपरिक शैलीत काही बदल करावे लागले हे खरेच आहे. तथापि, त्यातूनही जे काही आकाराला आले ते कीर्तनच होते. त्यात अभंग, नामस्मरण अशा गोष्टींचा पुरेसा वापर होत असे. 

थोडक्‍यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल, की बाबासाहेबांच्या धर्मत्यागामुळे आणि पुरोगामी समीक्षकांच्या अलिप्त कोरडेपणामुळे हिंदू धर्मात एक पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढणे प्रतिगामी व सनातनी प्रवृत्तींसाठी फारसे अवघड नव्हते. 

या संदर्भात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस झालेल्या एका वादाचा उल्लेख करणे सयुक्तिक ठरेल. आधी सामाजिक की राजकीय अशा स्वरूपाचा हा वाद होता. सामाजिक पक्षाचे म्हणणे असे होते, की समाजाची घडी नीट बसली नसेल, तर तो राजकीय सत्ता पेलू शकत नाही. उलट राजकीय पक्षाचे लोक म्हणायचे राजकीय सत्ता हातात असेल तर सामाजिक घडी बसवणे शक्‍य होते. 

वस्तुतः या दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधी नसून परस्परपूरक आहेत. कोणत्या गोष्टीला केव्हा व किती महत्त्व द्यायचे हा व्यावहारिक मुद्दा होय. समाजसुधारक ज्या प्रकारच्या सामाजिक सुधारणांसाठी धडपड करीत होते, त्यातील अनेक सुधारणा आपण स्वतंत्र झाल्यानंतर, म्हणजेच राजकीय सत्तेच्या प्राप्तीनंतर राज्यघटनेच्या माध्यमातून करू शकलो ही वस्तुस्थिती आहे. परंतु, त्याचबरोबर घटनेने कायद्यांच्या कागदावर स्वीकारलेले बदल प्रत्यक्षात आणण्यासाठी सुधारणेच्या चळवळीची गरज असते हेही विसरता कामा नये. 

ज्या राज्यघटनेच्या माध्यमाचा उल्लेख झाला, तो सिद्ध करण्यात डॉ. आंबेडकरांचा मोठा वाटा होता. परंपरेनुसार कायदा करणे हे काम उच्चवर्णीयांचे. वस्तुतः धर्म हा पारलौकिक अधिष्ठानावर व अलौकिक प्रमाणावर आधारलेला कायदाच आहे. त्यामुळे ज्याच्या हातात धर्माचा कारभार त्याचाच कायदा हे उघड आहे. त्याप्रमाणे भारतीय समाजात स्मृतींचा म्हणजे धर्मशास्त्राचाच कायदा प्रचलित होता. नव्या युगात तो चालणार नाही, हे बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाची सांकेतिक कृती करून दाखवून दिले होते. जुना कायदा मोडीत काढणाऱ्या बाबासाहेबांवरच नवा कायदा निर्माण करण्याची जबाबदारी यावी, हा एक प्रकारचा काव्यात्मक न्याय (Poetic justice) म्हणावा लागतो. अर्थात समाजातील एका अतिप्रतिगामी गटाला हे मान्य नव्हते. त्याने केव्हाही आपला निषेध नोंदवण्यात कमतरता ठेवली नाही. हिंदू धर्मशास्त्रानुसार बाबासाहेबांना असा कायदा करण्याचा अधिकारच नाही असे या गटाचे म्हणणे होते. 

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आंबेडकरांनी घटना लिहिण्याचे व प्रत्यक्ष घटनेचे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मनापासून स्वागत केले. सावरकरांच्या जात्युच्छेदक भूमिकेशी हे स्वागत सुसंगतच होते. 

मात्र, याच बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्मात प्रवेश केला तेव्हा सावरकरांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. वस्तुतः हिंदू असण्याची सावरकरांनी जी व्याख्या केली होती, तिच्याशी सुसंगत अशीच भूमिका राज्यघटनेत करण्यात आली आहे. ब्रिटिश आक्रमकांनी भारतावर राज्य करताना बौद्ध, शीख, जैन इत्यादी समूहांना कायद्याच्या व्यवहारासाठी हिंदू समजून एकाच कायद्याखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. ते धोरण भारतीय घटनेत कायम ठेवण्यात आले होते. सावरकरांनी केलेल्या व्याख्येत बौद्ध, जैनादी समूह अंतर्भूत होत होतेच. याचा अर्थ असा होतो, की बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे सावरकरी व्याख्येनुसार ते हिंदूच राहणार होते. इतकेच नव्हे, तर आपल्या व्याख्येचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन होत असल्याचे सावरकरांना पाहावयास मिळणार होते. 

अशा परिस्थितीत या घटनेचे स्वागत करण्याऐवजी भिख्खू आंबेडकरांची उडी हिंदू धर्माच्या परिघात पडली, अशा प्रकारचा उपरोध, राग सावरकरांनी का आळविला असावा? या प्रश्‍नाचे उत्तर शोधायला फार दूर जायचे कारण नाही. सावरकर आणि आंबेडकर यांच्याच लेखनातून हे उत्तर मिळते. 

राजद्रोहाच्या आरोपावरून ब्रिटिश सरकारने सावरकरांना अंदमानात जन्मठेप भोगायला पाठवले, हे सर्वांनाच ठाऊक आहे. या शिक्षेचा काळ संपण्यापूर्वीच, म्हणजे १९२२ मध्ये सरकारने काही निर्बंध लादून सावरकरांची सुटका केली. सावरकरांनी रत्नागिरीची हद्द सोडून बाहेर न जाणे व राजकारणात भाग न घेणे या दोन महत्त्वाच्या अटी होत्या. त्याप्रमाणे सावरकर रत्नागिरीत स्थायिक झाले. अप्रत्यक्षपणे राजकारण करण्याचे कार्य मात्र त्यांनी शिताफीने सुरूच ठेवले. त्यात इतिहास, नाटक, स्फुट लेख यांचा वापर करून हिंदुत्वाचे, हिंदू राष्ट्रवादाचे स्वरूप स्पष्ट करणे ही बाब मुख्य होती. जात्युच्छेदाचे कार्य मात्र राजकीय नसल्यामुळे ते प्रगटपणे करू शकत होते ते त्यांनी केले. त्यात सहभोजन, मंदिर प्रवेश इत्यादी गोष्टींचा समावेश होता. 

सावरकरांचे हिंदू राष्ट्रवादाचे राजकारण गांधी आणि काँग्रेस यांच्या हिंदू-मुसलमान ऐक्‍यावर उभारलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या राजकारणाच्या विरोधी स्वरूपाचे होते. शिवाय गांधीवादामध्ये अहिंसेचा स्वीकार होता; नव्हे तो तर गांधींच्या विचारांचा व चळवळीचा आत्माच होता. याउलट सावरकर सशस्त्र क्रांतीच्या म्हणजेच हिंसेचा पुरस्कार करणारे होते. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ हा प्रश्‍नच त्यांच्या राजकारणाचे स्वरूप स्पष्ट करणारा होता. 

सावरकरांनी गांधींच्या विरोधात आपल्या राजकारणाची मांडणी करताना आपण पारंपरिक वैदिक-हिंदू पद्धतीचे राजकारण करीत असून गांधी हे पारंपरिक श्रमण म्हणजे बौद्ध, जैन पद्धतीचे राजकारण करीत असल्याची मांडणी घेतली. गांधींची संभावना त्यांनी ‘साबरमतीचा श्रमण’ अशी केली. 

श्रमण परंपरा आत्यंतिक अहिंसेचा एकांगी पुरस्कार करणारी असून प्राचीन काळात तिने देशाला दुर्बल केले व त्यामुळेच देश परकीय आक्रमणाला बळी पडला असे सावरकरांचे इतिहासाचे वाचन आहे. या निष्पतिकारक श्रमण परंपरेच्या विरुद्ध विजिगीषू, प्रतिकाराची परंपरा आहे. तिनेच आक्रमकतेचा पाडाव करून इतिहासाची सोनेरी पाने लिहिली, असा त्यांचा दावा आहे. त्यानुसार उदाहरणार्थ पुष्यमित्र शुंग हा इतिहासातील नायक ठरतो. पुष्यमित्राने श्रमण परंपरेतील मौर्य राजसत्तेचा विनाश करून विजिगीषू वैदिक परंपरेचे पुनरुज्जीवन केले. विक्रमादित्य, शिवाजी महाराज हे महापुरुष याच परंपरेचे आविष्कार होत. 

सावरकर ही मांडणी करीत होते, तेव्हा भारतावर परकीय ब्रिटिश सत्तेचे राज्य होते. गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढाही रंगात आला होता. गांधींच्या अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही अशी सावरकरांची खात्री होती. पण त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले, तरी त्यात मुसलमानांचे वर्चस्व असेल अशी त्यांना भीती होती. त्यामुळे गांधींच्या मार्गावर चौफेर टीका करायचा पवित्रा त्यांनी घेतला होता. या टीकेत एकीकडे वर्तमानकालीन गांधी राजकारणावर हल्ला तर होताच, पण दुसरीकडे गांधी राजकारणाचे प्राचीन मूळ म्हणून श्रमण परंपरेलाही त्यांनी लक्ष्य केले होते. आता बौद्ध धर्माचा स्वीकार करू पाहणारे आंबेडकर हे सावरकरांना श्रमण परंपरेच्या नाण्याची दुसरी बाजू वाटले असल्यास आश्‍चर्य नाही. पहिली बाजू म्हणजे अर्थात गांधी!

संबंधित बातम्या