इतिहासाचे हत्यार 

डॉ. सदानंद मोरे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

महाराष्ट्रातील इतिहास लेखन हासुद्धा महाराष्ट्राच्या लोकयात्रेचाच एक भाग आहे असे म्हटले तर बिचकून जायचे कारण नाही. इतिहासकार हा स्वतः माणूसच असल्यामुळे एक मानवी व्यक्ती म्हणून त्याचे जे काही सामाजिक हितसंबंध असतील त्यांचा परिणाम त्याच्या इतिहास लेखनावर होत असतो. त्याचा स्वतःचा असा वर्ण असतो, वर्ग असतो, जात असते, विचारधारा असते. या सर्व गोष्टी त्याच्या व्यक्तित्वात जणू काही प्रविष्ट झालेल्या असतात. त्यामुळे तो ज्या गोष्टीशी अशा पद्धतीने तादात्म्य पावलेला असतो, त्या गोष्टी त्याच्या लेखनावर प्रभाव पाडतात, त्याला दिशा दाखवतात, मार्गदर्शन करतात, काही प्रमाणात नियंत्रित सल्ला करतो. काही इतिहासकारांना त्याची पुरेशी जाणीवही नसते. उलट काही इतिहासकार जाणीवपूर्वक आपल्या हितसंबंधांना पूरक असे लेखन करीत असतात. 

साहजिकपणे सुरुवातीच्या काळातील इतिहास लेखनावर राष्ट्रवादाचा प्रभाव होता. तसेच तेव्हाचे इतिहासकार सहसा उच्चवर्णीय असल्यामुळे वर्णवर्चस्ववादाची लागणही इतिहास लेखनाला होत होती. त्याचे सर्वांत ठसठशीत उदाहरण म्हणजे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखन होय. राजवाडे यांच्या इतिहासलेखनाच्या वर्णजातीय प्रेरणा मी ‘सकाळ साप्ताहिक’मधून प्रसिद्ध होऊन ग्रंथरूप मिळालेल्या ‘गर्जा महाराष्ट्र’ या लेखमालेतून उघड केल्याच होत्या. त्यांची पुनरावृत्ती करायची गरज नाही. स्वतः राजवाडे यांना आदर्श असलेले राष्ट्रपुरुष म्हणजे ‘निबंधमाल’कार विष्णूशास्त्री चिपळूणकर हा उल्लेख करणे आवश्‍यक आहे. 

चिपळूणकर, राजवाडे परंपरेच्या इतिहास लेखनाला छेद देणारे लेखन जोतिराव फुले यांनी केले. चिपळूणकर-राजवाडे काय किंवा महात्मा फुले काय त्यांच्यासाठी इतिहास हे एक हत्यारही होतेच. चिपळूणकर, राजवाडे, सावरकर अशा परंपरेचे उद्दिष्टच इतिहास लेखनाच्या माध्यमातून राजकीय पारतंत्र्यात खिचपत पडलेल्या देशबांधवांना जागे करून परकीय ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्याविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करणे हे होते. अर्थात चिपळूणकर, राजवाडे यांच्या वर्णवर्चस्ववादाचा उपसर्ग सावरकरांना झालेला असल्याचे त्यांच्या लेखनातून दिसत नाही, हेही स्पष्ट करायला हवे. हिंदू धर्मातील वर्णजाती संघर्ष संपुष्टात आणून सर्व हिंदूंना एक राष्ट्र म्हणून उभे करणे हे सावरकरांच्या इतिहासलेखनाचे ध्येय दिसते. मात्र सुरुवातीला म्हणजे १९०७ च्या सुमारास (१८५७ च्या उठावाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष) त्यांनी लिहिलेल्या ‘सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर’मध्ये राष्ट्रवाद आणि हिंदुत्ववाद यांचे समीकरण जुळलेले दिसत नाही. या पुस्तकात हा देश हिंदू मुसलमानांचा असून या दोघांनीही या समरात समान भूमिकेवरून भाग घेतला होता असेच प्रतिपादन केले होते. नंतरच्या काळात म्हणजे सावरकर जेव्हा अंदमानमध्ये राजद्रोहाच्या कृतीसाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवातून ते हिंदुराष्ट्रवादी झाले. हिंदू धर्मातील अंतर्गत भेदभावांना तिलांजली दिल्याशिवाय हिंदुराष्ट्रवाद उभा राहू शकत नाही हे त्यांना समजून चुकले होते. त्याची परिणती जातिध्वंसाच्या किंवा जात्युच्छेदाच्या चळवळीत झाली. या चळवळीत सहभोजन, मंदिर निर्मिती, शुद्धीकरण इत्यादी कृतींचा समावेश असे. 

जोतिरावांनी केलेली इतिहासमीमांसा वेगळ्या प्रकारची झाली, याचे कारण त्यांचा राष्ट्रवादच वेगळ्या प्रकारचा होता. हा राष्ट्रवाद राष्ट्रप्राधान्यवादी नसून समान प्राधान्यवादी आहे आणि तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे समाज प्राधान्यवाद अंतिमतः व्यक्तिप्राधान्यवाद आहे. राष्ट्राच्या किंवा समाजाच्या नावाखाली व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणे किंवा व्यक्तीकडून अवाजवी बलिदानाची अपेक्षा करणे त्यांना पटले नसतेच. 

सामाजिक व्यवहारात ही गोष्ट सावरकर समन्वयातून साधू पाहत होते, ती फुले संघर्षातून साध्य करणार होते. विषम व्यवस्थेतून प्राप्त होणारे लाभ व वर्चस्व उच्चवर्णीय सहजासहजी सोडणार नाहीत याची त्यांना खात्री पटली होती. त्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाची चळवळ उभी केली. समतेची प्रस्थापना करण्याच्या प्रक्रियेचा कर्ता (agent) यांच्या मते शूद्रातिशूद्र होता व मार्ग संघर्षाचा होता. याउलट सावरकरांच्या या प्रक्रियेचा कर्ता उच्चवर्णीयच असेल व मार्ग समन्वयाचा असेल. संघर्ष झालाच तर उच्चवर्णीयामधीलच समतावादी व समताविरोधक यांच्यात होईल. उच्चवर्णीयांनी आपल्या धर्मदत्त वर्चस्वाचा त्याग करून खालच्या वर्णजातींना सामावून घेत एका पातळीवर आणावे असे सावरकरांना वाटते; तर उच्चवर्णीय असे काही करणार नाहीत असे समजून त्यांना या स्थानावरून खाली खेचून समतेची प्रस्थापना करावी, ही फुले यांची भूमिका उच्चवर्णीयांना त्यांचे हे स्थान देणाऱ्या धर्माच्या विरोधात फुले यांनी आघाडी उघडली व त्याला आव्हान देणारा एक प्रतिधर्मच स्थापन केला. 

जातिभेद आणि जातिवर्चस्व यांचे विश्‍लेषण करीत त्याची पाळेमुळे शोधीत त्यांना जबाबदार असलेल्या धर्म आणि धर्मशास्त्रावर हल्ला चढवणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यांचे इतिहासलेखनही याच उद्दिष्टाने प्रेरित झाले होते. इतक्‍या खोलवर जाऊन असा हल्ला करणे सावरकरांना मानवले नसते. धर्मामधील विषमता समर्थक गोष्टी नाकारण्यात सावरकरांनी हयगय केली अशातला भाग नाही. पण त्या नाकारताना हिंदू धर्माला दुखावण्याची गरज त्यांना भासली नाही. कारण त्यांच्या इतिहासाचा कर्ता नामक हा उच्चवर्णीयच होता आणि सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे सावरकरांना हिंदू हिंदूमध्ये संघर्ष नको होता. 

इतिहासाची अशी मांडणी करताना सावरकरांनी राजवाडे यांची ‘महाराष्ट्र धर्म’ ही संकल्पना उचलून धरली. राजवाडेप्रणित महाराष्ट्र धर्माच्या संकल्पनेमध्ये महाराष्ट्राने हिंदुस्थानात अग्रेसर राहून नेतृत्व करणे अभिप्रेत आहे हा मुद्दा सावरकरांनी घेतला. मात्र राजवाडे यांचा दुसरा मुद्दा महाराष्ट्रातील सर्व वर्णजातींचे पुढारपण ब्राह्मणांनी करायचे, ते स्वाभाविक वर्णगुरूच आहेत, मात्र सावरकरांनी सोडून दिला. 

सावरकर ज्या वेळी रत्नागिरीत बसून हिंदुत्वावर प्रबंध लिहून हिंदुत्वाचे लक्षण मांडीत होते, त्या वेळी उर्वरित महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद उफाळून आला होता. जोतिराव फुले कालवश होऊन बरेच दिवस झाले होते व शाहू छत्रपती नुकतेच निवर्तले होते. पण त्यामुळे त्यांची चळवळ संपली असे झाले नाही. केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर ही जोडी ब्राह्मणेतर पक्ष घेऊन राजकीय क्षितिजावर चमकू लागली होती. इकडे दलित समाजात बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व उदयाला येत होते. अशा परिस्थितीत एकीकडे ब्राह्मण-ब्राह्मणेतर आणि दुसरीकडे स्पृश्‍य-अस्पृश्‍य या द्वंद्वांवर मात करीत सर्व हिंदूंनी एकत्र यावे अशी सावरकरांची भूमिका होती. याच दरम्यान सावरकरांशी सल्लामसलत करून डॉ. बा. शि. मुंजे आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना काढली. तिला हिंदू मुसलमानांच्या दंगलीची पार्श्‍वभूमी होती. अर्थात या संघटनेला सावरकरांचा विज्ञाननिष्ठ बुद्धिवाद पटणारा आणि पेलणारा नसणार हे उघड आहे. सावरकरांच्या जात्युच्छेक विचार संघाने स्पष्टपणे स्वीकारला होता असे दिसत नाही. मात्र सावरकरांची इतिहासमीमांसा त्याला मान्य होती असे म्हणायला हरकत नसावी. 

संघाचे आद्य नेतृत्व सावरकरांच्या प्रभावाखाली होते. मात्र, डॉ. हेडगेवार यांच्या पश्‍चात सरसंघचालक झालेल्या मां. स. गोळवळकर यांच्यावर हा प्रभाव तितका असण्याचे कारण नव्हते. शिवाय गुरुजी हे पारंपरिक सनातन हिंदू धर्म मानणारे तर सावरकर परंपरेचीच वैज्ञानिक दृष्टीने चिकित्सा करणारे. त्यामुळे त्यांच्यात केव्हा ना केव्हा काही ना काही दरी निर्माण होणे अपरिहार्य होते. अर्थात या ठिकाणी तो तपशील द्यायची गरज नाही. मुद्दा इतिहासमीमांसेचा होता. मधल्या काळात ब्राह्मणेतरांनी जोतिरावांची इतिहासमीमांसा पुढे नेण्याचा प्रयत्न केलाच नव्हता असे नाही. पण त्यांचे इतिहासलेखन शिवशाही व पेशवाई यांच्यामधील ब्राह्मण ब्राह्मणेतर वादापुरते मर्यादित राहिले होते. अशा प्रकारचा इतिहास लिहिण्यासाठी आवश्‍यक असणारी साधनसामग्री व पद्धतीशास्त्र त्यांच्याकडे होते असे म्हणणे अवघड आहे. ही उणीव डॉ. आंबेडकरांनी भरून काढली. बाबासाहेबांनी पाश्‍चात्त्य देशांतील चर्चाविश्‍वात प्रचलित असणारे मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, कायदा, धर्म इत्यादींचे अद्ययावत ज्ञान आत्मसात केले होते. ते सर्व ज्ञान पणाला लावून बाबासाहेबांनी लेखन केले. जातिव्यवस्थेमुळे भारत नेहमीच परकीय आक्रमणाला बळी पडत गेला. त्याच्या इतिहासामध्ये उल्लेखनीय असे काहीच नाही असे बाबासाहेब सूचित करीत होते. सावरकरांना त्याचा प्रतिवाद करणे आवश्‍यकच होते. त्यांनी भारताच्या इतिहासातील सोनेरी पाने शोधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. भारत हे राष्ट्र नसून परस्परविरोधी हितसंबंध असलेल्या जातींचा समूह आहे असे प्रस्थापित करण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न होता. तर भारत हे हिंदुराष्ट्र असून त्याला परकीयांच्या प्रतिकाराचाही ओजस्वी इतिहास आहे ही सावरकरांची भूमिका होती. त्यामुळे दोघांच्या दृष्टिकोनातून इतिहासाचे दोन वेगळे संप्रदाय निर्माण होणे स्वाभाविकच नव्हे, तर अपरिहार्य होते. 

या दोन इतिहासलेखन संप्रदायांमधील भेदाचे आणखी विवरण करण्यापूर्वी आंबेडकर-सावरकरांच्या नंतर झालेल्या प्रक्रियेचा उल्लेख करणे प्रस्तुत ठरेल. फुले-आंबेडकरांनी केलेल्या इतिहासमीमांसेला मार्क्‍सवादी पद्धतिशास्त्राची जोड देत ती आणखी पुढे नेण्याचे प्रयत्न होत होते. कॉ. शरद पाटील यांनी ही प्रक्रिया टोकाला नेली. हे टोक गाठताना त्यांना प्रसंगी मार्क्‍सवाद्यांनाही ओलांडून पुढे जावे लागले. या उल्लंघनासाठी त्यांना संस्कृत व्याकरणाच्या गाढ अभ्यासाचा आणि मानववंशशास्त्रीय संशोधनाचा विशेष उपयोग झाला हे नमूद करावे लागते. मात्र या प्रक्रियेत कॉ. पाटील, फुले, मार्क्‍स आणि आंबेडकर यांना उल्लंघून पुढे गेलेले दिसतात. या प्रत्येक विचारवंतांचे योग्य असे विचार आत्मसात करीत व इतर विचारांचा त्याग करीत एक वेगळ्याच प्रकारचा ‘सिंथोसिस’ समन्वय पाटलांनी घडवून आणला. या समन्वयातून त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी अन्वेषण पद्धती अथवा पद्धतिशास्त्र स्थिर केले. या पद्धतिशास्त्राचे वर्णन ‘अब्राह्मणी’ या शब्दाने केले जाते. वर्ग, वर्ण, जात आणि लिंगभाव यांच्यावर आधारित दास्य आणि विषमता यांचा अंत घडवून आणून समताधिष्ठित समाज स्थापन करणे हे पाटलांच्या इतिहासमीमांसेचे उद्दिष्ट आहे. 

स्पष्ट आहे, की पाटलांचे इतिहास लेखन हे एक विशिष्ट मूल्य चौकटीतून करण्यात आलेले आहे. ही मूल्य चौकट भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा असा अन्वयार्थ लावू शकते, की ज्यामुळे तिच्यात अनुस्थूत असलेल्या मूल्यांचा स्वीकार करून तद्‌नुषंगिक कृती करणे शक्‍य होईल, त्यासाठी प्रेरणा व समर्थन मिळेल. 

फुले, राजवाडे, सावरकर, पाटील या इतिहासलेखकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपला मूल्यभाव कधीही लपवला नाही. त्यामुळे त्यांच्या लेखनातील वस्तुनिष्ठता आणि मूल्यभावात्मक व्यक्तिनिष्ठता वेगवेगळी करणे शक्‍य होते. जशी पाटलांच्या इतिहासातील शाक्त पंथाने स्त्रीपुरुष समानतेसाठी केलेले प्रयत्न. 

कोणाच्या इतिहासात किती वस्तुनिष्ठता व किती मूल्यनिष्ठता आहे हे स्वतंत्रपणे पाहता येईल. इतिहासाचा हत्यार म्हणून उपयोग होऊ शकतो हे महत्त्वाचे.    

संबंधित बातम्या