इतिहासमीमांसेचे दोन प्रवाह 

डॉ. सदानंद मोरे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

विनायकराव सावरकरांनी केलेल्या हिंदुत्ववादाच्या व्याख्येत बौद्धांचा समावेश होत होता याचे कारण बौद्ध धर्माची व धर्मीयांची जन्मभूमी भारत हीच होती. या भारताच्या सीमा सिंधूपासून सिंधूपर्यंत म्हणजे सिंधूनदीपासून सागरापर्यंत अशा होत्या आणि मुख्य मुद्दा म्हणजे बौद्ध धर्मीयांसाठी पवित्र असलेली स्थळे या सीमांच्या अंतर्गत अर्थात भारतात वा हिंदुस्थानात होती. 

अर्थात तरीही इतिहासाचा विचार केला असता हिंदू (म्हणजे वैदिक) आणि बौद्ध या धर्मांमध्ये संघर्ष होत होता, हे कोणीच नाकारू शकत नव्हते. हा संघर्ष जरी इतिहासकाळात पूर्वी घडून गेलेला असला, तरी वर्तमानकाळात इतिहास लिहिताना त्याची मांडणी कशी करायची हा मुद्दा उरतोच. सावरकरांनी गुप्त काळाला इतिहासातील सुवर्णयुग मानले आणि नंतरच्या काळात भारत अरबांनी केलेल्या आक्रमणांना बळी पडला, विशेषतः या पराभवाच्या प्रक्रियेची सुरुवात वायव्य दिशेकडील सिंध प्रांतात झाली, याचे खापर तेथील बौद्ध धर्मीयांवर फोडले. हे लोक आक्रमकांना गुप्तपणे सामील झाले होते, असा सावरकरांचा रोख दिसतो. 

याच्या नेमका उलट पवित्रा आंबेडकरांचा दिसतो. आंबेडकर मौर्य युगाला भारताचे सुवर्णयुग मानतात. त्यांच्या मते बौद्ध धर्माने केलेली सामाजिक समतेची क्रांती मौर्य काळात झाली. मौर्यांनंतर आलेल्या शुंगांच्या राजवटीला ते विषमतावादी प्रतिक्रांती समजतात. शुंगांच्या काळात सुरू झालेल्या प्रतिक्रांतीमुळे गुप्त काळात वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन व स्थिरीकरण होऊ शकले. हा काळ ब्राह्मणी वर्चस्वाचा मानावा लागतो. 

ज्या मौर्य काळाला आंबेडकर सुवर्णयुग मानतात, त्याच काळातील आद्य राजपुरुषाला म्हणजेच त्या घराण्याच्या चंद्रगुप्त मौर्य नामक संस्थापकाला सावरकर व इतर हिंदुत्ववादी विचारवंतही आदरपूर्वक नमन करतात. चंद्रगुप्त मौर्याने ॲलेक्झांडर नावाच्या ग्रीक म्हणजे यवन परकीय आक्रमकाचा युद्धात पराभव केला अशातला भाग नसून चंद्रगुप्ताच्या राज्याच्या सामर्थ्याचा धसका घेतल्यानेच ॲलेक्झांडरला पंजाबमधूनच परत फिरायचा निर्णय घ्यावा लागला. ॲलेक्झांडर परत गेल्यानंतर त्याने भारतात मागे ठेवलेल्या ग्रीक सुभेदारांना चंद्रगुप्ताने मात दिली व भारताच्या विस्तीर्ण भागात आपले साम्राज्य स्थापन केले. 

चंद्रगुप्त वैदिक धर्माचाच अनुयायी होता, असे सावरकरादिकांचे गृहीत आहे. जैन धर्मीय मंडळी चंद्रगुप्ताने अखेरच्या दिवसांत जैन धर्माचा स्वीकार केला होता, असे समजतात. अर्थात एक तर त्यांचे हे म्हणणे पूर्णपणे प्रमाणित झाल्याचे कोणी मानीत नाही. आणि दुसरे असे, की खरे मानले तरीसुद्धा चंद्रगुप्ताचा पराक्रम हा त्याने जैन धर्माच्या अंगीकाराच्या अगोदर केलेला असल्यामुळे त्या पराक्रमावर दावा करण्यात वैदिक धर्मीयांना अडचण यायचे काही कारण नाही. दुसरे असे, की चंद्रगुप्ताचे नाव घेतले की बरोबरीने त्याचा गुरू मानल्या जाणाऱ्या चाणक्यचाही उल्लेख होतोच. किंबहुना ब्राह्मणी इतिहासकारांनी गाजवलेली ही जोडगोळी आहे. अर्थात या गाजवण्यामध्येही चाणक्य हा सूत्रधार व चंद्रगुप्त त्याचा हस्तक असा सूर आहेच. शिवाय चंद्रगुप्ताला क्षत्रिय म्हणून मान्यता न देता तो शूद्र होता हा त्यातील उपसूर आहेच. 

वैदिक धर्माच्या अनुषंगाने लिहिल्या गेलेल्या इतिहासात चंद्रगुप्ताचा नातू अशोक याच्यापासून राष्ट्राची अवनती सुरू झाली. बौद्ध धर्माचा म्हणजेच पर्यायाने अहिंसेचा स्वीकार केल्याने अशोकापासून देशातील क्षात्रतेज लोपायला सुरुवात झाली. त्याचे पर्यवसान हा देश इस्लामच्या आक्रमणाला बळी पडण्यात झाले. 

गौतम बुद्धांकडे आंबेडकर धार्मिक आणि सामाजिक क्रांतीचा उद्गाता म्हणून पाहतात. बुद्ध म्हणजे प्रचलित विषम व्यवस्थेचे विरोधक. त्यांनी घडवून आणलेल्या या क्रांतीमुळे मौर्यांची राजकीय क्रांती होऊ शकली असे आंबेडकरांचे प्रतिपादन आहे. हा सामाजिक दृष्टिकोन झाला. खडतर राजकीय राष्ट्रीय दृष्टीने पाहणारे सावरकर बुद्धांच्या शिकवणीमुळे देश दुर्बल झाला असे प्रतिपादन करतात. त्यांचे संन्यस्त खड्ग हे नाटक या संदर्भात लक्षणीय आहे.

आता मुद्दा परकीय आक्रमणांच्या आंबेडकरांच्या इतिहासलेखन संप्रदायाची या संदर्भातील मांडणी अगदी वेगळ्या प्रकारची दिसते. वायव्य भारतातील राजे बौद्ध धर्मीय असल्यामुळे त्यांना शह देण्यासाठी तेथील वैदिक उच्चभ्रूंनी इस्लामी आक्रमकांना माहिती पुरविली. वर्तमान काळातील वर्णजातींमधील परस्परसंघर्ष मिटवण्याचा कार्यक्रम सावरकरांनी हाती घेतला होता याबाबत संशय घ्यायचे कारण नाही. सहभोजने, सहउपासना, पतितपावन मंदिरांची उभारणी, त्याचप्रमाणे अस्पृशांना  मंदिर प्रवेशाच्या चळवळीत पाठिंबा या गोष्टी या कार्यक्रमाची खात्री पटवायला पुरेशा आहेत. अशा उपक्रमांना विरोध करणाऱ्या सनातन्यांवर टीकास्त्र सोडायला सावरकर मुळीच मागेपुढे पाहत नाहीत. नाशिकमधील काळाराम, पुण्यातील पर्वती या मंदिरांमधील प्रवेशाच्या चळवळींना सावरकरांचा पाठिंबा होता. पर्वती मंदिरातील प्रवेशाला विरोध करणाऱ्यांची संभवना त्यांनी 'मंबाजी' अशी केली होती. पण सावरकरांच्या दुर्दैवाने राजकीय क्षेत्रात  त्यांची पाठराखण करण्यात हेच 'मंबाजी' अग्रेसर असत. याचा परिणाम सावरकरांच्या विश्वासार्हतेवर झाल्याशिवाय राहिला नाही. संकल्पित हिंदुराष्ट्र अशा सनातनी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात जाणार असेल, तर सावरकरांच्या सामाजिक कार्यक्रमात भाग घ्यायला कोण पुढे येणार हा खरा प्रश्न होता. विषम सामाजिक व्यवस्थेचे बळी ठरलेले ब्राह्मणेतर शूद्र आणि अस्पृश्य अतिशूद्र सावरकरांच्या हिंदुमहासभेपासून दूरच राहिले. या लोकांच्या दृष्टीने साकवरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक किंवा सामाजिक असल्यापेक्षा राजकीय ठरले. बौद्ध धर्मीय हे हिंदूच ठरतील अशा प्रकारची व्याख्या करणारे सावरकर, बाबासाहेबांना राज्यघटना तयार करण्याचा मान मिळाला म्हणून समाधान व्यक्त करणारे सावरकर, आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर आंबेडकरांवर टीका का करतात हे आता समजू शकेल. बौद्ध धर्मातील अतिरेकी अहिंसेमुळे देश निष्प्रतिकारक बनला व इस्लामी राजवटीची शिकार झाला असे त्यांचे इतिहासाचे वाचन होते. तर हिंदुधर्मातील जातिव्यवस्थेमुळे समाज एकसंध होऊ न शकल्यामुळे आक्रमणाला बळी पडला असे बाबासाहेबांचे इतिहासवाचन. सावरकरांच्या पद्धतीने इतिहासलेखन करणाऱ्यांमध्ये पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा समावेश करायला हरकत नाही. वैदिक धर्मांची विजिगीषू राष्ट्रभक्ती आणि बौद्धजैनादि श्रमण परंपरेतील धर्मांची निष्प्रतिकारक अहिंसा असा भेद सातवळेकर वैदिक संस्कृती विवेचनात करतात. या विवेचनाला पुढे नेले, की महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व रामदासी संप्रदाय यांच्यातही असा भेद करणे शक्य होते. इतकेच नव्हे तर वारकऱ्यांचे कमरेवर हात ठेवून उभा राहिलेले निःशस्त्र (व म्हणून?) निष्प्रतिकारक विठोबा व कोदंडधारी युद्धसज्ज राम या देवतांमध्ये असाच विरोध दर्शविता येतो आणि त्यापुढे एक पाऊल जाऊन आधुनिक काळात गांधीजींना श्रमण परंपरेतील अहिंसक व दुबळा नेता ठरवता येते. हे सर्व प्रयोग या काळात झाले. त्यांचा सविस्तर आढावा ‘लोकमान्य ते महात्मा’ या ग्रंथात घेण्यात आलेला आहे. 

बौद्ध तत्त्वज्ञानावर अशा प्रकारचे आक्षेप घेतले जात असताना डॉ. आंबेडकर स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. त्यांनी एकीकडे हिंदुत्ववादी आक्षेपक आणि दुसरीकडे खरोखरच निरपेक्ष अहिंसेचा पुरस्कार करणारी परंपरा आणि बौद्ध विचार यांच्यात भेद असल्याचे प्रतिपादन केले. हिंदुत्ववाद्यांचे आक्षेप गांधीजींना आणि अन्य श्रमणपरंपरांना लागू होत असतील, पण ते बुद्धविचारांना लागू होत नाहीत, हे आंबेडकरांचे प्रतिपादन. याचा अर्थ, बुद्धविचार हा निरपेक्ष अहिंसावादी नाही, असा होतो. आंबेडकरांनीच केलेल्या भेदानुसार बुद्धाची अहिंसा हा नियम नसून तत्त्व आहे. दुष्ट प्रवृत्तीचा हिंसक प्रतिकार करण्यास तिी हरकत नाही. या संदर्भात आंबेडकरांनी ‘दया तिचे नाव भूतांचे पाळण। आणि निर्दळण कंटकांचे।।’ हा अभंग उद्‍धृत केला आहे. कंटकांचा नायनाट ही अहिंसेचीच दुसरी बाजू - हीच तुकोबांची व बुद्धांची अहिंसा आहे, असे स्पष्टीकरण आंबेडकर करतात. 

या संदर्भात एका महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख करणे उचित ठरेल. बालपणापासून बौद्ध विचारांच्या प्रभावाखाली असलेल्या आंबेडकरांनी अस्पृश्‍य समाजाच्या अभिजात लढाऊ वृत्तीवर नेहमीच भर दिला असल्याचे इतिहास सांगतो. ब्रिटिशांनी हा देश जिंकून घेतला, ते अस्पृश्‍य सैनिकांच्या पराक्रमाच्या जोरावर, पण नंतर कृतघ्न ब्रिटिशांनी अस्पृश्‍यांना सैन्यात घेणे बंद केले, हे त्यांनी वारंवार सांगितले आहे. ही सैन्यभरती परत सुरू करण्याची त्यांची मागणी होती. या मागणीचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. अखेर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते स्वतः युद्धकालीन मंत्रिमंडळात असताना त्यांच्या प्रयत्नांना यश आले व महार पलटणीची निर्मिती झाली, असे इतिहास सांगतो. 

आणखी एका गोष्टीची चर्चा केल्याशिवाय प्रस्तुत विषयाला न्याय देता येणार नाही. इस्लाम व ख्रिस्ती धर्मीयांची पवित्र स्थळे भारताच्या बाहेर असल्यामुळे ते ‘हिंदूं’मध्ये मोडत नाहीत. पण बौद्धांची स्थळे भारतातच असल्यामुळे - म्हणजे भारत हीच त्यांची पुण्यभूमी असल्यामुळे - ते ‘हिंदूं’मध्ये मोडतात. सबब तेही हिंदू, हे वादाखातर 
मान्य केले आणि या दृष्टीने परकीय ठरत असलेल्या धर्मांपासून हिंदूंनी सावध राहावे, ही भूमिकाही वादाखातर मान्य केली, तर धर्मांतराला असलेला विरोध समजून घ्यायचे एक कारण मिळते. पण याच मापाने बौद्ध धर्मांतराला कसे जोखणार? या संदर्भात हिंदुत्ववाद्यांच्या एका भीतीचा उल्लेख करणे जरुरीचे आहे. भविष्यात यदाकदाचित भारताचे एखाद्या बौद्ध धर्मीय राष्ट्राशी युद्ध झाले, तर भारतातील बौद्ध कोणाची बाजू घेणार, ही ती भीती. 

या सर्व विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे - सावरकरांचा समताविचार हा राष्ट्रवादाच्या पायावर उभा होता; तर फुले - आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा समतेच्या पायावर उभा आहे. या दोन विचारप्रणालींमधील विरोध पूर्णपणे दुर्लक्षित करणे अवघड आहे. 

जातिभेदांमुळे देश पारतंत्र्यात जातो म्हणून जातिभेद संपुष्टात आणून समतेची स्थापना केली पाहिजे, हा एक विचारप्रवाह व जातिभेदामुळे एका समूहावर अन्याय होत असल्यामुळे जातिभेदांना आधार देणाऱ्या धर्माचाच त्याग करायचा, ही दुसरी भूमिका. धर्मामुळे इतिहासकाळात झालेल्या अन्यायाला अधिकाधिक ठळक करण्यावर दुसऱ्या भूमिकेचा भर; तर अन्याय झाले हे पूर्णतः नाकारणे किंवा त्यांचे स्वरूप सौम्य करीत त्यांची मांडणी करणे, पहिला प्रवाह पसंत करतो. 

दोघांसाठीही इतिहासाचे हत्यार उपयुक्त ठरते, हे मात्र खरे.    

संबंधित बातम्या