मुंगीची गोष्ट

मृणालिनी वनारसे
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मनावनातल्या गोष्टी 
वस्तुस्थिती आणि कल्पना यांच्या सीमारेषा तपासणाऱ्या विज्ञानललित कथा... 
 

एक राणी होती शहराझाद नावाची. तिला तिच्या राजाला रोज रात्री गोष्ट सांगावी लागत असे. तिनेच ती युक्ती शोधून काढली होती. राजाने तिचे मुंडके छाटून धडावेगळे करू नये म्हणून. राजाने त्याच्या पहिल्या राणीवर संतापून हे सत्र सुरू केले होते. आपली राणी बदफैली आहे हे म्हणे त्याला कळले. त्याचा सूड म्हणून रोज नव्या मुलीशी लग्न करायचे आणि दुसऱ्या दिवशी तिला मारून टाकायचे असे त्याने सुरू केले. त्याची गाठ शहराझादशी पडली. या मुलीने त्याला चक्क गोष्ट सांगितली. राजाला गोष्ट तर आवडलीच, त्याला गोष्टींची चटक लागली. गोष्टींसाठी त्याने शहराझादला जीवनदान देण्याचे ठरवले. शहराझाद गोष्टी सांगत राहिली. गोष्टींनी तिला जिवंत ठेवले. कसली ही जीवघेणी गोष्ट! या अशा मरणावर हृदय तोलणाऱ्या गोष्टी सांगितल्यामुळेच असेल कदाचित; तिने सांगितलेल्या गोष्टी तिच्यानंतर शतकानुशतके टिकल्या. अलिबाबाची गोष्ट तिनेच तर सांगितली होती... 

गोष्टींना एवढी अटतट असते म्हणून तर गोष्टी अजूनही ऐकल्या जातात, सांगितल्या जातात. तसे नसलेल्या गोष्टी विरून जातात. काय चालू राहते आणि काय विरून जाते हीसुद्धा मोठी बघण्यासारखी गोष्ट. गोष्टी येतील, गोष्टी जातील. पण गोष्ट सांगण्याची गोष्ट मात्र पुढे चालू राहील. प्रत्येक नवी पिढी गोष्ट ऐकेल गोष्ट सांगेल. गोष्ट सांगण्याचा वारसा पुढे चालू राहील. याच वारश्‍यातल्या या काही मनावनातल्या गोष्टी. 

शहराझादप्रमाणे या गोष्टींना जिवंत राहण्याची आस नाही. पण जगतानाची गंमत जाणून घेण्याची आस नक्कीच आहे. वस्तुस्थिती आणि कल्पना यांच्या सीमारेषा तपासण्याचे कुतूहल आहे. या अर्थाने या विज्ञानललित कथा आहेत. रोजच्या वाटेवरच्या कथा, आडवाटेवरच्याही कथा. कथेचा वारसा पुढे चालवणाऱ्या कथा... 

गोष्ट : मुंगी व्याली 
एकदा एक मुंगी होती. म्हणजे काहीच फारसं नव्हतं असं तुम्हाला वाटेल. कदाचित अशा सुरवातीनंतर मुंगीभर कुतूहलदेखील या गोष्टीच्या वाट्याला यायचं नाही. पण आपल्याकडं मुंगी म्हणजे सोपं प्रस्थ नाही, हे जाणकार वाचकांना ठाऊक आहे. मुंगी उडून तिनं सूर्याला गिळण्याचं गाणं आत्ताच्या काळातल्या एका लहान मुलानं ऐकलं. त्याला फारच कुतूहल वाटलं. अशा मुंग्या आता कुठं मिळतात असे त्याने विचारले. ऑनलाइन ऑर्डर करता येणार नाहीत एवढेच मी त्याला सांगितले. त्याचा याबाबतीत माझ्यावर पुरेसा विश्‍वास नाही. त्यामुळे तो नेटवर बरीच शोधाशोध करणार याची मला खात्री आहे. पण असो. त्याला त्या मुंगीच्या मागे सोडून मी एकदा असलेल्या एका मुंगीकडे वळते. 

माझी खात्री आहे की मी वळेपर्यंत ती मुंगी काही कंबरेवर हात ठेवून माझी वाट बघत थांबणार नाही. ते बघा, ती गेलीसुद्धा... दुसरी तुरुतुरु चालत येताना मला दिसते आहे. तेव्हा तीच आपली मुंगी असे समजू. माझी गोष्ट संपेपर्यंत बऱ्याच मुंग्या येऊन जाणार असे दिसतेय. पण हरकत नाही. नाहीतरी ही गोष्ट मूळ ज्या मुंगीची होती, ती काही मुंग्यांमध्ये लाखात देखणी असली तरी मला ओळखता यायची नाही. त्यामुळे ‘वो नही, वो सही, वो नही और सही’ या न्यायाने ‘एकदा एक मुंगी’ असे मी म्हणणार आहे. या बदल्यात कुण्या मुंगीने माझा कडकडून चावा घेऊन निषेध व्यक्त करू नये एवढी माझी इच्छा आहे. (माणसाकडून होणाऱ्या अशा सामान्यीकरणाच्या रागाने मुंग्या लाल झाल्या असाव्यात का? काली निदान दिलवाली असेल. म्हणून चावत नसेल. असो.) 

तर एकदा (कोणतीही) एक मुंगी होती. तिला ठाऊक होते की (काही) माणसांचे आपल्याकडे विशेष लक्ष असते. आपण कुठे जातो, काय करतो, काय खातो, काय पितो, सगळ्यावर त्यांचे लक्ष! तिला अशासारखे लक्ष ठेवून असण्याचा कंटाळा आला होता. यांना काही उद्योग नाहीत का बाई?.. तिच्या मनात आले. हे काय असे, आपले घर सोडून दुसऱ्याच्या वारूळावर लक्ष ठेवून असायचे? राहायला का येणार आहेत इथे? आपल्या उंच घरकुलाचा तिला अभिमान होता! 

एक दिवस न राहवून तिने आपली त्रस्तता आपल्या मैत्रिणीला बोलून दाखवली. रांग मोडून त्या भिंतीला टेकून उभ्या राहिल्या आणि त्यांच्यात पुढील प्रकारची देवाणघेवाण झाली. 
मुंगी ब : अगं, तू काय म्हणतेस ते मला कळते. मी पण त्या माणसाकडे सुरवातीला असेच संशयाने पाहिले. कळतच नव्हते मेल्याला काय हवेय. पण मग एक गंमत माझ्या लक्षात आली. ती माणसे आपल्याकडे बघतच नाहीयेत. ती त्यांच्याकडेच बघतायत. 
मुंगी अ : हे बघ ब, तो माझ्याकडेच बघत होता. मी पाहिले ना नीट. 
मुंगी ब : ते बरोबर आहे गं. तो बघत तुझ्याकडेच होता. पण स्वतःकडे बघत होता. 
मुंगी अ : ब, मला वाटते तुला साखर जास्त झालीये. तू काय बरळते आहेस? 
मुंगी ब : सांगते सांगते, तो तुझ्याकडे बघत होता, पण तुझ्यातून स्वतःकडे बघत होता. 
मुंगी अ : मी जाते. मला तो बिस्किटाचा तुकडा दिसतो आहे घेऊन जायला... 
मुंगी ब : तीच तर गंमत आहे. आता बघ... 
मुंगी ब ला काहीही कळले नाही पण ती अ बरोबर गेली. दोघी मिळून त्या बिस्किटाच्या तुकड्यापर्यंत पोचल्या. इथून पुढचा संवाद म्हणजे स्वगत होतं... आणि ते मुंग्यांचे नसून त्यांना बघणाऱ्या एका दाढीवाल्या माणसाचे होते. ते जसे ऐकू आले तसे देत आहे. 

‘तो बघा सहकार्याचा अत्युच्च आविष्कार. बघता बघता या मुंग्यांनी तो त्यांच्या मानाने प्रचंड तुकडा ढकलायला सुरवात केलीसुद्धा. केवढासा जीव. पण एकत्र आले की काय करू शकतात याचा आदर्श आहेत या मुंग्या.’ 

मुंगी ब म्हणाली, ‘ऐकलंस?’ मुंगी अ चे दुर्लक्ष! ती बिचारी नेटाने तुकडा ढकलीत होती. 

‘ऐकायला कधी शिकणार आहेत या मुली!’ मुंगी ब तिच्या स्वमग्न मैत्रिणीकडे बघून म्हणाली. 

शेवटी तिला अगदी जवळ जाऊन ढोसले तेव्हा कुठे मुंगी अ चे तिच्याकडे लक्ष गेले. 

‘काय करतीयेस?’ ती काहीशी चकित होऊन म्हणाली. ‘कशाला खेटतीयेस. मी कामात आहे. दूर जायचेय मला.’ 

‘जरा ऐक तर खरी. तो माणूस बघ काय म्हणतोय..’ मुंगी ब तिला माणसाकडे हात (किंवा पाय) दाखवत म्हणाली. 

माणूस म्हणत होता, ‘आम्ही माणसांनी एकमेकाला अशी न सांगता, न बोलता मदत केली तर? कुठच्या कुठे नाही जाऊन पोचणार आम्ही? कसे हे चिमुकले जीव एवढाले कष्ट करतात. केवढाले मनोरे उभारतात. छे! माणसाला उगीच वाटते तो श्रेष्ठ. खऱ्या श्रेष्ठ तर या सहकारी मुंग्या आहेत. मुंग्यांनो, तुम्हाला माझा प्रणाम..’ असे म्हणून त्या माणसाने डोळे मिटले आणि हात जोडले. 

मुंगी अ म्हणाली, ‘हा बरा आहे का? याचे डोळे मिटले आहेत तोवर इथून निघावे हे बरे..’ 

ंमुंगी ब म्हणाली, ‘अगं, तुझ्या लक्षात आले का तो आपल्याकडे का बघतो आहे ते? याच्या घरी मी गेले आहे. सगळा वेळ इतकी काही धुसफुस ऐकली आहे मी, की एकदिवस अगदी हातातला केकचा तुकडा एक दिवस सोडून निघाले. हा माणूस घराबाहेर बसतो आणि सगळ्या दुनियेतल्या धुसफुशीच्या चिंता करतो.. ती कधी संपणार असा प्रश्‍न त्याला सकाळी पडतो आणि मग दुपार होईपर्यंत तो काही एका जागचा हलत नाही.. मग तो त्यावर काहीबाही लिहितो..’ 

ंमुंगी अ चकित होऊन म्हणाली, ‘तरीच याला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते आहे. एकदा एका दिवाळी अंकाला बुंदीचा दाणा चिकटला होता, त्यात मी शिरले तर तिथे पानावर चौकटीत हा. त्याच्या दाढीत अडकायला नको म्हणून लगबगीने बाहेर आले..’ 

‘आता तुला कळले, हा आपल्याकडे का बघतो?’ मुंगी ब म्हणाली. ‘आपल्याकडे बघून तो नेहमी सहकार्य .. सहकार्य असे म्हणत असतो.. त्याला आपल्याकडून सहकार्य हवंय.’ 

‘अगं पण म्हणजे काय?’ मुंगी अ त्रस्त होऊन म्हणाली. 
‘ते मलाही नक्की नाही सांगता यायचं..’ मुंगी ब विचार करत म्हणाली. ‘पण तो ज्या अर्थी आपल्याकडे बघतो आहे. त्या अर्थी आपल्याकडे ते असले पाहिजे..’ 

‘आपल्याकडे हा बिस्किटाचा तुकडा आहे आणि तो मी कुणालाही देणार नाही..’ 
एवढे बोलून दोन्ही मुंग्या पुन्हा एकदा बिस्किटाच्या तुकड्याशी झटू लागल्या.. मुंगी अ पुढून तुकडा ओढू लागली तर मुंगी ब मागून. 

त्यांचे कार्य चालू आहे तेवढ्यात तिथे दाढीवाल्या माणसाचा नातू आला.. नातवाकडे बघून माणूस दाढीत हसला.. सृष्टीकडे बघण्याची आपली निराळी दृष्टी पुढील पिढीकडे प्रदान करण्याची वेळ ती हीच हे जाणून तो म्हणाला, ‘तुला गंमत पाहायची आहे?’ 

नातू थोडा बिचकला. मागच्या वेळी या प्रश्‍नानंतर त्याला एक भले मोठे झुरळ पाहायला लागले होते आणि त्याच्या पृथ्वीवरील वास्तव्याचा कोटी वर्षांचा इतिहास ऐकावा लागला होता.. 

‘घाबरू नकोस..’ दाढीवाला म्हणाला. ‘आज मी तुला सृष्टीतील सहकार्याचा एक अत्युच्च नमुना दाखवणार आहे..’ 

मुलगा घाबरला. पण आजोबा दाखवणारच हे माहीत असल्यामुळे बघू लागला.. 
‘या मुंग्या बघ... काळ काम वेगाची गणिते शिकवीत तर यांच्याकडून. पाहिलेस त्या किती एकीने आणि नेटाने तो बिस्किटाचा तुकडा हलवताहेत? कुठे जोर लावला तर कसे बळ मिळते, कुठे घर्षण होते... कसे माहीत होत असेल या चिमुकल्या जिवांना.. आणि त्यात इतके एकदिलाने काम.. अरे, आपल्याला यांच्या तसबिरी लावल्या पाहिजेत स्वयंपाक घरात.. आहेस कुठे?’ 

‘इथेच..’ इंग्रजी शाळेत जात असल्यामुळे आजोबांना कधीकधी विषण्णता यायची. पण ती झाकून ते म्हणाले, ‘बरे, असू दे. बघ बघ..’ ते दोघे मुंगी साहचर्य ‘लाइव’ बघू लागले. नातवावर आजोबांची शिकवण ठसणार एवढ्यात एक विपरीत घटना घडली..

बिस्किटाचा तुकडा मधोमध तुटला. आता काय होणार? मुंग्या एक दिलाने काय निर्णय घेणार? नातू बघू लागला. आजोबा सावरून बसले. 

पृथ्वीवरच्या सहकार्याच्या त्या अत्युच्च आविष्कारात घडू नये ते घडले. बिस्किटाचा तुकडा तुटल्यावर असे दिसून आले, की मुंग्या आपापले तुकडे घेऊन दोन विरुद्ध दिशेने चालत्या झाल्या. त्यांनी एकमेकींकडे ढुंकून पाहिले नाही.. सहकार्याचा मनोरा कोसळला. नातवाने आजोबांकडे पाहिले, ‘आजोबा, त्या मुंग्या आधीपासून एकमेकींच्या ऑपोजीटच ओढत होत्या.’ तो म्हणाला.. त्याला खरीखुरी गंमत वाटली होती. निरीक्षणातून ज्ञानप्राप्तीची.. 

आजोबांचा चेहरा मात्र स्वयंपाकघरात फ्रेम करून लावण्यासारखा झाला होता.. एका मुंगीने एका माणसाला सहकाराचा असाही एक धडा दिला होता. तो कोणत्याही पाठ्यपुस्तकात येणार नसल्यामुळे इथे दिला आहे. एवढेच. 

(मार्क ट्‌वेनच्या ‘द लेबोरीयस अँट’ने प्रेरित)

संबंधित बातम्या