कल्पनेचे कुरण
मनावनातल्या गोष्टी
वस्तुस्थिती आणि कल्पना यांच्या सीमारेषा तपासणाऱ्या विज्ञानललित कथा...
टेकडीच्या उतारावर एकदा एक गाय मला उभी दिसली. हिरव्या गवतात पाय बुडवून एकटक नजर लावून ती अशी काही उभी होती, की या चित्रात असेच उभे राहण्याचे तिला कोणी पैसे दिले असावेत. ही चांगली कल्पना आहे. मॉडेल समोर बसवून आपण चित्र काढा.. भानगड नको. त्यापेक्षा मॉडेलला म्हणावे तूच या चित्रात कायमची उभी राहा. असा खराच कोणी असेल? म्हणजे आपल्याला उभे करणारा, चालवणारा, बोलवणारा.. काही क्षण मीदेखील त्या गाईच्या डोळ्यात डोळे घालून अचल उभी राहिले. हे दृश्य त्या निरंतर चित्रकाराला चांगलेच भावले असेल.. तिकडे ती गाय आणि इकडे मी..
आम्ही दोघी एकमेकींकडे अशा नजरबंदीने पाहात असता शेवटी आपल्या मोठ्या पापण्या झुकवून गाय म्हणाली, ‘तू जिंकलीस!’ मला जरा ओशाळवाणे झाले. गायीशी का कोणी स्पर्धा लावतात? मी माझी नजर हटवून स्वतःच्या वाटेने निघणारच होते. तर ही गाय माझी वाट अडवून म्हणते कशी, ‘थांब. दिवसभर मी इथे अशी उभी आहे. पुष्कळ आले-गेले. पण मला वाटतेय तूच ती! तू मला माझ्या प्रश्नाचे योग्य ते उत्तर देऊ शकशील.’
या चतुष्पादविलक्षणाला वाचा फुटते काय आणि संभाषणाला ती माझीच निवड करते काय, सारेच अतर्क्य. क्षणभर मला वाटले, हा रोबो तर नाही? हल्ली सगळ्याबाबतीत ही एक शंका घ्यायची वेळ आली आहे. तिकडे कुण्या रोबोला ऑड्री हेपबर्नचा चेहरा मिळून ती सोफिया झाली आहे. आमच्याकडे रोबो चार पायावर उभा राहिला तर या भारतवर्षात कुणाला आश्चर्य वाटेल? रोबोचा तो हक्कच आहे. दोन पायापेक्षा चार पाय, चार किंवा अधिक हात, खूप सारी डोकी याचे आकर्षण या देशाला फार पूर्वीपासून आहे. जे पूर्वीपासून आहे ते सहसा मानगुटीवरून उतरत नाही. तस्मात रोबो चार पायावर उभा राहून हम्मा करत असेल तर मला का आश्चर्य वाटावे?
मी वसुबारसेला गोठ्यात फिरकले नाही याचीही नोंद होते की काय? माझ्या मनात एक शंका गायीच्या खरबरीत जीभेसारखी चाटून गेली. त्याची उलटतपासणी अशा प्रकारे होते काय? शंका घेण्यालाही मर्यादा असाव्यात. उद्या कुणी म्हणाले, वसुबार्सेच्या नैवेद्याची नोंद आधारवर करण्याची सोय गोठ्यात आधीच केलेली आहे तर आम्ही काही लगेच ‘काय वेळ आली आहे’ विषयाची फेबु पोस्ट लिहिणार नाही. आम्हालाही मर्यादा आहेत. तेव्हा आल्या शंकेला मी त्वरित निडरपणे घालवून टाकले.
मजसमोर उभा असलेला प्राणी हा विद्युतऊर्जेवर नव्हे, तर अन्न-ऊर्जेवर चालतो, याचे प्रत्यंतर मला गाईने शेपटी उंचावून आणि शरीरातील काही कचरा बाहेर टाकून त्वरित दिले. आता मात्र मोठी परीक्षेची वेळ होती. संध्याकाळ सरत होती. लवकरच अंधार पडणार होता. एक गाय आपली वाट अडवून आपल्याशी बोलते आहे या कठीण परिस्थितीचा सामना कसा करायचा? (बोलणारा इंग्रजी ‘गाय’ असता तर माझी काही काही हरकत होती ‘काय’?) अंधारात आता डोळेबिळे दिसेनासे होऊन फक्त शिंगे तेवढी दिसत होती. तेव्हा आता फार विचार न करता मी गाईला तिच्या मनात काय आहे हे बोलू द्यायचे ठरवले..
‘बैस’ ती म्हणाली, ‘दोन पायांवर उभे राहणे अवघड वाटत असेल.’
‘काय तरी कल्पना..’ मी हसू दाबत म्हणाले. ‘करेक्ट! कल्पना... अगदी मुद्द्याचं बोललीस. मला खात्रीच होती. तुला ठाऊक असणार म्हणून. मी अगदी याच रोगाचे औषध शोधते आहे. कल्पना.’ गाय म्हणाली...
ही खरेच माझी कल्पना नाही.. खरेच गाय म्हणाली.. याची साक्ष द्यायला अन्य कोणीही द्विपाद नसला म्हणून हे खोटे ठरेल का?
‘कोणता रोग?’ संभाषण पुढे रेटत म्हणाले. मला स्वतःची लवकर सुटका करून घ्यायची होती ना. गाय काय मला ‘व्हेट’ समजत होती काय? तसे कोणत्याही चतुष्पादानी समजावे असे कोणतेही वर्तन माझ्या खात्यात जमा नाही. काही द्विपाद अगदी सहजपणे चतुष्पादांच्या जबड्यात हात घालून त्यांचे दातसुद्धा मोजू शकतात. मला त्याविषयी ना हेवा वाटतो ना मत्सर. करोत बापडे. मी मात्र त्यांच्याबरोबर दुरूनही ओळख वाढवत नाही. असे असताना माझ्याकडे हिच्या कोणत्या रोगाचे उत्तर असणार आहे असे हिला वाटतेय? मला कळेना. मी मनातल्या मनात गायींना होणारे रोग या बाबतीतली मेंदूतली पाने चाळवायचा प्रयत्न केला. पण काही सुचेना. पाने कोरी असणार. तेव्हा आत्ता ‘आलेल्या गायीला असावे सादर’ असे म्हणून केवळ प्रसंगावधान राखण्याच्या हेतूने म्हणाले, ‘कोणता रोग?’
‘ते तुम्ही सांगायचं.. मी केवळ त्याविषयी ऐकून आहे. माझ्या आज्या-पणज्यांकडून...’
‘क्षमा कर. पण मी गायींना होणाऱ्या रोगांबद्दल फारसे जाणत नाही.. माझे काही चांगले मित्र या बाबतीत जाणकार आहेत. तुला हवे असेल तर..’
‘आमच्या रोगाबद्दल नसून तुमच्या रोगाबद्दल बोलते आहे गं द्विपाद स्त्रिये..’ गाय जोराने हम्मा करून म्हणाली. मी घाबरून थोडी मागे सरकले.
आमच्यात जसे गायींचे डॉक्टर असतात तसे गायींमध्ये माणसांचे डॉक्टर असतात काय? किंवा ते आमची चिकित्सा करतात अशी त्यांची समजूत असेल काय? मी कल्पना लढवू लागले. आमच्यात आमच्या रोगांसाठी पुरेसे डॉक्टर आहेत आणि ते आमचा पुरेसा चारा खातात तेव्हा त्याची चिंता नको असे मला तिला सांगावेसे वाटू लागले.
गायीने आपल्या करुणेने भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, ‘तुम्हाला रोग आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही हा तुमचा खरा रोग आहे. बैस त्या दगडावर आणि ऐक तुमची कहाणी.! दाती तृण धरून मी निमूट दगडावर बसले. जाते कुठे?
‘ऐक तुमची कहाणी आणि दे आमच्या वंशाला धन्यवाद. जो वाढवण्याचे श्रेय तुमच्याकडेच आहे. फार फार म्हणजे फार हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. आमचे ऑरोच आजोबा त्यावेळी मोकळ्या कुरणात सुखाने चरत होते...’ गायीचे डोळे शून्यात लागले होते. ती कुठल्या आजोबाविषयी बोलत होती कुणास ठाऊक. ‘ऑरोच आजोबा अंगापिंडाने मोठे भरदार होते म्हणे. चारा खाऊन कोणी एवढे ताकदवान होते याची तुम्हा कोंबडीकुत्री खाणाऱ्या मंडळींना माहिती नाही.’
‘व्हेज आहे.. आणि वीगनसुद्धा.. म्हणजे तूप सोडून; म्हणजे खाऊन.’ मी घाईघाईने खुलासा केला. ‘आणि आमच्यात जे चारा खाऊन गब्बर होतात ते शेवटी तुरुंगाची हवा खातात’ गायीला माझे बोलणे फारसे कळले नाही. ती शून्यात दृष्टी लावून बोलत होती..
‘ऑरोच आजोबा फार प्रेमळसुद्धा होते. सगळ्यांशी त्यांची मैत्री. म्हणजे त्या मेल्या लांडग्याशी आणि वाघराशी सोडून. त्यांना कुणाशी मैत्रीच करायला नको. बघा ना आजही कसे वागतात..’ मी स्तब्ध ऐकत होते.
‘तर अशा या माझ्या प्रेमळ आजोबांनी तुमच्या खापरआजोबांना पण जीव लावला..’
‘माझ्या आजोबांना?’ मी गळाठून..
‘दहा हजार वर्षांपूर्वीच्या आजोबांना हो..’ गाय.. करुणार्द्र दृष्टीने...
‘आणि मग?’
‘आणि मग काय? आमचे आजोबा तसे भोळसटच. तुमचे आजोबा त्यांना चुचकारून इकडेतिकडे न्यायचे, हे जायचे, देतील ते खायचे. त्यांना आयता चारा आणि कंपनी बरी वाटू लागली. बघता बघता ऑरोच आजोबांच्या पुढच्या सगळ्या पिढ्या असेच करू लागल्या. द्विपादाला आपले दूध प्यायला देऊन सत्त्व गमावून बसल्या..’ गाय.. उसासत..
‘हळू हळू ऑरोच आजोबा आणि आजी कशी मस्तवाल दिसायची त्याचाही सगळ्यांना विसर पडला.. सगळे एकदम गरीब दिसू लागले.. गरीब गाय.. तुमचे आजोबा आमच्या दुधावर पोसू लागले.. आमच्यासाठीच जसे काही झोपेतून उठू लागले.. उठले की आमच्यासाठीचे काम सुरू.. आमचा चारा, आमचे पाणी, आमची सरबराई, सारे काही आमच्यासाठी.. आमची लांडग्याची भीती गेली आणि मोकळ्या कुरणाची हवाही संपली.. ठीक आहे.. चालायचे ते चालायचेच..’ गायीने एक माशी शेपटीने झटकली.
‘सगळे काही उभयपक्षी ठीक चालू असताना, बहुतेक आमच्या झेबू आजीच्या वेळी काहीतरी आणखी घडू लागले.. आम्ही खात होतो, पीत होतो, पिले जन्माला घालत होतो.. पण आता आम्ही पूज्य झालो होतो.. म्हणजे असे आम्ही सतत ऐकत होतो.. ऐकत आलोय.. आजवर. आमच्यापैकी कुणालाही आजवर पूज्यची भानगड समजलेली नाही. पण आम्ही पूज्य आहोत हे आमच्या कानावर केव्हापासून पडतेय! आता मला सांग, आपल्याविषयी कोणी काही बोलायचं आणि ते आपल्याला जराही कळायचं नाही हे काय चांगले आहे का?’
गायीची कैफियत मला आता लक्षात येऊ लागली. ‘परवा मी ऐकले, की आम्ही पूज्य असल्यामुळे आम्हाला आमच्या मालकाने इथे सोडून दिलेय..’
‘हं..’ म्हणाले.
‘परवा मी रस्ता क्रॉस करता करता वाचले..’ गाय आपला पृष्ठभाग दाखवत म्हणाली. तिला थोडे खरचटले होते.. गाडी घासली म्हणे. ‘मरण्याविषयी इथे कुणाला चिंता.. पण मरण्याआधी तुमच्या सुपीक कल्पनांचे कुरण कुठे आहे ते ऐकायचे होते.. म्हणून तुला थांबवले.. माझ्या सगळ्या आजीआजोबा-नाती-पणतींच्या वतीने विचारते.. उत्तर माहीत नसेल तर हवे तर उद्या सांग.. पण एका गायीला एक तेवढे पूज्य म्हणजे काय ते समजावून सांग..’
गाय म्हणाली आणि पुन्हा चित्रातल्यासारखी स्तब्ध झाली.. मी तिची रजा घेऊन निघाले.. अंधार गडद झाला होता आणि मनात पूज्य!
विश्वास ठेवा नाहीतर कल्पनेच्या कुरणात कल्पनेतली गाय चरली म्हणा.. माझ्या हाती पूज्य!