मनातल्या वनात

मृणालिनी वनारसे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मनावनातल्या गोष्टी 
वस्तुस्थिती आणि कल्पना यांच्या सीमारेषा तपासणाऱ्या विज्ञानललित कथा... 
 

एकदा एक शहर होतं. म्हणजे एकदा एक गाव होतं त्याचंच शहर बनलं होतं. एकदा शहर बनलं की ते असतंच, ते कुठं जाणार? असं शहरातल्या लोकांना वाटू शकतं. तेव्हा शहर ‘होतं’ म्हणजे काय? अनेकदा ‘असलेली’ शहरं ‘होती’ होतात. कधी एखादा ज्वालामुखी त्यांना गिळंकृत करू शकतो, तर कधी शहर स्वतःलाच गिळू लागतं. गिळणं सावकाश असेल तर शहराच्या लक्षात यायला वेळ लागतो. आपण स्वतःलाच गिळतोय हे लक्षात येईलच असंही नाही. छोटं मूल जसं करंगळी सापटीत अडकवून घेतं आणि बोट तसंच ठेवून रडू लागतं. आपल्याला नेमकं कशानं रडू येतं आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. ते अडकलेलं बोट काढलं की दुःख थांबतं हे त्यांना कळलं की ती मोठी झाली असं आपण म्हणतो. हे शहर मोठं झालं नव्हतं. नुसतंच फुगलं होतं. नुसतंच फुगलेल्याला कुणी मोठं म्हणत नाही. 

तर एकदा असलेलं हे शहर एकदा गाव होतं आणि गाव एकदा जंगल होतं. ही गोष्ट कुणी न सांगता सगळ्यांना माहीत होती. शहरात मधेच कुठंतरी गाव उगवून आलेलं दिसे, रान डोकं वर काढताना दिसे. शहर पुरेसं स्मार्ट नव्हतं याचाच तो पुरावा होता. 

शहराच्या आजूबाजूला आणखीनही शहरं होती. ती शहरं चांगली व्यायाम, डाएट वगैरे करून फिट असल्याप्रमाणं दिसायची. चाळिशीत आल्यावर माणसं अचानक फिट राहण्यासाठी धडपडतात. काहीजण तर जास्तच सुंदर दिसू लागतात. तसं या शहरांकडं बघून वाटे. हे शहर त्या फिट आणि स्मार्ट शहरांच्या नावांनी उसासा सोडे. आपला फुगवटा कमी करून आपण आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी काय प्रयत्न करता येईल यावरून त्या शहराच्या आत मोठा वादंग चाले. स्मार्ट शहरांच्या व्यायामशाळा फार स्मार्ट असतात असं हे शहर ऐकून होतं. त्या व्यायामशाळा एसी तर होत्याच; एका व्यायामशाळेत ऑक्‍सिजन पातळी कमी राखण्याचीही सोय होती. त्यानं म्हणे अधिक व्यायाम करायला लागून अधिक चरबी कमी होत असे. 

आपल्यापाशी एवढ्या उंची व्यायामशाळा नाहीत याचं शहराला दुःख होतं. त्या व्यायामशाळांसाठी जेवढे पैसे लागतील तेवढे आपल्यापाशी नाहीत. ते पैसे आणायचे तर आधी पुष्कळ हालचाल करावी लागेल. अगदी बसल्याजागी कल्पना लढवायलासुद्धा थोडा ‘स्मार्टनेस’ लागतो. शहराकडं यातलं काही नव्हतं. सर्जरीसारखे उपाय करून मेद कमी करता येतो वगैरे गोष्टी जरी ऐकायला भारी वाटल्या, तरी त्यांचं शहराला जरा भयच वाटे. करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं नको. शिवाय हा उपायसुद्धा शहराला परवडायला तरी हवा ना! वडापावावर फुगलेलं शहर होतं ते. मग काय करणार? मग जे उपाय आवाक्‍यातले आणि खात्रीशीर होते त्याकडं लक्ष वळवायचं असं शहरानं ठरवलं. म्हणजे डाएट आणि व्यायाम! 

उपायनिश्‍चिती तर झाली. आता पुढची कार्यवाही करणं आलं. ही खरी दुष्कर वेळ. जोवर निदान आणि उपायनिश्‍चिती होत नाही तोवर एक सुखद संदिग्धता असते. ती आपल्याला आपले व्यवहार ‘चालू’ ठेवायला मदत करते. निदान आणि उपायनिश्‍चितीकडं झटपट जाणं हाच एक रोग आहे. संदिग्धतेची मजा न घेता येऊ शकणं आणि सारखं काही कार्यवाही करावीशी वाटणं याला रोग का न समजावं? पण ते असो. तर आता डाएट आणि व्यायाम यासारखे उदास उपाय आपलेसे करावे लागतील असं शहरानं ठरवलं. 

व्यायामात मजा आहे आणि डाएटमधे तर त्याहून जास्त मजा आहे या सांगोवांगीच्या कथा शहर ऐकून होतं. यावर बरं म्हणण्यापलीकडं काय करणार! असू दे. असलेली बरीच आहे मजा. एकदम सगळे बदल करता येणार नाहीत. शहरानं विचार केला. हळूहळू करावेत बदल. ही स्थितीसुद्धा संदिग्धतेएवढीच मोहक असते. हळूहळू करण्याचे बदल. पण त्यानं फुगवटा कमी होतो की नाही हे तर बघायला लागतंच ना. बरेच दिवस हळूहळू करण्याच्या बदलात गेले. शहर काही कमी होण्याची चिन्हं नव्हती.. आणि एक दिवस तो साक्षात्कारी झटका शहराला बसलाच. काही क्षणात सगळं काही कोलमडून पडलं. शहराच्या वाहिन्या काहीकाळ बंद पडल्या. शहर मरतं की जिवंत राहतं अशी स्थिती उद्‌भवली. बाहेरून वेळीच मदत मिळाली म्हणून काही निभलं. शहर मोठया हृदयरोगातून उठलं. आता बदल हळूहळू नव्हे तर तातडीनं करायची गरज आहे यावर शहराला काही शंका उरली नाही. 

शहरासमोरचा प्रश्‍न असा होता, की जसं फुगणं आपोआप झालं, त्यासाठी काही करावं लागलं नाही, तसं हे बदल आपोआप का होत नाहीत. ते तेवढे ‘करावे’ का लागतात? इतका मोठा झटका बसला तरी सगळं एकदम बदलत नाही. अजून गिळावं वाटतं, अजून निजून राहावं वाटतं. शहराच्या लक्षात आलं, की आपले सगळे अवयव काही एकसारखे वाटून घेत नाहीत. एवढं सगळं घडलं तरी काहींना काही फरकच पडत नाही. शहर स्वतःबद्दलच थोडं सावध झालं. एका चांदण्या रात्री शहर निवांत पहुडलं होतं. कधी नव्हे ती अशी वेळ आली होती. रात्री जाग तर शहराला कायम असायची पण त्याला आवाजांची, वेगाची साथ असायची. चांदण्या रात्रीचा निवांतपणा आज बऱ्याच दिवसांनी लाभला होता. शहर स्वतःच्याच सुस्तावलेपणाकडं बघत होतं. कसे झालोय आपण! त्याच्या मनात आलं. जिकडंतिकडं साठलेल्या चरबीचे थर! आपण सुजलोय. आपण असे नव्हतो. आपण चांगले स्लिम होतो. आता परत तसं व्हायचंय.. काय करावं? 

स्वतःचं शरीरचित्र चांदण्यारात्री न्याहाळताना त्याला असं वाटलं, की बेढब सही पण यात काहीतरी प्रेम करण्यासारखं आहे नक्की. या सुजलेल्या अवयवांतच शोधायचंय पूर्वीचं शरीरसौष्ठव. माझेच उंचवटे, माझ्यातले ओहोळ, माझ्याच दऱ्या.. हे सगळं फार सुंदर आहे. उत्तररात्री एका इच्छेचं बी रुजलं. कसं कोण जाणे सगळ्या अंगप्रत्यंगानी ते झेललं. एक रुकार साऱ्या धमन्यांतून प्रकटला. पहाट आपली पावलं मंद वाजवत आली तेव्हा शरीरानं पाहिलं, एका उंचवट्यावर काही झाडंझुडपं एकमेकांच्या आधारानं उभी होती. त्यांना काही निगा नव्हती. ती आपली आपणच वाढल्यासारखी दिसत होती. एकमेकाला आधारसावली बनून ती मजेत उभी होती. त्यांच्यावर कोळ्यांनी सुबक नक्षीकामाची जाळी पांघरली होती. त्यावर काही दवबिंदू चमकत होते. लवकर जागे झालेले काही पक्षी तिथं इकडंतिकडं करत होते. काही अजून आळसावलेले पक्षी तिथंच पानांच्या आडोशानं निजले होते. एक ससा अंगाचं गोल मुटकुळं करून दगडाआड झोपला होता. 

या रानापासून थोड्याच अंतरावर काही गुलाबाचे ताटवे होते, रांगेत हलणारी डुलणारी आणखीनही काही विविधरंगी फुलझाडं होती. त्यावर एक स्प्रिंकलर पाणी घालत होता. ड्रीप इरिगेशनचे पाइप सर्वत्र पसरले होते. त्यातला एक पाइप चक्क एक उंदीर कुरतडून खात होता. आपल्याच अंगावरचं हे दृश्‍य बघून शरीराला शिसारी आली. चूक उंदराची नव्हती. त्या पाइपसाठी आणि पाण्यासाठी आपण घाम गाळला होता यानं शरीर कातावलं. शेजारच्या रानाच्या तुकड्यासाठी आपण काहीच ‘केलं’ नाही आणि तरीही ते किती सतेज दिसतंय.. 

त्या क्षणी, त्या क्षणी शरीराच्या लक्षात आलं, ही तर ‘त्या’ राजहंसाची गोष्ट. आपल्यातला राजहंस भेटण्याचा क्षण. आपल्याला इथवरच तर यायचं होतं. त्या क्षणी शहराच्या मनातल्या सगळ्या शंका फिटल्या. आता नुसतं डाएट करायचं नव्हतं, नुसता व्यायाम करायचा नव्हता. आता राजहंसाची भरारी मनात उमलत होती. या शहरानं पुढं काय केलं? असं म्हणतात, की त्या शहराच्या हृदयात एक मोठं रान उमलून आलं. शहरानं रानाचा हात हातात घेतला. तशी काळ-काम-वेगाची पुढची गणितं बदलली. शहरानं रानाचा हात हाती घेतला, रानानं शहराला घट्ट मिठी मारली. 

असं एक शहर होतं. कुठं विचारू नका, कधी विचारू नका. असं एक शहर गोष्टीत होतं. शहराच्या मनात असं एक शहर होतं. शहराच्या मनात कदाचित अजूनही एक असं शहर असेल. विश्‍वास बसत नसेल तर एकदाच रात्रीच्या अखेरी पहाटेची मंद पावलं वाजत असताना शहरातल्या त्या आत्मनिर्भर रानाच्या तुकड्याकडं बघा. दवाचं पाणी पिऊन बघा. कोळ्याच्या जाळ्यात गुरफटून जा. शहराच्या मनातल्या वनात आपला पायरव असू द्या.

संबंधित बातम्या