सोनसावर

मृणालिनी वनारसे 
मंगळवार, 20 मार्च 2018

मनावनातल्या गोष्टी

पुण्याचं पानगळी जंगल. जंगल म्हणजे तरी काय? कुणीही न लावलेला, इथं - तिथं अंग चोरून उभा असलेला किंचित झाडोरा. त्याला आसरा देताहेत त्या टेकड्या. दुरून पाहिलं तर या दिवसांत टेकड्या ग्लीरीसिडीयाच्या एकसारख्या खराट्यांनी भरून गेलेल्या दिसतात. हे माणसानं लावलेलं ‘जंगल.’ या जंगलाकडं पाहताना मला काही वर्षांपूर्वी एका चर्चासत्रात झालेला संवाद आठवतो... लावलेली झाडं आणि आपोआप फुलणारा निसर्ग अशी काही चर्चा चालली होती. तेव्हा एक मनुष्यमात्र उठून म्हणाला, ‘पण आज दिसणारं प्रत्येकच झाड आधी कुणीतरी लावलेलं असणार ना? त्याशिवाय कसं उगवेल ते?’ 

त्याचा प्रश्‍न ऐकून मी क्षणभर चकित, निःशब्द झाले. माणसानं लावलं असल्याशिवाय डोंगरमाथा ते समुद्रसपाटी कुठंही काहीही उगवून येणार नाही अशी त्याची समजूत होती. आज दिसणारी सगळी झाडं ही पूर्वजांची देणगी आहे असा कृतज्ञ समज त्यानं करून घेतला होता. त्या दिवशी तरी त्याच्या त्या अतर्क्‍य प्रश्‍नाला उत्तर देणं मी टाळलं. ग्लिरीसीडीयाच्या खराट्यांकडं बघून मला त्या माणसाची आणि त्याच्या प्रश्‍नाची वारंवार आठवण येते. असं जंगल बघत लहानाचं मोठं झालेल्या माणसाला जर असं वाटलं, की प्रत्येक झाड कुणी न कुणी तरी लावलेलंच असतं तर त्याची काय चूक? अर्थात हे लावलेलं आहे की नाही हा प्रश्‍न तरी का पडावा? टेकडीवर आलेले किती जण या प्रश्‍नात डोकं घालतात? झाडं ही झाडं असतात.. त्यांचं काम झाडासारखं उभं राहणं, वेळेला सावली, सौंदर्य पुरवणं, पक्षीबिक्षी बसू शकतात.. ते ही आम्ही बघू! फोटो काढू. छान आहे की सगळं. 

म्हणूनच असेल कदाचित, टेकडीवरच्या पायवाटेवर ग्लिरीसीडीयांच्या गर्दीत अजूनही उभी असलेली काही न लावता आलेली झाडं आणि त्याच्या अनुषंगानं बहरलेलं हलतं बोलतं असलेलं रान किंवा रानाचा तुकडा मला भलताच खिळवून ठेवतो. कुणी माझ्यासोबत असेल तर त्यांना कौतुकानं दाखवावं वाटतं, ही बारतोंडी बरं का, ही ना लावलेली नाही. उन्हाळ्यातही बघा ना किती हिरवीगार दिसते आहे! आपली आपण वाढली आहे ती, इथली पूर्वीची रहिवासी आहे. सहसा या दाखवण्याला सहानुभूती मिळते! नाही असं नाही. पण माझं मन आपलं त्या आपोआप तग धरून राहिलेल्या बारतोंडीकडं ओढ घेत राहतं. आधीच्या झाडोऱ्याचा अवशेष म्हणून राहताना झाडाचं काय काय होत असेल!? 

आता आता कुठं हे माणसाला कळायला लागलं आहे, की झाड काही एकटंदुकटं नसतं; एखाद्या टेबल किंवा खुर्चीसारखं! त्याला संगत असते. टेबलासमोर खुर्ची नसेल तरी आपल्याला चुकल्याचुकल्यासारखं वाटू शकतंच. झाडांना संगत लागते असं आपण म्हणतो ते या अर्थानं नव्हे. ही आपल्या मनातली गोष्ट नव्हे. आपण आता त्यांच्या गोष्टी ऐकू, शकतो, पाहू शकतो. रानातला संवाद समजावून घेऊ शकतो. या संवादाचा एक वाहक म्हणजे बुरशी. बुरशी म्हणजे जंगलातला www. म्हणजे Wood Wide Web. ही बुरशी नसेल तर जंगलात पाचोळा कुजवणार कोण, झाडांना पाणी आणि अन्नद्रव्य आत घ्यायला मदत करणार कोण, एक ना दोन. आत्ता तर कुठं रानातला हा संवाद आपल्याला ऐकू येऊ लागलाय. आपण यथामती तो ऐकायचा प्रयत्न करतोय पण तरी कितीतरी गोष्टी आपल्या ऐकण्याच्या शक्तीच्या पलीकडं उरणार. याची निदान जाणीव ठेवायला काय हरकत? त्या ऐवजी आपण एकतर रान नष्ट करत आलो किंवा आपल्याच मतीनं झाडं लावत तरी आलो. संवादाला जागा असणारं रान वाढू देणं ही अजून आपल्यासाठी फार दूरची गोष्ट आहे, फार दूरची. 

या ऐवजी मला टेकडीवर जाळलेली भुई दिसते. यावर कुठली तग धरून राहू शकणार आहे बुरशी? तिच्याशिवाय जे तग धरून राहू शकतं ते आणि तेवढं उभं बघायला मिळेल आपल्याला. आपल्या पुढच्या पिढ्या त्यालाच रान समजत मोठ्या होतील. संवाद हरवत राहील. 

आणि म्हणूनच ओळखीच्या वाटेवर जेव्हा सोनसावरी आपली वर्षभराची मरगळ झटकून अंगावर सोनफुलं घेऊन दिमाखात उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्याकडंही मी अनिमिष डोळ्यांनी बघत राहते. आपल्या ‘lol’ मोबाईल भाषेत अजूनही घडवंची, फडताळासारखा एखादा जुना शब्द असावा आणि त्याची कधीतरीच जाणीव व्हावी असं वाटतं या ‘संवादा’कडं बघून. सावरीबाई, तू कशी अजून इथं उभी राहिलीस? सगळ्या रानात मोठ्या या गुलाबासारखी पिवळीधमक फुलं लेवून उभी असणारी तू एकटीच तर आहेस. त्या फिकुट मिचकुट गुलाबी ग्लिरीसीडीयाच्या गर्दीत तुझ्याकडं पाहताना एकदम सोन्याची झळाळी डोळ्यात भरते. तुझ्याकडं बघून एकदम आश्‍वस्त वाटतं? कशानं? थोडा रानव्याचा वास येतो ना अजून तुझ्यापाशी. थोडी संवादाची भूक भागते. तुलाही संवादाची आस आहे हे दिसतं मला. तुझा संसार दर वर्षी थोडा थोडा वाढतो नाही? त्याशिवाय कशी एकाच टापूत तुझी लेकरं, नातवंडं वाढताना दिसतात? तुम्ही सगळे एकदम फुलता आणि आमची बघणाऱ्यांची नजरबंदी होऊन जाते. तुझ्या दूरच्या भाईबंदांवर पळस, पांगाऱ्यावर खूप जण फिदा असतात. कवी आणि निसर्गप्रेमी तर जास्तच प्रेमात; पण त्यांनी टेकडीवरून हळूहळू आपली रसद काढून घेतली असावी. आता चुकून कुठं एखादा पांगारा आपली केशरी लाल नाजूक फुलं ढाळीत असतो, पण भुंग्यांना, पक्ष्यांना खरं निमंत्रण मिळतं ते तुझ्याकडून. न जाणो हे उडुगण आपल्या सोबत आणखी काय आणतील? काय रुजवतील? हे सगळं हळूहळू होताना पाहायची मला फार आस आहे, सोनसावरे... 

पण या माझ्या अमर्याद वाटण्याला एक बंधन आहे सोनसावरे. मानवी जीवन फार मर्यादित काळाचं आहे. मी डिजिटली अमर होईन अशी शंका घ्यायला आता पुष्कळ वाव आहे. पण माझ्या पंचेंद्रियांना ज्या असण्याची, भोगण्याची ठाऊकी आहे त्याच्या हे किती जवळपास असणार आहे? मला ठाऊक नाही. मला ठाऊक आहेत दीर्घायुषी वृक्षांच्या काही कथा. स्वीडनमध्ये एक झाड आहे म्हणे, अवघे ९५०० वर्षे वयमान. स्प्रूसचं झाड. एवढी वर्षं म्हणजे सरासरी मानवी आयुष्याच्या ११५ पट! या झाडाला वेळ म्हणजे काय ते विचारा. त्याची घाई आणि त्याचा निवांतपणा म्हणजे काय असेल? एवढी वर्षं जगण्यासाठी या झाडानं काय करावं? फांद्यांतून पुनर्जन्म, मुळातून पुनर्जन्म.. फार अद्‌भुत कथा आहे. मूळ झाड असं शोधताच येणार नाही कदाचित, पण जे आहे ते मूळ जे होतं त्यापासून वेगळं काढणार कसं? सगळेच कूटप्रश्‍न! 

ते तिकडं सहाराच्या वाळवंटात जगातलं एकुटवाणं झाड आहे. बाभळीच्या कुळातलं. जगातलं सगळ्यात एकटं पडलेलं झाड म्हणून त्याची नोंद केलीये म्हणे आपण. आपल्यालाही काय दृष्टी मिळालीये! का शोधतो, हेरतो आपण कोण एकटं आणि कोण घेरलेलं ते!? तर जे काही असेल ते असो, पण या झाडाची नोंद एकुटवाणं झाड अशी आहे खरी. चारशे किलोमीटर लांबीच्या प्रवासी वाटेवरचं हे एकमेव झाड होतं म्हणे. म्हणजे अजूनही आहे, पण मूळ झाडाची फांदी रुजून वर आलेलं. मूळ झाड १९७३ मध्ये एका प्यायलेल्या ट्रक ड्रायव्हरनं पाडलं म्हणे! (ट्रक ड्रायव्हर आणि दारू यांच्याबद्दल काय बोलणार?) तर हे झाड तिथं असलेल्या एका विहिरीच्या जवळ वाढलं होतं. वाळवंटातल्या न संपणाऱ्या भयावह वाटेवरचं हे एकच झाड. शतकानुशतकं त्याची पानं उंटांनी खाऊन कशी टाकली नाहीत? त्याच्या लाकडांची शेकोटी कशी झाली नाही? त्याचं उत्तर असं आहे, की हळूहळू हे झाड, झाड राहिलंच नाही, एक दीपगृह बनलं.. वाळवंटातल्या कशावरतरी भरोसून मार्गक्रमणा करणाऱ्या वाटसरुंचं श्रद्धास्थान. त्याच्याभोवती वाटसरू गोळा होऊन प्रार्थना करायचे म्हणे, आमचा प्रवास नीट होऊ दे.. 

हा संवाद झाड कसं ऐकत असेल? आणि त्याच्या मनातला संवाद आपण ऐकतो असं त्याला कधी वाटेल? सगळेच प्रश्‍न.. 

दर वर्षी पावसाळ्यानंतर लावलेल्या आणि न लावलेल्या झाडांनी आपला पर्णसंभार गाळला की क्षितिजाची रेखा बदलल्यासारखी दिसते. इमारती अधिक जवळ येतात. दोन जगातलं अंतर वेगानं मिटत चालल्यासारखं वाटतं आणि मनात दहा, वीस, पन्नास वर्षांनतरचं चित्र वाकुल्या दाखवू लागतं. त्या चित्रात सोनसावर कुठं असेल? असेल का? तुझ्या फुलांनी मनात पडलेला सोनेरी प्रकाश असा काळवंडायला लागतो.. तशा सावल्याही आता लांबायला लागतात. घराकडे परतायची वेळ.. माझी, पाखरांची.. 

माझ्या पायवाटेवरही राखेचा काळिमा आहे. त्यावर सोनसावरीची पिवळी धमक फुलं अजूनच उठून दिसतात. मजा म्हणजे, ग्लिरीसिडीयांनी त्या राखेवर आपली नवी पानं गाळायला सुरवात केली आहे. हळूहळू राखेच्या जखमा झाकल्या जातील, नवा संवाद सुरू होईल.. संवाद कुणात, किती ताजा, किती जुना, हे कसं सांगता येईल.. पण संवादाची धुगधुगी अजून दिसतेय. अंधारातच सोनसावर अनावृत्त देहावरचे आपलेही दागिने हळूहळू उतरवून ठेवते आहे. चैत्र तिलाही नवी साडीचोळी करणार आहे. ती लेवून मग सोनसावर वर्षभर लाजाळूचं झाड होऊन उभी राहील. पुढच्या पानगळीत आपलं वैभव घेऊन पुन्हा भेटेल.. 

टेकडीवर, सरत्या हिवाळ्याच्या संध्याकाळी काही सोनफुलांशी हाच संवाद... हाच निरोप..

संबंधित बातम्या