सर्पराज 

मृणालिनी वनारसे
बुधवार, 21 मार्च 2018

मनावनातल्या गोष्टी

एक रानकरी होता. रानात राहणारा, रान वाढू देणारा म्हणून रानकरी. तो जिथं राहात होता ती जागा एका उंच पर्वतावर होती. ती अशी जागा होती, की जिथं उभं राहिलं असता आजूबाजूला फक्त पर्वताची शिखरं दिसत.. बाकी काही नाही. सूर्यालासुद्धा तिथं पोचायला इतर ठिकाणापेक्षा जास्त वेळ लागायचा. एक दिवस कधी न घडलेली एक गोष्ट घडली... 

पर्वताच्या शिखरांवरून उडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पक्ष्यांकडं तो पाहात बसला होता. दुपार होऊन गेली होती. आता लवकरच अंधार पडणार अशी ही वेळ होती.. आणि अचानक रानकऱ्याला दिसलं, की एक पांढरा पक्षी चक्क खाली येतो आहे. रानकरी बघू लागला. खाली येईपर्यंत पक्ष्याचा आकार मोठा झाला. आपले शुभ्र पंख फडफडवत तो रानकऱ्याच्या कुटीसमोर येऊन उतरला. त्याचं त्राण बहुधा संपलं असावं. रानकरी त्याच्या जवळ गेला. पक्ष्यासाठी डोणीतून थोडं पाणी घेऊन आला. चोचीनं पाणी टिपून, दम गोळा करत मनुष्यवाणीनं पक्षी त्याला म्हणाला, ‘आभार. माझी घटका भरत आली आहे. आता मी तुला जे सांगणार आहे ते नीट ऐक. पर्वताच्या पायथ्यानं एक भला मोठा सर्प तुझ्या दिशेनं निघाला आहे. वाटेत येईल त्या प्रत्येकाला गिळत हा सर्पराज तुझ्या दिशेनं वेगानं वाटचाल करतो आहे. सांभाळ!’ 

पक्ष्याचं मनुष्यवाणीतलं हे बोलणं ऐकून रानकरी चक्रावला. त्याला काही कळेना. पण घालवायला वेळ नव्हता. पक्षी अगदी क्षीण झाला होता; कोणत्याही क्षणी प्राण सोडेल असा दिसत होता. न कळून रानकऱ्यानं विचारलं, 

‘पण मी या सर्पराजाचं काय केलं आहे, म्हणून तो माझ्या दिशेनं येत आहे?’ 

‘ते मी जाणत नाही. असेल तुझ्या पूर्वजांचं काही. तू मात्र स्वतःला सांभाळ.. तुझ्या झोपडीला, तुझ्या रानाला सांभाळ...’ 

‘पण या सर्पराजाला मी थांबवू कसं?’ 

‘मला माहीत नाही बाळा. मी तुला एवढंच सांगू शकतो, की या सर्पाचा जीव एका विहिरीत आहे. ही विहीर इथून एक समुद्र दूर आहे. विहीर खूप खोल आहे आणि जेवढं या सर्पाला या विहिरीतून बाहेर काढायचा प्रयत्न करशील तेवढी त्याची शेपूट लांब होत जाईल. त्याचा जीव काही जायचा नाही. तुला जीव वाचवायचा असेल तर...’ 

एवढं बोलून पक्ष्यानं मान टाकली. दुःखी मनानं रानकऱ्यानं पक्ष्याचं शव मातीत पुरलं आणि तो विचार करू लागला. काय सांगितलं पक्ष्यानं? हा सर्पराज खरंच का आपल्याला गिळायला येतो आहे? बराच वेळ विचार करून त्यानं पर्वत शिखरावर जायचं ठरवलं. तिथून त्याला खालची हालचाल नीट निरखता आली असती. सर्पराजाची चाहूल लागते का हे स्वतः डोळ्यांनी खात्री करून बघावं म्हणून तो निघाला. पर्वत शिखरावरून त्याला दिसलेलं दृश्‍य अभूतपूर्व असंच होतं. एक नागमोडी वळणदार काळी रेषा पर्वताच्या पायथ्याला विळखा घालून सुस्त पडून राहिलेली त्याला दिसली. ‘एवढा वेढा पडेपर्यंत लक्ष कुठं होतं माझं? काय करत होतो मी?’ त्याच्या मनात आलं. पण हाच तो सर्पराज याविषयी मात्र त्याची खात्री पटली. आता पुढची पावलं वेगानं उचलायला हवी होती. त्याला पक्ष्याचं बोलणं आठवलं. सर्पराजाचा जीव एका विहिरीत आहे. विहीर एक समुद्र लांब आहे आणि जेवढं त्याला बाहेर काढू तेवढा तो वाढतच जातो. मरत नाही... हे गूढ कोडं सोडवावं कसं? तो विचार करू लागला. बराच वेळ विचार करून त्यानं एक योजना ठरवली. 

पायवाट उतरून तो सर्पराजाचं दर्शन घ्यायला जाणार होता. पर्वताचा उतार झपझप उतरत पायथ्यापाशी पोचत असतानाच त्याला सुस्तावलेला सर्पराज दिसू लागला. या आकाराचं कोणतंही धूड त्यानं आजवर बघितलेलं नव्हतं. त्यानं आजवर पाहिलेले विषारी साप या महाकाय सर्पराजापुढं काहीच नव्हते. याचं सगळंच वेगळं! हा जागा झाला तर आपला घास घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी त्याची खात्री पटली. भीतीनं तो दोन पावलं मागं आला. जागच्या जागी थिजला. पण पुढच्याच क्षणी त्याचं डोकं स्वसंरक्षणाच्या भावनेनं काम करू लागलं. 

‘सापाचं डोकं दिसतं आहे फक्त..’ त्यानं विचार केला, ‘शेपटी तर दिसत नाही... ती तर असणार आहे त्या विहिरीत, जिथं त्याचा जीव आहे. मला तिथपर्यंत गेलं पाहिजे. त्याचा जीव माझ्या हाती आला तरच माझं काम पूर्ण होईल. एक समुद्र ओलांडावा लागेल..’ त्यानं मनाची तयारी केली आणि तो निघाला... 

वाटेत त्याला ठिकठिकाणी सर्पराजाचं लांबच लांब धूड पसरलेलं दिसलं. कुठं अरुंद तर कुठं चांगलंच जाड.. फुगलेलं. रानकरी विस्मयचकित होऊन बघत होता. मधेच त्याला माणसं दिसत, सर्पराजाच्या पाठीला तेल मालिश करणारी, गुळगुळीत करणारी, त्याची पाठ चांगली रगडून देणारी. उन्हातान्हात बिचारी कामं करत होती. घाम गाळत होती. ‘हे त्या सर्पराजाचे नोकर - चाकर असावेत...’ त्याच्या मनात आलं. त्या शिवाय का त्यांना हे काम करावं लागतं? त्या माणसांबद्दल त्याला दया आली. ‘आपण या महाभयानक सर्पाचा जीव घेतला तर ही आपल्याला किती बरं दुवा देतील?’ तो मनात म्हणाला. पण हे सगळं कुणाला तरी सांगण्याएवढी त्याच्याकडं ना भाषा होती ना तेवढा वेळ. तो तसाच निघाला. आता तो जिथं होता तिथून अथांग समुद्र त्याला दिसत होता. समुद्राच्या दर्शनानं तो भारावला. हा ओलांडणं ही काय सोपी गोष्ट आहे? आपल्याला हे कधीच जमणार नाही या विचारानं तो खट्टू झाला. बऱ्याच काळानं त्याला काही नाविक आणि एक नाव दिसली. या समुद्राच्या पलीकडं सोडण्याविषयी रानकऱ्यानं त्यांना खाणाखुणा करून विनंती केली. नाविकांना काय कळलं कुणास ठाऊक. त्यांनी त्याला पलीकडच्या किनाऱ्यालगत सोडण्याचं आश्‍वासन दिलं. जीव मुठीत धरून रानकरी निघाला. शेवटी एकदाचा पैलतीर आला. पुळणीवर या गरीब माणसाला टाकून त्याच्या नशिबाची चर्चा करत नाविक निघून गेले. आता एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला वाळवंट अशा ठिकाणी पर्वताचा हा पुत्र एकटा होता. 

अहोरात्र चालल्यावर शेवटी एकदा त्याला दूरवर जमिनीतून आगीचे लोळ प्रकटत असावेत असं दृष्य दिसलं. मोठं भयानक दृष्य होतं ते आणि पाहता क्षणीच रानकऱ्याची अशी खात्री झाली, की हीच विहीर! भीत भीत, अत्यंत जपून तो त्या विहिरीपाशी गेला. तिथून बाहेर पडणाऱ्या ज्वाळांनी आपलं शरीर भाजते आहे असं त्याला वाटू लागलं. तिथं पोचेपर्यंत तो पार कसनुसा झाला. विहिरीचा तळ बघण्याच्या इच्छेनी तो जवळ गेला. तेवढ्यात बाहेर पडलेल्या ज्वाळेसारख्या फुत्कारांनी तो होरपळल्यासारखा झाला. झळ लागून शेवटी तो कोसळलाच. गलितगात्र होऊन क्षीणपणं त्याच्या तोंडातून उद्‌गार आले, ‘हे सर्पराजा, मी तुझं काय केलं आहे, म्हणून तू माझा घास घेणार आहेस? माझ्यासारख्या आणखी किती जणांना तू तुझा बंदी बनवलं आहेस? तुला काय दिलं म्हणजे तुझा हा संहार तू थांबवशील? तुझ्यापर्यंत पोचलो आहे मी पण आता माझ्यातली शक्ती संपली आहे. तूच आता मला तार किंवा मार. तुला मारायला आलो होतो मी; पण तुझ्यापुढं मी काहीच नाही. माझी शक्ती काहीच नाही... मला आता उत्तर देऊन तरी उपकृत करावंस..’ एवढं बोलून तो लांब जाऊन निपचित पडला. 

असा तो किती वेळ पडला होता कुणास ठाऊक. त्याच्या अंगावर वाळवंटातली वाळू चढू लागली होती. तिच्याखाली तो जवळपास अदृश्‍य होत चालला होता. याचवेळी एक नवल घडलं. पांढराशुभ्र वेश परिधान केलेली एक स्त्री त्याच्या जवळ आली. त्याच्यावर जमलेली वाळू दूर करून तिनं त्याला बसतं केलं. त्याच्यावर आपल्या वस्त्राची सावली धरली, त्याला प्यायला पाणी दिलं आणि म्हणाली, ‘तू कोण? इथं कसा आलास?’ 

जरासा दम खाऊन रानकऱ्यानं आपली सगळी कथा तिला सांगितली. वाळवंटात अचानक प्रकट झालेल्या या स्त्रीविषयी त्याला अप्रूप वाटत होतं. तिच्याविषयी उत्सुकता वाटत होती. त्याची सगळी कथा ऐकून ती स्त्री हसली. म्हणाली, ‘मी या मरुस्थलाची देवी आहे. इथं आजूबाजूला तू जे काही बघतो आहेस ही सारी माझी संपत्ती आहे. तू एवढ्या लांब या सर्पराजाचा शोध करत आलास. पण या सर्पाचं एक गुपित तुला कळलंच नाही. हा सर्प स्वतःच्या इच्छेनं काही करत नाही. स्वतःच्या इच्छेनं तो हलूही शकत नाही. त्याला हलवलं तर मात्र तो हलतो. त्याच्या हलण्यानं माणसं चेंगरूसुद्धा शकतात, मरू शकतात. पण तो हे आपलं आपण करत नाही.’ 

रानकऱ्याला मोठं आश्‍चर्य वाटलं. हा निद्रिस्त सर्प कधी तरी उठेल तेव्हा त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी त्यानं केली होती. सर्प स्वतः काहीच करू शकत नाही यानं तो हडबडला. ‘असं असेल तर माणसं का त्याला उठवत आहेत? हलवत आहेत? त्याच्या शेपटीला हात घालून त्याला बाहेर काढत आहेत?’ त्यानं अत्यंत आश्‍चर्यानं मरूभूमीच्या देवीला विचारलं. देवी म्हणाली, ‘फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा पहिल्यानं असं झालं की या सर्पराजाला कुणीतरी हलवलं. तो हलला, बाहेर आला, धावला. त्याचा वेग एवढा की त्याच्या पाठीला लटकलेले काही जण त्याच्याबरोबर दुसऱ्या मुलखात जाऊन पडले. पडले तर पडले; पुढं असं झालं की जिथं पडले तो मुलूख त्यांना आवडला. इथल्यापेक्षा तिथं राहणं त्यांना आवडलं. तिथं नेऊन पोचवल्याबद्दल सर्पराजाच्या शक्तीचे त्यांनी आभार मानले. त्यांची ही कथा जशी इथं उरलेल्या लोकांपर्यंत येऊन पोचली तशी त्यांनीही असंच करण्याचे मनसुबे आखले. सर्पराजाला हलवायचं, जागं करायचं आणि त्याच्या पाठीवर आरूढ होऊन दूरचे पल्ले गाठायचे. सर्पराजाला किती हलवता येईल आणि किती दूर जाता येईल याची चढाओढच जशी काही सुरू झाली. आता बघतो आहेस ती माणसं अशी आपणहूनच त्या सर्पराजाची गुलाम झाली.’ 

मरूदेवीचं हे बोलणं ऐकून रानकरी चमकला. ‘पण मग तू हे त्यांना सांगत का नाहीस? कुणीच हे त्यांना सांगत का नाही?’ 

देवीचे डोळे चमकले. धीरगंभीर आवाजात ती म्हणाली, ‘हा सर्प त्यांची शक्ती असेल तर मी त्यांचं भविष्य आहे. ज्याला वाचता येतं त्यालाच ते कळणार. जो मला जाणून घेण्यासाठी येणार त्यालाच मी आपलं रूप दाखवणार...’ एवढं बोलून देवी उठली आणि चालू लागली. तिला थांबवत रानकरी म्हणाला, ‘पण माझं काय? माझं काय होणार? मी परत कसा जाणार? गेलो तरी तोवर माझं घरटं या सापानं गिळंकृत केलं असलं म्हणजे?’ 

ममरूदेवी थांबली. वळून त्याच्याकडं बघत म्हणाली, ‘तू इथवर आलास. तुझं भविष्य शोधत आलास. तुला मी माझं रूप दाखवलं. आता ऐक.. सर्पाच्या इतक्‍या जवळ येऊन तू त्याच्या भक्ष्यस्थानी पडला नाहीस याचे आभार मान. परतीचा रस्ता पकड. आलास तसा परत जा. वाटेत दिसतीलच तुला कशानी पिचलेले, खंगलेले, ढेपाळलेले सापाचे कष्टकरी. जे ऐकतील त्यांना तुझी कहाणी तू सांग. पण तिथं थांबू नकोस. अडकू नकोस. आपल्या जागी जा. कष्टानं पिचलेल्या या माणसांकडून तुझं घरटं नष्ट व्हायला अजून पुष्कळ वेळ आहे. तुझी गोष्ट तोवर माणसं एकमेकाला सांगतील, माणसं हेलपाटे घालून पिचायचे थांबतील. तोवर तुझं घरटं तू सावर.. यापरते निर्वाणीचे प्रश्‍न विचारू नकोस... भलत्या ठिकाणी माथेफोड करू नकोस..’ 

एवढं बोलून देवी अंतर्धान पावली. रानकरी उठला. फुत्कार टाकणाऱ्या विहिरीकडं त्यानं डोळे भरून पाहिलं.. पाहिलं, ऐकलं ते खरं का खोटं? विचार मनात घोळवत तो निघाला. त्याला बराच मोठा पल्ला गाठायचा होता. खूप दूर जायचं होतं. इतक्‍या लांब आपण पोचलोच नाही, तर? इतक्‍या जवळ आहोत सर्पराजाच्या तर एकदाच... परत जाण्यासाठी फक्त... सर्पराजाची शक्ती वापरावी का? त्याच्या मनात आलं.. एकदाच फक्त एकदाच... 

वाळवंटात सोनेरी वाळू उडाली... ज्वाळेचा एक फुत्कार विहिरीनं बाहेर ओकला...

संबंधित बातम्या