मनातल्या हिमालयात, हिमालयातल्या वनात 

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मनावनातल्या गोष्टी

दिवसाचे दीड-दोन तास टेकडीवर निवांत घालवता आले तरी मन शांत होतं, शहराची तलखी कमी होते. पण कधीतरी मन अधिक गर्द रानव्याकडं उसासून धावू लागतं. शरीर मग त्याच्यामागं निमूट चालू लागतं. ही पळवाटच पर्यटनाच्या उदयाचे मूळ आहे. माणसं एका जागी स्थिर झाल्यानंतर पर्यटन उगवलं. तोवर काय गरज होती पर्यटनाची?

उत्तर दिशेच्या देवतात्मा नगाधिराज हिमालयाला भेटून आल्यानंतरची ही मनावनातली गोष्ट. कुठून सुरवात करू? 

काठगोदामला पहाटे बरोबर पाच वाजता ट्रेन पोचली. छोटंसं स्टेशन. बाहेर मिट्ट काळोख. धडपडत झोपेतून जागी झाले. बाहेर येऊन थंड हवेचा पहिला झोत अंगावर घेतला तेव्हा प्रसन्न वाटलं. स्टेशन छोटं असलं तरी स्वच्छ होतं. तिथं आवश्‍यक त्या सुविधा होत्या हे बघून बरं वाटलं. बाहेर दिनेशभाई ड्रायव्हर येऊन थांबले होते. पुढची सफर त्यांच्याच बरोबर व्हायची होती. छतोलापर्यंत दोन अडीच तासांचा प्रवास होता. चहा प्यावासा वाटला. दिनेशभाईंनी दरी-काठच्या एका छोट्या टपरीवजा हॉटेलसमोर गाडी थांबवली. पहिला चहा उकळत होता. मी आत जाऊन बसले. दरीत खोलवर दिवे लुकलुकत होते... दिवे लागले रे तमाच्या तळाशी... आसमंत शांत असतानासुद्धा अभिषेकींचे सूर कानात रेंगाळले. आपण आपले सूर बरोबर घेऊन प्रवास करतो! ओळखीच्या सुरांपासून मुक्तता हवी होती आणि तरीही या सुरांनी प्रसन्न वाटलं. मला फार फार आश्‍वस्त वाटत होतं. लवकरच दरी प्रकाशानं भरून जाणार होती. मला काय पाहावं आणि काय नाही असं होणार होतं. त्या आधीचा हा अंधार, पहाटवारा, गरम चहाचा दरवळ सगळं फार हवंहवंसं वाटत होतं. 

तशी काही मी काही सरसावून सगळं म्हणजे सगळं बघायला आले नव्हते. मी पर्यटक म्हणून आले नव्हते याचा मला सूक्ष्म अभिमानच वाटत होता. मी आले होते माझ्या हिमालयात स्थायिक झालेल्या मैत्रिणीला भेटायला. एका छोट्या कुमाऊ गावातल्या तिच्या घरी राहायला, तिचं काम पाहायला.. आणि माझ्या वाट्याला आलेला हिमालय मनभर साठवून घ्यायला. म्हटलं तर इथं मी बाहेरचीच; पण पर्यटक नाही. पर्यटनापासून आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पुढच्या सगळ्या निजी आणि सार्वजनिक व्यापांपासून मी जाणीवपूर्वक बाजूला होते आहे खरी, पण शहरी जीवन अजून सुटलं नाही तोवर इथल्या गर्दीतून सुटण्याचे रस्ते कायम साद घालत राहतात हे सुद्धा खरंच! दिवसाचे दीड-दोन तास टेकडीवर निवांत घालवता आले तरी मन शांत होतं, शहराची तलखी कमी होते. पण कधीतरी मन अधिक गर्द रानव्याकडं उसासून धावू लागतं. शरीर मग त्याच्यामागं निमूट चालू लागतं. ही पळवाटच तर पर्यटनाच्या पुढच्या राजरस्त्याचं मूळ आहे. माणसं एका जागी स्थिर झाल्यानंतर पर्यटन उगवलं. तोवर काय गरज होती पर्यटनाची? आता जर उगवलं तर मावळेल कशाला? शहरं वाढताहेत तोवर पर्यटन वाढेल. एवढं साधं आहे. हळूहळू दोन्ही कमी होईल. पर्यटकाची शक्तीही कमी होईल. पण तूर्त तर मी पर्यटक होते खरी! कुणी देवाच्या नावे जातो, कुणी साहसाच्या, कुणी अभ्यासाच्या तर कुणी आणखी कशाच्या. आपण जर तिथले नाही, तिथं कायम राहणार नाही, तर कारण कोणतंही असेना, आपण पर्यटकच! पहाडो में ये कहते है परदेसी तो झूठे है। रस्ता झालाय तर त्यानं सगळ्या प्रवाशांना सारख्याच रांगेत उभं केलंय. त्यात काही कमी जास्त नाही. आता पुढं काय कचरा कमी आणि जास्त करणार?! 

मी ही घडीची प्रवासी होते. पण आज काही मन त्याबद्दल खात नव्हतं. विमान, रूळ, रस्ते या जगङ्‌व्याळ यंत्रणांनी एवढं अचूक काम करून मला इथं ठरलेल्या वेळेला आणून दाखल केलं होतं. यात काय नवल असं कुणाला वाटेल, कुणी याहून चांगल्या सेवांचे दाखले देईल. पण या यंत्रणांमधली गुंतागुंत जो जाणतो त्याला सुखरूप प्रवास म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही वाटत. एवढंच की तो चमत्कारांची अपेक्षा नेहमी ठेवत नाही. एखाद्या वेळी ठेवायला हरकत नाही असंही नाही.. आणि तरीही जर चमत्कार घडलाच आहे तर त्याचा मजा का घेऊ नये? हमने माना की कुछ नही गालिब; मुफ्त हाथ आये तो बुरा क्‍या है। माझ्या पुढ्यात तर अख्खा हिमालय होता! लवकरच पर्वत उजळणार होता, पाणी चमकणार होतं... 

पुढं काय असेल याची गोड शिरशिरी अंगावर उमटत असताना चहा आला. चहा पिऊन ताजंतवानं होऊन आम्ही मार्गस्थ झालो. आता हिमालय. 
  

The meaning of life is to see! 
 मध्य हिमालयात होते. शिवालिक टेकड्या लांब राहिल्या होत्या. गोला नदीवरचा पूल ओलांडून आम्ही पुढं निघालो होतो. सूर्यानं साथ दिली तर दूरवरची हिमशिखरं दिसणार होती. त्रिशूल, पिंडारी, पंचचूल आणि नंदादेवी शिखरं दिसण्याच्या अंतरात आहेत ही भावना कुतूहल जागवत होती. इथं शिखरांचं दर्शन याचं कौतुक मोठं आहे. ती शिखरं वेगवेगळी ओळखता यायलासुद्धा त्यांच्याशी बरीच ओळख वाढवावी लागते. आत्ता म्हणजे कोणतंही नाव ऐकलं तरी मन थरारून जावं अशी परिस्थिती. पण इतक्‍या दुरून दिसणारी ही शिखरं आणि त्यांनी स्तिमित होणारा इथला माणूस या दोन्हीचं मला कुतूहल वाटत आलं आहे. मध्य हिमालयात राहणारी माणसं त्यांच्या परिसराला हिमालय संबोधतच नाहीत. हिमालय म्हणजे हिमशिखरं, हिमवान पर्वत. वर्षातील जास्तीत जास्त वेळ हिममुकुट घालून बसणारा पर्वत तो हिमालय. थंडीत चार-दोन वेळा बर्फ पडलं तर त्यात काय मोठंसं! दिनेशभाईंनी मला त्रिशूल दाखवलं, तेव्हा मी ते योग्य त्या भावनेनं पाहिलं. पण माझं खरं लक्ष वेधून घेत होती ती आजूबाजूची सालाची, सागाची आणि मधूनमधून डोकावणारी बुरासची झाडं. बुरास म्हणजे प्रसिद्ध ऱ्होडोडेंड्रोन. या स्वर्गीय झाडाला बुरास असं नाव का मिळालं असेल? उसने क्‍या बुरा किया था? शायद उसके साथ बुरा हो रहा था। या फुलांपासून सरबत बनतं आणखी कायकाय बनतं. ही फुलं देवाला चढवली जातात. यासाठी वाट्टेल तशी ओरबाडली जातात.. आणि तरीही वाटेवर एवढी सुहास्य उभी आहेत. मन माझे मोहून गेले... कितीतरी! 

हिमालय काही मी फार वेळा पाहिलेला नाही. या आधी गढवाल आणि हिमाचलमधला काही भाग बघून झाला होता. चढण जशी चढतो तसं वनस्पतींचं रूप पालटतं. साल वृक्षांची जंगलं जाऊन पाइन-ओकची जंगलं दिसू लागतात आणि मग देवदार. त्याही पुढं अल्पाईन कुरणं आणि मग हिम.. केवळ हिम. तिथवर तर काही मी जाणार नव्हते. त्याआधीचं काय काय दिसणार आहे? हरेक दरी निराळी. तिथवर पोचणारा प्रकाश निराळा. वळणागणिक भेटणारं हिरवं आश्‍चर्य हेच सुचवीत होतं. बघ माझ्याकडं, मी कुठून आलो इथं? कसा रुजलो? कसा वाढलो? माहीत आहे गेल्यावर्षी केवढ्या भीषण आगीला मी तोंड दिलंय! त्यातून तावून सुलाखून निघालो. बघ, तरी माझ्या अंगाखांद्यावर फुलं आहेत. फुलणं, फळणं अटळपणं चालू आहे. एकेक साल, बुरास, काफल मला हेच तर नव्हते का सांगत? 

पुण्याहून निघताना दोन पुस्तकं अगदी अलगद माझ्या हाती पडली होती. एक होतं ‘द हिडन लाइफ ऑफ ट्रीज’ आणि दुसरं ‘झेन सीइंग झेन ड्रॉइंग.’ ‘हिडन लाइफ’ हे शीर्षक वाचून मी काहीशी साशंक होते. झाडांशी उच्च आध्यात्मिक पातळीवर संवाद साधावा अशी काही माझी महत्त्वाकांक्षा नव्हती. पण हे पुस्तक मी आत्तापर्यंत इकॉलॉजीच्या ज्या वाटेवर चालले त्याच वाटेवर चालणारं निघालं. ते सांगत होतं, की झाडांचं दृष्टीपलीकडलं जग समजावून घेता येतं. 

एखादं झाड, झुडूप, वेल, अगदी गवताचं पातं समोर आलं तर त्याचंही जग जाणून घ्यायची कोशिश करता येते. निसर्गात वनस्पतींमध्ये, प्राणी आणि वनस्पतींमध्ये संवाद चालू असतो. ही संवादाची भाषा आपल्या संवादाच्या भाषेपेक्षा निराळी खरी. पण संवाद सुरू केला, की पुढं जाऊ लागतो. 

समोर आलेलं झाड/झुडूप एकांडे आहे का? त्याचा तिथल्या बाकीच्या वनस्पतींशी, कीटकांशी, बुरशीशी काय संबंध असेल? का दिसतं डोंगरावर अनेकदा विविध वनस्पतींचं एकत्र कुटुंब? उंच होणारे, पानं गळणारे, सावलीत वाढणारे, खोडावर वाढणारे, कशा आपल्या जागा शोधतात अचूक? का दिसतात कधीकधी एकाच एका प्रजातीनं व्यापलेले डोंगर उतार? त्यांच्यातही काही संवाद असेल का? आपण जे खड्डे करून, ओळी करून झाडं लावतो त्यांच्यात असेल का काही संवाद? संवादाविना कमकुवत होत असतील का झाडं? आपण लावलेल्या झाडांची काळजी घ्यावी लागते ते काही उगाच नाही. 
हळूहळू प्रश्‍नोत्तरं संपतील. 
When the Ten Thousand Things are seen in their Oneness 
We return to the Origins where we have always been 
असाही अनुभव येईल... 

तूर्त मी एका अनोळखी प्रदेशात जाऊन तिथलं ‘वूड वाइड वेब’ समजावून घेण्याचा प्रयत्न करत होते. सगळंच समजणार होतं असं नाही. पण मी शक्‍य तेवढं सगळं माझ्या डोळ्यांच्या झोळीत सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते. जे बघत होते, त्याचं मनःपटलावर काय चित्र उमटतं ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. जे उमटत होतं त्यातलं काही शब्दरूपानं बाहेर पडावं अशी माझीच अनिवार इच्छा होती. तेव्हाच तर बघणं पूर्ण होणार. नुसत्या डोळ्यासमोर गोष्टी आल्या म्हणजे बघितलं असं थोडंच होतं? झेन सीइंग झेन ड्रॉइंगचं हेच मर्म आहे. बघणं अधिक अर्थपूर्ण करण्याची कला, त्या बघण्याला शब्दाची किंवा चित्राची जोड देणं म्हणजे दृश्‍याला दिलेली टाळी... किंवा समेवर उठलेला हात! त्याच आनंदाच्या प्रत्ययासाठी ही मनावनातली गोष्ट! 
(क्रमशः)

संबंधित बातम्या