तुम्हीको दोष दूंगी, ऐ नजारों... 

मृणालिनी वनारसे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मनावनातल्या गोष्टी 

थोडं अजून वर गेल्यावर पीच, प्लम, जर्दाळूच्या फुलांनी डवरलेली झाडं दुतर्फा दिसू लागली. खिले खिले फुलोंसे भरी भरी वादी, रात ही रातमें किसने सजायी। केवळ चित्रांत किंवा कॅलेंडरवर दिसणाऱ्या दृश्‍यात आपण जाऊन दाखल होणं म्हणजे काय याचा अनुभव! ‘बघणं’ सांगत होतं, ही झाडं काही मूळची इथली नव्हेत. पण इथल्या भूचित्रात अलगद जाऊन बसली. कुमाऊचा हा प्रांत म्हणजे फळांची परडीच! फळं अजून लांब होती. माझी परडी फुलांनी भरली होती. आपल्याकडं हा ‘इष्टापुरी खाऊ’ पूर्वी मोठी चैन समजली जायचा. आता दुकानं भरलेली असतात. तेवढी इकडं फुलं वाढली नव्हे काय? असा सगळा विचार करतासुद्धा फुलं आपल्यावर करायची ती जादू करत राहतात. मी ही न राहवून अगदी गाडी थांबवून फुलांची ती नाजूक डहाळी हातात धरली. फुलांना हात लावायचं धैर्य होणार नाही. ती फारच नाजूक असतात. बघूनही कोमावतील! पुढं त्यांची गर्दी अजून अजून वाढू लागली. आता मी फुलांच्या राज्यात आले आहे याची मला खात्री पटली. थंडीही दर वळणाला वाढत होती की काय न कळे! यथावकाश आम्ही एका वळणावर थांबलो. दिनेशभाईंनी गाडी थांबवली. 

त्या सुंदर वळणावर गाडी थांबवायला माझी काहीच हरकत नव्हती. मी बाहेरचं दृश्‍य बघायला सरसावणार तेवढ्यात दिनेशभाई म्हणाले, ‘आ गया..’ आ गया? क्‍या आ गया? समोर विस्तीर्ण पसरलेली दरी दिसत होती. एक - दोन घरं दिसत होती. तिथं पाणी तापत असावं. धूर दिसत होता. बाकी बुरास आणि प्लम, पीच, जर्दाळूचे रंगीत ठिपके इकडं तिकडं सांडले होते. पाइन चमकत होते. ‘आपको इधरही जाना है।’ दिनेशभाईंनी माहिती पुरवली तशी मी चमकले, हरखले. कशी? नेमकं कुठं जायचं होतं मला? अचानक कुठूनशी दोन पोरं प्रकटली. ‘ज्योदी के घर जाना है ना?’ एकानं सरळ उचलून माझी सॅक पाठीवर घेतली. ‘अरे अरे ये क्‍या कर रहे हो? मै उठा लूंगी..’ ती पोरं, म्हणजे रवी आणि खुशबू इतके बारकुसे दिसत होते की त्यांनी माझं हलकं का होईना पण सामान वाहायला नको, असंच मला वाटत होतं. दिनेशभाईंनी जरा बुजुर्गगिरी दाखवत सांगितलं.. ‘वो ले लेंगे। आपको रास्ता मालूम नही, आप उनके साथ जाईये।’ ही आज्ञा प्रमाण मानून त्यांचा निरोप घेऊन मी निघाले. पाठीवर आणि हातात माझं सामान घेतलेली ती दोन मुलं, हिमालयाच्या त्या घसरड्या पाउलवाटेवरून तुरुतुरु जाऊ लागली. मी बेतानी पावलं टाकत, त्यांच्याशी बोलत रस्ता उतरू लागले. 

बोलताना लक्षात आलं, की आमची मैत्रीण आणि गावातले सगळेच असेच पाऊलवाट चालूनच आपापल्या घरी पोचतात. दुसरा मार्गच नाही. कोणाच्याही घरापर्यंत रस्ता जात नाही. सामान-बिमान वाहायचं असेल, तर खेचरं मिळतात. एकतर इथं रस्ता काढणं अवघड आणि नंतर कळलं, की रस्त्यात जमीन कुणाची जाणार हाही प्रश्‍न होता. गावात एकूण रस्त्याला अनुकूल मत नव्हतंच. रस्ता आला, की आपल्या गावाचं ‘अल्मोडा’ होईल अशी भीतीही एका गावकऱ्यानं माझ्यापाशी व्यक्त केली. किती खरी गोष्ट! पण मग आजारी, अपंग? वेळेला कसं जावं? अशा वेळी पालखी करून नेतात. मला वाटलं, मी जिथून आले तिथं मेट्रोनं शहर उकरून ठेवलं आहे आणि इथं अजून पूर्वजांची रीत ओसरली नाही. पालखी करून नेताहेत. पण धडधाकट माणसाला तर ही चाल नक्कीच सुखावह. घर येईपर्यंत मी छोटा ओढा ओलांडला, शेताच्या बांधावरून चालले, दोनदा उतरून चढून आले.. आणि हिमालयाची हवा आपल्याला कितीही श्रम झाले तरी कसं ताजंतवानं ठेवते याचा अनुभव घेत ज्योदीच्या घरी पोचले. 

गळाभेट आणि सुरवातीचे माझे आश्‍चर्य-आनंद उद्‌गार सोशिकपणं ऐकून घेत ज्यो म्हणाली, ‘दमली असशील तू, पण तुझी तयारी असेल तर पटकन आवरून माझ्याबरोबर चल. आज होली आणि महिला दिनानिमित्त कार्यक्रम आहे ऑफिसात. परिसरातल्या बायका येणार आहेत. मुलं येतील. गाणीबिणी होतील. येणार का?’ 

माझ्यावर तो परिसर, तिथलं सौंदर्य, तिथली वस्ती हे सगळं इतकं धडाधड कोसळत होतं, की मी सगळ्याला आनंदून ‘हो’ म्हणत होते फक्त! आवरून निघालो, तो चाळीस मिनिटांचा रस्ता, म्हणजे पाऊलवाट. असंच आधी एक उतार उतरून ओढा ओलांडा, मग एक चढ चढा, मग थोडी सपाटी, तिथं बुरासची झाडं आपली माया पसरून बसलेली असतात. त्यांच्या मायेत अडकू नका. पुढं एक गुंफा लागेल. एखादं हरीण, तरस नाहीतर वाघोबाची स्वारीसुद्धा इथं रात्री येऊन झोपत असेल. ज्यो म्हणाली, ‘इथं बायकापण येऊन बसतात, पाळी चालू असलेल्या बायका. त्यांना आवडतंच इथं येऊन बसायला आणि गप्पा मारायला...’ 

मी ऐकत होते. काळात मागं चालले होते, की काळ इथं थांबला होता? माझे पाय महिलादिनाच्या कार्यक्रमाच्या दिशेनं पडत होते. पाइनच्या जंगलातून उतरत उतरत ज्योचं ऑफिस आलं. मला कौतुक वाटलं.. ‘तू अशी रोज ये - जा करतेस?’ मी विचारलं. तिनं हसून मान डोलावली. मला माझी कामाला जायची वाट आठवली. रस्ता, गर्दी, ट्रॅफिक, हॉर्न्स, भयकांतारातूनच जातो माझा रस्ता! ज्योचं बरंय!

आतमध्ये मुलं यायला सुरवात झाली होती. थोड्या वेळात सगळ्यांनी फेर धरला आणि ‘झोडा’ गीत गायनाला सुरवात झाली. ही इथली पारंपरिक गीतं. बरीचशी पहाडी भाषेत होती. पहिली एक-दोन वसंत आगमनाविषयी असावीत. शब्द नीटसे कळले नाहीत. नंतरची मात्र हिंदीमिश्रीत होती.. ‘जल कैसे भरू यमुना गहरी’ आणि ‘अहा री सीता वन मी अकेले कैसे रहेगी’ असे त्यांचे शब्द होते. माझ्या मनात आलं, या सगळ्या पहाडी कन्या, यांनी बर्फाळ झऱ्यातून पाणी भरलं, रानावनातून वर्षानुवर्षं जळण वाहून आणलं, मग ते पाळीचे दिवस असोत नाहीतर गर्भारपणाचे! यांना सीतेची काळजी वाटते आहे... यमुनेच्या डोहाची भीती वाटते आहे. बायांची मजा आहे... गाण्यांची मजा आहे. 

गुजीया खाऊन आणि गोड चहा पिऊन कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यावर घरी जाताना अंधारून आलं आणि थोडी पावसाची लक्षणंदेखील दिसू लागली. तेव्हा मी न राहवून ज्योला म्हटलं, ‘अगं, या रानवाटेनं अशी एकटी हिंडतेस, वाघाबिघाची भीती नाही का वाटत? की नाहीच आहे या परिसरात वाघ?’ मला इथं आल्यापासून आपण जिम कोर्बेटच्या प्रदेशात आहोत असं सारखं मनात येत होतं. हलद्वानी, कालाढुंगी ही त्याची गावं लांब राहिली होती, पण होता तर कुमाऊ जंगलाचाच प्रदेश! इथं वाघ नक्की असणार असं माझं मन मला सांगत होतं.

‘नरभक्षक वाघ सगळे जिम कोर्बेटबरोबर निघून गेले. इथं वाघ आहे, पण त्यानं अजून कधी माझ्यावर हल्ला केला नाही...’ ज्यो हसून म्हणाली. मी भरभर पावलं उचलली. 

या संपूर्ण मुक्कामात मी या छोट्याशा दरीच्या बाहेर पडणारच नव्हते. काही काळासाठी ही दरी हेच माझं चिमुकलं विश्‍व होतं. बाहेर जाण्याचे रस्ते फक्त पाऊलवाटांचे होते. मला बाहेर जाण्याची घाई नव्हती. मी इथं सावकाश समोर येईल तसं आणि तेवढं निसर्ग-जीवन न्याहाळत होते. ती दरी मी हळूहळू ओळखीची करून घेत होते. 

एकदा सकाळी सकाळी शेजारची नेहा दोन कॅन घेऊन निघाली. ‘कुठं निघालीस?’ असं मी विचारल्यावर म्हणाली, ‘नौला.’ नौला असं म्हटल्यावर माझे कान टवकारले. नौला ही इथली झऱ्यांवरची पारंपरिक पाणीव्यवस्था. मी याविषयी आधी वाचलं होतं, पण नौला पाहिला नव्हता. नौला अगदी पाच मिनिटांवर आहे, असं म्हटल्यावर मी चहाचा कप आणि उबेचा मोह सोडून उठले आणि तिच्यासोबत गेले. नौला ही डोंगरात राहणाऱ्या लोकांची अगदी खास परंपरा आहे. डोंगरातल्या रहिवाशांना ठाऊक असतं, की पाणी उताराच्या दिशेने नुसतं धावत नाही तर वाहताना अनेक जीव फुलवतं. आपल्याला जसं पाणी लागतं तसं आपल्या खाली राहणाऱ्या मंडळींनाही लागतं. तेवढंच स्वच्छ आणि पुरेसं. डोंगरात कधी कोणी पाणी पूर्ण अडविण्याची भाषा करत नाही. पाणी हे वाहिलंच पाहिजे आणि वाहता वाहता त्यानं आपली तहान शमवली पाहिजे. जिवंत झऱ्याचं पाणी म्हणजे काही केवळ भौतिक गोष्ट नाही. झाडामुळातून हे आलेलं पाणी तहानेला चांगलं; तसंच ते औषधी आहे असंही मानण्याची पद्धत आहे. सह्याद्री, सातपुडा, हिमालय सर्व डोंगररांगांमध्ये पाणीविषयक हेच शहाणपण मी पाहिलंय. पण माणसांना पिण्याचं पाणी उघड्या ओढ्यापेक्षा वेगळं हवं, झाकलेलं हवं. ओढा, नदीचं पाणी इतर वापराला ठीक! पण पिण्याचं पाणी जपायचं कसं? नौला ही अशी व्यवस्था आहे, जिथं एखाद्या वृक्षाखालून येणारं पाणी वर एक छोटा आडोसा करून झाकलं जातं. तिथं गाईगुरं तोंड घालू शकत नाहीत. ही जागा पूज्य समजली जाते. नव्या नवरीला इथं दर्शनाला आणलं जातं. वर्षभर या नौल्यात पाणी राहतं. डोंगराच्या पोटातलं पाणी हे! पावसाचं तसंच वितळलेल्या बर्फाचं! वर्षभर इथं पाण्याला ददात नाही. मी या परिसरात एक हॅंडपंप असा पाहिला, की ज्यातून पाण्याची चांगली मोठी धार सतत वाहत राहते, कोणीही हापसत नसतानासुद्धा. इतकं पाणी. एक अट आहे. दिल्ली, लखनौ, मुंबईतून गेलेली मंडळी तिथं मोठमोठ्या टाक्‍या बांधताहेत. हजारो लिटर पाणी स्वतःसाठी साठवताहेत. हे रेनवॉटर हार्वेस्टिंग नाही. ओढ्याचंच पाणी वळवताहेत. असं झालं तर नौला व्यवस्था तर बंद पडेलच; पण इथल्या जंगलाचा आधीच नाजूक आणि कमकुवत असलेला पोतही विस्कटून जाईल. इकॉलॉजीवाल्यांना अशी दुःस्वप्नं लगेच पडतात! आज हे वाहते झरे, नौले, माझ्यासमोर आहेत आणि अगदी सुदृढ स्थितीत आहेत या वस्तुस्थितीकडं मी निग्रहानं लक्ष द्यायचं ठरवलं. एकदा बघायला लागल्यावर मला बरेच नौले आढळून आले. प्रत्येक ठिकाणची पाणी झाकायची तऱ्हा किंचित भिन्न.. कुठं नौल्यातील पाणी वाघमुखातून बाहेर येतंय, तर कुठं अगदी छप्परसुद्धा नसलेलं एक छोटं कुंडदेखील नौला म्हणूनच दाखविण्यात आलं. 

इथे अंघोळीचा फारसा सोस नाही. फ्लशवाली टॉयलेटं फारशी कुणाकडं नाहीत. कपडे धुवायला मजबूत पाणी आवडतं, पण ती काही अगदी प्राथमिक गरज नाही. इथले ओढे अजून वाहते आहेत, नैसर्गिक सुंदर आहेत यामागं हीच तर कारणं आहेत. अनेक सुंदर पाणपक्षी, छोटे मासे, आणि इतर जीवजिव्हार विविधतेनं हे ओढे जिवंत दिसतात. 

आपली गुरं चरायला सोडून इथं तासन्‌तास ओढ्याकाठी काही न करता बसून राहणारा गुराखी मी पाहिला. मी ही बसलेच होते. पण तो तर काही हा निसर्ग आज न्याहाळत नव्हता. मी पुण्याहून गेलेली असल्यामुळं संवादाची धुरा माझ्या खांद्यावर होती! मी त्याला म्हटलं, ‘मैं महाराष्ट्रसे आयी हूँ। पूना, बंबई, नाम सुना है?’ 

‘हां सुना है। मेरी बेटी बंबई होके आयी है। वो स्कूलमें टीचर है। उनकी टूर गयी थी।’ विडीचा झुरका घेत तो म्हणाला. 

‘अरे वा, और आप?’ 
‘मैं तो यहाँसे बाहर हल्द्वानी देहरादून तक होके आया हूँ। लेकिन हमे वहाँ अच्छा नाही लगता। बहोत भीड है। हमे तो यही पहाडीमें अच्छा लगता है।’ 
‘और बेटी को कैसा लगा बंबई?’ 
‘वो तो पढाती है। उसे तो ये करना पडेगा। उसको अच्छा लगा।’ 
एवढं बोलून त्यानं परत झुरका घेतला. त्याला पुण्यामुंबईविषयी ज्ञानात कोणतीही भर नको होती. मग मी ही चूप बसले. आम्ही दोघंही शतकानुशतकं वाहत असलेल्या त्या निर्मल ओढ्याकडं बघत बसलो... 
  
मी बरोबर एक देवदार घेऊन आले आहे 
ऊर्ध्वबाहू स्थितप्रज्ञ आकाशदर्शी देवदार 
भर रस्त्यातून, विमानातून, गर्दीतून 
तो कसा माझ्यासोबत आला... 
ऊन, आवाज, धुरातून आता मी जेव्हा डोळे मिटते 
तेव्हा तो देवदार माझ्यापाशी उभा असतो 
हलकं हिम त्याच्या शाखांवर सांडलेलं असतं 
चहूबाजूंनी गारठा वेढून राहिलेला असतो 
आणि मातीपासून आभाळापर्यंत मंद सावकाश 
अनाहत प्रवाह चालू असतो 
मी गच्च मिटलेले डोळे उघडते 
आणि वृक्षाची अनुमती मागते 
शतकांचे संचित साठवलेल्या त्या स्थिर खोडाला स्पर्श करते 
आणि त्या प्रवाहाचा नाद ऐकायचा प्रयत्न करते 
हळूहळू गात्रे शांत होतात, हिमकण पसरू लागतात 
आदितालाच्या अनुभूतीने शरीर-मन शांतवतं 
देवदाराने दिलेले शांतवन... 
देवदार आहेच आता माझ्यापाशी 
नगाधिराजाने माझी झोळी देवदाराने भरली 
ती दुबळी ठरू नये एवढीच प्रार्थना 

एकेका जागेच्या, पर्वतांच्या, नदीच्या, माणसाच्या... मनावनातल्या गोष्टी.. गोष्टींतून ‘पाहणं’ घडो. पाहण्यातून मूळ सापडो, गोष्टी संपत जावोत, मूळ रुजत जावो, ही सदिच्छा.

संबंधित बातम्या