कमळाच्या मागं लागली राणी 

मृणालिनी वनारसे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मनावनातल्या गोष्टी
 

‘सरस्वती, सरा, अगं ऊठ. कितीवेळ त्या कमळाकडं बघत बसणार आहेस? मैत्रकांची राजकन्या तू. आपल्या आईवडिलांची एकुलती एक. प्रतिहारांकडं तू लग्न करून जायचीस. तर सगळ्या गावाचा जीव वरखाली होतोय. तुझ्या जाण्याच्या कल्पनेनं आत्ताच बेचैन व्हायला होतंय. आहेस तेवढे दिवस आपल्या मातापित्यांबरोबर बैस. त्यांना तुझ्याशी मनसोक्त बोलू दे. तुझ्या सहवासाचा आनंद त्यांना मिळू दे. राज्यकारभार त्या वृद्ध खांद्यांना नंतर किती काळ झेपणार आहे कुणास ठाऊक?..’ अंबिका बोलत होती आणि सरस्वती - मैत्रकांची राजकन्या, अजूनही कमळावर डोळे खिळवून होती. तिच्या सखीचे शब्द तिच्या कानात शिरत होते, की नव्हते कुणास ठाऊक. 

‘सरस्वती... सरा... अगं काय म्हणतेय मी?’ अंबिका जवळ जवळ ओरडलीच. तेव्हा सरस्वती एकदम दचकून जागी झाली. 

‘अंबिके, कशाला इथली शांतता अशी बिघडवून टाकते आहेस? काय म्हणत होतीस तू?’ सरस्वती भानावर येत म्हणाली. 

‘मी म्हणत होते... जाऊदे. मी घसा फोडून बोलतेय आणि तुला ऐकू येत नाही. ते कमळ नुसतं मूकपणे त्या पाण्यात उभं आहे तर त्याच्याशी अगदी गुजगोष्टी चालल्यात तुझ्या. काय बघतेस तू एवढं त्या कमळाकडे?’ 

सरस्वती हसली.. समोर तळ्यात सौम्य वारा पाण्यावर तरंग उमटवीत होता.. मधूनच पाण्यावर शिरशिरी आणत होता... आणि पाण्यावर उचललेल्या कमलपत्रांच्या सुखद हिरव्या गर्दीतून गुलाबी पांढऱ्या कमळांनी मान वर काढली होती. त्यांचं आरस्पानी सौंदर्य असं, की जवळ जाऊन त्यांना हात लावावा. त्यांच्या त्या तलम मऊ पाकळ्या हाती धराव्या. तो रेखीव पुंकेसरांचा भाग जवळून न्याहाळावा. कोणते मृणाल तंतू त्या देठाला एवढं लवचिक बनवतात ते स्पर्शानं अनुभवावं. पण कमळ आणि आपण यांच्यामधे असतो कोरड्या ओल्या चिखलाचा, कमलवेलीच्या गुंत्याचा अडसर. तो ओलांडून त्यांच्यापर्यंत पोचता येईलही पण या जीवघेण्या प्रयत्नात त्या फुलाच्या दर्शनाची अद्‌भुतरम्यता निघून तर नाही ना जाणार? या दुविध्यात आपण पडलेले असताना ते कमळ आपल्याकडं बघून मिश्‍कील हसतंय असं सरस्वतीला वाटत होतं. पण यातलं काही ती अंबिकेशी बोलली नाही. ती फक्त म्हणाली, ‘या कमळांनी मला वेडं केलंय बघ...’ 

‘हो. माहितीये. ते कोण कुठचे व्यापारी चीन देशाहून आले काय आणि त्यांनी महाराजांना हे कमळ-कांदे नजर केले काय... तेव्हापासून तू जशी काही या कमळांच्या पाशात अडकलेल्या भुंग्यासारखी झाली आहेस. ते कंद रुजले, त्यांना पानं फुटली.. तेव्हापासून तुझे दिवसच्या दिवस आपले या तळ्यापाशीच चालले आहेत. तू त्या कमळांना एकटं सोडणार आहेस की नाहीस?’ 

सरस्वती खळखळून हसली. म्हणाली, ‘कमळांना मी जराही एकटेपणा देत नाहीये हे खरं.. पण ते तरी मला त्यांचं गुपित कुठं सांगतायत? बघ ना, नुसते दुरून मला हसताहेत. तुला आठवतंय ते व्यापारी काय म्हणाले होते? चीन देशात म्हणे कमळांना अमरत्वाचं प्रतीक मानतात. त्यांना पूजतात. बघ ना, हे कंद चीनहून आपल्या देशात एवढा प्रवास करून आले, तरी चिखलाचा स्पर्श लाभल्यावर लगेच उमलले. जणू ते आपल्याला सांगताहेत, आम्हाला उपटा, दुसरीकडं न्या, कुठंही ठेवा, पण पाण्याचा थोडा स्पर्शसुद्धा आम्हाला उमलवायला पुरेसा आहे. देशकाळाची आम्हाला क्षिती नाही. आम्ही आजही उगवू आणि उद्याही! आमचं सौंदर्य असं, की तुमचाही जीव आमच्यात अडकतो. बंदी भृंग्याप्रमाणं मग तुम्हीही आमच्यासाठी सरसावता. आमची काळजी घेता.. तुम्ही आमच्या सौंदर्याचे दास आहात.’ 

‘सरस्वती, सरे, तुझं बोलणं काही कळत नाही गं. अगं काही झालं तरी ती केवळ फुलं. त्यांच्यात एवढं काय अडकायचं?’ अंबिका न राहवून म्हणाली. 

‘त्यात न कळण्यासारखं काय आहे? मला सांग माझं नाव काय आहे?’ 

‘तुझं नाव? अगं ते कुणाला नाही ठाऊक? सरस्वती आहेस ना तू?’ 

‘हो पण तातांनी माझं हे नाव का ठेवलं?’ 

‘कारण तू त्यांना त्या जुन्या नदीची आठवण करून देतेस. गुप्त झालेल्या. त्यांचं असं मानणं आहे, की नदी कधी गुप्त होत नाही.. ती वाहातच राहते.. आपल्याला फक्त तिला शोधावं लागतं... ती आपल्या अंगणात आली तर तिला वाट काढून द्यावी लागते.. तू म्हणजे त्यांच्या वंशी आलेली ती जुनी नदीच आहेस.. नदीप्रमाणं तू वाहती राहशील.. नदी जशी दोन्ही तीरांना फुलवते तसा तू वंश उजळवशील. लग्न करून दोन्ही घरांना सुखी करशील असं त्यांना वाटतं..’ अंबिका एकदम बांध फुटल्यासारखं बोलू लागली तर तिला थांबवत सरस्वती म्हणाली, ‘अगं थांब, किती वाहवत जातेस? तातांपेक्षा तुलाच माझ्या लग्नाची घाई झालेली दिसते..’ 

‘अगं, इथं प्रतिहारांकडून येणाऱ्या दूताच्या स्वागताची तयारी चाललीये आणि तू म्हणतेस मला घाई आहे?’ अंबिका फणकाऱ्यानं म्हणाली. तर हसून तिचा हात हाती घेत सरस्वती म्हणाली, ‘या सगळ्या फार वरवरच्या गोष्टी आहेत बघ.. पाण्यावरच्या तरंगांसारख्या... मला तळ हवाय.. मला अमरपट्टा घेऊन आलेल्या कंदाचं रहस्य जाणून घ्यायचंय..’ 

‘अमरपट्टा? सरे, अमरपट्ट्याचा नाही लग्नबंधनाचा विचार कर..’ अंबिका कळवळ्यानं म्हणाली. तशी अधिकच हसत राजकन्या म्हणाली, ‘तो तू कर. मला काय वाटतं माहितीये? हे राज्य, राजघराणी, वैभव, मानमरातब, ज्या सगळ्याला आपण गच्च मिठी मारून बसलोय ना, ते आपल्याला लवकरच सोडून निघून जाणार आहे. मला त्याच्या आत कमळाचं रहस्य जाणून घ्यायचंय. कारण ते मात्र रुजायचं थांबणार नाहीये. कदाचित अजून खूप खूप वर्षांनी हेच कमळ अजून कुठंतरी रुजलेलं असेल. तिथल्या कुणा राजकन्येला आपल्या सौंदर्याची भुरळ घालत असेल. अमरत्वाचं गुपित घेऊन दिमाखात उभं असेल.. तेव्हा मी नसेन.. पण हे कमळ मात्र इथल्याही आठवणी पोटात घेऊन पुन्हा उगवायला सज्ज असेल.. नाही नाही.. अंबिके.. मला वाटतं.. या कमळाएवढं आश्‍चर्य मला जगात कशाचंही वाटणार नाही.’ 

‘अगं पण कमळच का? हा समोरचा डोंगर बघ, हा दगड बघ, ही माती... सगळेच तर आहेत इथं वर्षानुवर्षं.. आणि असणार आहेत. मग कमळाचंच एवढं कौतुक का?’ 

राजकन्येनं स्मित केलं आणि म्हणाली, ‘बघ त्याच्याकडं, तो सुकुमार हिरवा देठ बघ, ती तजेलदार हिरवी पानं बघ.. त्या प्रकाश प्यालेल्या पाकळ्या बघ.. काय दिसतं तुला?’ 

‘असं दिसतं... की तुला वेड लागलंय.. आणि मी लवकरच ही कमळं इथून हलवण्याची विनंती महाराजांना करणार आहे. एकदा ही कमळं इथून गेली की तुझं दुसऱ्या कशात लक्ष लागेल. माझं म्हणणं महाराजांना नक्कीच पटेल...’ अंबिका निश्‍चयी स्वरात म्हणाली. तशी राजकन्या कासावीस झाली. 

‘नको गं असं करूस,’ ती म्हणाली, ‘तुझ्या शब्दावर तात लगेच विश्‍वास ठेवतील.. अजून थोडे दिवस फक्त.. अजून थोडेच दिवस..’ ती शून्यात नजर लावून म्हणाली. 

‘पण सरे, तुझं हे वेड.. मला भीती वाटते. तुझ्या खांद्यावर आपल्या राज्याची धुरा आहे हे ठाऊक आहे ना तुला? प्रतिहारांबरोबरचा हा लग्नसंबंध महाराजांनी काही एका कारणानी योजलाय याचं भान आहे ना तुला? आपल्या ढासळत्या राज्याला संजीवनी देणं आता फक्त तुझ्या हातात आहे सरस्वती...’ 

‘हे ठाऊक नाही असं वाटतं का तुला अंबिके? मला कळायला लागलं तेव्हापासून हे वास्तव माझ्या अवतीभवती आहे. मी एकुलती एक मुलगी. राज्याला राजकुमार नाही. मी कायम अपेक्षांच्या ओझ्यात वाढले. सतत याचा विचार करत राहिले, की काय करून माझ्या राज्यासाठी मी काही करू शकेन? राजकुमार नसल्याची तातांची आणि राज्याची खंत पुसू शकेन! मी सुंदर आहे हे मला यथावकाश कळलं. हे सौंदर्य म्हणजे राजकारणाचं प्यादं असेल हे मात्र कळायला मला उशीर झाला. प्रतिहारांचा राजा माझ्याशी लग्न करायला उत्सुक आहे. पण त्याला तर मी कधी पाहिलासुद्धा नाही. त्याला एक राणी होती म्हणतात.. तिचं काय झालं मला माहीत नाही.. मला सगळ्याची खूप भीती वाटते... जीव घुसमटायला लागला.. आणि या सगळ्यात हे कंद माझ्या हाती आले. शाश्‍वततेचं रहस्यच जणू माझ्या हाती आलं.. भवतालाकडं वेगळ्या दृष्टीनं पाहायला शिकवलं मला या कंदांनी अंबिके.. आणि तू याला वेड म्हणतेस? वेडच असेल तर ऐक, प्रतिहारांसाठी माझा निरोप आहे. मला जाताना माझी कमळं बरोबर घेऊन जायची आहेत. माझं वेड जोपासायचंय. ही कमळं सुखात राहू शकतील अशी तळी, जलाशय आहेत ना त्यांच्या राज्यात? मुक्त वाहिनी नद्या आणि जलाशयं असतील तरच मी लग्न करेन. अंबिके, जाऊन सांग माझा निरोप....’ आपलं हृद्‌गत असं झरा फुटल्यासारखं सांगून राजकुमारी शांत बसली. तिच्या कपाळावरची शीर उडत होती.. चेहऱ्यावर निश्‍चय दिसत होता. 

कमळाच्या पाठीमागं लागलेल्या त्या भावी राणीकडं अंबिका बघतच राहिली.

संबंधित बातम्या